निमित्त मात्रेण : घाई कशाला? Print

altवीणा गवाणकर , शनिवार , ४ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altविन्नी मंडेलांच्या निमित्तानं माझं मत पुन्हा एकदा पक्क झालं की जिवंत व्यक्तीचं ‘चरित्र’ लिहू नये. शेवटच्या श्वासापर्यंत माणूस जगत असतो. त्या प्रवासात तो केव्हाही त्याचा सांधा बदलण्याची शक्यता असते. त्याचं वेगळं रूप समोर येऊ शकतं. पूर्वायुष्य आणि उत्तर आयुष्य यातून निर्माण होणाऱ्या प्रतिमा सारख्याच असतील, असं नाही. मग घाई का करा?
केव्हातरी मधूनच घर नीट लावण्याची उबळ मला येते. बरेच दिवस साफसफाई करायची राहून गेलेली असते.

आणि ती असते ती मुख्यत: नंतर बघू, पुढच्यावेळी ठरवू, म्हणून बाजूला ढकलून ठेवलेल्या कागदपत्रांची. मासिकांची. पुस्तकांची! यावेळच्या साफसफाई मोहिमेत माझ्या हाती लागलाय तो १९८८ चा ‘माणूस’ दिवाळी अंक. त्याच्या मुखपृष्ठावर नेल्सन-विन्नी मंडेलांचं छायाचित्र आहे.
ते छायाचित्र पाहिल्यावर माझं मन मला बावीस वर्षे मागे नेतं.
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्ष तुरुंगवासात होते. त्यांची आता सुटका व्हावी म्हणून आफ्रिकी गोऱ्या सरकारविरुद्ध तिथल्या कृष्णवर्णी जनतेचा लढा खूपच तीव्र झालेला होता. आंतरराष्ट्रीय दबावही वाढत होता. पतीच्या अनुपस्थितीत तो लढा विन्नी चालवत होत्या. प्रसिद्धीचा झोत होता तो विन्नींवर. त्यांचा परिचय ‘माणूस’ दिवाळी अंकात करून देण्याबाबत मला विचारलं गेलं आणि मीही उत्साहानं ते काम हाती घेतलं. बरीच माहिती जमवून, अभ्यास करून तो लेख मी पूर्ण केला.
हा अभ्यास करत असताना मी एका वेगळ्या विश्वात होते. विन्नींचा वारंवारचा तुरुंगवास. त्यातही अनेकदा एकांतवास. तिथल्या हालअपेष्टा, उपासमार यांची वर्णने अस्वस्थ करायची. पतीच्या अनुपस्थित आपल्या दोन छोटय़ा मुली आणि नेल्सनच्या पूर्वपत्नीचे तीन मुलगे यांचा सांभाळ करत, तर कधी त्यांना कुणाच्या तरी हवाली करून तुरुंगाच्या वाऱ्या करत विन्नींनी लढा चालू ठेवला होता. एकांतवासाच्या शिक्षेत वेड लागू नये म्हणून त्या पांघरायची गोधडी अख्खी उसवून पुन्हा शिवून काढत. भूक, उवा-पिसवांची संगत, कुटुंबियांचा विरह या साऱ्यानं गांजलेल्या या स्त्रीचा लढा थक्क करणारा होता. गोऱ्या सरकारचे जुलमी कायदे, अन्याय्य शिक्षण पद्धती मोडून काढण्याच्या प्रयत्नात त्यांनी मार्गारेट थॅचरनाही आवाहन केलं. आफ्रिकन सरकारची आर्थिक कोंडी करा, म्हणून हाकाटी लावली. त्यांच्या या धडपडीमुळे जनसामान्यात त्यांना मातेचं आदराचं स्थान लाभलं. आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्येही मानाचं स्थान मिळालं.
विन्नींची ती तडफ, जिद्द, कणखरवृत्ती, धैर्य पाहून मी अचंबित झाले. त्याच सुमारास मुंबईत एएनसी सदस्य, विन्नींच्या सहकारी शांती नायडू यांची वार्ताहर परिषद होणार होती. एका पत्रकार मित्राच्या मदतीमुळे मला तिथे उपस्थित राहाता आलं. शांती नायडूंशी बोलता आलं. त्यावेळी त्यांनी दिलेला विन्नींचा साडीतला फोटो माझ्या लेखासोबत छापता आला.
लवकरच नेल्सन मंडेलांची मुक्तता होण्याची चिन्ह दिसू लागली. विन्नींवरच्या प्रदीर्घ लेखात भर घालून पुस्तक करायचं का, म्हणून दिलीप माजगांवकरांनी मला विचारलं, मी ‘नाही’ म्हटलं. विन्नी तरुण आहेत. अजून खूप काही त्यांच्या हातून घडायचं असेल, म्हणून मला लेखाला पुस्तकरूप देणं योग्य वाटलं नाही.
