आरोग्यम् : क्षयरोग एक सामाजिक रोग Print

altडॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार, ३१ मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
२४ मार्च हा दिवस ‘क्षयरोग दिन’ म्हणून साजरा केला जातो. प्रतिवर्षी आपल्या देशात साधारणत: एक लाख क्षयपीडित महिलांना कुटुंबातून बाहेर घालविले जाते. या रोगाबद्दल जागरूकता व संवेदनशीलता निर्माण व्हावी,त्यानिमित्ताने हा खास लेख... नवनवे भारदस्त रोग आले की, जुने नेहमीचे साधे वाटणारे रोग पाठी पडतात; परंतु क्षयरोग आपला दबदबा टिकवून आहे, असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही.
एकदा ओपीडीत थायरॉइड आजाराचे निदान झालेल्या स्त्री रुग्णाला समजावताना मी म्हणाले होते, ‘‘तुला सांगते काळजी करू नको, मला जर देवाने विचारले- ‘एक चिवट आजार मी तुला देणारच. बोल कोणता हवा?’ तर म्हणेन ‘देवा मला थायरॉइड अथवा क्षयाचा आजार चालेल.’ कारण त्याचे उपचार उपलब्ध आहेत. त्यातला क्षयरोग सहा महिने, वर्षांच्या औषध उपचाराने बरा होऊ शकतो आणि त्याने हृदयरोगाच्या झटक्याप्रमाणे मरणही येत नाही.’’
परंतु आज म्हणाल तर ‘क्षयरोग’ या आजाराची वास्तविकता बदलली आहे. दिवसेंदिवस क्षयरोगाचे जिवाणू औषधांना निष्प्रभ ठरवत आहेत. एकेकाळी क्षय गरिबांचा आणि गरिबीचा रोग मानला जाई. म्हणजे तेव्हा या रोगाभोवती हा भेद निर्माण करणारे वलय होते, पण आपणा सर्वाची सामाजिक अनास्था औषध-उपचार देण्यात आणि घेण्यात दाखविलेला बेजबाबदारपणा आणि आरोग्य निरक्षरतेमुळे आपण क्षयरोगाला जीवघेण्या विकारांच्या मालिकेत नेऊन बसविले आहे. जसे एड्सपाठी पैशाचे पाठबळ व मोठय़ा प्रसिद्ध व्यक्तीचा सहभाग आहे, तसे क्षय, मलेरिया, कुपोषण यांच्यापाठी नाही. त्यामुळे जरी जगात क्षयरोग, मलेरियाने अधिक मृत्यू होत असले तरी त्याबाबत जनजागरण विशेष नाही. क्षयाचा जीवाणू हा एड्सच्या नाजूक विषाणूंच्या तुलनेत रांगडाच म्हणायला हवा. एड्सचा विषाणू शरीरद्रव्यातून एकदा बाहेर पडून सुकला की मरतो. रासायनिक द्रव्याने त्याचा सहज नायनाट होतो, तसा क्षयाचा जिवाणू नसतो. तो रुग्णाच्या थुंकीत, कफाच्या बेडक्यात, रुग्णांनी वापरलेल्या वस्तूंमध्ये, हवेतील धूलिकणांमध्येसुद्धा महिनोंमहिने तग धरून जिवंत राहतो आणि नवनवे बळी शोधतो.
जगातील एकूण क्षयरोगींपैकी २० टक्के आपल्या भारत देशात आहेत. पाचपैकी दोन भारतीयांना क्षयाच्या जंतूंची लागण (इन्फेक्शन) होतेच. दरवर्षी १९ लाख भारतीयांना क्षयरोग होतो. जगातील उपलब्ध आकडेवारीनुसार जगात दरवर्षी ७ लाख महिला टी.बी.च्या बळी ठरतात, तर ३० लाख महिलांना जंतूंची लागण होते.
येथे आपण क्षयाच्या जंतूंची लागण आणि क्षयरोग होणे म्हणजे इन्फेक्शन आणि डिसीज यामधील फरक समजणे आवश्यक आहे.
आपल्यासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात, शहरातील गर्दीत, लहान खोल्यांच्या घरात, तुडुंब भरलेल्या बस, ट्रेनमध्ये एखाद्या किंवा अनेक खोकणाऱ्या क्षयरोग्यांच्या संपर्कात किंवा त्याने हवेत सोडलेल्या रोगजंतूंच्या संपर्कात येतो तेव्हा ते आपल्या श्वसनमार्गातून सहज प्रवेश करू शकतात आणि क्षयरोगाच्या जंतूंची लागण होते. ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी असते अशा व्यक्तींमध्ये या लागणीचे रूपांतर क्षयरोगात होते.
