आरोग्यम् : गर्भनिरोधन : आपत्कालीन व्यवस्थापन? Print

डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत - शनिवार, १८ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altगर्भनिरोधन ही सर्वसाधारणपणे विवाहित स्त्रियांची जबाबदारी मानली जाते; परंतु शरीरसाक्षरता अर्थात बॉडी लिटरसी हा मुले आणि मुली दोघांच्याही सर्वागीण विकासातला महत्त्वाचा मुद्दा आहे.
पौष महिना संपल्यावर लग्नसराई सुरू होते. लग्नाला जाऊन आलं की नव्या जोडप्याच्या दाम्पत्य जीवनाविषयी विचार सुरू होतात. ज्या उत्साहाने आणि लक्षपूर्वक हे दाम्पत्य आणि त्यांचे पालक पत्रिका, हॉल, दागिने, आमंत्रण या गोष्टी काळजीपूर्वक पाहतात, तेवढय़ाच लक्षपूर्वक ते कुटुंबनियोजनाचाही विचार करतात का? कुटुंबनियोजन आणि गर्भनिरोधन एकच का? की गर्भनिरोधन या मुद्दय़ाची व्याप्ती कुटुंब नसलेल्या व्यक्तींचाही विचार करते? गर्भनिरोधन ही साधारणपणे स्त्रियांची (फक्त विवाहित बरं का!) जबाबदारी मानली जाते. शरीरसाक्षरता (बॉडी लिटरसी) हा मुले व मुली दोघांच्याही सर्वागीण विकासामधला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, हे विसरून चालणार नाही.
जरी पालकांनी या मुद्दय़ाकडे कितीही कानाडोळा केला तरी तारुण्यसुलभ लैंगिक कुतूहल मुलांना असतंच. पण त्यांना लैंगिक शिक्षण द्यायचं म्हटलं की, पालकच नाही तर शिक्षक, डॉक्टर, नर्सेसही चाचरतात. प्रत्येक पालकाला आपलं मूल त्यातलं नाही असंच वाटत असतं. मग जर या कुतूहलावर, त्यांच्या नवीन मित्रमैत्रिणींवर, मैत्रीवर, तारुण्यसुलभ शारीरिक आकर्षणावर आपला ताबा, नियंत्रण नाहीच तर या भावनांना योग्य वळण देणे, त्यांना स्वत:च्या जबाबदाऱ्यांची जाणीव होऊ देणे महत्त्वाचे. गर्भनिरोधन म्हणजे काय याबद्दल मोकळ्या वातावरणात चर्चा करणे योग्य नाही काय? यासाठी अनेक शाळा-कॉलेजांमध्ये पाल्य-पालकांच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
३ जानेवारी या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी बऱ्याच कॉलेजांमध्ये मुलींशी लैंगिक शिक्षण आणि गर्भनिरोधक साधनांबद्दल माहिती देण्यासाठी बोलाविले जाते. आमच्या पद्धतीप्रमाणे ही कार्यशाळा घेत असताना शरीराबद्दल माहिती दिल्यानंतर मुलामुलींना गर्भनिरोधके हाताळता यावीत म्हणून त्यांच्यासमोर आम्ही गर्भनिरोधक साधनांची बास्केटच ठेवतो. मुले-मुली गोळ्या, निरोध, कॉपर टी (तांबी) हातात घेऊन बघतात, अफाट प्रश्न विचारतात. त्यांच्या मनात न संपणाऱ्या शंका असतात. प्रशिक्षणातील हा भाग खूप जिवंत असतो.
एकदा ही कार्यशाळा चालू असताना पूर्णवेळ त्या मुला-मुलींबरोबर बसून संवाद ऐकणाऱ्या एक कॉलेजच्या प्राध्यापिका कावऱ्याबावऱ्या झाल्या.
त्या म्हणाल्या, ‘‘डॉक्टर तुम्ही असलं काही शिकवून जाल, आमच्या मुली त्याचा दुरुपयोग करतील.’’
