खाणे पिणे आणि खूप काही : बिघडलंय घडलंय Print

संपदा वागळे , शनिवार , २१  जुलै २०१२
alt

पदार्थ करीत असताना तो बिघडणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण या बिघडण्यातून ‘चांगलं’ घडविणाऱ्या सुगरणींची संख्याही कमी नाही. बिघडलेल्या पदार्थातून एक नवीनच, चविष्ट पदार्थ कसा घडला त्याचे हे चटकदार अनुभव.ह रीच्या नैवेद्याला केली बाई, जिलबी बिघडली, त्याचं एवढंसं उरलं पीठ, त्याचं केलं थालीपीठ.. हे भोंडल्याचं गाणं तुम्हा-आम्हा सर्वाच्या ओठातलं. पण या गाण्यातील ‘सुगरणगिरी’ दाखवण्याचा योग मात्र मला अगदी अलीकडे ‘साठीच्या उंबरठय़ावर’ पोहोचल्यावर आला.
खरंतर रोज दुपारी टीव्हीवर लागणारे खाद्यविषयक कार्यक्रम मन लावून बघणं हा माझा नेम असला तरी माझं पाककौशल्य मात्र ‘वरण-भात, पोळी-भाजी’ या परिघावर तळ्यात-मळ्यात करणारं.खादाडीवरील कार्यक्रमांचा माझ्यापुरता फायदा म्हणाल तर ‘पडद्यावरचे ते रंगारंग आणि बघताक्षणी जिभेला पाणी आणणारे पदार्थ पाहताना पुढय़ातील मिळमिळीत भाजी आणि पोळी घशाखाली कधी उतरते ते समजतही नाही’. असं असलं तरी दरवर्षी दिवाळीत माझी पाकसिद्धी सीमोल्लंघन करीत बेसन, लाडू, चिवडा व शंकरपाळी ही शिखरं यशस्वीरीत्या सर करीत आलीय एवढं नक्की.
यंदाही वर उल्लेखलेले दिवाळी स्पेशल पदार्थ बनवण्यासाठी मी कंबर कसली आणि पहिल्याच दिवशी अर्धा किलो बेसन अगदी घमघमाट सुटेपर्यंत भाजून सुमुहूर्त केला. फ्रिजमध्ये बरेच दिवस पडलेलं थोडं मुगाचं पीठ, थोडी खारीक पावडर आणि थोडा खोबऱ्याचा कीस हेही खमंग भाजून त्यात लोटून दिलं. तूपही चांगलं हात सोडून घातलं. वेलची पावडर, बेदाणे यांच्या बाटल्याही तळ दिसेपर्यंत रिकाम्या केल्या. आता फक्त पिठीसाखर घालून लाडू वळण्याचं शेवटचं काम उरलं होतं. एका दमात तेही उरकून टाकू म्हणत मी पिठीसाखर आणायला वळले.
दिवाळी फराळाच्या ‘रॉ मटेरियलची’ पिशवी ‘मला कधी उचलताय’ याची वाट बघत बाहेर सोफ्यावर पहुडली होती. तिच्यात हात घालून मी पिठीसाखर उचलली आणि मिश्रणात ओतली. सर्व जिन्नस हळूवारपणे एकजीव केल्यावर साखरेचं प्रमाण बघण्यासाठी म्हणून एक चिमूट तोंडात टाकली तर काय, गोडाचं नावनिशाण नाही. मनात आलं, ‘अगोड साखर नावाचा साखरेचा नवा प्रकार बाजारात आलाय की काय?’ दुसऱ्याच क्षणी काय घडलं असावं याचा अंदाज आल्याने पाय लटपटू लागले. घाईघाईत पिठीसाखर समजून मी अर्धा किलो मैदा त्यात ‘स्वाहा’ झाला होता.
