अनघड अवघड : मुलगा आहे म्हाणून... Print

alt

मिथिला दळवी , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आई - बाबा तुमच्यासाठी
मुलगा वयात येणं हा विषय अनेक कुटुंबांमध्ये जणू ऑप्शनलाच टाकलेला असतो. त्यांच्या लैंगिकतेचं सगळं स्वरूपच अळीमिळी गुपचिळी छापाचं आहे. त्यामुळे दडपण, अस्वस्थता, अवघडलेपणा आणि भीती कायमचीच त्याच्याशी जोडलेली आहे. आई-वडिलांचा आश्वासक आणि परिपक्व दृष्टिकोन मुलाचा आत्मसन्मान कायम ठेवण्यात खूप मोठी भूमिका बजावू शकतो, पण त्यासाठी या विषयावर बोलायची
तयारी हवी.
सा धारण १०-१२ व्या वर्षांपासून शरीरात बाह्य़त: दिसून येणारे बदल हे मुलं वयात येऊ लागण्याचं एक लक्षण असतं. मुलींच्या बाबतीत असे बदल दिसायला लागले की, मुलीच्या कुटुंबातली मंडळी एकदम जागृत होतात. तिची कपडय़ांची निवड, मित्रांबरोबर खेळणं याबाबत जरा जास्तच सूचना तिला मिळायला लागतात. मुळात मुलगी आहे म्हणून पहिल्यापासूनच उठणं- बसणं- वावरणं याबाबत काही ना काही सूचना तिला पहिल्यापासून मिळतच असतात. असं करताना खरंतर कुटुंबातील माणसं काही ना काही मार्गाने मुलीबाबतची काळजीच व्यक्त करीत असतात.
मुलीची शरीररचना मातृत्वासाठी घडलेली. मनुष्य सोडून सगळ्या प्राणिमात्रांमध्ये मादीची संमती वा इच्छा नसेल तर गर्भधारणा होत नाही, पण माणसाच्या मादीला हे स्वातंत्र्य आहेच असं नाही. त्यामुळे नको असताना लादलेली गर्भधारणा किंवा लैंगिक अत्याचाराची टांगती तलवार स्त्रीवर कायम राहिली आहे. मुलीची काळजी करणं यातूनच येतं.
मुलीच्या बाबतीत मासिक पाळी सुरू होणं हा वयात येण्याचा एक ठसठशीत टप्पा असतो. ही घटना फार महत्त्वाची असते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेला सामोरं जावंच लागतं. या संदर्भात आवश्यक ती माहिती मुलीला सहसा दिली जाते. बऱ्याचदा ती अगदीच इलाज नाही म्हणून, गरजेपुरती तेवढीच असते. मुलाच्या बाबतीत मात्र उलटंच होत असतं. मुलांच्या शिश्नाला ताठरता येणं आणि त्यातून वीर्यस्खलन (सिमेन इजॅक्युलेशन) व्हायला सुरुवात होणं, हा खरंतर मुलांच्या वयात येण्यातला मैलाचा दगड असतो- मुलीच्या बाबतीत मासिक पाळी येणं असतो तसाच; पण बहुतेक घरांमधून याची दखलच घेतली जात नाही. घेतली गेली तर त्यावर काहीही बोलणं होत नाही, अगदी चकारही काढला जात नाही.
मुलीच्या बाबतीत वयात येण्याच्या लक्षणांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवणारं कुटुंब मुलाच्या बाबतीत मात्र बऱ्यापैकी उदासीन असतं. १०-११ व्या वर्षांपासून अचानक उंची वाढणं, पावलांचा आकार वाढणं, त्यामुळे चप्पल-बुटाची साइझ सारखी बदलत राहणं, ही खरंतर पौगंडावस्थेची प्रारंभिक लक्षणं असतात. मुलांचे हातपायही बाकी शरीराच्या तुलनेत जास्त लांब वाटायला लागतात. छातीचा- खांद्याचा भाग रुंदावतो, पण कंबर मात्र त्या प्रमाणात वाढलेली नसते. थोडक्यात शरीराची सगळी ठेवणच वेगळी दिसायला लागते. त्यामुळे धडपडणं, हातून सांडलवंड होणं, वेंधळेपणा वाढणं- अशा गोष्टी या काळात मुलांच्या हातून जरा जास्तच होऊ लागतात. मग घरी आणि शाळेत याबाबतीत बऱ्याच तिखट शेरेबाजीला त्यांना तोंड द्यावं लागतं.
