अनघड अवघड : योग्य वेळ.. Print

आई - बाबा तुमच्यासाठी
मिथिला दळवी - शनिवार, ३ मार्च २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altलैंगिकतेसंदर्भातल्या अनेक गोष्टींतील योग्य काय, अयोग्य काय हे मुलं आपोआप समजून घेतील, असं गृहीत धरणं, ही पळवाट आहे. म्हणून मुलांशी जसजसे संदर्भ येत जातील तसतसा संवाद साधणं गरजेचं आहे. मुलांच्या वाढण्याचा सगळाच काळ ‘योग्य वेळ ’ असतो.
गेल्या जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि पाचवीतल्या एका मुलीच्या आईचा फोन आला. ‘‘माझ्या मुलीच्या  वर्गातल्या एका मुलीला शाळेतच पाळी सुरू झाली आणि त्यावरून माझी मुलगी मला प्रश्न विचारून भंडावून सोडते आहे. ती मुलगी जरा मोठीच आहे हो वर्गात, पण आमचीचं हे काही वय आहे का तिला ही सगळी माहिती देण्याचं? तुम्ही तिला समजावून सांगा की, योग्य वेळ आली की आई तुला सगळी माहिती देणारच आहे.’’
‘‘योग्य वेळ म्हणजे साधारण केव्हासं अभिप्रेत आहे तुम्हाला?’’ मी विचारलं. ‘‘ती बारा वर्षांची झाली की.’’
नववीत गेलेल्या एका मुलाची आई भेटायला आली होती. मुलगा सैरभैर, बिथरल्यासारखा झालेला. आठवीत परीक्षेतले मार्क्‍स अगदीच कमी झालेले. आई अतिशय काळजीत होती. तिच्याशी बोलताना विचारलं, ‘‘या वयात मुलांच्या शरीरात, भावविश्वात होणारे बदल याबद्दल काही बोलला आहात का त्याच्याशी? आईनं पटकन सांगितलं, अहो, मी त्यासाठी सगळं आणून ठेवलं आहे, अमुकची पुस्तकं, तमुक संस्थेची  सीडी. योग्य वेळ आली की मी देणारच आहे त्याला हे सगळं. त्याच्यासाठीच तर आणलं आहे ना?’’
‘‘ही योग्य वेळ म्हणजे नेमकी कोणती?’’ हे विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘म्हणजे दहावीची परीक्षा झाल्यावर! तेव्हा त्याला भरपूर मोकळा वेळ असेल ना, तेव्हा देईन हे सगळं. आत्ताच हे सगळं कळून काहीतरी भलतंसलतं नको यायला त्याच्या डोक्यात!’’
हे ‘योग्य वेळ’ प्रकरण अनेक जणांकडून ऐकायला मिळतं. याची एक गंमत असते- ‘‘ती वेळ अजून आली नाही,’’ असाच तिचा उल्लेख बहुतेक वेळा होत असतो. ‘ती वेळ आली आहे,’ असं बोलणं क्वचितच होतं. बऱ्याचदा ही योग्य वेळ आली नाही, असं वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे आई-बाबांना स्वत:लाच या विषयावर बोलणं कम्फर्टेबल वाटत नसतं. त्यातून मुलांनी पुढे काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं आपल्याला नीट देता येतील का, अशीही काळजी असते. त्यामुळे हे बोलणं पुढे ढकलण्याकडे कल असू शकतो. आधी उल्लेख केलेल्या दोन्हीही आईंनाही असं वाटत असण्याची शक्यता दाट आहे. यात आणखी एक मेख असते. मुलांशी लैंगिकतेबाबत बोलणं हे केवळ तोंडी संभाषणापुरतं मर्यादित नसतं. आई-बाबांची देहबोली (बॉडी लँग्वेज) मुलांपर्यंत कळत-नकळत अनेक गोष्टी पोहोचवत असते. आवाजातले चढ-उतार, चेहऱ्यावरचे भाव, हालचालीतला मोकळेपणा किंवा अवघडलेपणा हे सगळं मुलांना जाणवत-उमगत असतं आणि याची बिजे अगदी थेट बालपणापासून रुजलेली असतात.अगदी लहान बाळाला त्याच्याशी प्रेमाने बोललेलं, त्याला जवळ घेतलेलं, मायेने आंजारलेलं-गोंजारलेलं समजतं. त्यातून त्याच्या आजूबाजूच्या मंडळींकडून मिळणारं प्रेम, वात्सल्य, राग, चिडचिड या भावनाही समजतात. त्यामुळे बाळाला आंघोळ घालताना शिश्न (पेनिस) किंवा योनीची (व्हजायना) स्वच्छता वर वर आटपून टाकल्यासारखी होत असेल तर ‘हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे’ एवढं बाळाला जाणवतंच. हे अवयव इतर अवयवांपेक्षा वेगळे पडायला इथूनच सुरुवात होते. त्याबद्दल जाणीव-नेणिवेच्या पातळीवर ‘काहीतरी निराळंच’ वाटण्यालाही इथूनच सुरुवात होते.  एवढय़ा लहान वयापासून लैंगिकतेचं शिक्षण हे असं सुरू होतं.