डोळ्यासमोर तारे चमकणे, बोबडी वळणे, पोटात खड्डा पडणे, घशाला कोरड पडणे.. अशा सर्व वाक्प्रचारांचा अर्थ मला त्या क्षणी पुरता समजला. गेल्या २-३ तासांच्या मेहनतीबरोबर वाया गेलेले जिन्नस आणि पुढय़ातला पसारा या त्रिवेणी संगमाने डोळ्यांना धारा लागल्या. माझ्या ९० वर्षांच्या वडिलांना दिलेलं आश्वासन की ‘तुमच्यासाठी डबाभर बेसनाचे लाडू घेऊन येते..’ आठवून अधिकच उमाळे यायला लागले. काय करावं कळेना. सगळं मिश्रण पुन्हा भाजावं तर त्यातलं बेसन करपणार आणि न भाजता त्यात पिठीसाखर मिसळावी तर त्यातला मैदा पोटाला बाधणार. कुरुक्षेत्रावरील अर्जुनासारखी माझी अवस्था झाली..
विचार करता मला अचानक एक हक्काची आणि खात्रीशीर हेल्पलाइन आठवली. ‘फोन  अ फ्रेंड’. आणि मी पद्माताई खांबेटे यांचा फोन फिरवला. माझा पराक्रम ऐकल्यावर तिकडून क्षणार्धात सोल्युशन आलं; काही हरकत नाही. तयार मिश्रण घट्ट झाकणाच्या डब्यात भरून कुकरला लावून चांगल्या ४/५ शिटय़ा काढ. म्हणजे त्यातला मैदा शिजेल. नंतर मिश्रण गार झाल्यावर गुठळ्या मोडून भरपूर तूप आणि प्रमाणात पिठीसाखर मिसळून लाडू वळ. त्यात मैदा आहे हे कोणाच्याही लक्षात येणार नाही.’
या खेपेला मात्र मी कसलीही चूक केली नाही. पहिले दोन लाडू वळल्याबरोबर एक देवापुढे ठेवून दुसरा भीतभीत तोंडात टाकला. खरंच, मैद्याचा मागमूसही लागत नव्हता; चवही सुंदर आणि लाडूंची संख्याही दुप्पट. आनंदाच्या भरात दुसऱ्या दिवशी जो भेटेल त्याला मी ५-५ लाडू वाटत सुटले. लाडवांचा जरा जास्तच मोठा डबा बघून वडिलांचे डोळेही पाणावले. पण सगळ्यांना वाटलेले लाडू खाऊन ‘पचेपर्यंत’ अंदर की बात मात्र मी कुणालाच कळू दिली नाही. हो, उगीच मैद्याचं नुसतं नाव ऐकूनही कुणाच्या पोटात कुटकुटायला नको.
बरेच दिवस पोटात दडवलेलं हे ‘मैदा बेसन’ लाडवांचं गुपित दिवाळीचा हँगओव्हर उतरल्यावर मी आमच्या कट्टय़ावर उघड केलं आणि गंमत म्हणजे त्यानंतर ‘बिघडलेल्या पदार्थाच्या ‘जमलेल्या’ रेसिपीज’ सांगण्याची जणू तिथे स्पर्धाच लागली.
दस्तुरखुद्द पद्माताईंनीच सांगितलेला त्यांच्या भावाच्या लग्नाच्या वेळेचा म्हणजे १९७१ सालचा हा किस्सा. लग्नाच्या आदल्या दिवशी घरचं केळवण म्हणून २०-२५ लिटर दूध आटवून शेवयांची खीर केली होती. पण कशी कोणास ठाऊक, ती नासली. आता ऐनवेळी काय करणार? तेव्हा पद्माताईंनीच एक प्रयोग केला. पूरणयंत्रातील जाड चाळणी वापरून (भराभर होण्यासाठी) ती खीर त्यांनी एकजीव केली आणि तिला कस्टर्ड लावून एक उकळी आणली. ही बासुंदी लोकांच्या पसंतीला एवढी उतरली की, त्या वेळी नवीनच आलेला हा ‘कस्टर्ड’ प्रकार घेण्यासाठी मंडळी पुण्यातील मंडईसमोरील  दुकानात वेळ काढून गेली.