त्यांची काळजी चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. काळजी खरी असली तरी ती अनाठायी होती.
मी त्यांना म्हटलं, ‘‘गर्भनिरोधक साधनांचा केवळ उपयोग होऊ शकतो, दुरुपयोग नाही.’’
‘‘म्हणजे?’’ त्यांनी आ वासला.
गर्भनिरोधक म्हणजे नको असणारी गर्भधारणा थांबविण्याचं साधन. नव्याने सापडलेलं लैंगिक स्वातंत्र्य जेव्हा मुलं-मुली अनुभवतात तेव्हा कधी कधी मुलींना नको असलेल्या गर्भधारणेला सामोरं जावं लागतं. अशा मुली गांगरून जातात, आईबाबांना सांगायचं धाडस करीपर्यंत, डॉक्टरांकडे पोहचेपर्यंत खूप उशीर होण्याची शक्यता असते. त्यांना गर्भनिरोधकांची माहिती असल्यास हे संकट टळू शकते. अशा वयाच्या मुला-मुलींना गर्भनिरोधकांची माहिती देणे म्हणजे त्यांची नैतिकता कमी करणे असं नव्हे, तर त्यांना सक्षम करणे होय.
जशी योगासने हे मनात येईल तेव्हा, आठवेल तेव्हा करायचे व्यायाम प्रकार नव्हेत; ते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतील तरच त्याचा उपयोग होतो; ज्याला इंग्रजीत ‘वे ऑफ लाइफ’ (जीवनशैली) म्हणतात, तसेच गर्भनिरोधके लैंगिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत; आपत्कालीन स्थितीत वापरायचं साधने नव्हेत.
एक दीड वर्षांपूर्वी टीव्हीवर एक जाहिरात यायची. त्यात सकाळी नाश्त्याच्या वेळी एक जोडपं एकमेकांकडे चिंतित कटाक्ष टाकतंय, काल रात्री चूक झाली, आता काय करायचं? आणि मग साक्षात्कार व्हायचा, ‘‘अरे आपण पिल घेऊ शकतो!’’ परंतु पिल हे नेहमी सकाळच्या चिंतेचं निराकरण करायचं अस्त्र नव्हे! इमर्जन्सी गर्भनिरोधनाच्या गोळ्या या एखादी स्त्री अगदी काही वेळाच घेऊ शकते. त्याचा नियमित वापर अपायकारक ठरू शकतो. या जाहिरातीवर बरीच चर्चा व टीका झाल्यानंतर दुसरी थोडी अधिक समजूतदार वाटणारी जाहिरात आली, एक स्त्री आपल्या आपल्या मैत्रिणीला फोनवर रात्रीच्या वेळी आधारसदृश सल्ला देत म्हणते, ‘‘या गोळ्या घे. कशाला इतका मोठा धोका पत्करतेस? नाहीतर गर्भपाताशिवाय पर्याय उरणार नाही.’’
आणि तिसऱ्या जाहिरातीने तर कहर केला. अत्यंत घाबरलेली वीसेक वर्षांची तरुणी; तिची मैत्रीण तिला गर्भपात केंद्राकडे घेऊन जाते आहे आणि जाहिरातीत म्हणते आहे, ‘‘तिने पिल घेतली असती तर ही वेळच आली नसती.’’
अशा गोळ्या सातत्याने घेतल्यास याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ असा का, की या गोळ्या वापरूच नये? तर नाही. पूर्ण जबाबदारी व तयारीने वागणाऱ्या जोडप्यांकडूनसुद्धा एखादे वेळी योग्य गर्भनिरोधक वापरायचे राहिले तर किंवा बलात्कारित मुलीला गर्भधारणा होण्याची शक्यता असताना ही गोळी दिली जाते.
