निमित्त मात्रेण : सामथ्र्य लेखणीचे Print

वीणा गवाणकर - शनिवार, ३ मार्च  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altएक स्त्री, परदेशात कृष्णवर्णीय गुलामगिरीविरुद्ध लिहिणारी, तर दुसरी भारतात स्त्रीच्या गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवणारी. दोघींचं अस्त्र एकच- लेखणी. या लेखणीने इतिहास घडवला. ८ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने स्त्रीच्या लेखनसामर्थ्यांविषयीचा खास लेख.. जास्तीत जास्त स्त्रियांनी लिहितं व्हायला पाहिजे हे सांगणारा..
जग काय फक्त वैज्ञानिक शोधांनीच घडतं का? एखादी वाङ्मयीन कृतीही समाजाच्या विकासाचं, त्याला सकारात्मक विचारासाठी प्रवृत्त करण्याचं काम करून दाखवते. अशा साहित्यकृती मग काळाच्या प्रवाहात स्वत:चं वेगळं अस्तित्व टिकवून राहातात. अमेरिकन लेखिका हॅरिएट बीचर स्टोव् (१८११-१८९७) यांची ‘अंकल टॉम्स कॅबिन’ ही कादंबरी अशाच चिरस्मरणीय साहित्यकृतींपैकी एक. कृष्णवर्णीय गुलामांचं जीवन, त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, त्यांची विपन्नावस्था यांच्यावर प्रकाश टाकणारी.
अमेरिकेच्या दक्षिणेतली गुलामगिरी पाहातच स्टोव् वाढल्या. कृष्णवर्णीय गुलामांचे लिलाव पाहून, त्यांची दुरवस्था पाहून त्या व्यथित होत. त्या कनेक्टिकटमध्ये वास्तव्याला होत्या, तेव्हा शेजारच्या केंटूकीतून पळून आलेल्या गुलामांच्या कहाण्या त्यांना ऐकायला मिळाल्या. अशा एकीला त्यांनी आपल्या घरात काही काळ आश्रयही दिला होता. पळून आलेल्या गुलामांना आश्रय देणे हा गुन्हा ठरवण्यासाठी विधेयक मांडले जाण्याची खटपट चालू होती. त्याला विरोध असणाऱ्यांच्या सभा, चर्चा, बैठका होत. तिथे स्टोव् उपस्थित राहात. अखेरीस १८५० साली हा कायदा अस्तित्वात आलाच.
हॅरिएट स्टोव्ना राहावेना. गुलामगिरीच्या विरोधात असणाऱ्या ‘नॅशनल इरा’ या साप्ताहिकातून गुलामांच्या कहाण्या सादर करण्याचं त्यांनी ठरवलं. साप्ताहिकाच्या संपादकाला त्यांनी पत्र लिहिलं. ‘स्वातंत्र्य आणि मानवता याविषयी एखाद्या स्त्रीला वा लहान मुलाला काही म्हणायचे असेल तर ते बोलून दाखवण्याची हीच वेळ आहे.. लिहू शकणारी कोणतीही स्त्री आता गप्प राहाणार नाही, अशी आशा मला वाटते.’ स्टोव् स्वत:ही मुकाट राहिल्या नाहीत.
मार्च १८५१ ते एप्रिल १८५२ या कालखंडात त्यांनी ‘नॅशनल इरा’त प्रकाशित केलेल्या कहाण्यांतूनच त्यांची ‘अंकल टॉम्स कॅबिन’ ही कादंबरी १८५२ साली जन्माला आली. प्रथमावृत्ती होती पाच हजार प्रतींची. पण अल्पावधीतच अनेक पुनर्मुद्रणे होऊन सव्वातीन लाख प्रती खपल्या. शिवाय ती चोरूनही छापली गेली. त्या काळी अमेरिकन मंडळी संध्याकाळच्या वेळी गोलाकार बसून मोठय़ानं वाचन करीत. म्हणजे, ही कादंबरी किती तरी पट लोकांपर्यंत पोचली!!
