खाणे, पिणे आणि खूप काही : सुग्रास आणि आरोग्यदायी पदार्थाची मांदियाळी Print

लता दाभोळकर - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतीय खाद्यसंस्कृती ही जगातील अन्य खाद्यसंस्कृतींपेक्षा वैविध्यपूर्ण आहे. भारतातील विविध धर्म, जाती-जमातींनी या खाद्यसंस्कृतीला समृद्ध केलं आहे. विविध संस्कृतींचा अनोखा मिलाफ भारतीय खाद्यसंस्कृतीत प्रकर्षांने जाणवतो. ही खाद्यसंस्कृती केवळ जिभेचे चोचले पुरवते असे नाही, तर आरोग्यही राखते. प्रांतवार इथल्या खाद्यपदार्थाची चव बदलत जाते, त्यात वैविध्य जाणवते. अगदी एकच पदार्थ विविध प्रकारे करण्याची हातोटी आपल्या भारतीयांकडेच आहे, याविषयी कोणाचेही दुमत नसावं.

विविध राज्यांतील वातावरण, तिथल्या नैसर्गिक संपत्तीची उपलब्धता यांनी परिपूर्ण अशी भारतीय खाद्यसंस्कृती पाश्चात्त्यांनाही भुरळ पाडत आहे. या खाद्यसंस्कृतीवर त्या-त्या राज्याचा प्रभाव आपल्याला प्रकर्षांने जाणवतो. पदार्थ बनविण्याच्या पारंपरिक पद्धती आजही या पदार्थाची चव कायम राखतात. शाकाहार आणि मांसाहार अशा दोन्ही पद्धतींचा आहार आपली रसना तृप्त करणारा असाच आहे. हा आहार आपलं खाद्यजीवन समृद्ध करतो. जाळ तिखटाबरोबर अतिगोड पदार्थ, आंबट, तुरट अशा अनेक चवींच्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर भारतीय पद्धतीच्या जेवणाचा आनंद घ्यायला हवा.
जागतिकीकरणात सर्वच क्षेत्रांत आदान-प्रदानाची प्रक्रिया सुलभ होताना खाद्यसंस्कृतीमध्येही मोठय़ा प्रमाणात आदान-प्रदानही झालेले दिसून येईल. पाश्चात्त्यांनी ज्या प्रकारे भारतीय खाद्यपदार्थाना पसंती दिली आहे; तसेच भारतीय लोकांनीही पाश्चात्त्य खाद्यपदार्थाना काही प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात प्रवेश करू दिला आहे. आज अनेक पाश्चात्त्य पदार्थ घरीही सर्रास केले जातात.