मूल लहान असतं तेव्हा शरीराच्या वेगवेगळ्या भागांची नावं त्याला शिकवली जातात - नाक, डोळे, कान वगैरे. या यादीत योनी आणि शिश्न हे शब्द बहुतेक वेळा नसतातच. त्यांच्याबद्दल बोलणं अगदीच टाळता येण्याजोगं नसेल तेव्हा ते ‘नोनी’, ‘सूसूची जागा’, ‘तिथे खाली’, ‘पोपू’ अशा संदिग्ध - अर्धवट उल्लेखातून होतं. मुलं त्यांच्या लैंगिक अवयवांना काय म्हणतात यावर काही वर्षांपूर्वी सातशे इंग्लिश भाषिक मुलांचा एक सव्‍‌र्हे करण्यात आला होता. या सातशे मुलांनी मिळून शिश्नाचा उल्लेख करताना तब्बल पासष्ट वेगवेगळे शब्द वापरले होते.हे असं का झालं असावं? अर्थातच प्रत्येक घरागणिक वेगवेगळ्या गोंडस नावांनी शिश्नाचा उल्लेख होत असणार. मुळात आपण शरीराच्या या भागांची नावंच लहानपणी स्पष्टपणे शिकवली नाहीत, तर नंतर त्याबद्दल काहीही बोलणं आणखी कठीण होत जातं आणि त्याबद्दल मुलांना काही बोलायची वेळ आली की पुन्हा आहेच तो अवघडलेपणा आणि अपराधीपणा. काही वेळा खेळताना लिंगाला लागलं तरी मुलं घरी येऊन ते सांगत नाहीत- तेही यातूनच येतं. अगदी लहान वयात लैंगिक अत्याचारांचे बळी ठरलेली मुलं अनेकदा आई-वडिलांकडे त्याबाबत बोलत नाहीत, याच्या मुळाशी हे असू शकतं.त्यामुळं जितक्या आधीपासून शक्य होईल तेवढं यासंदर्भात मुलांशी बोलणं, त्यानुसार वागणं अगदी आवश्यकच.बऱ्याचदा ‘योग्य वेळ आली की बोलू’ असं म्हणणाऱ्या आई-बाबांचा लैंगिकतेविषयी दृष्टिकोन केवळ  शास्त्रीय माहिती देणं एवढाच असतो. पण या विषयाला अनेक पैलू आहेत. मुलांना माहिती देणं हा त्यातला केवळ वरकरणी दिसणारा एक भाग झाला, पण त्याच्याशी मुलांचं भावविश्व आणि आपली मूल्यव्यवस्था (व्हॅल्यू सिस्टिम) हे अतिशय महत्त्वाचे पैलू जोडलेले आहेत. मुलांच्या जडणघडणीवर खोल परिणाम करणारे हे घटक आहेत. मूल्यव्यवस्था ही अतिशय गुंतागुंतीची गोष्ट आहे. लैंगिकतेच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी- विवाहपूर्व शारीरिक संबंध, गुप्तरोग, नको असणारी प्रेग्नन्सी, संततिनियमन, त्यासाठी असणारी साधनं- त्यातलं योग्य काय, अयोग्य काय, हे मुलं आपोआप समजून घेतील असं गृहीत धरून चालणं, ही तर पळवाटच आहे. त्यासाठी या विषयावर मुलांशी जसजसे आजूबाजूचे संदर्भ येत राहतील तसा संवाद होत राहणं अतिशय गरजेचं आहे. फक्त हा संवाद वयाच्या त्या त्या टप्प्याला अनुरूप असा व्हायला हवा. त्यामुळे मुलांच्या वाढण्याचा सगळाच काळ ही ‘योग्य वेळ’ आहे. ही योग्य वेळ नेहमीच आपल्या आजूबाजूला दारं ठोठावत असते. आपण दारं उघडून तिचं स्वागत करायला हवं. हे स्वागत कसं करायचं ते आपण पुढच्या (७ एप्रिलच्या) लेखात पाहू.
(या संदर्भातील आपले प्रश्न जरूर पाठवा.) मुलं वाढत असताना स्वत: पाहून, स्पर्श करून, आपल्या शरीराच्या एकेका भागाचा अदमास (फील) घेत असतात. यात अर्थातच लैंगिक अवयव आलेच. मुलाच्या दृष्टीने त्यात वेगळं असं फारसं काही नसतं. बाकी भागांसारखा आणखी एक भाग एवढंच, पण लिंगाला हात लावल्यावर हातावर एखादा फटका बसत असेल तर मूल काय शिकतं? पुन्हा तेच! ‘हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे!’ यातून बऱ्याचदा होतं असं की, आजूबाजूला कोणी असेल तर तिथे हात लावायचा नाही, हे मुलाला कळतं. हे वारंवार होत राहिलं तर त्यातून ‘हे योग्य नाही,’ हा अर्थ मूल काढतं. पण म्हणून मूल लिंगाला हात लावणारच नाही, असं होतच नाही. यातून कुतूहल मात्र नक्कीच निर्माण होतं. पौगंडावस्थेत अनेक मुलांना शिश्नाला स्पर्श केला की सुखद तर वाटतं, पण नेमकं त्याच वेळी आपण करतो आहोत हे काही ठीक नाही, अशी खूणगाठ त्या लहानपणापासून हातावर पडलेल्या फटक्यांमुळेही बांधली गेलेली असतेच. या सगळ्याची परिणती एक अपराधी गंडही तयार होण्यात होते.