मग पुढचा प्रश्न असा उभा राहतो की, सर्वात सुरक्षित, सोयीस्कर, सोपं, स्वस्त साधन कुठचं? असं अगदी आदर्श गर्भनिरोधक अजून तरी अवतरलेलं नाहीय, पण निरोध (कॉण्डोम) हे जवळजवळ आदर्श साधन म्हणायला हरकत नाही. याने गर्भधारणा टळतेच, शिवाय गुप्तरोग किंवा लैंगिक रोगही टाळला जातो.
यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुटुंबनियोजन अथवा गर्भनिरोधन ही फक्त स्त्रीची जबाबदारी असते. ही धारणा बदलण्याला मदत झाली. कारण निरोध वापरायचा पुरुषाने! यामुळे कॉण्डोमच्या जाहिरातींमध्ये पुरुषाची एक जबाबदार व संवेदनशील प्रतिमा समाजात निर्माण व्हायला मदत झाली.
पण दोन वास्तविक प्रश्न असे आहेत की, अजूनही सर्वसाधारण समाजाला कॉण्डोम गुप्तरोग टाळायचे साधन वाटतो. स्वत:च्या सहचारिणीशी संभोग करताना कॉण्डोम वापरणे महत्त्वाचे मानले जात नाही. दुसरा मुद्दा असा की, प्रत्येक स्त्री कॉण्डोम वापरण्यास आपल्या जोडीदाराचे मन वळवू शकते असे नाही. अनेक जोडपी असंही मानतात की कॉण्डोममुळे संभोगसुख कमी होते, म्हणून त्यांचा गोळ्या वापरण्याकडे कल असतो.
बऱ्याच मुली लग्नाआधी अथवा लग्न झाल्या झाल्या गोळ्यांबद्दल सल्ल्यासाठी येतात. सहसा या सर्व मुलींना कुठलेही विकार नसतात. त्यामुळे त्या गोळ्या वापरू शकतात. गोळ्य़ांमुळे पाळीतले दुखणे कमी होते, पाळी नियमित होते, रक्तस्राव कमी होतो. आता तर नवनवीन गोळ्या कमीत कमी डोसमध्ये परिणामकारी गर्भनिरोध करू शकतात. पूर्वी चर्चा केल्या गेलेल्या पी.सी.ओ.एस.सारख्या विकारात परिणामकारी ठरणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्याही आहेत.
पण शेवटी कितीही डोस कमी असला तरीही हे एक प्रकारचे (किंबहुना दोन हॉर्मोन्सचे) औषधच आहे आणि याचे शरीरातल्या विविध अवयवांवर परिणाम होत असणारच नाही का?
स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी या संयुक्त गर्भनिरोधक गोळ्या (कंबाइन्ड काँट्रासेप्टिव्ह पिल्स) घेऊ नयेत.
क्षयरोग, आकडीचा आजार यांवरची औषधे आणि या गोळ्या एकमेकांची क्षमता कमी करतात.
ज्या स्त्रिया यकृत (लीव्हर), पित्ताशय (गॉलब्लॅडर)चे विकार, स्तनांचा कॅन्सर, रक्ताच्या गुठळ्या होण्याचा विकार, हृदयाच्या झडपांचे विकार, अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, अर्धशिशी (मायग्रेन) वगैरे त्रास असलेल्यांनी या गोळ्या घेऊ नयेत. याचा अर्थ, वैद्यकीय सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नयेत.
या गोळ्यांमध्ये जी दोन हॉर्मोन्स (इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन) असतात, त्यातील इस्ट्रोजेन हे खास करून अपायकारक ठरू शकते.
मग ज्या स्त्रियांना वर नमूद केलेले आजार आहेत त्यांनी काय करायचं?
अशा स्त्री वर्गासाठी फक्त प्रोजेस्टेरॉन असणारी गोळ्या, इंजेक्शने, इंप्लांट्स (शरीरात रोपण करता येणारी साधने) आहेत.
