खाणे पिणे आणि खूप काही : वडोदरानू खास जमण Print

सुनीती काणे ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गावाकडची चव

लग्नानंतर बडोदं सोडल्याला आता चव्वेचाळीस र्वष होत आली. त्या काळची आठवण आली की ती अगत्यशील माणसं आठवून हुरहुर लागते. शेजाऱ्यांबरोबर, आप्तमित्रांबरोबर चाखलेल्या तिथल्या स्वादिष्ट व्यंजनांचा स्वाद नव्यानं आठवतो. मन मागे जातं आणि भूतकाळात रमतं. घरोघरच्या अन्नपूर्णानी प्रेमानं रांधून मायेनं भरवलेले घास आठवले की, माहेरवासाची ऊब नव्यानं अनुभवल्याचा भास होतो..

बालपणीची माझी बरीच वर्षे संपन्न गुर्जरभूमीत व्यतीत झाली. अन्नधान्य, दूध-दुभतं, ऋतूंनुसार मुबलक मिळणाऱ्या भाज्या-फळं यांची रेलचेल असलेलं समृद्ध गाव असा बडोद्याचा ठसा मनावर कोरला गेला आहे. हसऱ्या, आतिथ्यशील, सढळपणे पाहुणचार करणाऱ्या गुर्जरभगिनी आठवल्या की मन अनेक र्वष मागे जातं. बदलत्या ऋतूंची खासियत असलेल्या, आपल्या खास रंग-गंध-स्वादानं रसनेची तृप्ती करणाऱ्या अन्नपदार्थाची आठवण आजसुद्धा ताजी आहे. मग ‘राजेशाही गुजराथी थाळी’ देणाऱ्य़ा हॉटेलकडे पावलं वळतात आणि दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न केला जातो. पण ती माती, ती हवा, प्रेमानं खाऊ घालणाऱ्यांची ती आस्था नव्यानं इथं कुठं मिळणार? मग आठवणींच्या राज्यात फेरफटका मारायचा आणि ताजंतवानं व्हायचं.
पहिली आठवण येतेय दिवाळी-पाडव्याची. गुजरातेत याला ‘बेसतूं वरस’ म्हणजेच ‘नव्यानं सुरू होणारं वर्ष’ म्हणतात. त्यांचं नवं वर्ष आपल्याप्रमाणे चैत्रपाडवा नसून दिवाळी-पाडवा असतं. या दिवशी पहाटेसच अभ्यंगस्नान करून शालू-अलंकार ल्यालेल्या घरोघरच्या लक्ष्मी आणि त्यांचे पतीदेव आप्तमित्रांकडे ‘साल-मुबारक’ म्हणत बधाई द्यायला जातात आणि एकमेकांचा फराळ चाखतात. मला आठवतंय की माझ्या मैत्रिणी आमच्या खानदेशी स्वयंपाक्यानं केलेल्या झणझणीत बाकरवडय़ांवर तुटून पडत आणि माझ्यासाठी मला अत्यंत प्रिय असलेले ‘मठिये’ ऊर्फ मटकीचे हरताळ पापड घेऊन येत. मटकी भिजवून, वाळवून, दळून, दुधात भिजवून कुटून हलकी करायची आणि त्यांचे पुऱ्यांच्या आकाराचे पापड तळून काढायचे. हे मठिये अत्यंत स्वादिष्ट आणि हलके-कुरकुरीत असत; जिभेवर विरघळत असत. बडोद्याची दिवाळी आणि मठिये हे अतूट समीकरण डोक्यात घट्ट बसलंय.
