निमित्त मात्रेण : कैफियत एका वाचकाची! Print

altवीणा गवाणकर , शनिवार, ३१ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शालेय स्तरावरच मी पुस्तकांशी मैत्री केली तेव्हापासून आतापर्यंत ‘आत्ता काय बरं करावं?’ अशा विवंचनेला मला कधीच तोंड द्यावं लागलं नाही. ग्रंथालयाच्या आणि ग्रंथांच्या आधारानेच मी वाढले.. माझ्या लहानपणी करमणुकीच्या साधनांची एवढी रेलचेल नव्हती. दुसरं जग कसं आहे ते समजायला वृत्तपत्रं, पुस्तकं, रेडिओ यापलीकडे अन्य मार्ग नव्हते. ६०-७०  वर्षांपूर्वीच्या खेडय़ात माझं बालपण गेलं. तिथे वीज नव्हती. नाटक, सिनेमा नव्हता. रामलीला, कधीमधी अवतरणाऱ्या टुरिंग टॉकीज (आता यांना ‘स्क्रीन ऑन ग्रीन’ म्हणतात) आणि फारच झालं तर एखादी सर्कस हीच काय ती मनोरंजनाची ठिकाणं. कलाविष्कारासाठी एकच क्षेत्र- गणपती उत्सवाच्या निमित्तानं होणारे मेळे. पण त्या मेळ्यांतही केवढय़ा स्पर्धा!.. अशा या खेडय़ातून मुलींवर- विशेषत: वयात आलेल्या मुलींवर फार बंधनं असायची. त्यांच्यासाठी शालेयस्तरावर होणाऱ्या खो-खो, कबड्डीपुरतेच मैदानी खेळ मर्यादित होते. इतर मुलींप्रमाणे मला बाहुला-बाहुलीच्या लग्नात किंवा भातुकलीच्या खेळात रस नव्हता. मोठे चार भाऊ. त्यांचं जग वेगळं. त्यांचे खेळ वेगळे. मी पुस्तकांशी मैत्री केली. तेव्हापासून आतापर्यंत ‘आत्ता काय बरं करावं?’ अशा विवंचनेला मला कधीच तोंड द्यावं लागलं नाही.
त्या काळी खेडय़ातल्या त्या छोटय़ा-छोटय़ा शाळांतून पुस्तक-पेटय़ा असत. रिकाम्या तासाला अशी एखादी पेटी वर्गात येई. त्या पेटीतली पुस्तकंही छोटी-छोटी असत, पण त्यातूनच मला दक्षिण-उत्तर ध्रुवांवरच्या मोहिमा, विविध साहसकथा, वैज्ञानिकांच्या शोधांच्या जन्मकथा, छोटी-छोटी चरित्रं  वाचायला मिळाली.
गावातलं छोटंसं वाचनालयही मला मोठ्ठा आधार वाटे. वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षीच ग. ल. ठोकळ, माडगूळकर, खांडेकर, चोरघडे, अण्णा भाऊराव साठे वगैरेंशी माझी मैत्री झाली. का कोण जाणे, ना. सी. फडके मला कधीच जवळचे वाटले नाहीत.
माझे वडील ब्रिटिश राजवटीतले फौजदार. आपल्या मुलींनी (मला एक धाकटी बहीण आहे) नीट शिक्षण घ्यावं, त्यांनी खूप वाचावं यासाठी ते नेहमी सजग असत. आम्हा भावंडांना प्रत्येकाला स्वतंत्र कंदील होता. रोज त्या कंदिलांच्या काचा रांगोळीनं घासूनपुसून, त्यांच्या वातींची काजळी काढून, त्यात व्यवस्थित रॉकेल भरून ते तयार ठेवणं ही एका ऑर्डर्लीवर सोपविलेली स्पेशल डय़ुटी. गृहपाठ  संपल्यावर त्या कंदिलाच्या प्रकाशात आमचं अवांतर वाचन चाले. वडील काही काळ रेल्वे इन्स्पेक्टर होते. त्या कार्यकाळात रेल्वे स्टेशनवरच्या ‘बुक स्टॉल्स’वरची, गाडय़ांवरची पुस्तकं, मासिकं, दिवाळी अंक रात्री-दोन रात्रींकरिता आमच्याकडे मुक्कामाला असत. वाचून झाले की ती स्वगृही जात. पुस्तकांशी मैत्री जडली ती अशी.
मॅट्रिकनंतरचं माझं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं ते पुण्यात. खेडय़ातून शहरात आल्यानंतरच्या काही काळापुरत्याच गांगरल्या अवस्थेत आश्रय मिळाला तो ग्रंथालयाचाच. प्री-डिग्रीला असताना एम. ई. एस. कॉलेजचं ग्रंथालय, पुढची तीन र्वष फग्र्युसन कॉलेजचं जेरबाई वाडिया ग्रंथालय आणि ग्रंथपालनशास्त्राची पदविका अभ्यासक्रम पार पाडताना पुणे विद्यापीठाचं जयकर ग्रंथालय यांचा मी पुरेपूर लाभ घेतला. कला शाखेचे वर्ग सकाळी सात ते साडेदहा वाजेपर्यंत. जेवण आणि जमल्यास, स्वस्तात असणारा आणि नित्य परवडणारा मॅटिनी शो पाहिल्यावर उर्वरित सर्व वेळ ग्रंथालयात जाई. मी राहायला वसतिगृहात. त्यामुळे हाकेच्या अंतरावर ही सगळी स्थानकं. वाडिया ग्रंथालयाचे ग्रंथपाल बुधगावकर यांनी माझं पुस्तकप्रेम, वाचनवेड हेरलं. तसंच ते आणखी एका काकूंनीही हेरलं.
