खाणे पिणे आणि खूप काही : किंग फादर Print

शाहरूख खान , शनिवार, १६ जून २०१२
शब्दांकन : पूजा सामंत
शाहरूख जगासाठी किंग खान असला तरी घरी मुलांसाठी बनतो तो शेफ! दुबईच्या घरी मुलांना बटर चिकन, तंदुरी चिकन करून खायला घालणारा शाहरूख त्याच्या अम्मी-अब्बांकडून अस्सल हैदराबादी बिर्याणी आणि तंदुरी चिकन शिकायचं राहूनच गेलं हे सांगताना मात्र हळवा होतो..
सच तो यह है की, फादर्स डे कब आ रहा है, यह भी इस बंदे को नही मालूम.. अलीकडच्या काळात मदर्स डे, फादर्स डे, वूमन्स डे, टीचर्स डे, व्हेलेंटाइन डे असे अनेक डे साजरे होतात. त्यामुळे कुठला डे लक्षात ठेवणार? पण माझ्यासाठी फादर्स डे  रोजच असतो. माझ्या दोन्ही मुलांवर, आर्यन आणि सुहानावर माझा अतोनात जीव आहे, त्यांच्या आनंदासाठी मी नेहमीच काही ना काही करण्याचा सतत प्रयत्न करत असतोच, केवळ त्यांच्या सांगण्यावरुन किचनमध्ये  जाऊन टिपिकल शेफ बनून त्यांना नाना पदार्थ खिलवण्यापासून ते ‘रा-वन’सारखा टुकार  (समीक्षकांच्या मते)  चित्रपटाच्या निर्मिती करण्यापर्यंत मी अनेक उद्योग केलेत. केवळ त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी, कारण मुलांचा आनंद हा माझ्यातल्या पित्याचा सर्वात मोठा गौरव आहे.
मुलांबरोबर मोकळा वेळ घालवता यावा, त्यांना मजा करता यावी म्हणून म्हणून मी दुबईच्या जुमेरा बीचजवळ आणि लंडन दोन्हीकडे बंगले घेतले आहेत. दुबईच्या घरी मी जेव्हा जेव्हा मुलांना घेऊन जातो, तेव्हा आर्यन आणि सुहानाच्या मूडनुसार माझी रवानगी किचनमध्ये होते. मी मग शेफ होतो. तसा मी एक्स्पर्ट शेफ नाहीये. पूर्वी मला फक्त एग फ्राय करणं जमायचं, पण आता अनेक पदार्थ ट्राय करतो. मुलांसाठी मला शेफ होणं आवडतं.  त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे ते मजेशीर, आनंदाचे भाव :  आय लव्ह इट! मी तेव्हा किंग खान नसतो, मी किंग फादर असतो, सुहाना आणि आर्यनचा!
altलंडन आणि दुबईला गेल्यावरच मी शेफच्या गणवेशात आणि त्या रूपात असतो. याचं कारण मुंबईत, मन्नतमध्ये मला अजिबात सवड मिळत नाही. यहा उनके लिए शेफ बनना बहुत दूर की बात है, पण वैयक्तिक माझ्याबाबतीत म्हणाल तर माझ्या बालपणीच्या विशेषत: खाण्याच्या बाबतीतल्या आठवणी आजही ताज्या आहेत..
माझे अब्बाजान ताज मोहम्मद खान यांचं दिल्लीत एक छोटंसं ढाबाटाइप हॉटेल होतं. कारण ते पठाणी फूडचे शौकीन होते. ते  मूळचे पेशावरचे, तर त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा हे अफगाणिस्तानचे होते. माझी अम्मी फातिमा ही मूळ हैदराबादची. हैदराबाद हेही अफलातून खवय्यांसाठी प्रसिद्ध. एकूणच आमच्याकडे सामिष भोजनच त्या काळात बनायचं. त्या खान्याची लज्जत आजही जिभेवर आहे.. कधी हैदराबादी तर कधी पेशावरी-पठाणी खाणं असायचं. अब्बाजान हॉटेलमध्ये स्वत: अनेक पदार्थ करत, कधी कधी घरीही करत, पण त्यांचे खास पदार्थ म्हणजे बटर चिकन आणि तंदूरी चिकन. त्यांची खासियत असलले हे दोन पदार्थ ते कसे करतात, हे मात्र मी तेव्हा शिकू शकलो नाही. दुर्दैवाने ते फार लवकर अल्लाला प्यारे झाले. मी तेव्हा फार तर पंधरा वर्षांचा होतो. अब्बाजान करतात, तसंच चिकन तंदूरी लवकरच शिकायला हवं असा विचार प्रत्यक्षात आणेपर्यंत ते खुदाकडे गेलेही. त्यांना कॅन्सर झाला होता..