बाळास दूध पाजणाऱ्या स्त्रिया काही महिन्यांपर्यंत फक्त प्रोजेस्टेरॉन असणाऱ्या गोळ्या घेऊ शकतात. नंतर गर्भाशय पूर्ववत झाल्यावर तांबी घालावी किंवा बाळाला वरचे दूध चालू केल्यावर संयुक्त गर्भनिरोधक गोळी चालू करावी.
प्रोजेस्टेरॉनची इंजेक्शने दर तीन महिन्यांनी घेता येतात, पण त्यांचा एक परिणाम म्हणजे पाळी येतच नाही अथवा अनियमितरीत्या येते. कधी कधी अचानक डाग पडतात. हे बऱ्याचदा स्त्रीचा गोंधळ उडविणारे ठरते. पाळी येत नसल्याने गर्भधारणा झाली असण्याची भीती असते, पण महत्त्वाचा आणि न चुकता लक्षात ठेवायचा मुद्दा म्हणजे पाळी येवो अथवा न येवो; ठरलेल्या तारखेला इंजेक्शन घ्यायचेच.
बाहेरगावी जाताना गावांमधल्या छोटय़ा घरांच्या मातीच्या भिंतींवर पाहिलेल्या जाहिरातीमध्ये हिवताप, कुष्ठरोग, क्षयरोग इ. होतेच; पण छोटे कुटुंब, सुखी कुटुंब, नसबंदी इत्यादीच्याही जाहिरातीही होत्या. यांच्या बरोबरीने विराजमान होती तांबी! तांब्याची बारीकशी तार गुंडाळलेले इंग्रजी ‘टी’च्या आकाराचे अगदी लहानसे एक शेपूट असलेले साधन!
तांबी हे एक सोयीस्कर गर्भनिरोधक आहे असं म्हणायला हरकत नाही; खास करून सरकारी रुग्णालयं, गर्भपात केंद्र इत्यादींच्या डॉक्टरांना जेव्हा ‘टारगेट’ (लक्ष्य) पूर्ण करायचं असतं तेव्हा तांबी आणि नसबंदी यांचा फारच सुळसुळाट असतो.
हे छोटसं टीच्या आकाराचं एक प्रकारच्या प्लास्टिकचं साधन. त्याच्यावर लपेटलेल्या तांब्याच्या तारेच्या मदतीने शुक्रजंतूंसाठी अयोग्य/ मारक वातावरण गर्भाशयात निर्माण करतं. गर्भाशय आकुंचन पावतं आणि आत बसवलेली तांबी बाहेर टाकायचा प्रयत्न करतं, यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही, पण ही तांबी सर्वासाठी नाही.
सहसा नवीन लग्न झालेल्या, मूल नसलेल्या स्त्रियांना तांबी वापरण्याचा सल्ला सुजाण डॉक्टर देत नाहीत.
ज्यांच्या गर्भाशयात फायब्रॉइडच्या गाठी, सेप्टम (पडदा) आहेत, ज्यांना मासिक पाळीत खूप रक्तस्राव होतो अथवा खूप दुखते, ज्यांना पांडुरोग (अ‍ॅनिमिया) आहे त्यांच्यासाठी तांबी अयोग्य आहे.
तांबीमुळेसुद्धा ओटीपोटात दुखू शकतं, अतिरक्तस्राव होऊन पंडुरोग होऊ शकतो, सफेद पाणी जास्त जाऊ शकते, क्वचितप्रसंगी जंतुसंसर्ग होऊ शकतो.
कधी कधी नव्याने घातलेली तांबी मासिक स्रावाच्या गुठळ्यांबरोबर पडून जाऊ शकते अथवा वर सरकू शकते.
म्हणून तांबी बसविल्यानंतर त्याची दोरी चाचपडून पाहून तांबी योग्य ठिकाणी असल्याची खात्री करणे, दर काही महिन्यांनी डॉक्टरी तपासणी करून घेणे बरे!