आरोग्यम् : स्त्रीधर्माचे प्रयास Print

डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत - शनिवार, २१ जानेवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altकुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या स्त्रीची मात्र कुणी अभावानेच काळजी घेतं. अनेकदा ती घ्यावी, याची जाणीव ना तिला असते, ना कुटुंबीयांना. म्हणूनच हे सदर तुमच्यासाठी आम्ही आहोत हे जाणवून देणारं. तुम्हीही तुमचे प्रश्न आम्हाला कळवा म्हणजे हे सदर दोन्ही पातळ्यांवर चालू राहील.
निसर्गाने स्त्रीला गर्भाशय, मासिक पाळी देऊन चांगलंच जखडून टाकलंय- पण दुसरी बाजू पाहायची तर मूल जन्माला घालायची ताकद देऊन अमूल्य वरदान दिलंय, म्हणूनच त्याबद्दल सातत्याने माहिती करून घ्यायला हवी. ज्या दिवशी माझं हिस्टरेक्टोमीचं (गर्भाशय काढण्याचं) ऑपरेशन झालं तेव्हा केवढं हायसं वाटलं म्हणून सांगू? अगदी स्वत: डॉक्टर असूनसुद्धा! अतिरक्तस्रावाने अ‍ॅनिमिया (पंडुरोग) झाला होता आणि जीवही नकोसा झाला होता. कसलंही वेळापत्रक, कुठेही येणं-जाणं ठरवणं शक्यच नसायचं. पाळी चालू असताना कुठे बसायलाही भीती वाटत असे व ऑपरेशननंतर आता ते दिवस संपून मी स्वतंत्र झाले, असं वाटलं.
कधी कधी वाटतं की, निसर्गाने स्त्रीला गर्भाशय, मासिक पाळी देऊन चांगलंच जखडून टाकलंय- पण दुसरी बाजू पहायची तर मूल जन्माला घालायची ताकद देऊन किती अमूल्य वरदान दिलंय, नाही का? म्हणूनच त्याबद्दल सातत्याने माहिती करुन घ्यायला हवी.
मासिक पाळी म्हणजे काय आणि गर्भाशयाचे विकार कुठले असतात? त्यासाठी कुठल्या वयात काय केलं पाहिजे, हे जाणून घेऊयात.
सुरुवात करूया, मुलींपासून! तारुण्याची चाहूल लागते साधारण अकरा-बारा वर्षे वयापासून. मुलीची उंची, वजन वाढते. स्तनांची वाढ होऊ लागते. शरीराच्या विशिष्ट भागांवर लव येऊ लागते. आणि मासिक पाळी सुरू होते. या वेळेस मुलींना समजावायला हवे की, हा शरीरधर्म आहे. यात घाबरण्यासारखे काही नाही. काही वर्षांतच ती प्रजननक्षम होईल. स्वत:चे आरोग्य चांगले राहण्यासाठी पाळीच्या दरम्यान गुप्तांगांची निगा राखावी. सॅनिटरी पॅड वेळेवर बदलावे. थोडेसे सफेद पाणी दोन पाळ्यांच्या मध्यावर (पाळीच्या १४-१५ व्या दिवशी जाण,े अपेक्षितच आहे. जर वाईट वास येत असेल, गुप्तांगावर खाज सुटत असेल, लघवी करताना जळजळत असेल तर जंतूसंसर्ग असू शकतो, तेव्हा वैद्यकीय सल्ला घ्यावा. अंतर्वस्त्रे सुती व स्वच्छ असावीत.
स्वत:ला अस्वागतार्ह व असुरक्षित लैंगिक संबंधांपासून सांभाळावे. प्रत्येक नवं नातं स्वच्छ, निखळ मैत्रीच्या निकषावर तपासून पाहावं, मगच पुढचे पाऊल! (याविषयी पुढे चर्चा करू, आज आरोग्यासंबंधी विचार करूया.)
सुरुवातीचे काही महिने पाळी अनियमित असते. जसजसे शरीर, बीजाशये परिपक्व होऊ लागतात, तसतसा अंत:स्रावांचा (हार्मोन्स) प्रवाह नियमित होतो व पाळीही नियमित होते.