फेब्रुवारी १९९० मध्ये नेल्सन मंडेलांची सुटका झाली. त्या सुमारासच विन्नींविषयी वेगळ्याच बातम्या कानी येऊ लागल्या. त्यांचा अंगरक्षक आणि त्यांच्या ‘मंडेला फुटबॉल टीम’च्या खेळाडूंनी केलेले हिंसाचार, एका चौदा वर्षीय स्टोम्पी सिपेई नावाच्या मुलाचे अपहरण, त्याची हत्त्या.. वगैरे आरोप त्यांच्यावर झाले. त्यांच्यावर खटला होऊन ते आरोपही सिद्ध झाले.
शेवटी, एप्रिल १९९२ मध्ये विन्नी-नेल्सन विभक्त झाले. ‘पार्ट ऑफ माय सोल’ या चरित्रात्मक पुस्तकात विन्नींनी म्हटलं होतं- ‘आय थिंक, आय अ‍ॅम मोस्ट अनमॅरिड वुमन’ त्याची आठवण झाली.
पण एवढं होऊनही त्यांची जनमानसात ‘मदर  ऑफ द नेशन’ प्रतिमा कायमच होती.
विन्नींच्या सांगण्यावरून एएनसीच्या कार्यकर्त्यांनी स्टोम्पीचा जन्म दिवस साजरा करायचा आणि त्या निमित्ताने त्याच्या आईला भोजन समारंभास बोलवयाचे ठरवले. सगळी तयारी झाली, स्टोम्पीची आईही आली. आल्या नाहीत त्या विन्नी मंडेला. स्टोम्पीची आई म्हणाली, खरं तर मला विन्नीला भेटायचं होतं.बरचं काही बोलायचं होतं.. मी आता सावरले आहे.. मदर ऑफ नेशनला भेटताना मला आनंदच होईल.
मार्च २००७ मध्ये मंडेलांच्या देशात-साऊथ आफ्रिकेला जाण्याचा योग मला आला. जोहान्सबर्गमध्ये तीन महिने मुक्काम होता. तिथलं ‘अपार्थेड म्युझियम’ पाहिलं. ते पाहाताना लेख लिहिताना केलेला अभ्यास आठवला. ‘मंडेला लायब्ररी’तून मॅक्स डु प्रीझ (Max Du Preez) याचं ‘पेल नेटीव’ (Pale Native) वाचायला मिळालं. मॅक्स डु ब्रीझ हे साऊथ आफ्रिकेतले जुने जाणते गोरे पत्रकार. ते  काळ्यांची एएनसी लढय़ाची बाजू घेत म्हणून गोरे वर्णद्वेष्टे त्यांना दूर ठेवत. आणि काळ्यांना ते ‘आपले’ वाटत नसत. म्हणून ते स्वत:ला ‘पेल नेटीव’ म्हणवत. त्यांच्या आत्मचरित्रात विन्नी मंडेलांच्या बाबत नमूद केलेली एक गोष्ट स्मरते. त्या खूप कर्जबाजारी आहेत, त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केलेत असं म्हटलं जातं. पण या प्रवादाची दुसरीही एक बाजू आहे. गोरगरीब लोक विन्नींकडे नाना प्रकारची मदत मागायला जातात. त्यांची नड असते ती अन्न-कपडा-बूट वगैरेंची. त्यांची नड भागवण्यासाठी विन्नी त्यांना स्वत:च्या नावावर दुकानातून त्या गोष्टी उपलब्ध करून देतात. विन्नींच्या खात्यावरची उधारी दिसामासांनी वाढतच जाते. ती फेडायला विन्नींकडे पैसा नसतो. पण त्यांचं म्हणणं- ‘या गोरगरिबांच्या गरजा भागवायच्या कुणी?’- अशा काहीशा अर्थाचा तो मजकूर होता.
तिथे असताना माझ्या मुलाच्या घरी घरकामासाठी येणाऱ्या कृष्णवर्णी बाईला मी विन्नींविषयी विचारलं. तिनं मोडक्यातोडक्या आफ्रिकी इंग्लिशमध्ये सांगितलं- ‘विन्नीला गरिबांचा कळवळा आहे. विन्नी नेल्सनचं कितीही भांडण असो, आमच्यासाठी ती मदर नेशन (मदर ऑफ नेशन) आहे.. तिनं आमच्यासाठी खूप काही केलंय. खूप सहन केलंय.’
विन्नी मंडेलांच्या निमित्तानं हे सगळं आठवलं आणि माझं मत पुन्हा एकदा पक्क झालं- जिवंत व्यक्तीचं ‘चरित्र’ लिहू नये.
शेवटच्या श्वासापर्यंत माणूस जगत असतो. त्या प्रवासात तो केव्हाही त्याचा सांधा बदलण्याची शक्यता असते. त्याचं वेगळं रूप समोर येऊ शकतं. पूर्वायुष्य आणि उत्तर आयुष्य यातून निर्माण होणाऱ्या प्रतिमा सारख्याच असतील, असं नाही. मग घाई का करा?