निमित्त मात्रेण : आधी केलेची पाहिजे Print

वीणा गवाणकर, शनिवार, १४  एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआजकालची मुलं अवांतर वाचन करीत नाहीत, अशी सर्वच पालकांची सर्वसाधारण तक्रार असते. मात्र मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी लहानपणापासून जे जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात ते खरंच केले जातात का?..
अशाच काही जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांविषयी.. डॉ.अरुण टिकेकरांचं ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी, ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध’ हे छोटेखानी पुस्तक वाचनात आलं आणि आपला ग्रंथसंग्रह किती ‘दिशाहीन’ आहे याचा साक्षात्कार झाला! ग्रंथपाल म्हणून नोकरी करीत असताना स्वत:साठी पुस्तकं विकत घेण्याची वेळ माझ्यावर आली नव्हती. लग्न होऊन वसईला आले आणि माझं पुस्तकं विकत घेणं सुरू झालं. माझ्या पतीलाही वाचनाची, पुस्तकं विकत घेण्याची आवड. त्यामुळे आमच्या घरात पुस्तकं जमत गेली. आम्हा दोघांचे वाचनविषय भिन्न. त्यामुळे पुस्तकखरेदीत वैविध्यही भरपूर असे. मुंबईतल्या हुतात्मा चौकातले पुस्तकांनी ओसंडणारे फुटपाथ, ‘न्यू अ‍ॅण्ड सेकंड हॅण्ड बुक शॉप’, पुस्तकांनी लादलेल्या ढकलगाडय़ा, पायरेटेड पुस्तकांचे ढीग.. आम्हाला काहीही वज्र्य नव्हते. मुंबईच्या फेरीत पुस्तक विकत घेतलं नाही, असं होतच नसे. आवडलंय, हवंय, वाचायलाच हवं, या एवढय़ा निकषांवर पुस्तकांची निवड व्हायची. आजही होतेय. आमच्या मुलांनी काय वाचावं, त्यांच्या हाती काय पडावं याचा विचार करून बालसाहित्य विभागही घरात आकार घेत होता. मूल जन्माला येण्याआधीच आम्ही त्याच्यासाठी पुस्तकं जमवायला सुरुवात केली होती. आमच्या परिचितांसाठी हा एक चेष्टेचा विषय झाला होता. मुलं लहान असताना मी त्यांना रोज रात्री ती झोपी जाण्याआधी काही ना काही वाचून दाखवीत असे. पुढे लवकरच ती स्वत: वाचू  लागली. चौकस होत गेली. त्यांच्या आवडीची, तसंच त्यांनी जरूर वाचावीत अशी आम्हाला वाटणारी पुस्तकं घरात येत गेली. त्या काळातली एक आठवण - त्या वेळी आमच्याकडे ‘सोव्हिएत देश’ हे नियतकालिक येत असे. एका अंकात रशियातल्या बर्फाच्छादित प्रदेशाची, त्यातल्या घरांची, लोकजीवनाची सचित्र माहिती आली होती. तो अंक चाळताचाळता माझ्या पाच वर्षांच्या मुलानं विचारलं, ‘‘मग इथली मुलं शाळेत कशी जातात?’’ ते निमित्त साधून मी त्याला अशा बर्फाळ प्रदेशांविषयी माहिती पुरविली. मग त्यानं विचारलं, ‘‘पण अशा बर्फाळ देशातल्या लोकांना रस्ते कसे सापडतात?’’ थोडक्यात, परीकथा-चांदोबातून मुलं लवकर बाहेर पडली आणि भोवतालचं वास्तव समजून घेऊ लागली.मुलांचे शालेय शिक्षण संपेपर्यंत आमच्या घरात टीव्ही नव्हता. त्यामुळे त्यांच्या विश्वात समुद्रकिनारा, चिखल, माती, मैदानी खेळ, पुस्तकं यांना महत्त्वाचं स्थान होतं. धो-धो पावसात घरातच अडकून पडावं लागलं तर आपसात खेळण्याइतपत बुद्धिबळचं ज्ञानही त्या दोघांना होतं.‘तुमच्या मुलांच्या वेळचं ठीक आहे हो! पण आताच्या मुलांच्या हातात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणं, करमणुकीची विविध साधनं असतात. ती त्यातच रमतात. सोशल नेटवर्किंग, फेसबुक, व्हर्च्युअल गेम्स यातच त्यांचा सर्व वेळ जातो. त्यांना वाचनाकडे वळवायचं कसं?’ असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. या समस्या आहेत खऱ्या! त्यांचं निराकरण करणं सोपं तर नाहीच आहे; पण धीराची, संयमाची कसोटी पाहणाऱ्याही या समस्या आहेत. थोडं अंतर्मुख होऊन विचार करून पाहूया. मूल अगदी सहा-सात महिन्यांचं असल्यापासून मोठय़ा चित्रांच्या पुस्तकांत रमतं. हा प्रयोग सातत्यानं आपण किती वेळा करून पाहिलाय? या वयात त्याला एकच गोष्ट वारंवार सांगत राहिलं की ते मूल ती गोष्ट ऐकताऐकता ठरावीक टप्प्यावर, विशिष्ट ठेक्यावर कसं प्रतिसाद देतं याचं निरीक्षण करून, त्याचा प्रतिसाद लक्षात घेऊन ती गोष्ट हळूहळू वाढवीत नेण्याचा प्रयत्न करून पाहिलाय? त्याची उत्सुकता, समज वाढविण्यासाठी अशा प्रसंगी चित्र, खेळणी यांचा उपयोग करून पाहिलाय? मूल एक-दोन वर्षांचं झाल्यावर त्याला त्याच्या योग्य पुस्तकांच्या गराडय़ात ठेवून पाहिलंय? त्याची पुस्तकं त्याला हाताळायला दिलीत? ती कशी हाताळायची ते दाखवलंत?मूल साधारण चार वर्षांचं झाल्यावर ‘घरातले सर्वजण वाचत बसलेत, तूही वाचत बस,’ अशी परिस्थिती दिवसभरातून एकदा तरी १५-२० मिनिटांकरिता निर्माण करीत होतात का? आपल्या पाच-सहा वर्षांच्या मुलाला पुस्तकांच्या दुकानात, पुस्तक प्रदर्शनात आवर्जून नेलंत का? त्याच्या आवडीची पुस्तकं त्याला निवडू दिलीत का? चांगले बालनाटक वा बालचित्रपटाला नेऊन त्यानंतर त्याविषयी मुलाशी चर्चा केलीत? अनेक वेळा मुलाला गोष्टी सांगत असाल. एखाद्या दिवशी ‘तूच एखादी गोष्ट सांग’ असं आवाहन केलंत? काय अनुभव आला? तुमच्या पाच-सात वर्षांच्या मुलाला शब्दांशी खेळायला शिकवलंत का? विरुद्धार्थी, समानार्थी शब्दांतली गंमत त्यांना दाखवलीत? एखाद्या छोटय़ाशा कथेचं नाटय़ीकरण करून दाखवलंत? त्यांना तसं करून दाखविण्यासाठी प्रवृत्त केलंत? जवळच्या ग्रंथालयात नेलंत?प्रश्न! प्रश्न!! प्रश्न!!!
