आरोग्यम् : लसीकरण Print

altडॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जगात होणाऱ्या नवजात बाळांच्या मृत्यूपैकी एक चतुर्थाश बाळे भारतातली आहेत. त्यापैकी १० टक्के बाळं धनुर्वाताने दगावतात. म्हणूनच योग्य वेळी योग्य त्या लसी घेणं आवश्यक आहे.  वयात येणाऱ्या मुली, गर्भधारणा इच्छुक महिला आणि गर्भवती मातांसाठी विशेष लसींची गरज असते का? आणि केव्हा? हे सांगणारा लेख ..
‘लोकसत्ता’च्या वाचकांना रोगप्रतिबंधक लसींचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज नाही. लहान बाळांच्या लसीकरणाविषयी आपण सर्वच जागरूक असतो. एखादा दिवसही इकडचा तिकडे होऊ नये म्हणून धडपडत असतो. परंतु वयात येणाऱ्या मुली, गर्भधारणा इच्छुक महिला आणि  गर्भवती मातांसाठी काही विशेष लसींची गरज असते का? असेल तर का? आणि केव्हा?
साधारणत: अधिक प्रमाणात असलेल्या रोगांच्या लसी सर्वाना व काही विशिष्ट रोगांच्या लसी निवडक व्यक्तींना दिल्या जातात. या नियोजनात या निवडक व्यक्ती अथवा गटांच्या स्वत:च्या आरोग्याचा व त्यांच्यापासून इतर व्यक्ती (जोडीदार, मुले) ना संभवणाऱ्या धोक्यांचा विचार केला जातो.
तसेच सगळ्या लसी सर्वच भौगोलिक प्रदेशातील सर्वानाच दिल्या जातात असे नाही. आपण कायमस्वरूपी रहात असलेल्या भागात असलेल्या काही आजारांना आपण इम्यून म्हणजे प्रतिकारक्षम झालेले असतो, पण परदेशातून येणाऱ्या प्रवासी व्यक्तींमध्ये ही रोगप्रतिकारक्षमता नसल्याने त्यांना या लसी घ्याव्या लागतात. (उदाहरणार्थ काही पाश्चात्त्य प्रवासी मलेरिया टाळण्यासाठी येथे आल्यावर दर आठवडय़ाला त्याच्या गोळ्या घेतात!)
तसेच सार्वजनिक आरोग्याचा दर्जाही प्रत्येक देशात वेगवेगळा असल्याने त्यांच्या आरोग्यविषयक गरजा आणि प्राधान्य असलेले आजार वेगवेगळे असतात. आर्थिक क्षमतेप्रमाणे हे सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम असतात.
अलीकडे मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादी मुलगी / सून तिकडे परदेशात असते. कधी अचानक फोन येतो, ‘प्रेग्नंसी स्क्रिनिंग’च्या वेळी आधी कोणत्या लसी घेतल्या होत्या त्याबद्दल माहिती विचारली जाते, कित्येक लसी देऊन घेण्याची त्यांची सूचना असते. अशा वेळेला घाबरलेल्या लेकी/ सुना म्हणतात, ‘आपल्या डॉक्टर काकांना विचार न यांची गरज आहे का?’ अगदी परदेशातच कशाला इथेही काही पंचतारांकित रुग्णालयातून बऱ्याच वेगवेगळ्या तपासण्या आणि लसी दिल्या जातात. या सर्वाची गरज असते का?
लसींबद्दल माहिती देण्याआधी मुळात लसी का देतात, त्या कोणत्या प्रकारच्या असतात, कशा दिल्या जातात वगैरे बघुया.
साध्या पद्धतीने सांगायचं तर गर्भवती स्त्रीला लस दिली म्हणजे तिचं आणि बाळाचं रोगराईपासून संरक्षण होतं. लस म्हणजे रोग-जंतूशी लढा कसा द्यायचा, त्यांचा नायनाट करून, रोग होण्यापासून शरीराची सोडवणूक कशी करून घ्यायची याचे शरीराला मिळालेले प्रशिक्षणच म्हणायला हरकत नाही. आपल्या शरीरात नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते. ही शक्ती लसींमुळे वाढते किंवा नसेल तर निर्माण होण्यासाठी चालना मिळते.