अमेरिकेच्या उत्तरेत आणि दक्षिणेत या कादंबरीविषयी परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटल्या. उत्तरेत गुलामगिरीविरुद्ध लोकमत तयार होत होते. मुक्त कृष्णवर्णीय गुलाम फ्रेडरिक डग्लस यांची चळवळही चालू होती. त्यांना ही कादंबरी खूप आवडली. गुलामगिरीविरुद्ध जाणीव-जागृती करणारी, आपल्या विहित कार्याला पाठबळ देणारी कादंबरी म्हणून उत्तरेतल्या कार्यकर्त्यांनी तिचं स्वागत केलं, तर दक्षिणेनं तिच्यावर झोड उठवली. या कादंबरीत वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. तिच्यातल्या कहाण्या मनगढंत आहेत, उत्तरेतल्या गोऱ्या मजुरांपेक्षा दक्षिणेतले काळे गुलाम सुखासमाधानात आहेत असे दावेही केले. एवढंच नाही तर लेखिकेला धमक्यांची पत्रंही पाठवली. दक्षिणेतल्या काही लेखकांनी लगोलग कादंबऱ्या लिहून तिथलं जीवन कसं सुखीसमाधानी रोमांचकारी आहे, हे दाखवण्याचे प्रयास केले.
मग हॅरिएट स्टोव्ही गप्प बसल्या नाहीत. फ्रेडरिक डग्लस यांच्या मदतीनं अनेक मुक्त गुलामांच्या भेटी, मुलाखती घेतल्या. रीतसर पुरावे जमवले, त्याच्या आधारे १८५३ मध्ये ‘अ की टू अंकल टॉम्स कॅबिन’ ही नवी कादंबरी सादर केली. विरोधकांचे दावे खोटे ठरवले.
लवकरच स्टोव् युरोपच्या दौऱ्यावर गेल्या. तिथल्या त्या वेळच्या अनेक नामवंत साहित्यिकांशी त्यांचा परिचय तर झालाच, पण परतताना कातडी बांधणीचे २६ खंड घेऊन त्या आल्या. अमेरिकन भगिनींनी गुलामगिरी संपवण्यात पुढाकार घ्यावा, असं आवाहन करणाऱ्या निवेदनावर युरोपातल्या पाच लाख भगिनींनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या कागदांचे ते खंड होते.
गुलामगिरीच्या प्रश्नावरून अमेरिकेत उत्तरदक्षिणेत १८६१ साली यादवी सुरू झाली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी १८६२ च्या डिसेंबर महिन्यात स्टोव्ना मेजवानीचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष स्टोव्ना ‘तीच का तू, जिच्या पुस्तकामुळे ही यादवी सुरू झाली?’ असं म्हटल्याची वदंता आहे. ते काहीही असो, १ जानेवारी १८६३ रोजी गुलामगिरी संपवल्याचा जाहीरनामा प्रसृत झाला. त्या दिवशी स्टोव्च्या घरासमोर जमून लोकांनी जयजयकार केला ही वस्तुस्थिती आहे.
वाङ्मयीन निकषांवर ही कादंबरी उणी ठरते असे तिचे काही टीकाकार म्हणतात. पण त्याचवेळी, जे राजकारण्यांना जमलं नाही, कार्यकर्त्यांची चळवळही जिथे रेटा लावायला कमी पडत होती, तिथे लोकमानस घडवून, त्याचं पाठबळ मिळवण्यात ही वाङ्मयकृती कारणीभूत ठरली. तिचं हे योगदान वादातीत ठरलं. तिनं काळ्या गुलामांना आशा, आत्मविश्वास आणि स्वाभिमान दिला.
आजवर ही कादंबरी ६० भाषांत अनुवादित झाली आहे. हॅरिएट स्टोव्नी गुलामगिरीतील अन्याय, अत्याचार यांना वाचा फोडण्यासाठी कृष्णवर्णीयांची दु:खं जगासमोर आणण्यासाठी लेखणी हाती घेतली. त्याच काळात आपल्याकडच्या ताराबाई शिंदे (१८५०-१९१०) पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वेशीवर टांगण्यासाठी लिहित्या झाल्या.
