खाणे पिणे आणि खूप काही : ‘बिस्कोटी’ Print

सई कोरान्ने-खांडेकर,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
alt

इटलीतल्या ‘बिस्कोटी’ या बिस्किटाच्या पदार्थात आणि आपल्या रस्क टोस्टमध्ये एक जवळचे नाते आहे. बहुतेक खाद्य संस्कृतींप्रमाणे बिस्कोटी आणि रस्क यांच्या साम्याची मुळेदेखील मानवी स्थलांतराच्या प्रवाहात सापडतील याबद्दल काहीच शंका नाही. पण एक छोटेसे बिस्कीट सात समुद्राचा प्रवास करून एका नव्या गावात, नव्या माणसांत घर करते ही काय कमी नावीन्याची गोष्ट आहे?
मीलहान असताना, एक उंच, मध्यमवयीन, दाढी असलेला, थोडासा चिडलेला पठाण,  लुंगी आणि पगडी घालून दर रविवारी माझ्या आजीच्या दक्षिण मुंबईतल्या पॉश बिल्डिंगमध्ये यायचा. त्याच्या डोक्यावर एक प्रचंड मोठी जर्मनची ट्रंक असे. त्या ट्रंकेच्या अर्धवट उघडय़ा तोंडातून एखाद-दुसरे ‘गुपित’ पठाणचाचांच्या डोक्यावर सांडत असे. एका हाताने ते ट्रंकेचा तोल सांभाळत असत, तर दुसऱ्या हातात मोठी, जमेल तितकी भरलेली कापडी पिशवी असे. मी त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असे. कधी एकदा ते येतील आणि कधी एकदा सकाळच्या नाश्त्याला काहीतरी वेगळं खायला मिळेल! ते नाही आले, तर नेहेमीचेच पोहे-उप्पीट खावे लागतील आणि दुपारी घरातले मोठे झोपले की चोरून खायला अशी काही गंमत नसेल.
इकडे पठाणचाचा त्याच्या कापडी पिशवीतून ब्रेड काढत असत आणि तिकडे आम्हा मुलांचे लक्ष त्या प्रचंड मोठय़ा जर्मनच्या ट्रंकेकडे असे, कारण त्यात वज्र्य असलेल्या गमतीजमती असत. खारी बिस्किटे (साधी, नमकीन आणि साखरेची), निरनिराळ्या आकाराची व चवींची नानकटाई, आणि इतर किती तरी अशा गमती ज्यांच्यावर आमची नजर पडे तोच घरातले मोठे एखाददुसरी वस्तू निवडण्याचा आदेश द्यायचे. त्यात चांगले मोहन वापरलेले नसते असे सांगून, कमीत कमी प्रमाणात आमचे लाड पुरवले जात असत. कॉफीत बुडवायला ते खारी बिस्किटे विकत घेत आणि खूप विचार करून आम्ही पोरं अखेर एक-दोन प्रकारची नानकटाई घेत असू. अगदीच ऐश म्हणजे कधीतरी, त्रिकोणी आकाराची साखरेची खारी मिळे. चुरचुरीत बिस्किटांवर अलगद भुरभुरलेली, अर्धवट भाजलेली साखर दुपारच्या दुधात बुडवून खायला काय मजा येत असे (अजूनही येते, फक्त पेय बदलले आहे-दुधा ऐवजी कॉफी!) हे सारे असले तरी लहानांना आणि मोठय़ांना तेवढाच आवडणारा पदार्थ म्हणजे रस्क. टोस्टसारखी ही बिस्किटे आयताकृती किंवा अर्धवर्तुळ अशा आकारांमध्ये यायची व नेमकी गोड असायची. नुसतीच कुडुम-कुडुम खायला किंवा आपल्या वयानुसार आणि आवडीनुसार एखाद्या पेयात बुडवून खायला सर्वानाच फार आवडायचे. बुडवल्या बुडवल्या ग्लासातले अध्रे दूध ते शोषून घेत असे; त्यामुळे आम्हा मुलांना ही बिस्किटे आणखीन प्रिय होती--प्यायला तेवढेच दूध कमी!
हे आमचे बेकरीवाले चाचा. त्या काळात, कोपऱ्यावरच्या प्रत्येक वाण्याकडे ब्रेड मिळत नसे. पठाणचाचासारखे कित्येक चाचा मुंबईभर ताजे ब्रेड, लादी पाव, ब्रून आणि टट्री फ्रुटी घातलेले गोड ब्रेड दारोदारी विकत असत. दाराबाहेर ठोकळा मांडून, मऊ, ताजे ब्रेड एका पातळ, ब्लेडसारख्या सुरीने कापून, त्याचे तुम्हाला हवे तशा जाडीचे स्लाईस ते सहज करून देत असत. आमच्या घरी जरा जाडसर स्लाईस खायची आवड होती--लाल-जांभळ्या मेणचट कागदात येणाऱ्या ब्रेडच्या पातळ स्लाईसच्या पुढे बेकरीवाल्या चाचांच्या ब्रेडचे सोनेरी भाजलेले व महाग अमूल बटर फासलेले जाड स्लाईस उभेच राहू शकत नसत.
वयाने आणि अकलेने मी जेव्हा मोठी झाले तेव्हा मला ‘बिस्कोटी’ या प्रकाराशी परिचय झाला. नेहेमीप्रमाणेच, रस्क आणि बिस्कोटी या दोन पदार्थामधलं साम्य मी शोधू लागले. इटलीतल्या या बिस्किटाच्या पदार्थात आणि आपल्या रस्क टोस्टमध्ये  जवळचे नाते आहे हे मला कळले. केक किंवा ब्रेडचे काप करून, पुन्हा भाजून ही दोन्ही बिस्किटे तयार केली जातात. दोन्ही प्रकार चहात, कॉफी, इत्यादीमध्ये बुडवून खाल्ली जातात. दोन्ही बिस्किटांना सौम्य असे वास असतात. बहुतेक खाद्य संस्कृतींप्रमाणे बिस्कोटी आणि रस्क यांच्या साम्याची मुळेदेखील मानवी स्थलांतराच्या प्रवाहात सापडतील याबद्दल काहीच शंका नाही. पण एक छोटेसे बिस्कीट सात समुद्राचा प्रवास करून एका नव्या गावात, नव्या माणसांत घर करते ही काय कमी नावीन्याची गोष्ट आहे?
‘बिस्कोटी’चा अर्थ ‘दोनदा भाजलेले.‘ बिस्किटाची मळलेली कणीक प्रथम अर्धवट भाजली जाते. मग त्याचे लांब काप करून ते पुन्हा भाजले जातात--चांगले कुरकुरीत-चिवट होईपर्यंत. इटलीत विविध प्रकारची बिस्कोटी केली जाते--त्यात भरपूर सुका मेवा घालतात. मग ही बिस्किटे एस्प्रेसोसारख्या दाट आणि कडू कॉफीत बुडवून किंवा नुसतीच खाल्ली जातात. काही विशिष्ट प्रकारची बिस्कोटी गोड पदार्थाबरोबर किंवा वाईनबरोबरदेखील दिली जातात.
 आज आपण करतोय कॉफी आणि हेझलनटची बिस्कोटी--दुधाळ किंवा बिनदुधाच्या कडू कॉफीत किंवा गरम, गोड दुधात बुडवून ही बिस्किटे अतिशय चविष्ट लागतात. तुमच्या आवडीप्रमाणे निरनिराळे कॉम्बिनेशन करून पाहा--बेदाणे, काजू आणि वेलदोडय़ाची पूड घालून देखील सुंदर बिस्कोटी तयार होतात किंवा फक्त व्हॅनिला आणि बदाम घालून अगदी पक्की इटालीयन बिस्कोटी करा आणि ती विरघळलेल्या चॉकलेटमध्ये अर्धी बुडवा व वाळवून खायला द्या.    