साधारणत: आपण असं म्हणू शकतो की या विशेष लसी माता-बाल संरक्षणार्थ जगभरात दिल्या जातात. त्यापैकी काही लसी वयात येणाऱ्या मुलींना देतात, काही लसी गर्भधारणे आधी काही महिने आणि गरोदर महिलेला दिल्या जातात. कोणत्या लसी द्यायच्या ते मुलीच्या वयानुसार, तिला संभवणाऱ्या धोक्यानुसार, ती ज्या देशात आहेत त्याच्या भौगोलिक किंवा सामाजिक वातावरणानुसार आणि शिवाय तिला आधीच कोणत्या लसी दिल्या गेल्या होत्या त्यावरून ठरते.
लसी कशापासून बनतात?
लसी या रोग निर्माण करणाऱ्या जिवाणू/ विषाणूंपासून बनतात. जिवाणू/ विषाणू (जिवंत किंवा मृत) हे लसीमधून शरीरात सोडले जातात. ते आपले शरीर त्यांच्याशी लढा देण्यासाठी प्रतिजिवाणू/ प्रतिविषाणू तयार करून सज्ज बनते. याला एन्टी बॉडीज असे म्हणतात. आणि जेव्हा शरीरावर खरोखरच्या रोग जंतूचा हल्ला होतो, तेव्हा शरीर त्यांचा प्रतिकार तयार एन्टिबॉडीजमुळे सहज करू शकते व रोग होण्यापासून त्या व्यक्तीचे रक्षण होते. या लसी रोग जंतूंच्या विषारी द्रव्यांपासूनही (टोक्साइड्स) बनविल्या जातात.
गर्भवती स्त्रीच्या शरीरात अशा तऱ्हेने लसींमुळे एन्टिबॉडीज तयार होतात, त्याची बाळाला नैसर्गिकरीत्याच भेट (गिफ्ट) मिळते. म्हणजे नवजात बाळाच्या शरीरात मातेची प्रतिकार शक्ती (मॅटरनल एन्टिबॉडीज) असतात.
यासाठी एक साधे उदाहरण द्यायचे तर- नवजात बाळाला आणि मातेला धनुर्वातापासून वाचविण्यासाठी मातेला गर्भावस्थेमध्ये धनुर्वाताची लस दिली जाते. ही लस धनुर्वात निर्माण करणाऱ्या रोगजंतूच्या विषारी द्रव्यांपासून (Toxoid) बनलेली असते. त्यामुळे मातेच्या शरीरात ज्या एन्टिबॉडीज तयार होतात त्या बाळाला आपसूक मिळतात आणि पहिले काही महिने बाळाचे संरक्षण करतात. गेली आठ दशके ही लस जगभरामध्ये माता-बाळांचे धनुर्वातापासून रक्षण करून प्राण वाचविते. नेहमीच्या भाषेत या लसीला टी. टी. म्हणतात. आपल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत गर्भवती मातेला हीच लस दिली जाते. या कार्यक्रमाप्रमाणेच बाळाच्या प्राथमिक लसीकरणानंतर (ते या लेखाचा भाग होऊ शकत नाही-) म्हणजे  पाचव्या वर्षी दुसरा बुस्टर दिल्यानंतर वयाच्या दहाव्या आणि सोळाव्या वर्षांत धनुर्वाताची लस द्यायची असते हे आपल्या गावीही नसतं. या धनुर्वाताच्या इंजेक्शनची किंमत साडेतीन रुपये आहे फक्त. त्या पुढचं म्हणजे जगात होणाऱ्या नवजात बाळांच्या मृत्यूपैकी एक चतुर्थाश बाळे भारतातली आहेत. त्यापैकी १० टक्के बाळं धनुर्वाताने दगावतात.
लस म्हटली की चांगलीच असं मात्र नाही. एक साधा नियम आहे, गर्भवती स्त्रीला जिवंत विषाणूंपासून बनविलेली लस दिली जाऊ नये. तशी लस द्यायचीच झाली तर महिला गरोदर राहण्या आधी दिली गेली पाहिजे. प्रगत देशात गर्भधारणे आधी स्त्रियांना गोवर, गालगुंड आणि रुबेला नावाची त्रिगुणी लस देण्याची प्रथा आहे. याला एम. एम. आर.ची लस असे म्हणतात. (मिसल्स, ममस् आणि रुबेला).
