आरोग्यम् : गर्भनिरोधन Print

डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत - शनिवार, ३ मार्च  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altगर्भपात सर्वप्रथम कायदेशीर करणाऱ्या काही निवडक देशांपैकी भारत एक आहे. अमेरिकेतल्या महिलांना कित्येक दशकं यासाठी संघर्ष करावा लागला..  आपल्या शरीरावर, प्रजननक्षमतेवर आपलं नियंत्रण असावं, हे स्त्रियांचं स्वप्न काही अंशी तरी सत्यात उतरलंय..  गर्भनिरोधन या लेखाचा हा उत्तरार्ध.
आपल्या समाजात दुर्दैवाने कुठल्याही प्रतिबंधक उपायांना महत्त्व दिलं जात नाही. ‘देवाक काळजी’ हे फक्त रिक्षांच्या काचांवरच नाही तर आपल्या मानसिकतेवरही ठसलेलं आहे. तहान लागल्यावर विहीर खोदायची, आग लागल्यावर बंब शोधायला जायचं यात आपण सर्व निष्णात! हेल्मेट, सीटबेल्ट आपण पोलीस दिसला तरच लावतो! तसंच काहीसं संततिनियमनाचं आहे आपल्या समाजात!
यापेक्षा अधिक गंभीर आणि सतत मनात सलणारा मुद्दा म्हणजे आपल्या शेकडो वर्षे जुन्या पुरुषप्रधान, संस्कृतीने सगळ्या स्त्रीवर्गावर लादलेला मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक गुलामीचा बोजा. सतीची प्रथा गेली, पण कुंकवाचे धनी, मालक इत्यादींचं राज्य बिनदिक्कत चालू आहे. मग मुलींना सक्षम, सबळ, आरोग्यसाक्षर कोण करणार? फक्त कुटुंबाच्या सुखासाठी आणि वंशवृद्धीसाठीच नाही तर स्वत:च्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी हवी तेव्हाच आणि हवी तेवढीच मुलं जन्माला घाला, असा सल्ला नवदंपतींना कोण देणार? माझ्या सासूबाई एक गुजराती भाषेतली म्हण सांगत. त्याचा अर्थ असा होतो, ‘सात बाळंतपणं सोपी, पण एक गर्भपात कठीण पडतो.’ तरीही गर्भनिरोधक न वापरल्याने प्रतिकूल वेळी गर्भधारणा होते आणि तरुणी घाबरत घाबरत आणि अपराधी भावनेने बाह्य़ रुग्ण विभागात येतात. कधी कधी थोडासा बुजलेला, अस्वस्थ झालेला नवरा (कामातून वेळ काढून बरं का! ) बाहेर अवघडलेल्या स्थितीत उभा असतो. तपासून झाल्यावर ते गर्भपाताच्या गोळ्यांबद्दल विचारतात.
गेली दोन-तीन वर्षे या गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत. जगातल्या जवळजवळ सर्व स्त्रियांचं कालातीत असं एक स्वप्न- आपल्या शरीरावर, प्रजननक्षमतेवर आपलं नियंत्रण असावं, नको असलेला तरीही लादला गेलेला गर्भ गोपनीय, पण सुरक्षितरीत्या पाडून टाकता यावा- या गोळ्यांमुळे शक्य झालंय.
सोनोग्राफी करून गर्भाची स्थिती व वय यांची तपासणी करून दोन प्रकारच्या गोळ्या दोन दिवसांच्या अंतराने घेता येतात. मग काही तासांत रक्तस्राव सुरू होतो आणि गर्भ पडून जातो. कधी कधी याला थोडा वेळ लागू शकतो. गर्भपाताची प्रक्रिया पूर्ण झाली याची खात्री सोनोग्राफीने करावी लागते. क्वचित प्रसंगी अपूर्ण गर्भपात झाल्याने खूप रक्तस्राव होतो तेव्हा पिशवी साफ करावी लागते.
या गोळ्या स्त्रीसाठी एक वरदान असल्या तरी त्या दुधारी शस्त्रासारख्या आहेत.
यांच्या योग्य वापराने जसा एखादय़ा बलात्कारपीडित अथवा घरगुती हिंसाचाराचा बळी ठरलेल्या हताश स्त्रीचा गर्भपात सुरक्षित, गोपनीय पद्धतीने करता येतो. तसाच या गोळ्यांचा अयोग्य केसमध्ये अयोग्य पद्धतीने केलेला वापर  स्त्रीच्या जिवावर बेतू शकतो, पण ऐकतंय कोण? याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा.
