निमित्त मात्रेण : एक जीवनप्रणाली Print

altवीणा गवाणकर , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
माता म्हणजे केवळ जन्मदा नव्हे. जन्माला घातलेलं जगवणं, जोपासणं, सुसंस्कारित करणं, ते विकसित करणं.. जगभरच्या माता अण्वस्त्रविरोधात, युद्धाच्या विरोधात उभ्या राहतात. त्यांचंही वाण सर्वानी घ्यायला हवंय. 'No fists, No Knives. No Guns, No Bombs' या ललकारीला प्रतिसाद द्यायला हवा. मातृदिन हा एका व्यक्तीपुरता, एका दिवसापुरता नाही. ती जीवनप्रणाली आहे. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. सिंधुताई सपकाळांकडे पाठवण्यासाठी माझ्याकडच्या पुस्तकांचे गठ्ठे बांधून झाले. तसा फोन मी त्यांना केला, तर म्हणाल्या, ‘आताच नेत नाही. माझ्या मुलांनाच झोपायला जागा नाही.. पुस्तकं ठेवू कुठे?’ काही आठवडय़ांनी पुन्हा फोन केला तेव्हा म्हणाल्या, ‘माझं येवढय़ात तिकडं येणं होणार नाही. पुण्याला तुमच्या मुलाकडे ठेवा. तिथून नेईन.’ तसं केलं. महिना झाला तरी पुस्तके गाडीच्या डिकीतच. मग पुन्हा फोन केला, तर म्हणाल्या, ‘तुमच्या मुलालाच पोचवायला सांगा. मी नाही नेणार.’ तसं तर तसं! लवकरच मी पुण्याला गेले. सगळ्यांच्या वेळा साधता साधता एके दिवशी सकाळी साडेसहालाच मी आणि माझा मुलगा पुस्तकं घेऊन हडपसरला सिंधुताईंच्या मुक्कामी गेलो.
दोनअडीच खोल्यांचा साधासा फ्लॅट. बैठकीच्या खोलीचा अर्धा भाग विविध पुस्तकांनी भरलेला. वय र्वष चार ते आठमधली पाचसहा नीटनेटकी, हसरी मुलं बाहेर आली. आम्हाला नमस्कार करून गेली. ‘हे पुरस्कार म्हणजे आमच्या घराच्या दगडविटा.. चला, मांजरीला जाऊ नि पुस्तकं उतरवू.’ सिंधुताईंना घेऊन आम्ही मांजरीला गेलो. तिथे कोणी हितचिंतकानं त्यांना काही दिवसांकरता आपला फ्लॅट दिला होता. त्या फ्लॅटच्या बैठकीत पाय ठेवताच एक आठ महिन्याचं गुटगुटीत बाळ लुटुलुटु रांगत आलं. सिंधुताईंच्या पायांना चिकटलं. त्याला उचलून घेत, त्याचे लाड करत सिंधुताई पुस्तकं कुठं ठेवायची ती जागा दाखवत होत्या. त्या बेडरूममध्ये छतापर्यंत पोचलेली नव्या गाद्यांची चळत. ‘एका भल्या माणसानं दिल्यात.. मुलं म्हणतात, आपल्या नव्या घरात गेल्यावरच वापरू..’ सिंधुताई सांगतात. पुस्तकं उतरवून होतात. मग आम्ही नव्या घराचं बांधकाम बघायला जातो.
‘सप्तसिंधू महिला आधार आणि बाल संगोपन व शिक्षण संस्था’चं बांधकाम सुरू होतं. चार मजली इमारत. बावीस हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जागा राहण्यासाठी तयार होत होती. एकूण खर्चाचा अंदाज दोन कोटी रुपये. ‘हा तिसरा स्लॅब माझ्या अमेरिकावारीत मिळालेल्या डॉलर्समधून घडला.. ही एका बाजूची स्वतंत्र खोली खास माझ्या ड्रायव्हरकरता. सारखं गाडी चालवून थकतं पोर. त्याला नीट विश्रांती पाहिजे ना.’ ताई आम्हाला माहिती देत इमारतीत फिरवत होत्या. विचारपूर्वक आखणी करून ऐसपैस इमारत उभी राहत होती.’
