खाणे पिणे आणि खूप काही : महालक्ष्मीचा नैवेद्य Print

विष्णू मनोहर , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
alt

गौरी-गणपतीच्या सणाला त्या त्या भागात काही विशिष्ट खाद्यपदार्थ बनवण्याची पद्धत आहे. गोडाधोडाची रेलचेल यावेळी असतेच. पण गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी किंवा महालक्ष्मींच्या जेवणासाठी काही चटण्या, भाज्या व कोशिंबिरी आवर्जून केल्या जातात. अशाच काही पाककृती..
फा र पूर्वीपासून आपल्या येथे म्हणतात की, ‘‘जेथे ज्ञान असते तेथे समृद्धी वसते.’’ याचीच प्रचीती आपल्याला या महिन्यात दिसून येते. भाद्रपद चतुर्थीला आपण विद्य्ोची देवता म्हणून गणेशाची पूजा करतो व अष्टमीला महालक्ष्मी गौरीची पूजा करतो. प्राचीन काळी महिषासुर आणि बेलासुर या राक्षसांचा महालक्ष्मीने संहार केला म्हणून तिला महिषासुरमर्दनिी म्हणतात व त्याचीच आठवण म्हणून महालक्ष्मीचा उत्सव थाटात साजरा करतो. गणेशोत्सवात गौरीचेही पूजन केले जात असल्याने महालक्ष्मी व गौरी दोघींचीही एकत्र पूजा करण्याची परंपरा आहे. हा उत्सव भाद्रपद अष्टमीला सुरू होत असल्याने या दिवसाला दुर्वाष्टमी म्हणतात. या दिवशी दुर्वाची पूजा करतात.
पहिल्या दिवशी तिला आघाडा, दुर्वा, कापूस वाहतात. काही ठिकाणी मेथीच्या भाजी-भाकरीचा नवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी नवेद्याला १६ कोिशबिरी, १६ पक्वान्ने, १६ भाज्या, १६ चटण्या तसेच फराळाचे पदार्थ करतात. तर पुरणाच्या १६ दिव्यांची आरती असते. तिला पाना-फुलांचा आरास करतात. चाफ्याचे फूल, केवडय़ाचे पान, हार वाहतात. तिसऱ्या दिवशी तिला खीर-कानवल्यांचा नवेद्य दाखवून तिचे विसर्जन करतात.
गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी किंवा महालक्ष्मीच्या जेवणाच्या काही चटण्या, भाज्या व कोशिंबिरीचे प्रकार करतात त्याच्या काही कृती.

कवठाची चटणी
साहित्य :-

कवठाचं फळ - १ नग, मीठ-चवीनुसार, गूळ - अर्धा वाटी, जिरे- १ चमचा
कृती :- प्रथम कवठ त्यावरील सालीसकट गॅसवर किंवा चुलीवर भाजून घ्या. सोलून त्यातील गर वेगळा करून त्यात मीठ, गूळ, जीरं घालून वाटून सव्‍‌र्ह करा.
दुसरी पद्धत :-
कवठं फळ -१ नग, चिंचेचा कोळ -अर्धा कप,
गूळ -१ वाटी, मीठ-चवीनुसार, जिरे पावडर -१ चमचा, दालचिनी -पाव चमचा, सुंठ, तिखट - चवीनुसार
कृती :- कवठाचा पल्प काढून त्यात चिंचेचा कोळ व इतर साहित्य मिसळून १० ते १२ मिनिटे मंद आचेवर षिजवावे. थंड करून बाटलीत भरा.
टीप :- तिखटाच्या ऐवजी सुंठ पावडर वापरा. चव बदलेल.

चिंचेचे पंचामृत
हा प्रकार विषेशत: विदर्भात आढळून येतो.
साहित्य :

चिंचेचा कोळ     -१ वाटी, गूळ -१ वाटी, मीठ-दीड चमचा, तिखट- १ चमचा, हळद-अर्धा चमचा, दाण्याचा कूट - २ चमचे, तिळाचे कूट-    २ चमचे,
मेथीदाणे- पाव चमचा, कढीपत्ता-काही पाने, हिरव्या मिरच्यांचे तुकडे- १ चमचा, धने-जिरे पावडर-१ चमचा, मोहरी    - १ चमचा, िहग- पाव चमचा, खोबऱ्याचे तुकडे-२ चमचे, शेंगदाणे- मूठभर
कृती :- सर्वप्रथम चिंचेचा कोळ काढून घ्यावा. त्याकरिता चिंच पाण्यात भिजवून, उकळवून चाळणीमधून गाळून त्याचा गर काढून घेणे. नंतर पॅनमध्ये मोहरी, मेथीदाणे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता िहग, खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे घालून थोडे परतून घेणे. नंतर त्यात चिंचेचा कोळ, गूळ, हळद, तिखट व धने-जिरे पावडर घालून भरपूर उकळणे. मिश्रणाला थोडी चमक आली की चवीनुसार मीठ व तिळाचे कूट व दाण्याचा कूट घालणे.