क्षयरोग म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर सतत खोकणारी, कृश झालेली, थुंकीत रक्त पडणारी व्यक्ती उभी राहते; परंतु क्षय केवळ फुप्फुसांनाच नव्हे तर शरीराच्या इतर अनेक अवयवांना पोखरू शकतो. मेंदू व मज्जासंस्था, मणके, हाडे, आतडी, जननेंद्रिये अगदी त्वचासुद्धा, क्षयाने प्रभावित होऊ शकते.
यापैकी जननेंद्रियांचा क्षयरोग स्त्रियांना शारीरिक तसेच सामाजिकरीत्या मारक ठरतो. या प्रकारच्या क्षयरोगाची लक्षणे नेहमीसारखी नसल्याने त्याचे निदान लवकर होत नाही. तरुण महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.
जननेंद्रियांच्या क्षयाचे परिणाम प्रामुख्याने गर्भाशय व गर्भनलिका यांच्यावर होतात. त्यापाठोपाठ ओटीपोट (पेल्व्हिस) व गर्भाशयाचे मुख (सव्‍‌र्हिक्स) यातसुद्धा तो पसरतो.
गर्भाशयाच्या आंतरपटलात (एण्डोमॅट्रियम) क्षयरोगाचा संसर्ग होतो तेव्हा गर्भाशयाला सूज येते. पाळीत अतिरिक्त स्राव होतो. याचे निदान व्हायला वेळ लागतो. काही काळ हार्मोन्सच्या गोळ्या वगैरे घेण्यात जातो. काही काळानंतर आंतरपटलाच्या पेशी नष्ट होतात. त्यांची विभाजनक्षमता संपते आणि गर्भाशयाच्या भिंती एकमेकांना चिकटतात व तिथली पोकळी नाहीशी होते. त्यामुळे पाळी अगदी कमी येऊ लागते किंवा पूर्णत: थांबते यालाच ‘सेकंडरी अमेनोरिया’ असे म्हणतात. याने वंध्यत्व येते.
अंडनलिका किंवा गर्भनलिका क्षयग्रस्त झाल्या तर त्या नाजूक नलिका नरम न राहता दडदडीत घट्ट होतात. त्यांच्या पोकळीतील पेशींचा थर नाहीसा होतो. नाजूक लव असलेल्या या पेशींचे कार्य, नलिकेत अंडय़ाचे फलन झाल्यानंतर त्या गर्भाला गर्भाशयाकडे ढकलत राहणे हे असते. या पेशी नष्ट झाल्याने फलित अंडे गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाही. तो गर्भ नळीतच अडकतो. नलिका अगदी नाजूक असते. ती फुटून रक्तस्राव झाल्याने मृत्यूही येऊ शकतो. नळीत गर्भ राहण्याला ‘एक्टोपिक प्रेग्नन्सी’ किंवा ‘टय़ुबल प्रेग्नन्सी’ म्हणतात. वेळेवर शस्त्रक्रिया व इलाज झाला नाही तर ते जिवावर बेतते. या ऑपरेशनमध्ये नलिकेतील गर्भाबरोबरच अंडनलिकाही काढून टाकावी लागते. नलिकेचा टी.बी. झाला तर तो साधारणत: दोन्ही नलिकांमध्ये पसरलेला असतो. त्यामुळे पुन्हा गर्भ राहिला तरी तो दुसऱ्या नलिकेतच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा शस्त्रक्रिया, दुसरी टय़ूबही काढणे वगैरे.
स्त्रियांमधील वंध्यत्वाच्या कारणांमध्ये गर्भनलिकेचा क्षय २५-३० टक्के एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आहे. छातीचा (फुप्फुसांचा) क्षय असलेल्या आठ महिलांपैकी एकीला जननेंद्रियांचा क्षयरोग असू शकतो. स्त्रियांमधील आर्थिक व सामाजिक कारणांमुळे, उपचारांकरिता तपासण्या होण्यास व इलाज होण्यास अडचणी येतात व उशीरही होतो. त्यामुळे त्यांना वंध्यत्व येऊ शकते.
सामाजिक संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की, प्रतिवर्षी आपल्या देशात साधारणत: एक लाख क्षयपीडित महिलांना कुटुंबातून बाहेर घालविले जाते. अशा तऱ्हेने हा सामाजिक रोग बनतो.
गर्भाशयाच्या क्षयामुळे पाळी बंद झालेली असते तेव्हा हार्मोन्सच्या गोळ्यांनीसुद्धा पाळी येत नाही. योग्य व पूर्ण निदान करण्यासाठी रक्त तपासण्या, छातीचा एक्स-रे, गर्भाशयाच्या पोकळीचे दुर्बिणीद्वारे निरीक्षण (हिस्टॉरोस्कोपी), ओटीपोटाच्या अंतर्भागाचे दुर्बिणीने निरीक्षण (लेप्रोस्कोपी) व आवश्यक त्या बायोप्सीज या तपासण्या करणे आवश्यक असते.
