आरोग्यम् : कर्करोग चिकित्सा Print

डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत : शनिवार, १७ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altआरोग्यदृष्टय़ा सक्षम असणं हे प्रत्येक स्त्रीसाठी वरदान असतं. त्यासाठी तिने जागरूकतेने स्वत:कडे बघणे महत्त्वाचे असते. स्त्रियांना सर्वात जास्त भेडसावणाऱ्या कर्करोगाविषयी विस्तृत माहिती.
आपणा सर्वानाच आरोग्यदृष्टय़ा सर्वात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती आहे- कॅन्सर आणि एच.आय.व्ही.ची! खरं तर टी.बी., मलेरिया, हृदयरोग यांनी अधिक मृत्यू होतात. पण भीतीला शहाणपण नसतं; दूरदृष्टी नसते. भीती ही आंधळी, बहिरी, मुकी असते. आधीच मुक्या स्त्रीवर्गाला भीतीने ग्रासले तर विचारायचे कोणाला?
माझ्या स्वत:च्या मनातल्या भीतीची गोष्ट सांगू का? माझी मामेबहीण अगदी तरुण वयात दोन लहान अबोध मुलींना मागे ठेवून स्तनाच्या कॅन्सरने गेली. कुटुंबातील आम्हा सर्व बहिणींना याचा मोठा धक्का बसला. अगदी लहान वयातच माझी स्तनातल्या साध्या गाठीची शस्त्रक्रिया झालेली होती. कर्करोगाचा त्याच्याशी दुरान्वयानेही संबंध नव्हता; तरीही भीती कायम होती! मॅमोग्राफी करून घ्यायचं ठरविलं. टेस्ट होण्याआधीच भलभलते विचार पाठ सोडेनात. टेस्टचे रिपोर्ट घेऊन आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ डॉ. उत्तुरेंकडे गेले. रिपोर्टच्या विश्लेषणाने आणि आश्वासनाने जीव भांडय़ात पडला.
महिलांना कर्करोगाबद्दल साधारणपणे कोणती माहिती असायलाच हवी? महिलांमधले कर्करोग असल्यास कारणे (रिस्क फॅक्टर्स), लक्षणे, सुरुवातीलाच निदान आणि प्रतिबंधक उपाययोजना.
स्त्रियांमधील कर्करोग-
- गर्भाशयाच्या मुखाचा (सरवायकल कॅन्सर) कर्करोग
- स्तनांचा
- बीजाशयाचा
- गर्भाशयातील आंतरपटलाचा (एन्डोमॅट्रियम)
यापैकी सर्वात मोठय़ा प्रमाणावर म्हणजे स्त्रियांमध्ये दिसणाऱ्या कर्करोगांपैकी ८० टक्के कर्करोग गर्भाशयाच्या मुखाचा (सरवायकल कॅन्सर) असतो. जागतिक महिलांच्या तुलनेत भारतीय उपखंडातील महिलांमध्ये याचे प्रमाण दुप्पट आहे. माहितीचा अभाव आणि संकोच यामुळे निदान व इलाज व्हायला उशीर होतो. म्हणूनच या उपखंडातील सरवायकल कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये मृत्यूचे प्रमाणही खूप जास्त आहे.
या मारक कर्करोगाची कारणे कोणती? बालवयात मुलींचे लग्न होणे, शरीरसंबंधाला लवकर सुरुवात होणे, वरचेवर गर्भधारणा व प्रसूती, अनेक व्यक्तींशी शरीरसंबंध येणे, योनिमार्गातून एच.पी.व्ही. (ह्य़ूमन पापिलोमा वायरस) विषाणूंचा संसर्ग सर्वात महत्त्वपूर्ण आहे, तसं बघितलं तर उपाय सोपा म्हणायला हवा- सुरक्षित लैंगिक संबंध! परंतु हेच अनेकदा स्त्रियांच्या हाती नसते.
परंतु सर्वात आशादायी बाब म्हणजे याचं निदान अगदी सुरुवातीच्या अवस्थेत झालं तर इलाज पूर्ण होऊन ती परिपूर्ण जीवन जगू शकते. त्यासाठी तपास मात्र नेमाने करून घेतला पाहिजे. या तपासणीला म्हणतात ‘पॅप स्मियर’. आपल्या शरीराच्या पृष्ठभागावरील सर्व पेशी झडत असतात आणि नव्या बनत असतात. तोंड, घसा, श्वसनमार्ग, योनीमार्ग, गर्भाशय, गर्भाशयाचे मुख वगैरे. सडलेल्या पेशी तिथल्या द्रावात मिसळतात. हा द्राव तपासला तर त्यामध्ये असणाऱ्या पेशींच्या स्वरूपावरून जंतुसंसर्ग, कर्करोग आहे की नाही हे कळू शकते, अशा अभ्यासाला एक्सफोलिएटिव्ह सायटोलॉजी (झडलेल्या पेशींचा अभ्यास) असे म्हणतात. याचा शोध पापिनिकोलू नावाच्या शास्त्रज्ञाने ७० वर्षांपूर्वी लावला. म्हणूनच या तपासणीला ‘पॅपस स्मियर’ असे प्रचलित नाव आहे. तीस वर्षांवरील सर्व स्त्रियांनी प्रत्येक तीन वर्षांनी ही तपासणी करून घ्यावी.