alt

दिवाळीपाठोपाठ येणारा तिथला चैतन्यमय सण म्हणजे संक्रांत. याला तिथे ‘उतराण’ (उत्तरायण) म्हणतात. त्यादिवशी सकाळपासून घराच्या गच्चीवर आणि घर कौलारू असेल तर घराच्या छपरावर मुलं जमा होत आणि पतंग उडवू लागत. घरकाम आटोपल्यावर त्यांच्या आया-बहिणी त्यांना उत्तेजन द्यायला जमत आणि आरडाओरड करत. कुणाचा पतंग डौलानं उंच जातोय आणि काटला न जाता राजासारखा अपराभूत राहातोय, तो किती पतंग काटतोय, याबद्दल वातावरणात चुरस खदखदत असे. क्रिकेट-मॅचमध्ये आपल्या भिडूनं सिक्सर मारल्यावर आनंदाची सामूहिक गर्जना ऐकू येते, तशीच गर्जना दुसऱ्याचा पतंग आपल्या भिडूनं काटल्यावर दुमदुमत असे. पतंगाच्या धुंदीत तहानभुकेचं भान नसलं तरी रेवडय़ा, उसाचे करवे, आंबट-गोड बोरं, पेरू यांचा फराळ अव्याहत चालू असे. संक्रांतीच्या आगेमागेच ठिकठिकाणी उंध्यो-पाटर्य़ा झडू लागत. ज्यांच्या आप्तमित्रांची शेतं असत, तिथं शेतात उंध्यो बनवण्याचा साग्रसंगीत कार्यक्रम होत असे. मोठं मडकं आतून साफ करून त्यात उंध्यो-स्पेशल भाज्या- गोराडकंद, रताळी, बटाटे, वांगी, केळी, कोवळी सुरती पापडी, वालाचे दाणे, मेथीचे मुठिये तेल-मसाल्यांनी माखून भरल्या जात. उंध्योत तेल घालताना हात सढळ असावा लागे. तेव्हा कॅलरीजचा हिशेब करून चालत नसे. मडक्याचं तोंड घट्ट बंद करून जमिनीत खणलेल्या खड्डय़ात ते मडकं उलटं पुरलं जात असे. (म्हणून ‘उलटं’ ऊर्फ ‘उंध्यो’) आणि वरून जाळ देऊन आतल्या भाज्या खरपूस शिजवल्या जात असत. उंध्योबरोबर पुरी, जिलबी, घट्ट दही, हिरवी चटणी, असला तर हुरडा असा जोड बेत असे. शेतात रांधलेल्या खमंग उंध्योची चव शहरातल्या, गॅसच्या शेगडीवरच्या पातेल्यात रटरटलेल्या उंध्योला येत नसली, तरी शेताची सोय नसलेली मंडळी त्यावरही ताव मारत. आपल्या धुंधुर्मासासारखा तिथे ‘उंध्योमास’ असे. संक्रांतीची आपली गुळाच्या पोळीची खासियत गुर्जरबंधूंनी आपलीशी केलेली नाही. आपल्या बासुंदीचा आणि तांदळाच्या खिरीचा समन्वय साधणारा त्यांचा ‘दूध-पाक’ हे तेव्हा लग्नातलं सर्वमान्य पक्वान्न असे. दूधपाक म्हणजे तांदूळ टाकून उकडलेली घट्ट आटवलेली, वेलचीच्या स्वादाची बासुंदीच. लग्नाच्या जेवणात खमणी (सुरळीची वडी) आणि पात्रा (आळुवडी) हमखास असेच.
लवंग, दालचिनीच्या स्वादाची पांढरी गुजराथी कढी, शेंगदाणे घातलेली चिंच-गुळाची पातळसर चविष्ट आमटी, ओवा घातलेली गवारीची भाजी, कैऱ्यांचा गोडसर छुंदा या त्यांच्या रोजच्या स्वयंपाकातल्या गोष्टी अत्यंत चविष्ट!
तुपात निथळणारी त्यांची घारी, मोहनथाळ अशी मिष्टान्नं रुचकर असली तरी तुपाचा थर पाहून घशाखाली उतरत नसत. रवाळ सुतरफेणी ही गुजरातची खासियत. तर सकाळच्या नाश्त्याला दूध-जिलेबी-भावनगरी गाठी खाण्याचा रिवाज सौराष्ट्रातला. शिरा बहुतांशी सत्यनारायणाच्या पूजेत (या पूजेला ‘कथा’ म्हणत) प्रसाद म्हणूनच केला जाई. तो आपल्या प्रसादासारखाच साजूक तूप, दूध, केळी, वेलची, साखरेचा बनवलेला असे. खानदेशी बाकरवडी गुर्जरबंधूंनी आपलीशी केली. बेसनपोळी लाटून त्याला चिंचेचं पाणी-लाल तिखट लावून आत कोशिंबीर, तीळ, सुकं खोबरं, मिरच्या, आलं यांचं भरपूर सारण भरलेली बाकरवडी तिथल्या दुकानात विकली जाई. आपल्या चितळेबंधूंच्या बाकरवडीसारखी ती कुरकुरीत नसली तरी अत्यंत रुचकर लागे. बडोद्यात ‘लीलो चेवडो’ ही फरसाणवाल्यांकडली खास चीज असे. ‘लीलो’ शब्दाचा अर्थ ‘हिरवा’ किंवा ‘ओला’ असा आहे. हा चिवडा ओलसर असल्यामुळे त्याला हे नाव मिळालं असावं. यात पोहे नसतच. बटाटय़ाचे ओलसर तळलेले काप, त्यात मिसळलेली कुरकुरीत तळलेली चणाडाळ, त्याला तीळ, मिरच्या, सुकंखोबरं यांची झणझणीत फोडणी. बडोद्यातल्या ज्युबिली गार्डन वर्तुळाच्या सभोवार असलेल्या फरसाणवाल्यांच्या दुकानातल्या ताज्या ‘लीलो चेवडा’वर सर्वाच्या उडय़ा असत. त्याचप्रमाणे वाटल्या चणाडाळीचे गरमागरम वडे आणि गोड चटणी यावरसुद्धा सर्व जण तुटून पडत. बारा महिने तेरा काळ ही दुकानं गर्दीनं फुलून गेलेली असत.