प्रत्येकाचा हातगुण असतो, त्यामुळे त्यांची ती विशिष्ट चिकन तंदूरी-बटर चिकन मी शिकलो नाही हे शल्य आजही माझ्या हृदयी ठसठसत आहे..
altनंतरच्या काळात अम्मीही गेली, ती जाण्यापूर्वी माझा व तिचा जगण्यासाठीचा संघर्ष तीव्र झाला होता. पुन्हा तीच धुमश्चक्री.. अम्मीकडूनही तिची हैदराबादी बिर्याणी, हैदराबादी गोश्त शिकणं राहूनच गेलं.. अम्मीच्या पश्चात मी मुंबईला आलो, अभिनयाच्या क्षेत्रात काही करावं हे ठरवून आलो होतो. फिल्मी हेलपाटे, कुठे नकार, कुठे होकार करता-करता पुढे जात राहिलो. नट झालो खरा, पैसाही मनासारखा मिळाला, पण या रहाटगाडग्यात  माझ्या लक्षात आलंच नाही, की उद्या जेव्हा मी पिता बनेन तेव्हा माझ्या मुलांच्या आवडीचे काहीतरी रांधून-शिजवून-बनवून घालायला हवं, मग त्यांच्याही मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुटेल. यशाच्या पायऱ्या चढत गेलो तेव्हा किचनची जबाबदारी नेमलेल्या शेफकडे दिली. पण शेवटी मुलांचा आग्रह मोडता येत नाहीच..
आर्यन आता चौदा वर्षांचा आहे, त्याच्यासाठी मी एग फ्राय, नूडल्स असे बिनडोक पदार्थ दुबईच्या घरी बनवू लागलो. त्याला ते आवडतंही. पण, सुहाना माझी बारा वर्षीय लेकीने मात्र माझी विकेट घेतली.. डॅड, मेक समथिंग डिफरंट.. मग, मला बटर चिकन, तंदूरी चिकन हे पदार्थ शिकून घ्यावेच लागले. केवळ सुहानाची मर्जी सांभाळण्यासाठी!.. यात माझाही थोडासा स्वार्थ होताच-आय टू लव्ह बटर चिकन, तंदूरी चिकन, चिकन टिक्का मसाला. मी हे सगळं शिकलो, अलीकडेच. पण त्यांच्या निमित्ताने मीही खातो, जरा ऐसपैस बटर वगैरे घालून. गौरी मग आमच्यात काही ढवळाढवळ करू शकत नाही. माझा मुक्त वावर किचनमध्ये आणि डिशमधल्या आवडत्या चिकनवर असतो.
गंमत सांगतो तुम्हाला, माझी लेक सुहानाने जेव्हा मला म्हटलं, पपा, हृतिक रोशनचे किती सॉलिड मसल्स आहेत, अक्षय अंकलचे, सलमान अंकलचे ‘५-६ पॅक्स’ आहेत.. व्हाय यू डोन्ट हॅव इट..? झालं. माझं पानिपत माझ्या लेकरांनी करून टाकलं. ‘ओम शांति ओम’ या माझ्या होम प्रॉडक्शन चित्रपटात मी फरहाला सांगून मुद्दाम माझ्या नसलेल्या पण जाणुनबुजून निर्माण केलेल्या ‘सिक्स पॅक अ‍ॅबस्’चं प्रदर्शन घडवलं.. यात मुख्य हेतू लेकरांना खूश करणं हा होता. माझी लीन बॉडी आहे, माझं वजनही फार वाढत नाही, त्यामुळे सिक्स पॅक वगैरे मुश्किलीने साध्य केलं. मनोरंजनाचा भाग हा हेतू कमी होता ही दिव्यं करण्यात. तोच प्रकार ‘रा-वन’च्या निर्मितीबाबत. ‘आर्यनला सुपर हीरोबाबत प्रचंड कुतूहल होतं. त्यालाही वाटायचं की, त्याचे डॅड सुपर हिरो आहेत, त्यांनीही अचाट शक्तीचे प्रयोग करावेत.. मग, त्याची वट वाढेल. ‘रा-वन’ हा चित्रपट मी आर्यन आणि सुहाना आणि त्याच्यासारख्या मुलांना  डेडिकेट केला होता. आर्यननेच इंटरनेटवर वाचलं, ओरिसातील बरीचशी गावं विजेविना होती.. त्यानेच आग्रह धरला की, त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. मग मी चार-पाच गावं दत्तक घेतली आणि त्या सगळ्या गावांना कायमचा वीजपुरवठा केला.
जगातलं सार्वभौम कितीही मोठं असो.. राजा असो रंक असो, पण मुलांसमोर त्याची सत्ता शून्य ठरते. स्वामी तिन्ही जगांचा मुलांशिवाय शून्य असंच मी म्हणेन. जगासाठी मी किंग खान आहे.. पण, माझे किंग माझी मुलं आहेत.