मुलाचे प्रत्यक्ष वीर्यस्खलन होण्याच्या बरंच आधीपासून शिश्नाला (पेनिस) ताठरता येणं सुरू झालेलं असतं. अगदी गर्भावस्थेतही ती येऊ शकते. बऱ्याच मुलांमध्ये सकाळी उठायच्या वेळी शिश्न ताठर झालेलं दिसून येतंही. मात्र शुक्राणू (स्पर्म्स) तयार होणं आणि ते वीर्याबरोबर (सिमेन) बाहेर टाकलं जाणं, हे मुलगे वयात आल्यावर घडू लागतं. बऱ्याचदा पहिल्यांदा हा अनुभव झोपेत स्वप्नात (नाइट फॉल) म्हणून येतो आणि तो अंथरुणावर ओलसर डाग पडणं, अंतर्वस्त्र चिकट होणं, अशा अवघडवून टाकणाऱ्या गोष्टी सोबत घेऊन घेतो.
अनेकांना हा अनुभव पहिल्यांदा येईपर्यंत त्याबद्दल धड माहिती नसते, त्यामुळे मनात येणारी पहिली भावना अवघडलेपणा आणि भीतीची असते. त्यापायी कुठे काही बोलायचीही हिंमत होत नाही, पण एव्हाना भिन्न लिंगाबद्दल अमाप कुतूहल आणि आकर्षण तर वाटायला लागलेले असतं. वर ते बोलून दाखवायचीही कुठे सोय नसते. एरवी अगदी जवळचा वाटणारा मित्रही याबाबतीत आपणहून बोलत नाही आणि स्वत:हून विषय उघडायला प्रचंड संकोच वाटत असतो. अशा पराकोटीच्या अस्वस्थ गोंधळलेल्या स्थितीतून मुलं काही महिने- वर्ष जात असतात.
पौगंडावस्थेत कधीही, केव्हाही येणारी शिश्नाची ताठरता हे प्रकरण तर मुलांना अतिशय लाजिरवाणं वाटत असतं. अगदी सिनेमातलं हाणामारीचं किंवा लैंगिक भावना चाळवणारं दृश्य पाहताना, वर्गात तिसऱ्याच कोणाला शिक्षक ओरडताना, डबा खाऊन झाल्यावर हात धुताना, कोणत्यातरी लग्नकार्यात जेवत असताना, अगदी धार्मिक कार्य सुरू असतानाही शिश्न ताठर होतं. बऱ्याचदा मनावर ताण येतो तेव्हा किंवा भीती वाटते तेव्हाही हे होऊ शकतं. परीक्षेच्या हॉलमध्ये पेपर हातात पडेपर्यंत बऱ्याचदा टेन्शन आलेलं असतंच आणि त्यात अचानक शिश्न ताठर झालं की, आणखीनच टेन्शन! अशा परिस्थितीत असं काही होणं हे अगदी नॉर्मल आहे आणि ही ताठरता काही वेळाने आपोआप बसूनही जाते. त्यासाठी विशेष काही करावं लागत नाही, हेही मुलांना माहीत नसतं.
या संदर्भात बऱ्याचदा मुलांना माहिती मिळते ती समवयस्क किंवा थोडय़ा मोठय़ा मुलांकडून. बऱ्याचदा या माहितीचा सोर्स त्यांच्यासारखीच आणखी चार मुलं हा असतो. त्यामुळे त्यात अर्धवट माहिती, अपसमज असायलाही खूप वाव असतो. त्यातली काही माहिती तुकडय़ा-तुकडय़ांनी बनलेली, अधूनमधून येणाऱ्या अचकट-विचकट विनोदाच्या स्वरूपात असते. माझ्या एका ज्येष्ठ स्नेह्य़ांनी या संदर्भात बोलताना सांगितलं, आमच्या घराच्या आसपास राहणारे काही मित्र या विषयावर बोलायचे, नाही असं नाही. त्यातून काहीबाही कळायचंही, पण ते सगळे इतकं अर्वाच्यपणे बोलायचे की त्यातलं काय खरं आणि काय खोटं, हे ठरवताच यायचं नाही. ते सगळे आपली टिंगल करताहेत असं वाटायचं. मजा म्हणजे मोठं झाल्यावर ते ज्या गोष्टी बोलत होते, त्यात बरंच तथ्य होतं असं कळलं, पण लहान वयात मी गोंधळूनच जास्त गेलो होतो.
