निमित्त मात्रेण : पण लक्षात कोण घेतं? Print

वीणा गवाणकर - शनिवार, १८  फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altसागरी जीवशास्त्रज्ञ राचेल कार्सन आयुष्यभर पर्यावरणासाठी लढल्या. अर्थात त्यांचा लढा होता पुस्तकाद्वारे. त्यांच्यावर खूप टीका झाली, बदनामी झाली. खरं तर त्यांचा लढा होता तो मानवजातीसाठी, पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वृत्तीविरुद्ध, पण लक्षात कोण घेतो? आजही ही हानी तशीच चालू आहे..
आ पल्याकडे सण- समारंभ- उत्सव- यश- आनंद- निवडणुकीनंतरचे विजयोत्सव (की विजयोन्माद?) व्यक्त करण्यासाठी नव्हे, त्याचं प्रदर्शन करण्यासाठी फटाके उडवणं अनिवार्य होऊन बसलंय.. आणि फटाके न उडवणारा हा मागास, भित्रा, कद्रू वगैरे ठरवला जातोय.हे जरा बाजूला ठेवूया.  गेल्या दिवाळीचीच गोष्ट. पुण्यातल्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात फटाके उडवण्यासंबंधात वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. त्यासाठी खास पान राखलेलं होतं. त्या विविध प्रतिक्रिया वाचता-वाचता एका प्रतिक्रियेची ठेच मनात कळ उठवून गेली. एका युवा मातेनं कळवळून लिहिलं होतं,- ‘लहान मुलांची हौस असतेच ना!.. त्यांचा किती हिरमोड करायचा?.. मोठेपणी समज आल्यावर ती आपोआप फटाके उडवणं थांबवतील.. आत्ताच त्यांचं बाल्य का हिरावून घ्या..’ काहीशा अशाच अर्थाचं ते पत्र होतं.
आपल्या पाल्याच्या बाल्याचा एवढा विचार करणाऱ्या त्या मातेला फटाक्यांच्या दणक्यांनी झोपेतून दचकून उठणारी बालकं; कानात बोटं घालून, डोळे गच्च मिटून घराचा सुरक्षित कोपरा शोधणारी बालकं कधीच दिसली नसावीत. शिवकाशी आणि अशाच अन्य ठिकाणच्या फटाक्यांच्या कारखान्यात लाखो बाल कामगार राबत असतात. तिथे अपघाती मृत्यूची शक्यता तर असतेच, पण फटाके बनवताना वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे, रसायनांमुळे या मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात.. याची गंधवार्ताही त्या भाग्यवान मातेला नसावी!!
असं वाचण्यात आलंय की, दिवाळीच्या मोसमात फटाक्यांमुळे हवेत सल्फर डाय ऑक्साइडचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असतं. जागतिक आरोग्य संघटनेने (हऌड) निर्देशित केलेल्या सुरक्षित पातळीपेक्षा ते दोनशेपट अधिक असतं. याचा अर्थ, या प्रदूषणाचे दुष्परिणाम फटाके उडवणाऱ्याला आणि ते उडवण्याचे नाकारणाऱ्यालाही सारखेच भोगावे लागतात. जसे, धूम्रपान न करणाऱ्यालाही (पॅसिव्ह स्मोकरला) धूम्रपानामुळे होणारे दुष्परिणाम भोगावे लागतात, तसेच.
सर्व वृत्तपत्रे, अनेक स्वयंसेवी संस्था या संदर्भात सातत्यानं प्रबोधन करत असतात. पण लक्षात कोण घेतं?
फटाके फुटल्यानंतर त्यातून ‘स्ट्रॉन्शियम ९०’ (म्हणजे किरणोत्सर्गी र१९० ) आणि अन्य विषारी रसायनं वातावरणात पसरतात आणि हे स्ट्रॉन्शियम तर अतिशय घातक आहे.