ही पद्धत अत्यंत सोपी आहे, सरकारी दवाखान्यात मोफत आहे आणि ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व स्त्रियांची केली जाते. एका छोटय़ाशा लाकडी चमच्यासारख्या साधनाने (आइस्क्रीमचा लाकडी चमचा) गर्भाशयाच्या मुखावरील द्राव काचपट्टीवर घेतात. त्यातील पेशी सुकून जाण्याआधी अल्कोहोलच्या द्रावणात बुडवून तपासणीसाठी प्रयोगशाळेत काचपट्टी पाठविली जाते. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली बघताना पेशींच्या स्वरूपात बदल झाले असतील, तर त्या भागाची बायोप्सी (तुकडा काढून) केली जाते. त्या तपासणीत पेशीतील बदल कर्करोगाच्या पूूर्वप्राथमिक अवस्थेतच असतील तर गर्भाशयाच्या मुखाचा तेवढाच तुकडा काढून टाकणे, विकारग्रस्त पेशीचा भाग क्वाटरी (जाळून) करणे किंवा लेझर वगैरे. पेशीतील बदल पुढच्या टप्प्यावरील असतील तर गर्भाशय काढून टाकणे, कॅन्सर उपचार, रेडिएशन वगैरे घ्यावे लागते.
परंतु गर्भाशयाच्या मुखांच्या कर्करोगाची लक्षणे कोणती-
- सुरुवातीला काहीच लक्षणे नाहीत.
- पाळी नसतानाही डाग पडणे.
- पाळीच्या मध्ये रक्तस्राव.
- लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव.
वगैरे लक्षणे दिसतात.
पॅपटेस्ट कधी करावी? ही तपासणी पाळी चालू नसताना कधीही करता येते.
‘पॅप स्मियर’मध्ये काही चुकीचं आढळलं तर कॉल्पोस्कोपी नावाचीही टेस्ट करतात. हीसुद्धा अगदी सोपी-साधी टेस्ट आहे. कॉल्पोस्कॉप म्हणजे नळीतून दिसणारं दुर्बिणीसारखं यंत्र. हे योनीमार्गातून व गर्भाशयाच्या मुखातूनही आत घालतात. अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड नावाच्या रसायनाने त्या भागाला किंचित धुतले तर ज्या पेशींमध्ये बदल झाले असतील त्या पांढऱ्या दिसू लागतात आणि अशा पांढऱ्या भागाचा सहज तुकडा (बायोप्सी) काढता येतो.
एच.पी.व्ही. (ह्य़ूमन पापिलोमा व्हायरल्स) नावाच्या विषाणूंच्या संसर्गाने सरवायकल कर्करोग होत असल्यास त्याविरुद्धची लस देणे शक्य आहे. तशी लसही बाजारात उपलब्ध आहे. १२-१३ वर्षांच्या मुलींना काही अंतराने तीन डोस द्यावे लागतात; परंतु या लसीच्या उपयुक्ततेबद्दल संशोधकांचे दुमत आहे.परंतु सरवायकल कर्करोग टाळण्यासाठी लहान वयात मुलींची लग्ने लावून न देणं सुरक्षित व उपयुक्त गर्भनिरोधके वापरून वरचेवर होणारी गर्भधारणा रोखणे व गर्भपात टाळणे, सुरक्षित लैंगिक संबंध राखणे व नियमितपणे पॅपची तपासणी करून घेणे आपल्या हाती आहे.
स्तनांचा कर्करोग : जागतिक पातळीवर स्त्रियांमधील प्रथम क्रमांकाचा हा कर्करोग आहे; परंतु भारतीय उपखंडात सरवायकल कॅन्सरच्या खालोखाल स्तनांच्या कर्करोगाचा क्रमांक लागतो. पण अलीकडे आपल्याही देशात याचं प्रमाण वाढत आहे.