बडोद्याची आजतागायत अत्यंत लोकप्रिय असलेली चीज म्हणजे शर्माजीचे तपकिरी रंगाचे खमंग, लुसलुशीत पेढे. ‘दुलीराम रतनलाल शर्मा’ या नावाची पाटी मिरवणारं, बडोद्याच्या ‘टॉवर’ भागात हमरस्त्यावर असलेलं हे छोटंसं दुकान गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ लोकांची तोंडं गोड करतं आहे. ‘धारवाडी पेढा’ नावानं पुण्याला विकला जातो, त्या पेढय़ाच्या चवीचा परंतु त्याहून अनेकपट लुबलुबीत- मृदु मुलायम असा शर्माजीचा पेढा बडोद्याची एकही माहेरवाशीण विसरू शकणार नाही. त्यानंतर आलेल्या हलवायांनी केशरी पेढे, पिस्ता पेढे, पांढरे मलई पेढे असे अनेक पर्याय बाजारात आणले तरी शर्माजींची लोकप्रियता अबाधित राहिली आहे. रोज ताजा माल विकणाऱ्या आणि ताजा माल संपल्यावर विक्री बंद ठेवणाऱ्या शर्माजींचे एकनिष्ठ ग्राहक दुसरीकडे ढुंकूनही पाहात नाहीत.
तिखट-गोड पदार्थाच्या आठवणीत आकंठ डुंबल्यावर आठवण येतेय तिथल्या रानमेव्याची. थंडीत आंबट-गोड गराची गोल बोरं; लांबट, करकरीत, गोड चवीची अहमदाबादी बोरं, स्वादिष्ट पेरू, उसाचे करवे, विलायती चिंच (यालाच आकारावरून जंगल-जिलेबी किंवा आतल्या पांढऱ्या गरामुळे गोरस-आमली असं म्हटलं जाई) यावर ताव मारून झाला, उन्हाळी परीक्षा संपल्या की मोसम येई आमरसाचा! बाजारपेठ रायवळ आंब्यांनी ओसंडून जाई. पायरी-हापूस हे बाहेरून येणारे आंबे महाग असत. बलसाड हापूस जूनच्या सुरुवातीला येई. तोपर्यंत स्थानिक रायवळच्या स्वादिष्ट, मधुर रसावर लोक आडवा हात मारत. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीची ही आठवण आहे. त्यावेळेस रायवळ आंबे रुपयाला पाच शेर (साधारण अडीच किलो) मिळत. उन्हाळ्यात तेव्हा बडोद्याला फारशा भाज्यासुद्धा मिळत नसत. कांद्याची दह्य़ातली कोशिंबीर, बटाटय़ाच्या विविध प्रकारे केलेल्या भाज्या, कैरीचा टक्कू आणि आमरस-पोळी या रोजच्या बेतावर ताव मारून आम्ही मुलं उन्हाळा संपेपर्यंत चांगली गबदूल होत असू. उन्हाळ्यातच ‘ठंडा मिठा फालसा’, चिकाळ रायण्या आणि खरबूज (याला शक्करटेटी म्हणत) ही फळंसुद्धा मुबलक मिळत. या साऱ्या गोष्टी आमची उन्हाळी सुटी गोड करून टाकत. बडोद्याच्या भीषण उन्हाळ्यात गच्चीवर संध्याकाळी पाणी शिंपडून थंडावा आणायचा आणि रात्री वाऱ्याची झुळूक अनुभवत चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली निवांत झोपायचं हे राजेशाही सुख वाटे.
लग्नानंतर बडोदं सोडल्याला आता चव्वेचाळीस र्वष होत आली. त्यानंतर तिथं जाण्याचा फारसा योगही आला नाही. आता तर आई-वडील गेले. मैत्रिणी पांगल्या. आम्हाला शिकवणारे अनेक प्राध्यापकसुद्धा काळाच्या पडद्याआड गेले. त्या काळची आठवण आली की ती अगत्यशील माणसं आठवून हुरहुर लागते. शेजाऱ्यांबरोबर, आप्तमित्रांबरोबर चाखलेल्या तिथल्या स्वादिष्ट व्यंजनांचा स्वाद नव्यानं आठवतो. मन मागे जातं आणि भूतकाळात रमतं. घरोघरच्या अन्नपूर्णानी प्रेमानं रांधून मायेनं भरवलेले घास आठवले की, माहेरवासाची ऊब नव्यानं अनुभवल्याचा भास होतो.