किशोरावस्थेत उद्भवणाऱ्या पाळीशी संलग्न तक्रारी :
१) अति व अनियमित रक्तस्त्राव :
सुरुवातीला जेव्हा पाळी अनियमित असते, तेव्हा अपरिपक्व अशा बीजाशयांत प्रोजेस्टेरॉन बनायला सुरुवात झालेली नसते. अशा वेळी फक्त इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे दर पाळीत जे पेशींचे पटल (अथवा थर म्हणा) बनून वाहून जाते ते जाड होते व पाळी येते तेव्हा खूप रक्तस्राव होतो. कधीकधी अगदी पंधरा-वीस दिवससुद्धा! लहानशी पोर खेळा-बागडायच्या वयात, थकून कोमेजून जाते. पालक मग औषधाच्या दुकानातूनच गोळी घेतात. (खरं तर वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेणे हा निव्वळ खुळेपणाच आहे!) केमिस्ट अथवा काही डॉक्टर्ससुद्धा हार्मोन्सच्या गोळ्या देतात; रक्तस्त्राव थांबतो आणि आता सगळं ठीक आहे, असं समजून गोळीही बंद करतात. यात वस्तुस्थिती अशी असते की, पाळी हार्मोनच्या प्रभावाने थांबते आणि रक्तात हार्मोनचे प्रमाण घटले की, प्रत्युत्तर म्हणून परत रक्तस्त्राव चालू होतो. (याला वैद्यकीय भाषेत व्रिडॉअल ब्लीडिंग म्हणतात.) मग परत गोळ्या.. परत थांबून परत रक्तस्त्राव! डॉक्टर, गोळ्या, इंजेक्शने, सोनोग्राफी असे प्रयोग चालतात. तोपर्यंत त्या मुलीचं  हिमोग्लोबीन जे १२ ऐवजी आधीच १० असतं, ते घसरतं ८-७-६ वर! शाळा बुडतेच. सुरुवातीचा नुसत्या हिस्टोजन हार्मोनमुळे बनणाऱ्या गर्भाशयातील स्तराच्या जागी प्रोजेस्टिरॉन तयार झाल्यानंतर दोन्ही हार्मोनच्या ताळमेळाने बनलेला गर्भाशयातील पेशीचा स्तर योग्य जाडीचा बनतो. त्यामुळे पाळीतील अतिरिक्त रक्तस्त्राव व रक्ताच्या गाठी जाणे ही तक्रार हळूहळू कमी होत जातो. हा थोडासा अवघड काळ असतो. प्रथिने असलेला अन्नपदार्थ लोहयुक्त आहार आणि शक्यतो मानसिक आधार सर्व ठीकठाक व्हायला पुरतो. परंतु वास्तविक पाहता, जर हॉर्मोन्सच्या गोळ्या घ्यायच्याच तर त्या पाळी किमान २०-२५ दिवस बंद राहील, अशा पद्धतीने घ्याव्यात. त्याबरोबरच लोहवर्धक गोळ्याही घ्याव्यात. या गोळ्यातील लोह आतडय़ात व रक्तात शोषले जाण्यासाठी शक्यतो रिकाम्या पोटी घ्याव्यात. प्रथिनयुक्त आहार घेणेही आवश्यक आहे. हा इलाज डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा. कधी कधी हा अनियमित पाळीचा त्रास थायरॉईडच्या विकारामुळे अथवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिन्ड्रोममुळेही असू शकतो. याचे निदान हार्मोन्सच्या तपासण्या, सोनोग्राफी यांनी होते व त्यासाठी विशिष्ट उपचारही आहेत. (पी.सी.ओ.एस.ची (ढ’८ू८२३्रू ५ं१८ २८ल्ल१िेी) समस्या व त्याचे प्रजननक्षमतेवर व साधारण आरोग्यावर होणारे इतरही परिणाम आपण पुढे विचारात घेऊ.)
आता १५-२० वर्षांच्या मुलींविषयी ‘पी.सी.ओ.एस.’शी संलग्न असे पुढील मुद्दे लक्षात ठेवू.
- या विकारात मुली स्थूल होऊ शकतात (विशेषत: पोट, कंबर, छाती येथे चरबी जमते).
- चेहरा, छाती, कधी कधी पोटावरही अधिक लव येते.
