स्त्री. पु. वगैरे वगैरे :प्रेम आणि अहंकार Print

महेंद्र कानिटकर ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

अहंकार कशाचाही असू शकतो. रंग, रूप, पदव्या, नोकरी, घराणं, जात-पात, पसा, विद्वत्ता वगरे. पण वैवाहिक जीवनात यापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरतो तो सदाचाराचा, मूल्यांबाबत असलेला अहंकार. मला वाटतं, लग्नाची आपली रीत म्हणजे प्रत्येकानं आपल्या अहंकाराला  जपणं-वाढवणं-कुरवाळणं आहे. आणि ही सगळी परिस्थिती पाहता नात्यात प्रेमाचं बीज कोठून रोवलं जाईल यांची मी शक्यता तपासतोय..
‘प्रेम आणि अहंकार एकत्र नांदूच शकत नाहीत,’ जे. कृष्णमूर्ती यांचे अलीकडेच वाचलेलं हे वाक्य माझ्या मनात घर करून बसलं आहे. अगदी सहज पटेल असं हे वाक्य असलं तरी स्त्री-पुरुष नातेसंबंधातील सगळी मेख यात खच्चून भरली आहे, असं मनोमन वाटून गेलं. खरे तर हे विधान प्रत्येक नात्याला लागू होते.
मुळात लग्नसंबंध हे अहंकारावर जोडले गेलेले संबंध आहेत. आता बघा ना, ठरवून जेव्हा लग्न केलं जातं तेव्हा पालकांची भूमिका कशी असते? मुलांचे पालक म्हणत असतात, माझीच सून नात्यातील सर्व सुनांमध्ये उजवी.. आमच्या व्याहय़ांनी इतर सर्व नातेवाईकांच्या व्याहय़ांपेक्षा लग्नात मोठ्ठा बार कसा उडवून दिला. आमच्याच सुनेच्या अंगावर इतकंइतकं सोनं आणि आम्हीसुद्धा सगळ्यांचं नीट कसं केलं इथपासून या नात्यांना सुरुवात होते.
मुलीच्या दृष्टीनंसुद्धा माझा नवरा माझ्यापेक्षा उंच, माझ्यापेक्षा जास्त शिकलेला, माझ्यापेक्षा जास्त कमावता हे सगळे अभिमानानं मिरवायचे मुद्दे असतात. हल्ली प्रत्येक घरात लग्नाबद्दल शोबाजी करण्याची स्पर्धाच असते. आमच्या रिसेप्शनला किती वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ होते? किती लाख रुपये सजावटीवर खर्च केले? इत्यादी गोष्टी खूप महत्त्वाच्या होऊ लागल्या आहेत. जावयानं हनिमूनला कुठे जावं, हे ठरवून त्याला परदेशात कसं लवकरात लवकर पाठवता येईल आणि हनिमून हा पंचतारांकित कसा होईल हेच सारे निकष होत चालले आहेत.
मला वाटतं ही सगळीच लग्नाची रीत म्हणजे प्रत्येकानं आपल्या अहंकाराला जपणं-वाढवणं कुरवाळणं आहे आणि ही सगळी परिस्थिती पाहता नात्यात प्रेमाचं बीज कोठून रोवलं जाईल यांची मी शक्यता तपासत होतो. आणि लक्षात आलं, कृष्णमूर्ती ज्या प्रेमाबद्दल बोलत आहेत त्याचा आणि आपला काही संबंधच नाही. आपला म्हणजे आपला सगळ्यांचा.  जे. कृष्णमूर्ती प्रेमाबद्दल सांगतात तेव्हा त्यात एकमेकांचा विना अट स्वीकार असतो. तिथे माझंच खरे अशी भाषा नसते. तिथे फक्त प्रेम असते. हे प्रेम शरीरापल्याडचे असते. तिथे आपल्या व्यक्तींबद्दल विलक्षण करुणा असते. त्या व्यक्तीच्या भावविश्वात समरस होत जाणे असते. त्या व्यक्तींच्या सुखदु:खाशी तादात्म्य असते.
 अहंकारापासून दूर रहाणं फारच कठीण. अेक व्यक्तींच्या बाबतीत आपण ते पहातो. साहित्यिकांच्या पत्नीनं लिहिलेली आत्मचरित्रं वाचलीत तर ध्यानात येईल त्या सगळ्या नात्यात अहंकार ठासून भरलेला आहे. इतकंच काय माझ्या पत्नीनं जर प्रामाणिकपणे लिहिलं तर माझ्या अहंकाराची भीषण रूपं त्यात बघायला मिळतील.
मग जे असाध्यच आहे ते साध्य करायचा प्रयत्न करायचा का? मला वाटतं, का नाही? करून बघूया. जमेल तितके जमेल. त्याच्यात आनंद घ्यायचा आधी थोडसे  अहंकाराबद्दल. अहंकाराची सोपी व्याख्या अशी आहे. (जी मला खूप आवडते.)
 जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मला इतरांपेक्षा अधिक समजतं, असा भ्रम आणि मी माझीच ठरवलेली समाजातील किंमत म्हणजे अहंकार.
इथे तीन शब्दांवर भर द्यावा लागलेला पाहा- प्रत्येक क्षेत्रातलं मला समजते आणि मी माझीच किंमत ठरवलेली आहे आणि मी जी स्वत:ची किंमत ठरवली आहे ती माझ्या आसपास असलेल्या सर्वापेक्षा जास्त आहे.
एकदा का असं वाटायला लागलं की अहंकार आला. तो कशाचाही असू शकतो. रंग, रूप, पदव्या, नोकरी, घराणे, जात-पात, पसा, विद्वत्ता वगरे. या गोष्टी तर आपल्याला माहीतच असतात. पण वैवाहिक जीवनात यापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरतो तो सदाचाराचा, मूल्यांबाबत असलेला अहंकार.
माझ्या पाहण्यात एक जोडपं आहे. त्या पतीचं खानदान अतिशय उच्चभ्रूंचं. तो एका सामान्य कुटुंबातील मुलीच्या प्रेमात पडला. प्रेमप्रकरण बरंच दिवस चाललं. त्या दोघांनी लग्नापूर्वी ज्या मर्यादा ठेवणं आवश्यक असतं त्या मर्यादा ओलांडल्या. मुलगा ‘पार्टी’ संस्कृतीतील. त्यामुळे त्यानं तिला मद्यपान करणं वगरे शिकवलं. ती आता संपूर्णपणे मनानं त्याच्यात अडकली. आता तिनं लग्नाचा भुंगा लावला. तो विषय टाळू लागला. तिनं फारच लावून धरलं तेव्हा त्यानं त्याच्या घरी विषय काढला. अखेर लग्न झालं.
लग्नानंतर तिच्या सासरकडच्या माणसांनी ती सामान्य कुटुंबातील म्हणून तिला हीन पद्धतीनं वागवायला सुरुवात केली. तिची जाऊ मोठय़ा उद्योगपतीची मुलगी. त्यामुळे तिचं स्थान मानाचं! हे सगळे ती जेव्हा नवऱ्याला सांगे तेव्हा तो शांतपणे म्हणाला, ‘‘ तरी तुला सांगत होतो. प्रेम वेगळे आणि लग्न वेगळे.’’ त्याच्या या वाक्यासरशी ती मनोमन कोसळलीच. किमान नवऱ्याकडून साथ मिळेल अशी तिची अपेक्षा होती. जसजशी ती घरात रुळू लागली तसतशी अनेक धक्कादायक माहिती तिला कळू लागली. जावेचा लग्नापूर्वीचा मित्र होता. दोन्ही घराण्यात व्यावसायिक कारणासाठी नातेसंबध आले होते. त्यामुळे जाऊ आणि दीर यांनी आपापले लग्नापूर्वीचे संबंध चालू ठेवले होते आणि ते दोघांनाही मान्य होते. सासऱ्याने बाई ‘ठेवली’ होती. सासूबाई रोज रात्री झोपेच्या गोळ्या आणि व्हिस्कीचा एक पेग घेतल्याशिवाय झोपत नसत. आणि तिला हेही लक्षात आलं की नवऱ्याला तिच्या फक्त देहामध्ये रस होता.
ती आम्हा दोघांना भेटायला आली तेव्हा तिनं ही सारी कहाणी सांगितली. तिचं म्हणणं एकच होतं ‘‘माझं कुटुंब सामान्य असेल. पसेवाले नसेल पण आमच्याकडे नतिकता आहे. आणि अशा अनतिक कुटुंबात मी एक क्षणही राहू शकत नाही. माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत.’’
मी विचारले, ‘‘तुझ्यावर झालेल्या संस्कारांचा तुला गर्व वाटतो का? आणि सासरच्या लोकांची तुला लाज वाटते का?’’
ती म्हणाली, ‘‘अगदी बरोब्बर! मी हसत म्हणालो , म्हणजे एका परीने तुमच्यात अहंकाराचं युद्ध आहे. त्याच्याकडे खानदानाचा अहंकार आहे आणि तुझ्याकडे सदाचाराचा, संस्कारांचा.  मग तुमच्या दोघांत प्रेम कोठून नांदणार? एक तर माझं सासर असं आहे हे तुला स्वीकारायला हवं किंवा तुझ्या सदाचाराला तुझ्यापुरतं मर्यादित ठेवायला हवं. तुमच्या नात्यात एकमेकांचा अहंकार बाजूला ठेवत प्रेम करायला शिकायला हवं. तुझ्या माहेरी काय होतं आणि त्याच्या घरात काय होतं आहे यापेक्षा तुम्ही एकमेकांच्यात भावनिकरीत्या जास्त कसं गुंताल यावर परिश्रम घ्यायला हवेत. तू म्हणतेस त्याला फक्त देहाधर्मात रस आहे. ठीक आहे भावबंधात त्याला जोडून घेण्याचं ते एक साधन आहे का, याचा तू विचार करू शकतेस. असं जर वागलात तर आपापल्या अहंकारापासून लांब जात तुम्ही एक चांगलं नातं उभे करू शकाल.’’