‘इथं आता माझी साडेसातशे मुलं राहतील. त्यांच्यासाठी ही लायब्ररीची, अभ्यासाची जागा.. इथं तुमची पुस्तकं..’’ मी धन्य झाले.
सरकारकडून एका पैशाचीही मदत न घेता ही जगन्माता जगन्नाथाचा रथ ओढतेय तो लोकाधाराने. भाषणानंतर पदर पसरून मिळालेला, देणगी रूपानं, पुरस्काररूपानं मिळालेला सर्व पैसा या वास्तूत जिरतोय..
‘‘..म्हणून तर पुरस्कार मिळाल्याचा आनंद होत असतो.. एक अडचण त्यातून दूर होते.’’ त्या सांगतात.
परत निघते वेळी मुलगा म्हणाला, ‘‘माझ्या मित्रांनाही या संस्थेविषयी सांगेन.’’
‘‘मग, तुलाच पुस्तकं घेऊन यायला का सांगितलं मी? तुम्ही दोघांनी आपल्या डोळ्यांनीच बघितलंत.. आता तुम्हीच लोकांना सांगाल ना!. माझी पब्लिसिटी झाली की!.. अनाथ मुलांनी बापुडवाणं, केविलवाणं जगायला पाहिजे असं कोणी सांगितलं! त्यांना प्रतिष्ठेनं, सन्मानानं जगता यायला पाहिजे.. त्यांनी का म्हणून खुराडय़ात राहायचं?’’
ज्या समाजात कोणत्याही परिस्थितीत आपलं मूल त्यागण्याची वेळ मातेवर येणार नाही तो खरा प्रगत समाज. मातृत्वाचा सन्मान करणारा.
हे लिहीत असताना मला लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रांतली घटना आठवतेय.
१८९५ मधला भीषण दुष्काळ. खायला अन्न नाही आणि प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती. त्या सुमारास टिळक मंडळी नगरात होती. नगरच्या मिशनवर त्यांचं बोर्डिग बंद करण्याची वेळ आली. ना. वा. टिळकांच्या (तोवर त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला नव्हता.) कानी हे आलं. त्यांना वाईट वाटलं. तिथल्या बावीस निराधार मुलांनी जायचं कुठं?  अन्नान्न करून मरून जातील ती. लक्ष्मीबाईंच्या संमतीनं त्यांनी ती मुलं आपल्या घरी आणली. स्वत:चा एकुलता एक दत्तू, दोन अनाथ मुली पदरी होत्याच. त्यात ही २२ जणांची भर.
‘‘आपले अन्न आणि या मुलांचे अन्न यात काहीच फरक करायचा नाही’’ असं वचन एकमेकांना देऊन, दत्तूलाही त्यात सामील करून घेऊन टिळक पती-पत्नीने ही मुलं अकरा महिने सांभाळली. पडतील ते कष्ट उपसत लक्ष्मीबाईंनी त्यांची काळजी घेतली. पैसे वाचवून मुलांना खाऊ घालता यावं म्हणून त्यांनी कामवाली कमी केली. स्वत: दळणं दळली.. ना. वा. टिळकांचा पगार तर कधीच खर्ची पडलेला असे. पुढची उचलही घेतलेली असे. या अकरा महिन्यांत त्यांना पाचशे रुपयाचं कर्जही झालं.. पण समाधान मिळालं ते मुलांना आश्रय देता आल्याचं, दुष्काळाच्या भीषण संकटातून त्यांना वाचवता आल्याचं.
मातृत्व हे लिंगसापेक्ष नाही, जन्मदात्रीशी जखडून नाही हे दर्शवणारी कितीतरी उदाहरणं आहेत.