स्वत:ची भीती, अपराधीपणा यापोटीही अनेक पौगंडावस्थेतले मुलगे या विषयावर जरा जास्तच आक्रमकपणे अचकट-विचकट बोलत असतात.
हस्तमैथुनाच्या (मॅस्टरबेशन) संदर्भातले गैरसमज हा तर न संपणारा अध्याय आहे. पिढय़ान् पिढय़ा डॉक्टर्स, लैंगिक शिक्षणाच्या संदर्भात काम करणारी मंडळी आणि मानसोपचार तज्ज्ञ याबाबत बोलत आले आहेत. या वयात लैंगिक उत्तेजन शमविण्याचा तो एक स्वाभाविक, निरुपद्रवी आणि बिनधोक मार्ग आहे. सगळी माध्यमं असं वारंवार सांगत असतानाही अनेक प्रश्न उरलेले आहेतच.
‘दिवसातून कितीदा करणं नॉर्मल?’, ‘पुन: पुन्हा हेच विचार डोक्यात येत राहतात, तर काय करायचं?’ हे तर मुलांचे खास प्रश्न! मुलग्यांमध्ये यात नॉर्मल म्हणून काही एक ठोस संख्या अशी नसते. त्याबाबत प्रत्येकाची गरज आणि क्षमता वेगवेगळी असू शकते, पण सदासर्वदा त्याचाच विचार करणं, त्याच्या पूर्ण आहारी जाणं आणि हातून दुसरं काहीच घडू न शकणं असं होत असेल, तर मात्र ते काळजीचं कारण असू शकतं. त्यासाठी उपचाराची गरज पडू शकते.
पण ही स्थिती काही एका रात्रीत येत नाही. मुळात ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, ती विकृती नाही, हे मुलांना कळणं फार आवश्यक असतं आणि हे एकदा कुठेतरी वाचून किंवा लैंगिक शिक्षणावरचं व्याख्यान एकदा ऐकून पुरेसं होत नाही. तो विश्वास मुलांना वारंवार मिळावा लागतो, हा यातला फार कळीचा मुद्दा आहे. असं का होतं? मुलांच्या लैंगिकतेचं सगळं स्वरूपच अळीमिळी गुपचिळी छापाचं आहे. त्यामुळे दडपण, अस्वस्थता, अवघडलेपणा आणि भीती कायमचीच त्याच्याशी जोडलेली आहे. ‘मी याबाबतीत नॉर्मल आहे ना? आणि मला भविष्यात समागम जमेल ना?’ या भय आणि गंडापोटी मुलांच्या अनेक पिढय़ा आजवर प्रचंड अशा अदृश्य ताणाखाली वावरल्या आहेत. मुलांच्या मनावरच्या या ताण-तणावांचं आई-बाबांनी भान जागं ठेवल्यानेही त्यांच्या देहबोलीत खूप फरक पडतो. आई-वडिलांचा आश्वासक आणि परिपक्व दृष्टिकोन मुलाचा आत्मसन्मान कायम ठेवण्यात खूप मोठी भूमिका बजावू शकतो, पण त्यासाठी या विषयावर बोलायची तयारी हवी. त्यासाठी संधी शोधायला हव्यात.
मुलगा वयात येणं हा विषय अनेक कुटुंबांमध्ये जणू ऑप्शनलाच टाकलेला असतो. ते तसं न करता त्याला मुख्य प्रवाहात आणायला हवं. पुढच्या लेखात  (४ ऑगस्ट) या संदर्भात आपण बोलू.