आरोग्यम् : शुभेच्छा आरोग्यासाठी! Print

altडॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , ७ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या स्त्रीची मात्र कुणी अभावानेच काळजी घेतं. अनेकदा ती घ्यावी, याची जाणीव ना तिला असते, ना कुटुंबीयांना. म्हणूनच हे सदर तुमच्यासाठी आम्ही आहोत हे जाणवून देणारं. तुम्हीही तुमचे प्रश्न आम्हाला कळवा म्हणजे हे सदर दोन्ही पातळीवर चालू राहील. तेव्हा नवीन वर्षांत आरोग्यासाठी शुभेच्छा!


महिलांचे आरोग्य प्रश्न वेगळे आणि विशेष असं का बरं मानलं जातं? शरीर सारखं, रोगराई सारखी तरीसुद्धा हे वेगळंपण कशामुळे? याला कारणं अनेक असली तरी स्त्रीचं समाजातील व कुटुंबातील दुय्यम स्थान आणि तिची जननक्षमता ही दोन कारणं सर्वात महत्त्वाची आहेत.
तिच्या सामाजिक स्थानामुळे अजूनही तिच्या वाटय़ाला येणारं अल्पशिक्षण किंवा शिक्षणाचा अभाव, आर्थिक परावलंबत्व, स्त्रियांकडून असणाऱ्या समाजाच्या अपेक्षा, स्वत:ला सिद्ध करण्याची तिची जिद्द- तिचं दुय्यम स्थान तिच्या अनारोग्याला कारणीभूत होऊ शकतं तर तिची जननक्षमता (किंवा वंध्यत्व) तिच्यासाठी आरोग्याचे प्रश्न निर्माण करू शकते.
शासकीय पातळीवर व कुटुंबामध्ये स्त्री आरोग्याकडे डोळसपणे बघितलं गेलं पाहिजेच; परंतु महिलांनी आरोग्याची शास्त्रीय माहिती गाठीशी ठेवून स्वत:च्या आरोग्याचा लगाम आपल्या हाती घेतला पाहिजे.
आपल्या शरीराची रचना व कार्य, उपलब्ध तपासण्या व उपचार यासंबंधीची योग्य व शास्त्रीय माहितीची गरज केवळ खेडय़ा-पाडय़ांतल्या व गरीब महिलांनाच असते असे नाही तर त्याची गरज शिकलेल्या व शहरी मध्यमवर्गीय महिलांनाही तितकीच असते. ही माहिती हे ज्ञान तिच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असते.
एखादा देश प्रगत आहे, असं कधी म्हणतात? हे कशावर अवलंबून असतं? त्या देशातील ‘स्त्री’चं समाजातील स्थान, स्त्रियांची पुरुषांच्या प्रमाणातील संख्या, त्यांचं आयुष्यमान, शिक्षित स्त्रियांचं प्रमाण, त्यांचा राजकीय व सामाजिक सहभाग हे परिणाम बघून देशाची प्रगती ठरते. म्हणूनच केवळ आपल्यासारख्या देशातच नव्हे तर प्रगत- अति प्रगत देशांतही ‘महिलांच्या आरोग्य समस्या’ हा विषय कळीचा मुद्दा मानला जातो.
‘आरोग्य प्रश्न’ म्हणजे कसे बरे विचार महिलांच्या मनात येत असतील? ते प्रश्न अतिशय साधे असतात.
‘माझ्या गळ्याला सूज नाही तरी डॉक्टर ‘थायरॉइड’ आहे असं का म्हणतात?’
‘माझी मुलगी गरोदर आहे, आठव्या महिन्यापासून बी. पी. आहे. गोळ्यांची सवय लागेल का?’
‘पॅप’ची तपासणी म्हणजे काय?’
‘मी रोज कॅल्शियमची गोळी घेते, पण टी. व्ही.तली बाई म्हणते तसं ते मला मिळतं का?
‘पित्ताशयातील खडे महिलांमध्ये जास्त असतात का?’ ‘गर्भाशयातील ‘फायब्रोइड’चा उपचार लेझरने होतो का?’
‘गरोदरपणी ‘अंगावरून’ महिना गेल्यासारखं जाऊ शकतं का?’
‘आय-पिल’ किती वेळा घेता येते?
‘मध्यमवर्गीय स्त्रीला टी. बी. होऊ शकेल का?’
‘माझ्या बाळाचं वजन वाढत नाही, टॉनिक घालून बेजार झाले.'
‘संध्याकाळ झाली की, छातीत धडधडतं, दरारून घाम फुटतो.’
‘पांढरं पाणी अंगावर जायची सवयच झाली आहे. कितीही उपचार केला, उपयोग नाही.
पाळी गेल्यापासून अंगाला सूज येते, त्यामुळे वजन वाढलं , असं वाटतं.’
‘मायांगाला खाज येत राहते, कितीही डेटॉलचं पाणी घेतलं, उपयोग नाही.’
‘मुलींच्या शाळेत लैंगिक शिक्षण देतात, त्याचा काही वेडावाकडा परिणाम होईल का?’
‘पाळीत अंगावरून जात नाही, म्हणून वजन वाढलं आहे, असं वाटतं.’
‘गोळ्या घेतल्याने नको असणारा गर्भ पडू शकतो का?’
‘बाळंतपणात घातलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यायची?’