खाद्यपदार्थ हा प्रेक्षकांचा अधिक जिव्हाळ्याचा विषय असल्याचं लक्षात घेऊन अनेक वाहिन्यांवर आवर्जून खाद्यपदार्थावरील कार्यक्रम प्रदर्शित केले जात आहेत. या वाहिन्यांवर सेलिब्रेटीही आपले आवडीचे खाद्यपदार्थ बनविण्यात मागे नाहीत. सेलिब्रेटींचे आवडीचे खाद्यपदार्थ, त्यांच्याशी निगडित आठवणींनी सजलेल्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनीही पसंती दिली आहे. खाद्यपदार्थावरील कार्यक्रमांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो हे लक्षात आल्यावर अनेक वाहिन्यांनी असे कार्यक्रम दाख्विण्यास सुरुवात केली. अगदी खाद्यपदार्थावर बेतलेली एक वाहिनीच सुरू करणं, हे खाद्यपदार्थाबाबत व ते तयार करण्याविषयी लोकांमध्ये असलेले कुतूहलच अधोरेखित करतं. अर्थात, ‘उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म..’ हेच खरं!
हेच खाद्यपदार्थ पुस्तकरूपात लोकांपर्यंत पोहोचविण्याचा घाटही अनेक प्रकाशन संस्था घालत आहेत. विशेष म्हणजे अशा पुस्तकांना बाजारात चांगली मागणी असल्याचं निरीक्षणही प्रकाशक नोंदवतात. खाद्यपदार्थाची पॉकेट बुक्स मोठय़ा प्रमाणात विकली जातात. पूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच पुस्तकं बाजारात उपलब्ध होती. आता त्यांची संख्या शंभराच्या घरात आहे; किंबहुना जास्तच!  खाद्यपदार्थाची रंगीत चित्रे, छपाईसाठी उत्तम कागद यांनी ही खाद्यपदार्थाची पुस्तके खाद्यप्रेमींची मनं वेधतात. अशाच नुकत्याच दाखल झालेल्या काही पुस्तकांविषयी आपण जाणून घेऊयात.
आपलं महाराष्ट्रीय जेवण चौरस असतं वा असावं अशी अपेक्षा असते. दुपारचं जेवण, रात्रीच जेवण यातही पातळ भाजी, सुकी भाजी, वरण वा आमटी शिवाय कोशंबिर वा सॅलड हवं असतं याशिवाय नाश्त्यामध्येही विविधता हवी असते.. हवी असते हे मान्य पण ती रोजच्या रोज आणायची कशी? त्याचा सततचा भुंगा गृहिणींच्या मागे लागलेला असतो. अनेकदा आपल्याला पदार्थ माहिती असूनही चटकन सुचत नाहीत. मग अशा वेळी आयती डायरीच मिळाली तर ? तुम्ही फक्त बाजारात जाऊन सांगितलेले पदार्थ विकत आणायचे की पुढचं काम  शीला बारपांडे आणि प्रणाली बारपांडे यांचं ‘सासू-सुनेची शाकाहारी मेन्यू डायरी’ करतं! या पुस्तकात वर्षभरातील प्रत्येक आठवडय़ाचा, प्रत्येक दिवसाचा सकाळ-दुपार आणि रात्रीचा मेन्यू दिला आहे. त्याला अगदी कोशिंबीर, रायतं, सॅलड यांचीही जोड आहे.
लेखिकाद्वयींनी आठवडय़ाचं तयार मेन्यूटेबल गृहिणींच्या दिमतीला दिलं आहे. त्यामुळे या मेन्यूटेबलप्रमाणे तुम्ही तुमचा मेन्यू ठरवू शकता. विशेष म्हणजे यात दिलेले पदार्थ हे आरोग्यासही पोषक आहेत. अगदी साध्या-सोप्या रेसिपींमुळे ही मेन्यू डायरी जवळ बाळगली तर ती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल. ‘मैत्रेय’ प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाची किंमत २५० रुपये आहे.
मत्स्याहार म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो गोवा आणि तिथला मैलो न् मैल पसरलेला समुद्र. तिथला निसर्ग मनाला प्रसन्न करतो.. तृप्त करतो तसा तिथला मत्स्याहार जिव्हेला तृप्त करतो.. परंतु त्यासाठी गोव्याला जायची आवश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरी त्या स्वादाचे पदार्थ बनवू शकता त्यासाठी मदतीला आल्या आहेत गोमती सावर्डेकर. त्यांनी आपल्या ‘माय गोवा’ या पुस्तकात नावीन्यपूर्ण गोवन रेसिपीज दिल्या आहेत. सुरुवात अर्थातच होते ती गोवन मसाल्यापासून. कारण कुठल्याही मांसाहारी पदार्थाचा आत्मा म्हणजे त्याचा मसाला. तुमचा मसाला किती अस्सल आहे त्यावर तुमच्या पदार्थांची चव ठरलेली असते साहजिकच एकदा का हा गोवन मसाला हातात पडला की अर्र्धी बाजी मारल्यासारखंच आहे. शिवाय या छोटेखानी पुस्तकातील काही फोटो नुसते पाहूनही अस्सल मांसाहाराच्या तोंडाला पाणी सुटतं. पापलेटची आमटी, तिसऱ्या हिरव्या मसाल्यातल्या, कोळंबी पुलाव, चिकन शागुती, सुक्या बांगडय़ाचं कालवण, भरला बांगडा .. सुटलं ना पाणी..  पण गोवा म्हणजे काही फक्त मांसाहार नाही तिथे बहुसंख्य घरात सोमवारी शाकाहारच असतो. त्यामुळे कच्च्या फणसाची भाजी, सोललेल्या मुगाची भाजी, खटखटे, नीर फणसाचे काप, सोलकढी अशा ‘अपरिहार्य’ गोव्याचे पदार्थ त्यातल्या आवश्यक कृती सह या पुस्तकात आहेत. योगेश्वर पब्लिकेशन्सचे हे पुस्तक १५० रुपये किमतीत उपलब्ध आहे.
याच पठडीतलं आणखी एक पुस्तक आहे विवेक ताम्हाणे याचं ‘शेफ रेसिपीज’.  या पुस्तकात भारतीय आणि पाश्चात्त्य पदार्थाची माहिती देतानाच पदार्थाचा इतिहासही थोडक्यात नमूद केला आहे. अगदी थंडपेयांपासून ते डेझर्टपर्यंतच्या पाककृतींचा समावेश या पुस्तकात आहे. या रेसिपीज देताना लेखक आरोग्याविषयीही सजग असल्याचं जाणवतं. याशिवाय कारवारी, सारस्वत, कोकणी, मालवणी पदार्थांच्या कृती या पुस्तकात आहेत. लोणची-चटणी, मुरंबे, आफ्रिकन कुझीन, अफगाणी फूड, गुजराती लोकांचे पदार्थ, केक, आरोग्यदायी पराठे असे अनेक या पुस्तकातून आपल्या भेटीला येतात, अगदी उत्तम चित्रांसकट! मॅजेस्टिक पब्लिकेशनचं हे पुस्तक ३५० रुपये किमतीचं आहे.
केवळ सुगरण असलेल्या गृहिणींसाठीच ही पुस्तके उपयुक्त आहेत असे नाही. पदार्थ आवडीने खाणाऱ्या आणि ते बनविणाऱ्या प्रत्येकासाठी ही पुस्तकं उपयुक्त ठरतील. या पुस्तकांचा एक समान धागा म्हणजे हे पदार्थ खाणाऱ्याचं आरोग्य उत्तम राहावं, याचा केलेला विचार! हे पदार्थ बनविण्याच्या सहज-सोप्या कृती हासुद्धा एक विशेषच!
या पुस्तकातील पदार्थाच्या चित्रांवरूनच पोटातील अग्नी प्रज्वलित होतो आणि आज कुठला पदार्थ करायचा आणि त्याचा आस्वाद कोणाकोणाला घडवायचा, याचे आडाखे बांधायला तुम्ही मनोमन सुरुवात करता..