तर, या ‘स्ट्रॉन्शियम ९०’च्या निमित्तानं आठवलं ते ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक आणि त्याची जिद्दी लेखिका राचेल कार्सन (१९०७-१९६४). या पुस्तकात एके ठिकाणी लेखिकेनं म्हटलंय, ‘अणुविस्फोटानंतर ‘स्ट्रॉन्शियम ९०’ सुटं होऊन ते हवेत पसरतं. हवेतून, पावसाच्या पाण्यातून ते जमिनीत, गवतात, पिकांत मुरतं.. तिथून ते मानवाच्या अन्नसाखळीत प्रवेशतं आणि माणसाच्या अस्थिमज्जेत मुक्काम ठोकतं. मालकाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला सोबत करतं.
हे ‘स्ट्रॉन्शियम ९०’ अन्नसाखळीत आलं  की त्यापासून मानवी जीविताला असंख्य धोके संभवतात. हृदरोग, हाडांच्या विकृती, अ‍ॅनेमिया, अल्झायमर, सांधेदुखी, हार्मोन्सवर- विशेषत: कोवळ्या मुलांच्या- दुष्परिणाम, श्रवणशक्ती कमी होणं, दमा वगैरे वगैरे. ज्यांना अशांपैकी काही व्याधी असेल त्यांच्या व्याधीचं रूप उग्र होतं. ज्यांना अशा व्याधी नसतील, त्यांना बाधा होऊ शकते.
..सांगत होते, ‘सायलेंट स्प्रिंग’विषयी. १९६२ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकानं अमेरिकेत खळबळ उडवून दिली आणि केमिकल इंडस्ट्रीची झोप उडवली. राचेल कार्सन या सागरी जीवशास्त्रज्ञ. निसर्गातील परिसंस्था हा त्यांचा खास अभ्यासाचा विषय. त्यावरची त्यांची पुस्तकंही गाजलेली.
राचेल कार्सनना १९५८ सालात मॅसेच्युसेट्स्हून त्यांच्या एका मैत्रिणीचं पत्र आलं. डीडीटी फवारणीमुळं त्या परिसरात अगणित पक्षी मृत्युमुखी पडल्याचं तिनं कळवलं होतं.
दुसऱ्या महायुद्धात (१९३९ मध्ये) साऊथ पॅसिफिक बेटावरच्या अमेरिकन पलटणींची तिथल्या डासांपासून सुटका करण्यासाठी डीडीटीचा वापर झाला. तो परिणामकारकही ठरला. डीडीटीच्या संशोधकाला नोबेल पुरस्कारही मिळाला. डीडीटीपूर्वीची कीटकनाशकं एखाद-दुसरी कीटकजात नष्ट करत, पण डीडीटी शेकडो कीटकजाती नष्ट करी. तिचा सर्रास वापर १९४५ साली सुरू झाला.
कार्सन राहात होत्या त्या मेरीलॅण्डमध्ये डीडीटी फवारणीचे प्रयोग चालू होते. त्यांनी त्यासंबंधी ‘रीडर्स डायजेस्ट’ मासिकाकडे लेखमाला लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, पण नकार मिळाला.
पुढच्या तेरा वर्षांत डीडीटी मुक्तहस्ते फवारली गेली. तिचे दुष्परिणाम स्पष्ट दिसू लागले. म्हणून पुन्हा एकदा १९५८ मध्ये कार्सननी ‘रीडर्स डायजेस्ट’कडे लेखमाला लिहिण्याची तयारी दर्शवली. या वेळीही नकारच मिळाला. मग पुढे चार र्वष खपून त्यांनी सरळ एक पुस्तकच छापलं. विसाव्या शतकातलं ते एक अति महत्त्वाचं पुस्तक- ‘सायलेंट स्प्रिंग’.
