खाणे पिणे आणि खूप काही : टू मिनट्सच्या पलीकडे... Print

alt

सई कोरान्ने-खांडेकर , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
प्रत्येकाची नूडल्स करायची एक खास पद्धत असते. इतक्या वर्षांत, आपण रस्त्यावरच्या चायनीज ठेलेवाल्याच्या तेलकट, हळद लावलेल्या पिवळ्या हाका नूडल्सच्या पलीकडे, पाकिटातल्या २ मिनिटांत होणाऱ्या मद्याच्या शेवयांच्या गोळ्यापासून खूप पुढे आलो आहोत. इतर धान्यांपासून तयार केलेले नूडल्स आता आपल्याला खाऊन माहिती आहेत.. आणि तरी, चायनीज खायची तल्लफ आली की रस्त्यावरचा तेलकट, खारट, कृत्रिम खाण्याच्या रंगात भिजलेला ट्रिपल शेझवान खावे असेच प्रथम वाटते..
अंधेरीतल्या कमíशअल परिसरातल्या एका पॉश, वातानुकूलित ऑफिसात माझी पहिली नोकरी होती - संपादक म्हणून. त्या निळ्या, कुडकुडणाऱ्या थंडीत काम करायला मदत व्हावी म्हणून ऑफिसच्या मधून दोन वस्तू सारख्या बाहेर येत असत, आलं घातलेला कडक चहा आणि चमचमीत नूडल्स. या दोन वस्तूंशिवाय काम करणे अशक्य होते. त्या मोरीएवढय़ा स्वयंपाकघरात दोन जण कायम मोठ्ठाले काळे मातीचे कप धूत असत आणि त्यात ताजा, गरम, मसालेदार चहा ओतत असत. चहाच्या पातेल्याशेजारी आणखीन एका मोठय़ा पातेल्यात कायम पाणी उकळत असे - नूडल्ससाठी. सकाळी सात वाजल्यापासून ऑफिसमध्ये हालचाल सुरू व्हायची ती मध्यरात्र उलटून गेल्यावरसुद्धा चालूच असायची. रात्रीच्या अंधारात, कुडकुडणाऱ्या थंडीत, शेवटची पाने वाचत, लहान-मोठय़ा चुका सुधारत, नखं खात आम्ही भीतभीत काम करत असताना वाफाळलेले नूडल्सचे बोल हातात आले, की कुणीतरी मायेचा हात डोक्यावर ठेवल्यासारखे वाटायचे. त्या वाफा उठून कम्प्युटरच्या समोर नाचल्या की मन शांत व्हायचे.
गणेश, ऑफिसचा स्वयंपाक करणारा वेटर प्यून दोस्त, आमच्यासाठी वेळीअवेळी मॅगी बनवत असे. त्याची पद्धत अशी -उकळत्या पाण्यात नूडल, गाजराचे तुकडे आणि मटार प्रथम शिजवून घ्यायचा. शिजल्यावर तयार बारीक चिरलेली मिरची, आंबटगोडतिखट मसाला, भरपूर टोमाटो केचप, आणि उभे चिरलेले आम्लेटचे तुकडे त्यात घालायचा. आणि वरून एकदा केचपचा.. पचाक.. " की झाले नूडल्स तयार .. आमच्या टेबलावर बोल् भरून नूडल येऊन किचकट  alt
एडिटच्या समोर बसत आणि तो तिखट मसालेदार, गरम वास सगळीच दुखणी दूर करायचा- शारीरिक आणि मानसिक. आज कित्येक वर्षांनंतरसुद्धा, भरपूर काम असलं किंवा सर्दीताप असला तर मला अगदी तसेच, गणेशचे नूडल खावेसे वाटतात..
प्रत्येक आईची जशी आमटी करायची पद्धत वेगळी असते, तसेच थोडं फार, प्रत्येकाची नूडल करायची एक खास पद्धत असते. इतक्या वर्षांत, आपण रस्त्यावरच्या चायनीज ठेलावाल्याच्या तेलकट, हळद लावलेल्या पिवळ्या हाका नूडलच्या पलीकडे, पाकिटातल्या २ मिनिटांत होणाऱ्या मद्याच्या शेवयांच्या गोळ्यापासून खूप पुढे आलो आहोत. तांदळाचे आणि इतर धान्यांपासून तयार केलेले नूडल आता आपल्याला खाऊन माहिती आहेत. अगदी पातळ, पारदर्शक ‘ग्लास नूडल्स’ तांदळाच्या कागदासारख्या पोळीत भरून त्याचे थाय पद्धतीचे रोल केले जातात. रेश्मासारखे (Udon) नूडल्स सूपमध्ये घातले जातात- सूपमधल्या सगळ्या चवी त्या नूडलमध्ये उतरतात. तसेच ‘stir फ्राय’सारख्या साध्या पाककृतीत हे नूडल अर्धवट कुरकुरीत झाले आणि आजूबाजूच्या तिखट, तुरट, गोड, आंबट चवी शोषून त्याची मजा औरच असते. महागडय़ा चायनीज हॉटेलात बांबूच्या भांडय़ात किंवा सुंदर निळ्या आणि पांढऱ्या चिनी मातीच्या भांडय़ात नूडल देतात. कुठे ते मळकट प्लास्टिकचे बोल् आणि त्यात येणारे तेलकट, तिखट नूडल-त्यावर बसलेले बारीक लसणीचे आणि पातीच्या कांद्याचे जवळजवळ काळपट तुकडे! स्वतला  चॉपस्टिक्सनी खायला आपण शिकवले. हॉटेलात ‘अजिनोमोटो नको’ असे सांगायला शिकलो. प्लेटवर तेलाचा तवंग दिसला तर नाकं मुरडायला शिकलो. आणि तरी, चायनीज खायची तल्लफ आली की रस्त्यावरचा तेलकट, खारट, कृत्रिम खाण्याच्या रंगात भिजलेला ट्रिपल शेझवान खावे असेच प्रथम वाटते. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये ६ मित्रांनी एका प्लेटमध्ये खाल्लेले chow mein एखाद्या थंडगार, पावसाळी संध्याकाळी आठवतात.
थायलंडची प्रसिद्ध डिश-पॅड थाय ही माझी सध्याची अगदी आवडती नूडल डिश आहे. तांदळाच्या चपटय़ा नूडलपासून बनवलेल्या या पाककृतीत आंबवलेल्या कोलंबीच्या पेस्टचा सुंदर वास असतो. त्याचबरोबर, शेंगदाणे, चिंच आणि थोडीशी साखर असल्यामुळे त्याला आंबटगोडतिखट अशी चव असते. आवडीप्रमाणे त्यात चिकन, ताजी कोलंबी किंवा भाज्या घालू शकतो. झटपट होणारी आणि हमखास सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे. गप्पा मारता मारता मित्रांबरोबर बनवण्यासारखी आणि एकत्र खाण्यासारखी. पॅड थायची पेस्ट आधी करून फ्रिजमध्ये १५ दिवसांपर्यंत ठेवता येते. आज मी इकडे शाकाहारी पद्धत दाखवली ह्यहे; यातच कोलंबी, चिकन इत्यादी घालून मांसाहारी डिश तयार होऊ शकते. मासे मिळाल्यास तोदेखील घालावा-त्याने आणखीन सुंदर चव येते.