- चेहऱ्यावर पुटकुळ्या येतात. डोक्याचे केस विरळ होतात. ही सर्व लक्षणे पूर्णत: पी.सी.ओ.एस. झालेल्या स्त्रियांची असली तरी काही मुली फक्त स्थूल झालेल्या असतात. कारण, पी. सी. ओ. एस. हा एक विशिष्ट रोग नाही, त्याची लक्षणे प्रत्येकामध्ये अगदी वेगवेगळीही असू शकतात. काही मुलींमध्ये ही लक्षणे १५-१७ वर्षांतही दिसतात. तर कधी कधी लग्न झाल्यावर मूल होत नाही, पाळी नियमित येत नाही, म्हणून डॉक्टरांकडे आलेल्या स्त्रियांमध्ये याचे निदान होते. यात बीजाशयात अनेक बीजं एकत्र वाढायला लागतात आणि अंतस्त्र्रावाच्या प्रमाणचं गणित बिघडतं. यासाठी रक्तचाचणी, सोनोग्राफी नंतर वैद्यकीय औषधोपचार स्वाभाविकच!
पण- ‘लाइफस्टाइल चेंज’ - ‘सुधारित दैनंदिन राहणी’ हा या विकारावरील सर्वात प्राथमिक व रामबाण उपाय आहे. अगदी नियमित व्यायाम, आहारनियमन केले तर वजनही घटते आणि पाळीही नियमित होते. इथे मी माझ्या एका आतेबहिणीचं उदाहरण आवर्जून देईन. लहानपणापासून थोडी स्थूल असणारी प्रतिमा तिचं २५ व्या वर्षी लग्न झाल्यानंतर थोडी आणखीनच सुटली. लहानपणापासून थोडी अनियमित असणारी पाळी तिचं मुळी तंत्रच साफ बिघडलं. पाळी आली म्हणजे १५-२० दिवस थांबत नसे. एकत्र कुटुंबात कामाच्या रगाडय़ात हे न बोलता येण्यासारखं दुखणं! त्यात पुन्हा लग्नाला पाच वष्रे होऊनही मूलबाळ नव्हतं. हार्मोनल प्रॉब्लेम म्हटल्यावर तिला केईएमच्या एन्डोक्राइन बोलावलेलं. डॉक्टर नलिलीने तिला तत्परतेनं बघितलं. कोणतेही औषध लिहून न देता तिला ती म्हणाली, ‘स्वत:साठी थोडा वेळ दे. वजन कमी कर तरच तुला असणारे त्रास कमी होतील.’ नलिनीने तिची आहाराची पूर्ण माहिती घेतली होती. त्यात साधे बदल सुचवले होते. व्यायामप्रकार दिले होते. प्रतिमा अजूनही औषधाच्या प्रिस्क्रिप्शनची वाट पाहात होती. परंतु तिला जेव्हा एवढय़ावरच जायला सांगितलं तेव्हा तिचा विश्वासच बसेना. इतके दिवस हार्मोन्सच्या गोळ्या इंजेक्शनं तिने घेतल्या होत्या. डॉक्टर सतत तिला ‘हार्मोनल प्रॉब्लेम’ म्हणत असताना हार्मोन्स स्पेशलिस्ट नलिनी मात्र एकही गोळी घे, म्हणेना. प्रतिमा रडू लागली. मला म्हणाली, ‘दिदी, डॉक्टरांना माझा प्रॉब्लेम समजला आहे, असे मला वाटत नाही. मला कुठलंही औषध न देता फक्त वजन कमी करण्याचा सल्ला देत आहेत,’ नलिनीने एक चार्ट पेपर घेतला. त्यावर तिने पेशीचे अवाढव्य चित्र काढले व एक थेंब हार्मोनचा लाल रंगाने दाखविला. त्या अवाढव्य पेशीमध्ये लहान आकाराची पेशी काढली आणि सांगितलं ‘प्रतिमा,  तुझ्या शरीरातील हार्मोनचं प्रमाण या लहान आकाराच्या पेशीला पुरेसं आहे. म्हणजेच शरीरातील आकार कमी केलास तर नैसर्गिक हार्मोन तुला पुरतील. आणि बाहेरून गोळ्या दिल्या तर त्याचे दुष्परिणाम होतील.’
‘पीसीओएस’चे प्रजननावरसुद्धा परिणाम होतात. आणि जर हा विकास वेळीच नियंत्रणात आणला नाही तर स्त्रियांना पुढे मधुमेह, उच्चरक्तदाब इत्यादी त्रास होऊ शकतात.     
(उर्वरित भाग ४ फ्रेबुवारीच्या अंकात )