शीला म्हणाली, ‘माझं आणि उपम्याचं काय वैर आहे कोणास ठाऊक? रवा भाजताना कधी एखादा वळसा जास्त होतो तर कधी एखादा कमी. पाणी मोजूनमापून घेतलं तरी कधी तो दडस होतो, नाहीतर कधी त्याची खीर बनते. एकदा तर या बिघडलेल्या उपम्यावर मी एवढी चिडले की रागारागात त्याला आलं, लसूण, मिरचीचं वाटण लावलं आणि ओवा, बेसन घालून त्याची भजीच करून टाकली. ती एवढी हलकी आणि खुसखुशीत झाली की आता माझ्या मुलाचा हट्ट असतो, ‘आई उपमा कर आणि जरा जास्तच कर म्हणून.’ खरंच, या भज्यांना ‘उपमा’ नाही, असं म्हणून ती खाली बसेस्तोवर प्रेक्षकांतील एक ‘केटरर’ उभे राहिले आणि शीलाला म्हणाले, ‘बाई तुमच्या या रेसिपीने आमच्यापुढील एक प्रश्न, की सकाळच्या नाश्त्याला केलेला उपमा उरला तर त्याचं काय करायचं, तो सुटला. त्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद. एका दगडात दोन पक्षी म्हणतात ते हेच.
त्यानंतर ‘गूळपोळी मास्टर’ वैदेहीने आपला पोल खोलला. ती म्हणाली, गूळपोळी भाजताना गूळ बाहेर येऊन पोळ्या तव्याला चिकटायला लागल्या तर मी थोडं बेसन खमंग भाजून गुळात मिक्स करून छान मळून घेते आणि जर गूळ कोरडा किंवा कडक झाला तर अगदी किंचितशी शिजवलेली तुरीची डाळ त्यात घालून एकजीव करून घेते, काय बिशाद पोळ्या बिघडतील?
भाजी बिघडली किंवा न आवडणारी भाजी उरली तर काय करायचं, याचं उत्तर ८२ वर्षांच्या प्रमिलाताईंनी दिलं. त्यांचं म्हणणं, अशा वेळी घरात असलेली थोडी थोडी पिठं उदा. बेसन, तांदूळ पिठी, ज्वारी, नाचणी यांची पिठं इ. घालून आलं, लसूण, मिरची लावून व तीळ, खसखस, ओवा घालून त्याचे रोल करून, वाफवून श्ॉलो फ्राय करा. चटकदार नाश्ता तयार. भातात पाणी जास्त झालं तरी त्यात वरील जिन्नस घालून झकास थालीपीठं होतात. त्यांचं बोलणं ऐकतानाच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं.
एकीने सांगितलं की, दारातली फणसाएवढी पपई नेमकी अगोड आणि घट्ट निघाली तेव्हा तिचा गर मिक्सरमध्ये फिरवून त्यात साखर घालून जाम केला तर त्याचा केव्हाच फडशा पडला. तर दुसरीने घरात आलेला केळीचा घड एकदम अति पिकल्यावर त्यात मैदा, रवा, तांदळाची पिठी, गूळ, वेलची घालून बनवलेल्या गोड पुऱ्यांची रेसिपी सांगितली. ‘पोहे’ भिजवून त्यात आलं, लसणीचं वाटण लावून त्याचे वडे बनवून वेळ कशी निभावली त्याची कथा सांगितली; तर कुणी सुरळीच्या वडय़ा करताना पिठात गुठळ्या झाल्याने ते मिश्रण गरम असतानाच मिक्सरवर फिरवून घेतल्याने कशी फजिती टळली त्याचा किस्सा सांगितला.
दोन तास उलटले तरी बिघडलेल्या पदार्थाच्या ‘पुनर्जन्माच्या’ सुरस कहाण्या संपेचनात. या मंथनातून नव्हत्याचं होतं करणारीला खरी सुगरण म्हटलं पाहिजे, यावर सर्वाचं एकमत झालं. ‘मास्टर शेफ’मधील स्पर्धकांसमोर अशा प्रकारचं चॅलेंज ठेवावं.. असा कट्टय़ातर्फे प्रस्ताव पाठवण्यावरही शिक्कामोर्तब झालं. या ‘बिघडलंय-घडलंय’ एपिसोडला कारणीभूत ठरलेली माझी मैदा-बेसन लाडवांची रेसिपी घेऊन आता मी टीव्हीवर जाईन म्हणतेय...