पण हे सर्व प्रयोग मी माझ्या मुलांवर केलेत. आता नातवंडंही तशीच वाढताहेत. एक प्रसंग सांगावासा वाटतो. माझी नात चारएक वर्षांची असेल. तिला शंख, शिंपले, गोगलगाई गोळा करण्याचा नाद लागला होता. जवळच्या ग्रंथालयात मला ‘शेल टू व्हेल’ असे सचित्र पुस्तक मिळाले. ते पुस्तक नातीनं बरंच चाळलं. मग तिच्या आईनं तिला संगणकावर अधिक चित्रं दाखवली. शंख-शिंपल्यातलं वैविध्य दाखवलं.. आता आजीबरोबर ग्रंथालयात जाणं, हवं ते पुस्तक निवडणं, ते हातात धरून मिरवत घरी आणणं हा तिच्यासाठी महत्त्वाचा ‘इव्हेन्ट’ झालाय. कोणत्याही लहान मुलांशी- मग ते अगदी चार-पाच वर्षांचं असलं तरी- संवाद साधल्यावर ते कोणत्या प्रकारच्या ‘पर्यावरणा’त वाढतंय हे चटकन समजू शकतं. त्याचा शब्दसंग्रह, अभिव्यक्ती, संवाद साधण्याची पद्धत हे सर्व ते मूल कसं वाढतंय याचं द्योतक असतं. एका कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांनं मला विचारलं होतं, ‘‘आम्हाला ज्याचा काही उपयोग नाही अशा विषयांवरचे धडे आमच्या पाठय़पुस्तकात का घालतात?’’ मी म्हणाले, ‘‘अशा एखाद्या धडय़ाचं नाव सांग.’’ ‘‘गोदूताई परुळेकरांचा ‘पाडय़ावरचा चहा’,’’ तो उत्तरला. क्षणभर मी  अवाक् . मग मी त्याला विचारलं, ‘‘रुपेरी पडद्यावरचा एखादा प्रसिद्ध नायक भल्या पहाटे अनवाणी चालत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जातो, या घटनेचा तुझ्याशी काही संबंध? तरीही तू ते वृत्तचित्र, ती बातमी कुतूहलानं वारंवार बघतोस, खरं ना! तेवढीही उत्सुकता तुला गोदूताईंच्या कार्याविषयी का नाही?.. तुम्ही काय जाणून घ्यावंत, कोणते पैलू समजून घ्यावेत, त्यासाठी कोणतं अवांतर वाचन करावं यासाठी मार्गदर्शक असे हे धडे असतात..’’ वगैरे वगैरे. हे असं का? गुणपत्रिकेत अडकलेल्या शिक्षण पद्धतीचं हे फलित आहे का? की मनोरंजनाच्या धबधब्याखाली कुतूहल, जाणिवा, संवेदना वाहून जाताहेत? की थोडं थबकून काही समजून घ्यावं हे आताच्या ‘वेगवान’ जीवनशैलीत शक्य होत नाहीए?  की शक्य झालं तरी ‘संदर्भहीन’ ठरलंय? पण या केवळ सबबीच ठराव्यात असेही काही सुखद अनुभव येत असतात. माझ्या परिचयाचे एक पालक आहेत. टीव्हीचं बटण आपल्या हाती ठेवून ते आपल्या दोन मुली वाढवताहेत. मोठीला ‘भूगोल’ समजून घ्यायला आवडतोय, असं दिसून आल्यावर तिच्यासाठी खास पृथ्वीचा गोल विकत आणून, तिला नकाशावाचन शिकवून, जगाची ओळख करून देऊन तिला त्यांनी वाचनाची गोडी लावलीय. घरात सर्व अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणं हाताशी असतानाही तिचं पुस्तकप्रेम उणावलेलं नाही. आपला ५०० पुस्तकांचा संग्रह ती अभिमानाने दाखवते.. धाकटी मुलगीही आता मोठीच्या पावलावर पाऊल टाकून निघालीय. अगदी अलीकडेच ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ कार्यक्रमानिमित्त वसईला आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना चहासाठी घरी निमंत्रिलं. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘येते, पण एका अटीवर. तुम्ही लिहिलेली पुस्तकं मला देणार असाल तर.’’ चहा पितापिता मी माझ्याकडे असलेल्या पुस्तक संग्रहाविषयी बोलले. ‘‘मला बरीचशी पुस्तकं काढायची आहेत. ती तुमच्याकडे पाठवू का?’’ तर त्या म्हणाल्या, ‘‘पुस्तकं तर पाठवाच, पण जुने दिवाळी अंकही असले तर पाठवा. मुलं वाचतील. मी वाचेन.’’ केवळ इयत्ता चौथीपर्यंत शिकलेल्या या स्त्रीला पुस्तकांची किती ओढ! माझी पुस्तकं सुस्थळी पडलीत. माझ्या अध्र्या भरलेल्या पेल्यातलं पाणी वर वर चढतंय. माझी नातवंडंही पुस्तकप्रेमी होताहेत. ‘पडिले वळण’ अबाधित आहे. माधुरी पुरंदरे ही माझ्या नातीची आवडती लेखिका. अक्षरओळख नसतानाही ती त्यांच्या गोष्टी वाचल्यासारख्या धडाधड सांगते. लिहिणाऱ्या-वाचणाऱ्या आजीपेक्षा वाचून दाखविणारी आजी म्हणून तिच्या दरबारात मला स्थान आहे.
शेवटी मी एक ‘वाचक’च!