पॅड थाय पेस्टचे साहित्य:
१/२ कप चिंचेचा दाट कोळ
१/४ कप गूळ किंवा ब्राऊन शुगर
३ मोठे चमचे लाल मिरचीची पेस्ट  
२ मोठे चमचे डार्क सोया सॉस
१ मोठा चमचा माशांचा सॉस
चवीनुसार मीठ
१/४ कप पाणी
नूडल्ससाठी साहित्य:
५०० ग्रॅम पॅड थाय नूडल्स (जाड, तांदळाचे)
१/२ कप मशरूम, उभे चिरलेले
१/२ कप ब्रोकोली
१/२ कप गाजर
१/२ कप लांबट मोड आलेले मूग
२ मोठे चमचे दाण्याचे कूट
१/४ कप टोफूचे तुकडे
१ लहान चमचा वाळवलेल्या कोलंबीची पूड किंवा आंबवलेल्या कोलंबीची पेस्ट (मांसाहारी करत असल्यास.)
चवीनुसार मीठ
३-४ पाकळ्या लसूण
१/२ इंच आलं, उभे चिरलेले
३ पातीचे कांदे, उभे चिरलेले
३ लहान चमचे शेंगदाण्याचे तेल
१ लहान जुडी ताजी कोिथबीर, चिरलेली
कृती:
१. पॅड थाय पेस्ट बनविण्यासाठी, सगळे साहित्य एका जाड पातेल्यात एकत्र करावे आणि उकळी आणावी. ताव मंद करून ८ ते १० मिनिटे शिजू द्यावे. चाखून बघावे; वाटल्यास आणखीन मीठ किंवा तिखट घालावे. थंड करून स्वच्छ बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवावे.
२. डिश करायच्या अर्धा तास आधी, नूडल्स गरम पाण्यात मऊ होईपर्यंत भिजवून ठेवावे. मग पाणी काढून, चाळणीवर ठेवावे.
३. तोपर्यंत, एका मोठय़ा कढईत तेल तापवावे. त्यात आलं, लसूण आणि पातीचा कांदा (पात आत्ता नको) घालून मिनीटभर परतावे.
४. मग त्यात मोड आलेले मूग सोडून इतर सगळ्या भाज्या घालून पुन्हा परतावे.
५. आता नूडल्स, ३-४ मोठे चमचे पॅड थायची तयार केलेली पेस्ट, आणि मीठ घालून सगळे पटकन परंतु हलक्या हाताने एकजीव करावे. चाखून पाहावे; आवडत असल्यास आणखीन पेस्ट घालावी.
६.  बंद करून त्यात मोड आलेले मूग आणि कांद्याची पात घालावी.
७. वाढताना पसरट बोल् किंवा प्लेटमध्ये प्रथम नूडल्स घालावे व त्यावर थोडे दाण्याचे कूट आणि भरपूर कोिथबीर घालून बरोबर िलबाची फोड ठेवून खाण्यास द्यावे.