आपल्या शहरांमध्ये अनेक औषधाचे दुकानदार (केमिस्ट) कॅन्सरची औषधं सोडून जवळजवळ इतर सर्व औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकतात. डॉक्टरची फी वाचावी म्हणून वैद्यकीय सल्ल्याशिवाय आणि कर वाचावा म्हणून बिलाशिवाय आपल्या आयाबहिणी बिनदिक्कत या गोळ्या खरेदी करतात. इकडे प्रश्न येतो तो आरोग्यसाक्षरता आणि स्वत:साठी असलेल्या जबाबदारीचा. आपण डॉक्टरांना योग्य ते आणि आपलं पूर्ण शंकासमाधान होईपर्यंत प्रश्न विचारायला घाबरतो, त्यांना आपले सगळे प्रश्न माहीत असतील, केमिस्टना सगळी शास्त्रीय माहिती असेल, असं आपण गृहीत धरतो.
पण गोळ्या द्यायच्या आधी सोनोग्राफी करून गर्भधारणा गर्भनलिकेत झाली नाही याची खात्री केली पाहिजे. स्त्रीचं हिमोग्लोबिन, तिचा रक्तगट माहीत असला पाहिजे. गर्भपात कायद्याच्या कक्षेत असला पाहिजे, हे या दुकानदारांना कसं माहीत असेल? त्यामुळे काय झालंय, अलीकडे सरकारी रुग्णालयात अनेक स्त्रिया अर्धवट गर्भपात झाल्याने, भरपूर रक्तस्राव झाल्याने गंभीर अवस्थेत दाखल केल्या जातात. त्यांना रक्तगट कोणता, कसल्या गोळ्या होत्या, डोस काय होता याचा पत्ताच नसतो आणि मग पिशवी साफ करावी लागतेच शेवटी.
हा जिवावरचा खेळ होऊ शकतो. म्हणून वैद्यकीय सल्ल्यानेच योग्य डोसमध्ये गोळ्या घेऊन गर्भपात करून घेणे शहाणपणाचे होईल.
महिलांनी विचारलेला आणखी एक प्रश्न- गर्भपात नको एम. आर. करा- एम. आर. म्हणजे मॅस्ट्रअल रेग्युलेशन, ही पद्धत गर्भपाताच्या गोळ्या किंवा आपत्कालीन गर्भनिरोधके येण्याआधी वापरली जायची. गर्भधारणेच्या अगदी सुरुवातीच्या काळात (सहा-आठ आठवडे) प्लास्टिकची मोठी सिरिंज वापरून गर्भाशयातील गर्भ खेचून काढला जातो. ही पद्धत खेडोपाडी वापरली जायची, कारण याला वीजपुरवठय़ाची गरज नसते; परंतु गर्भ आठ आठवडय़ांपेक्षा जास्त असेल तर अर्धवट गर्भपाताची भीती असते आणि खूप रक्तस्राव होऊ शकतो.
वैद्यकीय गर्भपात कायदा (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्ट)'टळढ'अ‍ॅक्ट म्हणजे काय- १९७१ साली गर्भपातासाठी कायदा झाला. म्हणजे गर्भपात करून घेणे कायदेशीर झाले. याआधी पण गर्भपात होत असत; परंतु सारे, चोरून-मारून बेकायदेशीर. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्याने महिलेच्या जिवावर बेतायचे. माता मृत्यूचे प्रमाण खूप जास्त होते. मामला गुपचूप असल्याने तक्रार कशी करणार? याला आळा घालण्यासाठी किंबहुना असं म्हटलं तर वावगं होणार नाही की, लोकसंख्या नियंत्रणासाठी हा कायदा करण्यात आला. महिलांचा हक्क म्हणून नव्हे. तुम्हाला माहीत आहे का संपूर्ण जगात भारत हा पहिला देश आहे, जिथे गर्भपात सर्वप्रथम कायदेशीर झाला. गर्भपाताचा हक्क मिळविण्यासाठी युरोप-अमेरिकेतील महिलांना कित्येक दशके संघर्ष करावा लागला आहे.
या कायद्याप्रमाणे गर्भपात हा प्रशिक्षित डॉक्टरने करावा, आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतील, अशा नेमक्या ठिकाणीच करावा व हा केवळ १२ आठवडय़ांपर्यंतच करता येतो. गर्भपात करून घेण्यासाठी कायद्यात पुढील कारणे दिली आहेत. या गर्भधारणेने मातेच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम होत असेल. गर्भधारणा बलात्कारानंतर झाली असेल. गर्भामध्ये काही व्यंग असल्यास किंवा गर्भनिरोधक साधन फसल्याने गर्भधारणा झाली असल्यास. कायद्यामध्ये एक विशिष्ट तरतूद आहे की काही व्यंग ही सोनोग्राफीने १८-२० आठवडय़ांपर्यंत ओळखता येतात, अशा वेळी १२ आठवडय़ांऐवजी २० आठवडय़ापर्यंतही गर्भपात करता येतो. कायद्याच्या या चौकटीचा विपरीत दुरुपयोग या समाजाने केला आहे. सोनोग्राफीमध्ये शारीरिक व्यंग दिसतंच; परंतु लिंग-ओळखही होते. त्यामुळे मुलीचा गर्भ असेल तर व्यंग म्हणून गर्भपात! अर्थात याविरुद्ध कायदा आहे. कायदा बनविण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होता. समाजामध्ये अजूनही मुले-मुली समान मानले जात नाहीत. अगदी श्रीमंत समाजातही ही वृत्ती दिसते. उपलब्ध होतंय म्हणून लोक करून घेतात आणि पैसा मिळतो म्हणून सोनोग्राफिस्ट आणि डॉक्टर हा प्रकार करतात. गर्भपात जरी २० आठवडे (४ १/२ महिने) पर्यंत कायदेशीर समजला जात असला तरी जसजसा गर्भ वाढत जातो तसतसा मातेच्या आरोग्याला धोका वाढत जातो.