लेप्रोस्कॉपीत गर्भाशयावर सूज असणे, नलिकांवर सूज येऊन त्या कडक होणे, अडथळे निर्माण होणे किंवा बंद होणे, नलिका व गर्भाशयावर साबुदाण्यासारखे लहान-लहान दाणे (टय़ुबर्कल्स) तयार होणे, ओटीपोटातील अवयव एकमेकास चिकटलेले असणे- इत्यादी लक्षणे दिसतात. जर आतडी, नलिका, गर्भाशय, एकमेकांना चिकटलेले असतील तर शस्त्रक्रियेने हे अवयव सोडवताना आतडय़ाला इजा होऊ शकते.
वंध्यत्वाच्या तपासण्यांअंतर्गत ‘हिस्टोसाल फिंगोग्राफी’ म्हणजे योनीमार्गातून गर्भाशयात एक प्रकारचे रसायन घालून एक्स-रे घेतले जातात. यानेही गर्भाशय, गर्भनलिकेचा क्षयरोग कळून येऊ शकतो. हिस्टोरोलॅप्रोस्कोपीद्वारे अंतर्पटन (एण्डोमॅट्रियम, पेरिटोनियम) इ.ची बायोप्सी पी. सी. आर. (पोलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन) तपासणी यांनी पक्के निदान झाले की, डॉक्टर डोट्स प्रणालीखाली क्षयाचा उपचार सुरू करतात. क्षयाची औषधे वेगवेगळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळ्या डोसमध्ये दिली जाता कामा नयेत. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गतच डोट्सप्रमाणे दिली जावीत, त्यामुळे औषधांना दाद न देणाऱ्या (रेझिस्टंट) क्षयरोगाला आळा बसू शकतो.
एकदा उपाय चालू झाले की, आरोग्य झपाटय़ाने सुधारते, लक्षणे नाहीशी होतात व बरे वाटू लागते. अशा वेळी या रुग्ण महिलेला गर्भधारणा झाली तर क्षयाची औषधे घेताना तिचा हात आखडतो. तिला या औषधांमुळे बाळ सदोष जन्मण्याची भीती वाटत असते. मग ही बाई उपचार थांबवते किंवा गर्भपात करून घेण्यास येते. स्ट्रेप्टोमायसिन सोडून इतर क्षयरोगविरोधी औषधांचा गर्भावर परिणाम होत नाही, पण तशी १०० टक्के हमी कोण देईल. म्हणून उपचार चालू असताना अगदी कोणताही दीर्घकालीन उपचार चालू असताना जोडप्याने निरोधचा योग्य वापर करून गर्भ राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.
गर्भवती महिलेला क्षयरोग झाला तर प्रतिकारशक्तीच्या अभावाने कुपोषणाने माता व गर्भ दोघांच्याही जिवाला अधिक धोका असतो. अपुऱ्या महिन्यात प्रसूती होणे, कमी वजनाचे बाळ जन्मणे याचा धोका इतर निरोगी स्त्रियांपेक्षा क्षयग्रस्त स्त्रियांमध्ये दुप्पट असतो व बाळ दगाविण्याचा धोका चौपट असतो.
क्षयरोगी मातेपासून तान्हं बाळ क्षयाच्या लागणीच्या भीतीने दूर केले जाते. तिच्या दुधापासून वंचित केले जाते. अशा बाळांना क्षयरोगाच्या जंतूचा संसर्ग (इन्फेक्शन डिसीज नव्हे!) झालेला असतोच, शिवाय स्तनपान न मिळाल्यामुळे त्या बाळाची प्रतिकारशक्ती खालावते व ते बाळ कुपोषित होऊन क्षयरोगाचा धोका कमी होण्याऐवजी वाढतो. क्षयरोगाची औषधे चालू असताना महिलांनी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करू नये. गर्भनिरोधक म्हणून निरोधचा वापर व्हावा.
रोज हजार क्षयरोगी आपल्या देशात मृत्युमुखी पडतात. टी.बी.ने माता मृत्यूच्या प्रमाणात खूप मोठय़ा प्रमाणात भर पडते. लेकरांना अनाथ करणाऱ्या व महिलांना बेघर करणाऱ्या या सामाजिक रोगावर मात करताना दोन गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे- जिकडेतिकडे न थुंकणे, क्षयरोग झालाच तर डोट्स प्रणालीप्रमाणे न चुकविता, न थांबविता उपचार घेणे.