कॉफी आणि हेझलनट बिस्कोटी
साहित्य:
पाऊण कप हेझल नट, भाजून, जाडसर भरडलेले ३ अंडी
 अर्धा  लहान चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा लहान चमचा बदामाचा इसेन्स (आवडत असल्यास )
१ लहान चमचा कॉफी पावडर
२ कप मदा
पाऊण कप साखर
१ लहान चमचा बेकिंग पावडर
 चिमूटभर मीठ
२ मोठे चमचे दूध (लागल्यास)
कृती
१. प्रथम अंडी, व्हॅनिला आणि बदाम इसेन्स एकत्र फेटा.
२. एखाद्या मोठय़ा भांडय़ात मदा, बेकिंग पावडर, साखर, हेझलनट आणि मीठ एकत्र करावे. त्यात अंडय़ाचे मिश्रण घालून पीठ एकजीव करावे. फार घट्ट वाटल्यास थोडे दूध शिंपडावे. जास्त मळू नये.
३. बेकिंग शीट वर मेणचट कागद लावावा व त्यावर ते पीठ ठेवावे.
४. ओवनमध्ये १५० डिग्री वर १० मिनिटे गरम करावा व त्यात पीठ १५ मिनिटे भाजावे करावे.
५. मग ओवनमधून काढून ५ मिनिटे गार करावे व मग धारदार सुरीने त्याचे १/४ इंच जाड असे काप करावे. हे काप पुन्हा १५-२० मिनिटे भाजावे व गार करून बरणीत भरावे.