विजयालक्ष्मी नावाच्या गुजराती ब्राह्मण विधवेने केलेल्या भ्रूणहत्येमुळे वादाचं मोहोळ उठलं. त्याचा प्रतिवाद करण्यासाठी ताराबाईंनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ (उपशीर्षक- ‘स्त्रिया व पुरुष यांत साहसी कोण हे स्पष्ट करून दाखविण्याकरिता हा निबंध.’) ही ३७ पानी पुस्तिका १८८२ साली लिहून प्रकाशित केली. विधवांना पुनर्विवाहास बंदी असल्यानं स्त्रियांची होणारी कुचंबणा, त्यातून निर्माण होणारे अनर्थ, विवाहित स्त्रीचे शोषण, पुरुषांच्या ठिकाणी असणारे दुर्गुण यावर झोड उठवली. ‘हिंदुस्थानास नियंत्रित करणारी सर्व शास्त्रें पुरुषानुकूल आहेत, उघड उघड स्त्री विरोधात आहेत’ असा आरोप केला. पुरुषाला देवत्व देणारी पारंपरिक विचारसरणी मोडीत काढण्याचं धाडस दाखवलं. पुरुषांकडून न्यायाची भीक न मागता त्यांच्या सदसद्विवेक बुद्धीला आवाहन केलं. फटकारलंही. तेही कशा भाषेत-
‘अरे, तुमचा मोठेपणा व शौर्य घरांतच..’
‘नवऱ्याअधीं बायकोनें मरावे किंवा नवऱ्यानें
बायकोअधी नवऱ्याने मरावें याचा तुमच्या
बापदादांनी देवांपासून दाखला आणला काय रे?’,
‘अरे, तुमचा शूरपणा जोवर आजमावून पाहिला नाहीं तोंच तुमचा आव.’
मराठी साहित्यात हे प्रथमच घडलं. जी शिकेल तिच्या सात पिढय़ा नरकात जातात अशी लोकधारणा असणाऱ्या त्या काळात एका स्त्रीनं पुराणे, धार्मिक ग्रंथ, इतर साहित्यकृती यांचा परामर्श घेत समर्थपणे लेखणीने वार केले. जोतिबा फुले वगळता तत्कालीन अग्रगण्य समाजसुधारकांनीही ज्या विषयाला हात लावणं टाळलं होतं, तो विषय अत्यंत खणखणीत शब्दात ताराबाईंनी मांडला.
ताराबाईंची ही पुस्तिका पुण्यात छापली गेली. अवघ्या ५०० प्रती काढल्या. बुलढाणानिवासी लेखिकेच्या या पुस्तिकेचं ना स्वागत झालं, ना नंतर तिनं अन्य काही लिहिलं. कालप्रवाहात ती कुठं लुप्तच झाली. ताराबाईंच्या धारदार लेखणीने प्रसवलेले विचार एवढे भेदक की समाजानं दचकून जाऊन त्यांना अनुल्लेखित उपक्षित ठेवणंच स्वीकारलं.
पुढची जवळपास ९० र्वष म्हणजे सं. ग. मालशेंनी त्या पुस्तिकेचा शोध घेऊन, तिच्यावर अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहून १९७५ मध्ये ती पुन: प्रकाशित करीपर्यंत विस्मृतीतच गेली होती. या विचारप्रवर्तक निबंधाला वाचकांचं वा राजकीय इच्छाशक्तीचं पाठबळ न मिळाल्यानं तो दुर्लक्षित राहिला, दृष्टीआड गेला होता, हे खरं. पण त्यात मांडलेले विचार, उपस्थित केलेले प्रश्न आजही अनुत्तरितच होते. म्हणूनच १९७५ च्या सुमारास स्त्रीमुक्ती चळवळीनं जोर धरला तेव्हा तिच्या कार्यकर्त्यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ला अग्रमान दिला. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या बरोबरीनं ताराबाईंनाही मानाचं स्थान दिलं.
पुलित्झर विजेत्या जेन स्मार्टली म्हणतात, ‘वाङ्मयाने आपल्याला जबाबदाऱ्यांना सामोरं जाण्यास शिकवलं पाहिजे, त्या टाळण्यासाठी नव्हे.’
असं वाङ्मय निर्माण करण्यासाठी स्त्रीनं स्वत:ला सर्वार्थानं सज्ज केलं पाहिजे. समर्थपणे, जबाबदारीनं लेखणी वापरली पाहिजे. समाजाचं वैचारिक शिल्प घडवण्यात स्त्रीचाही मोठा वाटा असतो, हे सिद्ध करण्यासाठी!