वीसएक वर्षांपूर्वी माझ्या सासूबाई म्हणाल्या, ‘‘छातीत वाटाण्याएवढी गाठ लागतेय, काय बरं करू या?’’ आम्ही लगेच टाटा हॉस्पिटलमधील डॉ. राव यांच्याकडे गेलो. त्यांनी ताबडतोब शस्त्रक्रिया करून वर्षभर उपचार चालू ठेवले. त्या पूर्णपणे कर्करोगमुक्त झाल्या. याचा अर्थ असा आहे की, जागरूकतेने स्वस्तन निरीक्षण व परीक्षण केल्यास कर्करोगावर मात करणे शक्य होईल.
स्तनांच्या बाबतीत महिला गर्भाशयापेक्षाही जास्त हळव्या असतात. गर्भपिशवीची शस्त्रक्रिया बघणाऱ्याला दिसत नाही, पण स्तनांची शस्त्रक्रिया पाहणाऱ्यांच्या सहज लक्षात येऊ शकते. म्हणजे स्तनाचा कर्करोग महिलेचं शारीरिक व मानसिक खच्चीकरण करू शकतो.
गेल्या काही दशकांत स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण आपल्या देशात वाढत आहे, कर्करोग होण्याचं वयही कमी होत आहे. म्हणजे अधिक तरुण स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग दिसून येतो.
स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कोणाला संभवतो?
बीजाशयातील इस्ट्रोजन- प्रोजेस्टिरोन या आंतसस्रावांवर स्तनांची वाढ, पेशीचे परिपक्व होणे, दुग्ध ग्रंथींची वाढ इत्यादी अवलंबून असते; परंतु जेव्हा प्रोजेस्टिरोन अंतस्राव नसेल तेव्हा केवळ इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे पेशींची अर्निबध वाढ व त्याचे कर्करोगात रूपांतर होण्याची शक्यता जास्त होते. असे केव्हा होईल? - ज्या महिलांची पाळी लवकर चालू होते, रजोनिवृत्ती उशिरा होते, ज्या महिलांनी स्तनपान करविले नाही. शिवाय धूम्रपान, मद्यपान, हार्मोन रिप्लेसमेंट (विशेषत: इस्ट्रोजन)मुळे, ज्या महिलांच्या आई, मुली, बहिणींना स्तनाचा कर्करोग झाला असेल त्यांना हा धोका संभवतो. त्या महिलांनी नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
स्वस्तन निरीक्षण व परीक्षण म्हणजे काय?
यालाच सेल्फ ब्रेस्ट एक्झ्ॉमिनेशन म्हणतात. स्वस्तन निरीक्षण म्हणजे आरशासमोर उभे राहून आपल्या स्तनांचा आकार, ठेवण, त्यावरील त्वचेचा पोत, स्तनाग्राचे स्वरूप या बदलांकडे लक्षपूर्वक पाहणे, स्तनाग्र आत खेचलं जाणे, स्तनावरील त्वचेचा पोत दडदडीत होणे, स्तन वर खेचला जाणे किंवा स्तनाग्रातून रक्तमिश्रित द्राव येणे ही धोक्याची लक्षणे असू शकतात.
स्वपरीक्षण ही पुढची पायरी. आपल्या हाताच्या बोटांच्या सपाटीने स्तनांचा पृष्ठभाग चाचपडून पाहणे, आतील गाठ, घट्टपणा वगैरे लागतो का ते बघणे. ही तपासणी कधीही बोटे व अंगठा जुळवून करू नये, कारण दुधाच्या गाठी हाताला लागतील व अकारण चिंतेचं कारण होईल. हे कसे करावे हे महिलांनी डॉक्टरांकडून शिकून घ्यावे.
ज्या महिलांना पाळी येत असते अशांनी स्वस्तन परीक्षण पाळीनंतर करावे, कारण पाळीच्या आधी अधिक रक्ताभिसरणामुळे स्तन जड लागतात. रजोनिवृत्तीनंतर महिन्यातली एक तारीख ठरवून दर महिन्याला ही तपासणी करावी.
मॅमोग्राफी
मॅमोग्राफी म्हणजे स्तनांचा एक प्रकारचा एक्स-रे. तरुण स्त्रियांमध्ये स्तनांची घनता अधिक असल्याने मॅमोग्राफीबरोबर सोनोग्राफीसुद्धा करावी लागते. मॅमोग्राफीमध्ये यंत्राच्या दोन सपाट पृष्ठभागांमध्ये स्तन थोडेसे दाबले जातात. स्तनातील गाठी वगैरे दिसण्यासाठी हे आवश्यक असते. काही शंकास्पद आढळले तर डॉक्टर बायोप्सीचा सल्ला देतात.