पुढे मूल नकोच आहे, कुटुंब परिपूर्ण आहे, तरी कधी जोडपी कायमस्वरूपी उपाय करून घेण्यास कचरतात. घरातल्या इतर कामांचा, कष्टांचा बोजा जसा महिला स्वत:च्या डोक्यावर वागवतात तसेच कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे आहे. ९९.९९ टक्के कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया महिलाच करून घेतात.
ही शस्त्रक्रिया पाळीच्या पाचव्या दिवशी, गर्भपातानंतर किंवा बाळंतपणानंतर लगेच ४८ तासांच्या आत केली तर अजून गर्भाशय अंडनलिका मोठय़ा असतात. शिवाय बाळंतपणात दीड महिना आपसूक आरामही होतो. ही शस्त्रक्रिया दोन प्रकारे करता येते. साधारणत: लोक त्याला टाक्यांची शस्त्रक्रिया आणि दुसरी ती दुर्बिणीची शस्त्रक्रिया असं म्हणतात.
कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत दोन्ही बाजूच्या अंडनलिका (ां’’स्र््रंल्ल ळ४ुी२) बांधून कापल्या जातात. त्यामुळे तयार झालेली परिपक्व अंडी गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. शस्त्रक्रियेत बेंबीच्या खाली छेद देऊन वरील प्रोसिजर केली जाते. नंतर दोन ते तीन टाके पडतात.
बिनटाक्यांची, दुर्बिणीची म्हणजे लेप्रोस्कोपने होते. लांब बारीक नळी ओटीपोटात बारीक छिद्र करून अलगद सरकविली जाते. या नळीच्या बाहेरच्या टोकातून बघण्यासाठी दुर्बीण असते आणि आतल्या टोकाला आकडा असतो. या नळीला अशी व्यवस्था असते की, बाहेरूनच आतल्या आकडय़ांवर नियंत्रण करता येते, एक-एक अंडनलिका उचलून आपण केसांना घट्ट रबरबॅण्ड लावतो, त्याप्रमाणे नलिका दुमडून रबरबॅण्ड बसवितात.
दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया अयशस्वी होतात का? तसं काही नाही; परंतु काही वेळा नलिकेवर बसविण्याच्या बॅण्डचा दर्जा चांगला नसेल, हे बॅण्ड तुटतात आणि नलिका पुन्हा सरळ होते. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेनंतर पाळी आली नाही तर गर्भ न राहिल्याची खात्री करणे अत्यावश्यक आहे.
पुरुष नसबंदी हा एक संशोधनाचा विषय आहे. पद्धत सोपी-सरळ आहे. ऑपरेशन बाह्य़-रुग्ण विभागातही केवळ सात ते दहा मिनिटांत करता येतं. भूल देण्याची गरज नसते. रुग्ण चालत येऊन शस्त्रक्रियेच्या टेबलवर चढू शकतो आणि चालत परत जाऊ शकतो. आधीच ही शस्त्रक्रिया सोपी त्यात एन. एस. व्ही. पद्धत आणखी सोपी म्हणजे एकही टाका नाही! तरीही ती केली जात नाही. कारण करून घेणारे नाहीत. ही शस्त्रक्रिया करताना लिंगाच्या खाली दोन वृषणांमध्ये अगदी बारीक छिद्र केले जाते, त्यातून एक-एक शुक्राणू नलिका बाहेर काढून बांधून आत सरकविली जाते. तिथली त्वचा सैल असल्याने फक्त जुळवून घट्ट बॅण्डेज दिले जाते. शस्त्रक्रिया करून घेतल्याबद्दल रु. १४७१ इतका नकदी पुरस्कारही दिला जातो. शस्त्रक्रियेनंतरही वीर्यामध्ये काही आठवडय़ापर्यंत शुक्रजंतू असतात. म्हणून ते नाहीसे होईपर्यंत निरोध वापरण्याचा सल्ला दिला जातो. पुरुष या शस्त्रक्रियेला घाबरतात, त्याप्रमाणे महिलापण घाबरतात. नवऱ्याचं ऑपरेशन करून घ्यायला ठाम नकार देतात. सर्वसाधारण समजूत असते की, शस्त्रक्रियेनंतर कमजोरी येईल. कदाचित १९७७ च्या आणीबाणीच्या खुणा अजून सुकल्या नसाव्यात.