व्याकरणकार रा. भि. जोशी यांची पणती माझी वर्गमैत्रीण. शनिवार-रविवारी वा सुट्टीच्या दिवशी मी तिच्या घरी जाई. जोश्यांच्या घरी पुस्तकांनी भरलेली मोठमोठी काचेची कपाटं. घरात असू शकणाऱ्या अशा ग्रंथसंग्रहाची मला अपूर्वाई  वाटे. मी ती पुस्तकं चाळे, हाताळे, वाचे.. आणि नीट लावून ठेवी. मैत्रिणीच्या काकूच्या हे लक्षात आलं. तिनं मला सुचविलं, ‘तू ग्रंथपाल हो. विद्यापीठात ग्रंथपालनशास्त्राचा अभ्यासक्रम आहे. तो तू कर.’ ग्रंथपाल  बुधगावकर यांचा सल्ला विचारायला गेले. त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि सावधही केलं. म्हणाले, ‘या पदविकेचे आठ पेपर्स असतात. तुला ते सर्व इंग्रजीतून द्यावे लागतील.’ मी दचकले. माझं सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं. बी. ए.चा विषयही मराठी वाङ्मय. त्यामुळेच बुधगावकरांना काळजी वाटली होती.
मी मनाची तयारी केली. फॉर्म भरला. या पदविकेसाठी मौखिक प्रवेश परीक्षा असे. मला मुलाखतीसाठी बोलावणं आलं. त्या वेळी चौकशी करताना समजलं की, आत्तापर्यंत ज्यांची ज्यांची अशी परीक्षा घेतली ते सर्व कोणत्या ना कोणत्या ग्रंथालयातर्फे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलेले होते. त्यांच्याकडे उदंड कार्यानुभव होता. मीच एकटी नवखी होते. माझा निभाव लागणं कठीणच दिसत होतं. प्रत्यक्षात मात्र ती मुलाखत ही माझी चाचणी परीक्षा आहे, असं मला जाणवलंच नाही. कारण परीक्षक आणि मी अर्धा तास वेगवेगळ्या पुस्तकांवर बोललो.. माझ्या अवांतर वाचनाने मला साथ दिली.. माझी त्या बॅचकरिता निवड झाली. वर्षभर नेटानं अभ्यास करून इंग्रजीत उत्तरं लिहिण्याचा सराव करून  मी परीक्षा दिली. गंमत म्हणजे रिझल्ट लागण्यापूर्वीच माझी डॉ. आंबेडकरांच्या औरंगाबादमधल्या मिलिंद कला महाविद्यालयाच्या ग्रंथालयाची ग्रंथपाल म्हणून निवड झाली.
‘मिलिंद’चे ग्रंथालय हे त्या संस्थेचे भूषण. त्या समृद्ध ग्रंथालयात डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथसंग्रहाचा एक स्वतंत्र विभागही होता. इथल्या साडेचार वर्षांत मी हजारो पुस्तकं तर हाताळलीच, त्याचबरोबर वाचनही भरपूर केलं. वाचनाच्या माझ्या कक्षाही विस्तारल्या. आपण किती अज्ञानी आहोत, हे समजत गेलं.
डॉ. आंबेडकरांच्या लौकिकामुळे ‘मिलिंद’ला भेट देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या व्यक्ती येत. न चुकता त्यांची ग्रंथालयालाही भेट असे. न्या. गजेंद्रगडकर, मार्गारेट अल्वा, सुलभा खान-पाणंदीकर, कुलगुरू तावडे यांच्यासारख्यांच्या भेटी मला आजही स्मरतात. ग्रंथालयात आल्यावर या व्यक्ती अनेक संदर्भ विचारीत, अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची चौकशी करीत. त्यांची तातडीनं पूर्तता करावी लागे. यामुळेच संदर्भ शोधणे, ते लक्षात ठेवणे, योग्य वेळी त्यांचा  वापर करणे, त्यासाठी ग्रंथालयातल्या सर्व ग्रंथांशी किमान- ‘तोंडदेखली’तरी- ओळख असणं जरुरीचं ठरे. प्रा. म. भि. चिटणीस, प्रा. डॉ. म. ना. वानखेडे ही चोखंदळ आणि अभ्यासू मंडळी कोणत्या वेळी कोणता संदर्भ वा कोणती माहिती मागतील याचा नेम नसे. पुन्हा त्यांना ती लगेचच हवी असे. अशा वेळी पुस्तकांची ‘तोंडओळख’ उपयोगी ठरे. ही  मंडळी काही पुस्तकं तातडीनं मागवायला सांगत. त्यांच्या मागणीमागच्या गांभीर्याचा अंदाज असल्यानं ती पुस्तकं आल्या आल्या मी चाळून पाहत असे. सगळे विषय आपल्याला समजतीलच असा भरवसा मला त्याही वेळी नव्हता. आजही नाही. पण एखाद्या पुस्तकाचं मोल काय आहे हे समजून घ्यायची माझी धडपड असे. (ती आजही आहे.) या धडपडीचा परिणाम असा झाला की, ललित वाङ्मयापलीकडच्या ज्ञानक्षेत्रांचा अंदाज मला येत गेला. इंग्रजी भाषेतली पुस्तकंही वाचनात येऊ लागली.
अशा या ग्रंथालयांच्या आणि ग्रंथांच्या आधाराने मी वाढले. थोडीफार घडले. वाचता-वाचता लिहिती झाले आणि लिहिण्याच्या खटपटीत अधिक वाचत गेले. मी आधी वाचक आहे आणि मग लेखक!