यातील रुबेला अथवा जर्मन मिसल्स हा आजार विषाणूंमुळे होतो. गोवरासारखा ताप येणारा आजार गर्भवती स्त्रीला झाला तर शारीरिक व्यंग असलेलं बाळ जन्माला येऊ शकतं, मृत बाळाचा जन्म होऊ शकतो किंवा बाळ जन्मत: कमी वजनाचं होतं. म्हणून मुलींना, महिलांना ही लस गर्भवती  होण्याआधी (कमीत कमी महिनाभर) दिली जाते. आपल्या देशापुरतं बोलायचं तर रुबेलाचं प्रमाण अगदी नगण्यच आहे. म्हणून आपल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत बाळालासुद्धा एम. एम. आर. (मिसल्स, ममस्, रुबेला) देत नाही. केवळ गोवराची लस देतो (मिसल्स). याची अनेक कारणे आहेत.
टटफ ही लस बाळाचे रक्षण तीन रोगांपासून करीत असली तरी ती बाळाच्या पंधराव्या महिन्यापर्यंत देता येत नाही. म्हणून नवव्या महिन्यात निदान केवळ गोवर लस दिली जाते. कारण नऊ ते पंधरा महिन्यांदरम्यान गोवर आले तर बाळ दगावण्याची शक्यता असते.
ममस् म्हणजे गालगुंड साधारणत: लहानपणी होतात आणि दुखऱ्या सुजेपलीकडे मुलांमध्ये त्याचे दूरगामी परिणाम नसतात. पण मोठय़ा मुलामुलींमध्ये गालगुंड झाले तर त्याचे परिणाम दूरगामी व कायमस्वरूपी असतात. त्याचे परिणाम अंडाशयांवर होऊन वंधत्व येऊ शकते.
रुबेला जर्मन (मिसल्स) आपल्या भारतात क्वचित दिसतो. म्हणूनच आपल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत टटफ चा समावेश नाही. प्रगत देशात मात्र पंधराव्या महिन्यात एम. एम. आर. दिल्यावर दर पाच वर्षांनी देतात. गर्भधारणेसाठी इच्छुक महिलेला एम. एम. आर.बद्दल सुचविले जाते. लस घेतल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी गर्भधारणा  झाली तर चालते.
‘हिपेटायटिस बी’ची लस
या प्रकारची कावीळ हा गंभीर आजार असून रक्त आणि शरीरद्रव्यांनी संक्रमित होणारा आजार आहे. गर्भवती महिलेकडून बाळाला संक्रमण होऊ शकते. ही लस महिला गरोदर राहण्याअगोदर घ्यावी, पण ज्या महिलांमध्ये संक्रमणाची शक्यता जास्त असते म्हणजे ज्या महिलांना वरचेवर रक्त द्यावे लागते, ज्या रक्त व शरीरद्रव्ये हाताळतात अशा महिलांनी गर्भधारणेनंतरही ही लस घेतली तर चालते. याची सहा आठवडय़ाच्या अंतराने तीन इंजेक्शने घ्यावी लागतात.
या लसीबद्दल थोडे अधिक सांगणे योग्य ठरेल. या आजाराचे संक्रमण HIV/ AIDs प्रमाणेच होते, पण संक्रमणाचे प्रमाण HIV/ AIDsपेक्षा पन्नासपट जास्त असते. या प्रकारच्या काविळीने यकृताचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. लिव्हरचे आजार संभवतात. म्हणूनच गेली दहा वर्षे ही लस आपल्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट आहे.
परिस्थितीच्या गांभीर्यानुसार हिपेटायटिस ए  आणि बी च्या लसी अगदी गर्भवती स्त्रीलाही दिल्या जातात.
ह्य़ुमन पेप्पिलोमा वेक्सीनबद्दल आधीच्या लेखातून लिहिले आहे. काही महिन्यांपूर्वी टी.व्ही.वर या लसींच्या जाहिरातीचे पेव फुटले होते.
एच. पी. व्ही. (ह्य़ुमन पेप्पिलोमा वायरस) गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरकरिता जबाबदार मानला जातो. त्याचे संक्रमण लैंगिक संबंधातून होते. पाश्चात्त्य देशात मुलगी १२-१३ वर्षांची झाली की ही लस दिली जाते. लसीचे दोन मुख्य प्रकार असून ते चार प्रकारच्या एच. पी. व्ही. विषाणूंविरुद्ध परिणामकारी आहे. हे वॉर्टस व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग दोन्हींना प्रतिबंध करतात.
अधिक परिणाम साधण्यासाठी लैंगिक संबंधांना सुरुवात होण्याआधी ही लस घेणे आवश्यक आहे. इतर लसीप्रमाणे ही लसही तीन डोसेसमध्ये दिली जाते. परंतु ही राष्ट्रीय कार्यक्रमात अंतर्भूत नाही. आवश्यकतेबद्दल जास्त चर्चा होणे गरजेचे आहे.