वऱ्हाडी प्रकारची पातळ भाजी
alt
यात मुख्यत्त्वे पालक वापरतात. पालकाच्या जोडीला मेथी किंवा अळू अथवा आंबट चुका वापरतात. एक वेगळा प्रकार म्हणून करायला हरकत नाही.
साहित्य :- बारीक चिरलेला पालक -२ वाटय़ा,  मेथी किंवा अळू - अर्धा वाटी, मुळ्याच्या चकत्या - अर्धा वाटी, हिरवी मिरची कापलेली - २ चमचे, आलं, लसूण पेस्ट, हळद, तिखट - चवीनुसार, मेथी दाणे - अर्धा चमचा, खोबऱ्याचे काप - २-३ चमचे, भिजलेले शेंगदाणे -१ चमचा, चणा डाळ भिजलेली- अर्धा वाटी, िहग - अर्धा चमचा, धणे- जिरे पावडर-२ चमचे, तेल-अर्धा वाटी
कृती :- प्रथम एका भांडय़ात दाणे चणा डाळ एकत्र भिजवून घ्या. अर्धा वाटी तेलापकी थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, िहग, लसूण, शिजवलेले दाणे, चणा डाळ, कढीपत्ता, खोबरं-मुळा, हळद, तिखट, मेथीदाणे घालून चांगले परतून घ्यावा. नंतर बारीक चिरलेला पालक, मेथी टाकून खरपूस परतून घ्यावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळल्यावर थोडी बेसनाची पेस्ट करून त्यांनी घट्ट करावी. चवीनुसार मीठ, चिंच, गूळ घालून उकळून घ्यावी. उरलेल्या तेलात पुन्हा मोहरी, िहग व बारीक चिरलेला लसूण घालून ती फोडणी वरून भाजीवर घालावी.

मोकळी चटणी
साहित्य :- चण्याची डाळ भिजवलेली    १ वाटी, िलबाचा रस-१ चमचा, मोहरी-१ चमचा, हळद, तिखट- चवीनुसार
मीठ- चवीनुसार, तेल-दोन चमचे, िहग-    पाव चमचा, हिरव्या मिरचीचे तुकडे-२ चमचे
कृती :- सर्वप्रथम डाळ दोन-अडीच तास भिजवून वाटून घेणे. नंतर कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घालावी. सर्वात शेवटी हळद, तिखट व जाडसर वाटलेली चण्याची डाळ घालून मंद आचेवर झाकण लावून भिजवा. एक-दोनदा परतवून पाहा. सर्वात शेवटी चमच्याच्या साहाय्याने मिश्रण एकत्र करून मोकळे करा.

आमसूल चटणी
alt
चटकन होणारी चटकदार अशी ही चटणी वेळ पडली तर वरणात, भाजीतसुद्धा घालू शकतो किंवा आमटीतसुद्धा.
साहित्य :- आमसूल -१ वाटी, गूळ -अर्धा वाटी जिरे पावडर -१ चमचा मीठ-चवीनुसार, तिखट-चवीनुसार
कृती :- आमसूल भिजवून त्यात गूळ, मीठ, तिखट, जिरे किंवा जिरे पावडर मिसळून मिक्सरवर बारीक करून घ्या. सव्‍‌र्ह करा.
दुसरी पद्धत :- आमसूल थोडया पाण्यात उकळवून त्याची पेस्ट करावी उरलेले जिन्नस मिसळून वरीलप्रमाणे चटणी करावी.

कोहळ्याची गाखर भाजी
साहित्य :-
कोहळा -पाव किलो, कोिथबीर - पाव वाटी, वऱ्हाडी रस्सा - ३ वाटय़ा, गरम मसाला - १ चमचे, मीठ -चवीनुसार, मोहरी-िहग चिमुटभर, तेल फोडणीला, कढी पत्ता, चारोळी भाजलेली - ५ चमचे
कृती :- कोहळे सालीसकट कापून ठेवावे. एक चमचा तेल फोडणीला घेऊन त्यात मोहरी, िहग, कोहळ्याचे तुकडे, कढीपत्ता व चवीनुसार मीठ घालावे. यानंतर वऱ्हाडी ग्रेव्ही व चारोळी घालून मंद आचेवर शिजवावे. गरम मसाला घालावा. शक्यतो वर पाणी न टाकता शिजवावे. वरून कोिथबीर घालून गरम गरम पोळी बरोबर वाढावे.
टीप :- ही भाजी तशी मुळात सौम्य असते, त्यामुळे तयार करताना थोडी मसालेदारच करावी.

बोंड
हा प्रकार मध्य भारतातला. यात लाल कोहळ्याचा वापर केला जातो, गोड आणि खारे असे दोन प्रकार यात असतात आणि वेगळं पाणी न वापरता कोहळ्याच्या अंगच्याच पाण्याने हे भिजवल्यामुळे याला एक वेगळी खुमासदार चव येते.
बोंड खारे (साहित्य) :- लाल कोहळ्याचा किस - २ वाटय़ा
(काही ठिकाणी कोहळ्याला भोपळा किंवा डांगरसुद्धा म्हणतात), मेथीदाणे भिजवून वाटलेले-अर्धा चमचा, थोडी कोिथबीर, तिखट-     चवीनुसार, हळद, मीठ - चवीनुसार, िहग-  पाव चमचा, तेल-तळायला, यात मावेल तेवढी कणीक घालावी.        -
कृती :- सर्व जिन्नस एकत्र करून वेगळं पाणी न घालता भिजवणे. नंतर ५ ते १० मिनिटे तेलावर मंद आचेवर तळावे. तळून झाल्यावर पंचामृताबरोबर खायला देणे.
बोंड (गोड) साहित्य :- लाल कोहळ्याचा किस - १ वाटी, किसलेला गूळ -१ वाटी, कणीक -साधारण १ वाटी, तीळ -१ चमचा तेल - तळायला
कृती :- कोहळ्याचा किस व गूळ एकत्र करणे. ८ ते १० मिनिटांनंतर त्याला पाणी सुटेल नंतर त्यात मावेल इतके कणिक मिसळावे. तीळ ( भाजून घेणे ) घालून मंद आचेवर शेंगदाणे तेलातच तळणे, गरम गरम खायला देणे.
टीप :- तीळ भाजून घेतल्यामुळे तेलात फुटत नाहीत. शेंगदाणे तेलातच तळल्यामुळे त्याला एक वेगळा खमंगपणा येतो.