‘कुटुंबात राहणाऱ्या महिलेला गुप्तरोग होऊ शकतो का?’
‘कॉपर टी घालून घेण्याची भीती वाटते. आमच्या वस्तीत ती एका बाईच्या काळजात घुसली होती.’ ‘गर्भपिशवीत गर्भ न राहता टय़ूबमध्ये राहिला म्हणजे काय?’
‘ओटीपोटात दुखत राहतं. द्राक्षाचा गर्भ राहतो, म्हणजे काय?’
‘गर्भ पिशवी खाली उतरली तर काय करावं?’
‘ गर्भाशयाच्या तोंडाला वरच्यावर अल्सर होतो, असं का?’
‘पेन-लेस डिलिव्हरी करणं चांगलं का?’
‘गरोदर महिलांसाठी, बाळंतपण सोपं व्हावं, म्हणून काही व्यायाम आहेत का?’
‘क्ष-किरणांचा शरीरावर काही परिणाम होतो का?’
‘माझी मुलं मोठी आहेत, पण गेले दोन-तीन महिने नुसती डिलेव्हरी झाल्याप्रमाणे छातीतून दूध गळते आहे’.
‘पाळीच्या आधी दुखऱ्या गाठी येतात, कॅन्सर असण्याची शक्यता आहे का?’
‘माझं बाळ सहा महिन्यांचं आहे, कोणता आहार देऊ? ‘लॅक्टोजीन’ कोणतं देऊ?’
‘नवजात बाळाचे स्तन सुजले तर काय करायचं?’
‘रक्तगट एकच असेल तर लग्न करता येतं का? त्यामुळे काही प्रॉब्लेम होतो का?’
‘एच. आय. व्ही. टेस्टिंगशिवाय लग्न करू नका असं म्हणतात, पण एखादी मुलगी ही मागणी कशी करू शकेल?’
‘लग्न ठरलं आहे. दोघांनी ‘गायनॅक’कडे जावं का? मूल होण्यासाठी बरेच प्रयत्न केले, कुठे चुकलं कळत नाही.’
‘ऑफिसमध्ये आम्हाला स्वस्तन तपासणी शिकविली. नेहमी करण्याची गरज आहे का?’
‘चिकनगुनियाने सांधे धरलेत ते कधी मोकळे होतील?’
‘मी १४ वर्षांची आहे, कॉम्प्लॅनने उंची वाढेना.’
‘आमच्या शेजारची गरोदर बाई ‘साध्या काविळीने’ गेली.’
‘किती वेळा सोनोग्राफी केली तर गरोदरपणी सेफ असतं.’
‘गर्भपिशवी काढायला सांगितली आहे, काय करू?’
‘बाळंतिणीला वेड लागतं का?’
‘टेम्पून वापरला तर चालेल का? असे असंख्य प्रश्न स्त्री शरीराभोवती केंद्रित होत असतात.’
तिच्या काही प्रश्नांकडे बायकांचं हे नेहमीचंच असतं म्हणून बघितलं जातं, तर तिचे काही प्रश्न इतके काही घरातल्या सर्वाचे होऊन जातात की, तिचे म्हणून मुळी उरतच नाहीत. उदा. मूल न होणं!
स्त्रियांचे काही आरोग्य प्रश्न हे आपले सार्वजनिक आरोग्याचे प्रश्नही आहेत. जसे की, ५० टक्के सर्वसाधारण महिलांना अ‍ॅनिमिया असतो तर त्याचे प्रमाण गरोदरपणात ८० टक्के इतके जास्त आहे.
आपल्या देशात माता मृत्यूचं प्रमाण प्रगत देशांपेक्षा ३० पट जास्त. माता मृत्यू म्हणजे गरोदरपणी, बाळंतपणाच्या वेळी किंवा बाळंतपणानंतर ४२ दिवसांत होणारा मातेचा मृत्यू. अपघातामुळे होणारे मृत्यू यात समाविष्ट नाहीत. या मृत्यूची कारणं जी आहेत ती प्रतिबंध करता येण्यासारखी आहेत. जसं की, बाळंतपणानंतर होणारा अतिरिक्त रक्तस्राव (Post partum haemorrhage) गर्भपिशवीचा जंतुसंसर्ग ज्याला Post Partum Sepsis  असं म्हणतात.
अंधत्वाचं प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट आहे. हे आंधळेपण संपूर्णपणे व सहजपणे प्रतिबंध करण्यासारखं असतं ते आहे मोतिबिंदू किंवा कॅटरेक्टमुळे आलेलं.
आपल्या समाजातील स्त्रियांची संख्या पुरुषांच्या प्रमाणात कमी होत चालली आहे. काही राज्यात तर हे प्रमाण खूप कमी झालेलं आहे, त्याचा महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होतो आहे.
कुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या स्त्रीची मात्र कुणी अभावानेच काळजी घेतं. अनेकदा ती घ्यावी याची जाणीव ना तिला असते ना कुटुंबीयांना. म्हणूनच हे सदर तुमच्यासाठी आम्ही आहोत हे जाणवून देणारं. तुम्हीही तुमचे प्रश्न आम्हाला कळवा म्हणजे हे सदर दोन्ही पातळीवर चालू राहील. तेव्हा नवीन वर्षांत आरोग्यासाठी शुभेच्छा.
( हे सदर पाक्षिक आहे.)