खाणे पिणे आणि खूप काही - बिघडलंय घडलंय : पपईच्या चविष्ट वडय़ा नि पुऱ्या Print

लजा कुमठेकर ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

एकदा मंडईतून पपई आणली. किती सुरेख केशरी रंग होता. म्हटलं नक्कीच चांगली निघेल, पण भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात तशी ती पपई अगदी सपक निघाली. मग काय दाखवलं माझं पाक कौशल्य ..
मला स्वत:ला वेगवेगळे पदार्थ करून बघायला खूप आवडतं. विशेषत: गोड पदार्थ करायचा म्हटलं की, माझा उत्साह अगदी उतू जातो. तरी मुलगी म्हटतेच- ‘‘सारखे काय गं गोड पदार्थ करतेस?’’ माझा गोड पदार्थ करण्यात हातखंडा! गुलाबजाम, म्हैसूर पाक तर करायला आणि खायला मी अगदी एका पायावर तयार असते. तर दारावर एकदा चांगला अर्धा किलो खवा घेतला. म्हटलं गुलाबजाम काय टिकतात आणि मुलांनाही आवडतात, पण त्याचा पाक मात्र बराच उरतो, कारण तो कुणालाच नको असतो. या उरलेल्या पाकाच्या मी सरळ शंकरपाळी करून टाकते आणि मुलंपण ‘‘काय छान झालीत शंकरपाळी’’ म्हणून फस्त करतात.
हं! तर मी माझ्या हातखंडा गुलाबजामाबद्दल बोलत होते. एकदा मी असाच दारावर खवा घेऊन गुलाबजाम केले, नेहमीसारखे अगदी साजूक तुपातले! गोड पदार्थ साजूक तुपातच करायचे असा माझा शिरस्ता. पाकात केशर, वेलदोडे पावडर घातली आणि खुशीत गाजर खात बसले. म्हटलं आज मुलं बेहद्द खूश होतील. संध्याकाळी मुलांना बाऊलमध्ये घालून गुलाबजाम दिले. मुलं तयारच होती, पण हाय रे दैवा! प्रत्येकजण पहिला गुलाबजाम तोंडात टाकला की दुसऱ्याकडे बघत होता. मला कळेना. म्हटलं, ‘‘काय झालं रे? कसे झालेत गुलाबजाम?’’ तर चिमुरडी नात म्हणते कशी, ‘‘अगं आजी, पाकातल्या कडक गोटय़ा आहेत या.’’ मी एक  तोंडात टाकला. खरंच की गुलाबजाम इतके कडक झाले होते की त्यात तसूभरपण पाक शिरला नव्हता. मुकाटय़ाने आयत्या वेळचे पोहे तयार करून मुलांना खायला दिले.
आता एवढय़ा पदार्थाचं काय करावं बरं! तशी मी माझं सुगृहिणीचं डोकं लढवलं. सगळे कडक गोळे मिक्सरमध्ये घातले बारीक करून घेतले आणि पाकामध्ये टाकून त्यात आणखी साखर घातली. अर्धा किलो बारीक रवा घेऊन तुपावर खमंग भाजला, लाडू केले तेव्हापासून माझी नात मला म्हणते, ‘‘आजी, बिघडलेल्या गुलाबजामचे लाडू कर ना! किती छान लागतात!’’ मग मी डोळे मिचकावत म्हणते, ‘‘अगं, त्यासाठी गुलाबजाम बिघडावे लागतात, तेव्हाच लाडू इतके छान होतात.’’
एकदा मंडईतून पपई आणली. किती सुरेख केशरी रंग होता. म्हटलं नक्कीच चांगली निघेल, पण भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात तशी ती पपई अगदी सपक निघाली. बरं एवढी महाग आणलेली टाकून कशाला द्यायची. मी सगळा गर काढून मिक्सरमध्ये एकसारखा केला. थोडा गर घेऊन त्यात साखर व मोहन घातले आणि कणीक त्यात चांगली मळून घेऊन पुऱ्या केल्या. छान केशरी पुऱ्या, पण पाकात न घातलेल्या. उरलेल्या गरात एक नारळ खऊन घातला. दोन बटाटे उकडून बारीक करून घातले आणि दीडपट साखर घालून सुंदर केशरी वडय़ा केल्या. भजनातल्या बायकांना प्रसाद म्हणून दिल्या तर त्यांचा अभिप्राय ‘‘काय छान झाल्यात हो वडय़ा, आंबा घालून केल्या का?’’ मी आधी गप्पच बसले, पण मग गौप्यस्फोट केला.
ढोकळा हा माझा हातखंडा पदार्थ. एकदा मी असाच ढोकळा केल्या तर काय पाटवडय़ा बऱ्या अशा त्या वडय़ा झाल्या. पाटवडी म्हणूनसुद्धा कोणी खाईना. मग सरळ त्या वडय़ा तेलावर खरपूस भाजून घेतल्या. ओलं खोबरं, चिंच, गूळ घालून छानसं सांबार केलं आणि त्या वडय़ा सांबारात घातल्या. झकास सांबार झालं. सगळ्यांनी अगदी नावाजत खाल्लं. एकदा इडलीही अशीच दगडासारखी घट्ट झाली. मग काय त्या सगळ्या इडल्या मिक्सरमधून काढल्या. बारीक चिरलेला कांदा, कडुलिंब, हिंग-जिऱ्याची फोडणी करून त्यावर इडलीचा भुगा केलेला घालून चांगली वाफ आणली. ओलं खोबरं, कोथिंबीर घालून सगळ्यांना दिलं. उपमा म्हणून सगळ्यांनी चापून खाल्ला. तर गृहिणींनो, ‘अंदर की बात’ ही की, एखादा पदार्थ बिघडला म्हणून हात-पाय गाळून बसू नका. त्यातूनही एखादा नवा पदार्थ तयार करता येतो.  इति अलम् पदार्थ पुराणम्.