कुष्ठ रुग्णांसाठी जीवन समर्पित करणारे, आपल्या अंध रुग्णांना काटे बोचू नयेत म्हणून बिनकाटय़ांच्या गुलाबांचे ताटवे फुलवणारे बाबा आमटे मातृहृदयाचेच! एखादी माता अनेक संकटांवर मात करत, स्वत: उपाशी राहून, पडतील ते कष्ट सोसून आपल्या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्यात यशस्वी झाल्याच्या कहाण्या आपण वाचतो. सानेगुरुजींनी वेगळं काय केलं! आपल्या छात्रालयातल्या गरीब मुलांचं फीअभावी शिक्षण थांबू नये म्हणून त्या कामी स्वत:चा सर्व पगार तर ते खर्ची घालतच. पण हेही कमी पडे तेव्हा, जेवणाचे खाडे करून ते पैसे वाचवून मुलांची गरज भागवत. या उपासमारीचे दुष्परिणाम त्यांच्या तब्येतीवर होऊ लागले तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यानं त्यांना आपल्या घरी जेवायला यायला सांगितलं. तिथं ते जाऊ लागले. पण तिथलं ते चारीठाव अन्न पाहून त्यांना आपल्या छात्रालयात साधंच जेवण जेवणाऱ्या मुलांची आठवण येऊन तोंडात घास फिरू लागला. ते पुन्हा छात्रालयाच्या भोजनालयात जेवू लागले.. हे कशाचं लक्षण?
वृत्तपत्रातून अलीकडेच इरिना सेंडलर या पोलीश महिलेविषयी वाचनात आलं होतं. जर्मनीनं पोलंड कब्जात घेतलं तेव्हा १९४० ते १९४३ या तीन वर्षांत या सेंडलरबाईने अडीच हजार ज्यू मुलं नाझींपासून वाचवली. दूर सुरक्षित पोचवली. तसं करण्यापूर्वी तिने आणि तिच्या वीस सहकाऱ्यांनी या मुलांच्या व्यवस्थित नोंदी करून त्या एका डब्यात बंद करून अंगणात खोल पुरून ठेवल्या होत्या. तिच्या या कामगिरीची कुणकुण लागल्यानंतर १९४३ मध्ये तिला नाझींनी पकडलं. तिच्याकडून माहिती वदवून घेण्यासाठी तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. ते सगळं सहन करूनही सेंडलरनं तोंड बंदच ठेवलं.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपाननं चीनवर आक्रमण केलं. त्या काळात शंभर अनाथ चिनी मुलं सुरक्षित ठिकाणी नेऊन पोचवणाऱ्या ब्रिटिश मिशनरी स्त्रीच्या-ग्लॅडीस आयलवर्डच्या- जीवनावर निघालेला चित्रपट ‘इन ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस’. इंग्रिड बर्गमननं ग्लॅडीसची भूमिका साकारली होती. मातृत्वाचा विलक्षण साक्षात्कार.
जातपात, धर्म, वंश, वर्ण न बघता स्वत:च्या जिवावर उदार होऊन अनाथ निराधार मुलांना वाचवणाऱ्या, त्यांना सांभाळणाऱ्या या व्यक्ती ‘मातृत्व’ वृत्तीचा सन्मान करणाऱ्या.
मातृत्व हे पोटच्या मुलाबाळांपुरतंच निगडित नसतं, ते वैश्विक असतं. अणुविखंडनाचा शोध लावणारी इटनर हिला १९४३ साली अमेरिकेतल्या लॉस अ‍ॅलामॉस इथे चालू असलेल्या अ‍ॅटमबॉम्ब प्रकल्पात सहभागी होण्याचं निमंत्रण होतं. ते तिनं नाकारलं. वास्तविक त्या वेळी ती परागंदा अवस्थेत अतिशय अडचणीचं जीवन जगत होती. पण तिनं आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग विध्वंसक कामगिरीकरिता होऊ देण्याचं नाकारलं.
माता म्हणजे केवळ जन्मदा नव्हे. जन्माला घातलेलं जगवणं, जोपासणं, सुसंस्कारित करणं, ते विकसित करणं.. जगभरच्या माता अण्वस्त्रविरोधात, युद्धाच्या विरोधात उभ्या राहतात. त्यांचंही वाण सर्वानी घ्यायला हवंय. 'No fists, No Knives. No Guns, No Bombs' या ललकारीला प्रतिसाद द्यायला हवा.
मातृदिन हा एका व्यक्तीपुरता, एका दिवसापुरता नाही. ती जीवनप्रणाली आहे.