मी प्रयत्न करेन इतकं सांगून ती गेली. हा सगळा संवाद गौरीच्या केबिनमध्ये झाला होता. मी माझ्या केबिनमध्ये परत आलो, लॅपटॉप सुरू केला आणि दहा-पंधरा मिनिटांनी इंटरकॉम वाजला. ‘‘एक मेल पाठवली आहे. वाच.’’ पलीकडे गौरी ( माझी पत्नी) होती. काही काही वेळा जे समक्ष बोलता येत नाही त्या वेळी आम्ही एकमेकांना मेल करतो. मी उत्सुकतेनं मेल उघडली.
तू इतरांना अहंकाराचे धडे देतोस स्वत:चं काय? -गौरी
मी क्षणभर विचारात पडलो. माझ्या मते मी अगदी गरीब स्वभावाचा पडते घेणारा, तिच्या शब्दांना मान देणारा चांगला नवरा होतो. माझं तिच्यावर उत्कट प्रेम आहे, असा माझा समज होता. तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी उत्तम भेटी देत होतो, तिच्या लेखनाला आणि तिच्या वक्तृत्वाला दाद देत होतो. अनेक बाबतीत ती माझ्यापेक्षा सरस आहे हे जाहीर सांगत होतो. मग मी अहंकारी कसा? माझं प्रेम तिच्याबाबतीत कमी कसं? या प्रश्नांनी मी गांगरून गेलो आणि माझं लक्षच लागेना.
मी विचार करू लागलो तेव्हा तिचे शब्द आठवले. ‘‘इतरांसमोर जरी तू माझं कौतुक करीत असलास तरी अनेक बाबतीत मला काही कळत नाही, असं तुझं ठाम मत असतं आणि तुझ्या तोंडातून ते व्यक्त झालं नाही तरी तुझी देहबोली सगळं सांगून जातं.’’
मग मला आमच्या तांत्रिक टीमबरोबर झालेल्या अनेक मीटिंग आठवल्या. तिला त्यात सहभागी होऊन सगळं जाणून घेण्याची तयारी असायची. पण ती अगदी फालतू प्रश्न (माझ्या दृष्टीनं) विचारते म्हणून मी मीटिंगला नेणं टाळीत असे. तरीही ती हट्टानं येई. कुतूहलानं प्रश्न विचारी. आमचे तज्ज्ञ तिच्या सगळ्या शंकांना नीट सविस्तर उत्तरं देत असत. पण मला तिच्या प्रश्नांची लाज वाटत असे.  आणि ही उगाचच वेळ घेत आहे, असे भाव माझ्या चेहऱ्यावर येत. एकदा आमचे तज्ज्ञ म्हणाले, ‘कानिटकर, त्यांच्या शंका महत्त्वाच्या. त्यामुळे एक तिसरा विचार आपल्याकडे येतो.’
माझा अहंकार असा असतो. हीच गोष्ट आम्ही जाहिराती करतो तेव्हाची. मला असं वाटतं की मी चांगल्या जाहिराती लिहितो, इतकंच नाही तर वाचकांपर्यंत काय संदेश पोचला पाहिजे ते मलाच कळतं. ती अनेकदा माझ्या कल्पना खोडून काढते. आणि सांगते, ‘‘जाहिरात वाईट नाही पण सामान्य वाचकाला ती आवडणार नाही. मी तज्ज्ञ नाही पण मला जर कळत नसेल तर आम जनतेला ते कळायला अवघड जाईल हे लक्षात ठेव.’’
तिच्या बोलण्यात काही अर्थ आहे हे मला मान्यच होत नसे. मी नुसती मुंडी हलवत हसायचो. माझ्या हसण्यावर एकदा तिला रडू फुटले. ‘‘किती र्वष तू मला कमी लेखणार आहेस ते सांग.’’ या तिच्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं. माझा अहंकार आडवा येत होता हे स्पष्ट होतं. आणि मी इतरांना प्रेम आणि अहंकार याबाबत सांगत होतो. मला हे सांगण्याचा अधिकारच नाही, हे तेव्हा मला जाणवलं. आणि हेही समजलं की जर अहंकार असेल तर प्रेमाला काय अर्थ आहे.
पस्तीस र्वष तथाकथित प्रेम केल्यावर खरं प्रेम कसं करायचं हे शिकायला सुरुवात केली आहे. बघू कधी यश येईल? ..