अनघड.. अवघड : वय वर्षे तेरा ते एकोणीस Print

altमिथिला दळवी , शनिवार , ७ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रवासातला ‘मूल’ ते ‘जननक्षम प्रौढ’ हा ठसठशीत टप्पा. लैंगिकता आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल मुलांच्या मनात  लहानपणापासूनच कुतूहल आणि शंका निर्माण होत असतात. 'अनघड.. अवघड..पौगंड'  या महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणाऱ्या सदरातून आपण याच बदलांविषयी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तुम्ही तुमच्या मुलांशी या बदलांविषयी कसा संवाद साधलात, ते आम्हाला नक्की कळवा.


कामाच्या निमित्ताने शाळकरी मुलं आणि त्यांच्या पालकांशी माझा नेहमी संपर्क येत राहतो. आजची आईबाबांची पिढी अनेक बाबतीत अतिशय सजग असलेली दिसून येते. आपल्या मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ, मुलांना उपलब्ध करून द्यायच्या संधी, त्यांना आजूबाजूच्या जगाचं, त्यातल्या घडामोडींचं भान असावं या सगळ्याबाबत. त्यासाठी मुलांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्न करणारे पालक अगदी निमशहरी-ग्रामीण भागांतही दिसतात. आज प्रत्येकजण आपापल्या परीने मुलांच्या उत्कर्षांसाठी सर्वतोपरी झटताना दिसतो. काही वेळा आपल्याला एखादी गोष्ट हाताळायला कठीण जाते आहे असं वाटलं, तर अनुभवी, त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींशी बोलणं, हे आता शहरांमध्ये तरी रुजू लागलं आहे. याबाबतीत अतिशय मोकळेपणाने आपल्या अडचणी मांडणारे अनेक आईबाबा माझ्या पाहण्यात आहेत.
मुलं टीन एजमध्ये (पौगंडावस्था- तेरा ते एकोणीस हे वय) येऊ लागली, की आईबाबा आणि मुलांच्या पिढीत एक विचित्र ताण येऊ लागतो. बरेचसे पालक ते ताण कुठे आणि कसे दिसून येतात, हे नीटपणे मांडूनही दाखवतात. अभ्यासातलं लक्ष कमी होणं, समवयस्क मित्रमंडळींचा प्रभाव (पिअर प्रेशर), अस्वच्छता, शिस्त न पाळणं, वेळा न पाळणं, या आणि अशा अनेक गोष्टींवरून घरात होणारे वाद हे बऱ्याचदा त्या ताणांचं मूळ असतं.
मुलांच्या वेगळ्या वागण्या-बोलण्यामागे, त्यांच्या बदलत्या मूड्स मागे ‘बोलविते धनी’ शरीरातले बदलते हार्मोन्स असतात, हे तर आता सर्वज्ञात आहे. या हार्मोन्सचा दृश्य परिणाम म्हणजे मुलांची झपाटय़ाने होणारी शारीरिक वाढ आणि शरीर वैशिष्टय़ातले लक्षणीय बदल. ‘मूल’ ते ‘जननक्षम प्रौढ’ या प्रवासातला हा ठसठशीत टप्पा. लैंगिकता आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल मुलांच्या मनात अपार कुतूहल आणि शंका निर्माण करणारा हा काळ. या काळात मुलं (मुलगे आणि मुली) संभ्रमित (कन्फ्युज्ड) आणि गोंधळलेली असण्यामागचं हे एक मुख्य कारण. ‘याबाबतीत काही बोलला आहात का मुलांशी?’, असं आम्ही विचारतो, तेव्हा साधारणपणे काय उत्तरं मिळतात?
‘‘आता काय बोलायचं! हल्लीच्या मुलांना माहीतच असतं की, सगळं- टी.व्ही., सिनेमा आणि इंटरनेटमुळे.’’
‘‘सॅनिटरी नॅपकिनच्या कंपनीची लोकं आली होती शाळेत, त्यांनी सगळं नीट समजावून सांगितलं आहे मुलींना.’’
‘‘अजून लहान आहेत हो मुलं, एवढय़ातच काय सांगायच्या या गोष्टी त्यांना?’’
‘‘कशाला काय बोलायला हवं? योग्य वेळ येताच कळतात आपोआप सगळ्या गोष्टी. आपल्याला कुणी काय सांगितलं होतं?’’
‘‘आम्ही या विषयावरची पुस्तकं आणि एक सी.डी. आणली आहे. त्याने अमुक तमुकचं एक व्याख्यान पण ऐकलं आहे, या विषयावरचं.’’
‘‘बोलायला हवं हे कळतं, पण कुठून आणि कशी सुरुवात करायची हेच कळत नाही.’’
विषय अर्थातच बोलायला अवघड आहे. त्यांच्या टीन एज काळात आईबाबांच्या पिढीशी कुणी मोठी व्यक्ती मोकळेपणानं बोलली असेल ही शक्यता विरळा. त्यामुळे मुळात पालक मंडळीच अवघडून गेलेली असतात. म्हणूनच कदाचित आज शाळेत मुलांना सेक्स एज्युकेशन दिलं जातं आहे. हे कळल्यावर आपल्यापैकी अनेकांना हायसं वाटतं. आपल्याला वाटतं आपल्या मुलाला आवश्यक ती सर्व माहिती मिळेल आणि मग आपल्याला मुलाबरोबर ते अवघडून टाकणारं, संकोच वाटणारं संभाषण करायला लागणार नाही.