स्तनाच्या कर्करोगाचा इलाज कर्करोगाची तीव्रता, गाठीचा आकार, जागा, झालेला प्रसार, पेशी इस्ट्रोजन, प्रोजेस्टिरोनला संवेदनशील आहेत का इत्यादी अनेक मुद्दय़ांवर आधारित असतो. त्यानंतर तज्ज्ञ निर्णय घेतात. केवळ गाठ काढणे, संपूर्ण स्तन काढणे, स्तनाबरोबर लिंफ नोड ग्रंथीही निपटून टाकणे, यापैकी त्या रुग्णासाठी योग्य शस्त्रक्रिया कोणती, रेडिएशन किंवा केमोथेरपी (कॅन्सरोपचाराची) घ्यावी लागू शकते. शस्त्रक्रियेनंतर प्रोस्थेसिसचा (बांधा सुडौल दिसण्यासाठी) सल्ला किंवा प्लास्टिक सर्जरीचा सल्ला दिला जातो.
गुलाबी रिबिनीचं महत्त्व काय?
१९९० च्या दरम्यान हेनले नावाच्या स्तन कर्करोगावर मात केलेल्या महिलेने गुलाबी रिबिन कर्करोग जागृतीची निशाणी म्हणून बनविली. ही रिबिन धारण केलेली व्यक्ती जणू म्हणते- ‘‘मला स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहिती आहे. ही माहिती इतरांना द्यायला मी उत्सुक आहे. अशी रिबिन धारण करून महिलांमधील स्तनाच्या कर्करोगासाठी जास्त बजेट ठेवण्याची सरकारला आठवण करून देते. या जीवघेण्या कर्करोगाविरुद्ध मोहिमेत मी सहभागी आहे. जनजागृतीचा वसा मी घेतला आहे.’’
महिलांमधील कर्करोगांच्या यादीत बीजाशयाचा कर्करोग येतो. हा विकार किंचित फसवा असतो, कारण नेमकी लक्षणे नसल्याने निदान व्हायला उशीर होतो. बऱ्याचदा नुसतं पोट जड वाटणे, अपचन, गॅस, थोडंसंही खाल्लं तर पोट जड, लघवी-शौचाच्या तक्रारी, ओटी-पोटाचा घेर वाढणं यातलं काहीही होऊ शकतं. यावर घरगुती किंवा तात्पुरते उपाय करण्यात वेळ जातो. कधी पाळी अनियमित येते तर रजोनिवृत्तीनंतर परत पाळी येते. जास्त करून बीजाशयाचा कर्करोग वयस्क स्त्रियांमध्ये होत असला तरी तरुण मुलींत जर बीजाशयात गाठ आढळली तर ती कर्करोगाची असण्याची शक्यता जास्त आहे. याचे प्रतिबंधक उपाय नसले तरी अलीकडे पंचतारांकित रुग्णालयात जे हेल्थ पॅकेजेस् उपलब्ध आहेत, त्यात महिलांसाठी पॅप तपासणी, मॅमोग्राफीबरोबर पोट व ओटी-पोटाची सोनोग्राफीपण अंतर्भूत असते.
नियमित तपासणीत अचानक गाठ मिळाली तर काही रक्त तपासण्या (टय़ूमर मार्कर) कर्करोगाचे निदान करण्यास उपयुक्त ठरतात. बीजाशयाच्या कर्करोगाच्या उपायात गर्भाशय व दुसरे बीजाशयही शस्त्रक्रियेने काढावे लागते.
गर्भाशयाच्या आंतरपटलाचा एन्डोमॅट्रियम कर्करोग हा वयस्क स्त्रियांमध्ये होतो आणि सुदैवाने अंगावर रक्त जास्त गेल्याने लक्षही त्वरित वेधले जाते. अनियमित, अतिरक्तस्राव, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव, काही महिलांना चाळिशी, पंचेचाळिशीनंतर जास्त रक्तस्राव होतो, पाळी जायची आहे म्हणून असं होतंय असे मानू नये.गर्भधारणा कधीच न झालेल्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगासाठी टॅमोक्सिफेन औषध घेणाऱ्या स्त्रियांना होऊ शकतो.
स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह, आंतरपटलाचा कर्करोग याचा निकटचा संबंध मानला जातो.याचं निदान गर्भाशयाच्या आतील भागाचं निरीक्षण (हिस्टरोस्कोपी) व बायोप्सीने होतो. गर्भाशय व इस्ट्रोजनचे स्रोत अंडाशये शस्त्रक्रियेने काढून टाकली जातात. योग्य ती रेडिएशन, केमोथेरपी अथवा हार्मोनथेरपी असे उपाय योजले जातात.