एकदा डीडीटी फवारणी झाली की ‘नको’ असलेल्या कीटकांच्या बरोबर ‘हवे’ असलेले कीटकही मारले जातात. पावसानंतरही डीडीटी वातावरणातून धुतली जात नाही, उलट पाण्यात राहाते. जनावरांच्या माणसांच्या अन्नसाखळीत उतरते.. माणसाच्या (चरबीच्या) स्नेहाच्या ठिकाणी विरघळून राहाते.. मग जन्मजात विकृती, कर्करोग, मातेच्या स्तनातून बालकात उतरणं वगैरे आलंच. थोडक्यात, डीडीटीची फवारणी म्हणजे न सुधारता येणारी चूक- यावर कार्सननी उदंड पुराव्यांनिशी प्रकाश टाकला, धोके दाखवले.
या पुस्तकाचा परिणाम म्हणजे ‘मोन्साटो’, ‘अमेरिकन सायनामाइड कंपनी’ वगैरे केमिकल इंडस्ट्रीवाले खवळले. डीडीटीवर बंदी घातल्यानं ‘पुन्हा जर या पृथ्वीवर कीटक, रोगराईचं राज्य अवतरलं तर आपण तमोयुगात जाऊ’ अशी हाकाटी ते करू लागले. मोन्साटो कंपनीने तर ‘द डिसोलेट इयर्स’ (ळँी ऊी२’ं३ीीं१२) नावानं पुस्तिका छापून तिच्या पाच हजार प्रती वाटल्या. रासायनिक कीटकनाशकांवर बंदी घातल्यास कीटक कसे बेलगाम होतील; रोग, दुष्काळ यामुळे कसं सगळं ओस पडेल यावर पुस्तिकेत भर दिला.
काहींनी राचेल कार्सन यांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटवलं तर काहींनी त्यांच्या मानसिक संतुलनावर!
केमिकल इंडस्ट्री आपल्याविरुद्ध उठणार याचा अंदाज कार्सनना होताच. त्यांनी आपल्या पुस्तकाला पंचावन्न पानांचं परिशिष्ट जोडलं होतं. त्यात विस्तृत नोंदी, पुरावे तर होतेच, पण ज्या ज्या शास्त्रज्ञांनी हस्तलिखित वाचून त्याला मान्यता दिली होती, त्यांची यादीही दिली होती. अनेक शास्त्रज्ञ कार्सनच्या बाजूने उभे राहिले.
तत्कालीन राष्ट्राध्यक्ष केनेडी यांनी त्यांच्या विज्ञान- सल्लागार समितीकडे या प्रकरणी अहवाल मागितला. दान ‘सायलंट स्प्रिंग’च्या बाजूनं पडलं. डीडीटी फवारणीवर नियंत्रण आलं आणि पुढे १९७२ साली अमेरिकेत डीडीटीवर बंदी आली.
आता डासच डीडीटी पचवू लागलेत, ही गोष्ट वेगळी.
‘सायलेंट स्प्रिंग’नं अमेरिकन जनमानसावर नक्कीच परिणाम केला. ‘कीटकनाशके घातक आहेत का?’कडून ते ‘कोणती कीटकनाशके घातक आहेत?’ याचा विचार करू लागलंय. ते सावध झालंय.. पर्यावरणवादाला बळकटी आलीय.
आता महत्त्व आहे ते माणसाच्या निसर्गाकडे बघण्याच्या दृष्टीला. कारण निसर्गात बिघाड निर्माण करण्याची ताकद माणसाच्या हाती आहे. माणूस निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाविरुद्ध युद्ध म्हणजे स्वत:विरुद्ध युद्ध! म्हणूनच माणसानं अधिक परिपक्व, विवेकवादी होण्याची गरज आहे आणि आपण तसे आहोत, हे सिद्ध करण्याची वेळही हीच आहे. असो.
फटाके, प्रदूषण, स्ट्रॉन्शियमनिमित्तानं राचेल कार्सन आठवल्या.
त्या जागृत देवतेला दंडवत!
एक वैधानिक इशारा -
अजिबात धूम्रपान न करता,
एकही फटका न उडवता आनंदानं जगता येतं.
असे जगणारे अगणित, असंख्य आहेत.
त्यांच्या जीविताला हानी पोहोचवण्याचा अधिकार कोणालाही नाही.