पण लवकरच लक्षात येतं की, अशा बहुतेक वर्गामधून आपल्या मुलांना फक्त प्रजनन संस्थेबाबत (रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम) माहिती दिलेली आहे. लैंगिकतेसंबंधी (सेक्शुअ‍ॅलिटी) त्यांच्याशी फारसं बोललं गेलेलं नाहीय. वाढत्या मुलांना आपल्या वयात येणाऱ्या शरीराबद्दल, संवेदनांबद्दल कसं वाटतंय, आजूबाजूला सेक्ससंबंधी त्यांना टी.व्ही., वर्तमानपत्रांत जे पाहायला, ऐकायला मिळतं त्याबद्दल त्यांनी काय समजावं, त्यांची काय प्रतिक्रिया असावी, त्यांनी कसं वागावं, बरोबर काय आणि चूक काय- हे काहीच शिकवलं जात नाही.
लैंगिकतेची व्याप्ती इतकी मोठी, गुंंतागुंतीची आणि रोजच्या आयुष्याशी संबंधित आहे, की माध्यमांवर विसंबून आणि लैंगिकतेला अनुल्लेखाने टाळून भागणारं नाही. लैंगिकता हा विषय केवळ समागमाच्या क्रियेशी संबंधित नाही, तर सेक्सविषयीचा दृष्टिकोन, शरीरात होणाऱ्या बदलांप्रतीच्या भावना, रोमॅण्टिक भावना, लैंगिक कल्पनाविलास (सेक्शुअल फॅण्टसीज), अन्य लिंगाच्या व्यक्तींविषयी वाटणारं आकर्षण, शरीरस्पर्श, हस्तमैथुन, न्यूनगंड, समाजातील रूढी, निषिद्ध गोष्टी- अशा अनेक पैलूंचा त्यात समावेश होतो. आणि एकदा हे समजून घेतलं, की वाढत्या वयाचा केवढा मोठा हिस्सा लैंगिकतेसंबंधीच्या घडामोडींनी व्यापलेला असतो, याचा अंदाज करता येतो.
अनेक वेळा रूढ लैंगिक शिक्षण हे केवळ लैंगिक अवयव आणि समागम यांची शास्त्रीय माहिती देण्यापुरतं मर्यादित राहतं, पण त्याच्याशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या भावनिक बाबी अनुत्तरितच राहतात. अनेकदा मुलांना स्वत:च्या शारीरिक बदलांबद्दल, दुसऱ्या व्यक्तींबद्दल वाटणाऱ्या खास भावनांबद्दल संकोच वाटत राहतो. अवघडलेपणा येतो. या गोष्टी कुणाकडे बोलू नये असं वाटतं, क्वचित कधी अपराधीही वाटत राहतं. कित्येक वेळा आपल्याला नेमकं काय वाटतं आहे, हे मुलांचं मुलांनाही कळत नाही.  त्यातून अनाठायी भीती, संकोच, आक्रमकता, आततायीपणा, राग अशा भावनांचा उद्रेक होऊ शकतो. मुलांची ही अवस्था बराच काळ चालू राहू शकते.
आज माध्यमांच्या जगातल्या क्रांतीमुळे (इन्फर्मेशन एक्सप्लोजन) कोणे एके काळी पौगंडावस्थेशी संबंधित असणारे हे प्रश्न, फार लहान वयात मुलांच्या घरीदारी येऊन थडकले आहेत. एकतर वयात येण्याचा टप्पा दिवसेंदिवस अलीकडे सरकत चालला आहे आणि अनेक प्रकारच्या योग्य अयोग्य गोष्टींचा मारा लहान वयातच होतो आहे. त्यामुळेच पालक म्हणून आपल्याभोवतीचे प्रश्नही गुंतागुंतीचे होत चालले आहेत.
लैंगिकतेसंबंधीच्या अनेक बाबतीत कुटुंब म्हणून आपण काय मूल्यव्यवस्था मानतो, याच्याशी या प्रश्नांचा थेट संबंध आहे. आज बाहेरच्या जगात सेक्शुअल मूल्यांबाबत असंख्य गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, आव्हानं आहेत. आपली मुलं या सगळ्याला एकटय़ाने तोंड द्यायला सक्षम नाहीत. त्यांना त्यातून वाट काढायला आपली मदत हवी आहे. रोजच्या जीवनात भेडसावणाऱ्या अनेक लैंगिक प्रश्नांशी झगडताना, त्यांना आपला आधार हवा आहे, आपल्याशी सहज बोलता यायला हवं आहे.
त्यामुळे अगदी लहान वयापासून शक्य असेल तेव्हा लैंगिकतेबद्दल आणि त्या अनुषंगाने मूल्यव्यवस्थेबद्दल मुलांशी बोलत राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे थोडी आपली कसोटी पाहणारं असू शकतं. त्यात एकदा बोलून संपून जाणारा हा विषय नाही. रोज नव्या स्वरूपात या संबंधी आव्हानं आपल्या आजूबाजूला उभी राहत असतात. त्यामुळे मुलांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना उमजेल आणि आपल्यालाही जमेल अशाप्रकारे संवाद साधत राहणं, हा त्यातला खरा कळीचा मुद्दा आहे. याच सगळ्या पैलूंबद्दल या सदरातून आपण वर्षभर बोलणार आहोत. एका अनघड वळणावरचा आणि अवघड वाटेवरचा प्रवास आपल्याला करायचा आहे. असा प्रवास करू इच्छिणारे आपण अनेक जण आहोत. हा प्रवास सोपा जरी नसला तरी अवघडही नाही. आपण या प्रयत्न करून पाहणार आहोत!
( हे सदर दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रसिद्ध होईल)