आरोग्यम् : एचआयव्ही पॉझिटिव्ह Print

डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

एड्स म्हणजे मृत्युदंड, हे समीकरण आता संपुष्टात आलेलं आहे. गरोदर स्त्रियांमध्ये एड्सचं प्रमाण लोकसंख्येच्या ०.५ इतकं आहे. योग्य खबरदारी, योग्य उपचार यामुळे या आजारावर मात करता येणं शक्य आहे.
संजनाचा आवाज फोनवर एकदमच घाबरलेला होता. सिद्धार्थच्या अ‍ॅपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या आधी डॉक्टरांनी सगळ्या रूटीन टेस्ट्स करविल्या. त्यामध्ये एच.आय.व्ही. तपासणीही केली, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, सिद्धार्थ कोलमडून पडला. संजनाच्या पायाखालची जमीनच सरकली. नवा संसार सुरू होऊन केवळ सात-आठ महिनेच झाले! नवी स्वप्ने बघायचे दिवस! आता तर झोपच उडून गेली.
या वेळी प्रिटेस्ट आणि पोस्ट टेस्ट कौन्सेलिंगचे महत्त्व (एच.आय.व्ही. टेस्ट करण्याआधी व नंतर करावे लागणारे समुपदेशन) एक वैयक्तिक पातळीवर जाणवलं.
सिद्धार्थच्या डॉक्टरांनी एच.आय.व्ही. तपासणी रूटीन टेस्ट म्हणून केली. प्रायव्हेटमध्ये तपासणीअगोदर कौन्सिलिंगची अत्यंत गरज असते हे त्यांच्या गावीही नसतं. रिपोर्टही इतर रिपोर्टसारखा नुसता द्यायचा नसतो. डॉक्टरांनीसुद्धा टेस्ट करण्याअगोदर सिद्धार्थशी साधा संवादही साधला नव्हता, त्याचं एच.आय.व्ही.बद्दलचं ज्ञान किती, त्याला आणखी कोणत्या माहितीची गरज हे जाणून घेतलं नव्हतं. नुसता आपला लिफाफा हाती दिला. याचा अर्थ काय, पुढे कोणते मार्ग आहेत, याची कल्पना नव्हती दिली. रिपोर्ट वाचून दोघांचं अवघं विश्वच उद्ध्वस्त झालं होतं.
असं कसं झालं? आधी काहीच कशी चाहूल लागली नाही?
एच.आय.व्ही.चा विषाणू सिद्धार्थच्या शरीरात कसा गेला असेल?
आता पुढे काय? दोघांनी काय काय निर्णय घ्यावेत?
एच.आय.व्ही.चा विषाणू आता आपणा सर्वाच्या चांगलाच परिचयाचा झाला आहे. गेल्या दोन दशकांत राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने जोमाने चालविलेल्या माहिती प्रचारामुळे जवळजवळ सर्वच वाचकांना एच.आय.व्ही.बद्दल माहितीसुद्धा आहे.
हा विषाणू रक्त, असुरक्षित शारीरिक संबंध, स्तनपान याद्वारा पसरतो. जेव्हा अगदीच तान्ह्य़ा बाळांना हा स्तनपानाद्वारे लागतो तेव्हा त्यांची तब्येत लवकर खालावण्याची शक्यता असते, पण जेव्हा तरुणांना, प्रौढांना याची लागण होते तेव्हा अनेक वर्षे काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. सिद्धार्थचंही तसंच झालं असावं.
जर संसर्गित व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली असेल, आहार व आरोग्य चांगले असेल आणि त्याला अथवा तिला क्षयासारखे दुसरे कुठले आजार नसतील तर हा काळ दीर्घ असतो. हळूहळू रोगप्रतिकार करणाऱ्या पांढऱ्या पेशी (सी.डी. फोर लिम्फोसाइट्स) एच.आय.व्ही.मुळे नष्ट होतात आणि त्यांची संख्या घटते आणि इतर सुदृढ व्यक्तींमध्ये लवकर बरे होणारे आजार या संसर्गित व्यक्तींमध्ये खूप बळावतात.
या वेळेस सिद्धार्थ आणि संजना दोघांचीही परिस्थिती अत्यंत विचित्र होती. एकमेकांशी काय बोलावे हे सुचत नव्हते. घरातल्या इतरांना काय, कसे सांगायचे की त्यांना या इन्फेक्शनबद्दल अंधारात ठेवायचे?
 जरी शब्द सापडले नाहीत, अपराधाची भावना आणि भीती खायला उठल्या तरीही निदान जोडीदाराला विश्वासात घेऊन एच.आय.व्ही.चे इन्फेक्शन असल्याची माहिती देणे आवश्यक आहे.
रिपोर्ट गुप्त ठेवणे हा आपला हक्क असला तरी त्यामुळे जोडीदाराला खूप मोठा धोका असतो. या चर्चेत समुपदेशकांची खूप मोलाची मदत होते. त्यांना या विषयाबद्दल माहिती देण्याचे, शंकासमाधान करण्याचे आणि भीती दूर करण्याचे विशेष प्रशिक्षण मिळालेले असते.
एवढेच नाही तर पुढील आुयष्यात कसे निरोगी राहायचे, चांगल्या दर्जाचे जीवन कसे जगायचे याबाबतही समुपदेशक मौलिक सल्ला देतात.
काही वेळा परिस्थिती अशी विचित्र असते की, संसर्गित व्यक्तीचा जोडीदार किंवा जोडीदारीण वर्षांनुवर्षे संसर्गमुक्त राहू शकतात. अशा वेळी जोडीदाराचे संरक्षण कायम कसे करता येईल, याबद्दलही मार्गदर्शन समुपदेशक करतात.
आपल्या या जोडप्याचे पुढचे पाऊल काय असले पाहिजे? आता संजनाने स्वत:ची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या सहवासाला जेमतेम सात-आठ महिनेच झाले आहेत. कदाचित संजनाला एच.आय.व्ही.ची लागण अजून झालीच नसेल अथवा ती ‘विण्डो पीरियड’मध्ये असेल!
विण्डो पीरियड म्हणजे काय?
जेव्हा एच.आय.व्ही.चा संसर्ग होऊनही रक्ततपासणी नकारी (निगेटिव्ह) येते; तेव्हा या काळाला विण्डो पीरियड म्हणतात. हा काळ साधारणत: तीन ते चार महिन्यांचा असतो. जरी तपासणी नकारी आली तरी या विण्डो पीरियडमध्ये या व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तींमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
जर तपासणीचा निकाल नकारी आला तर संजनाने काय करावे? आपले संरक्षण करण्याची खबरदारी तर घेतलीच पाहिजे, पण पुन्हा तीन-चार महिन्यांनी एच.आय.व्ही.ची तपासणी करून घेतली पाहिजे. जर पुढच्या तपासणीचा निकालही नकारी आला तर संजना संसर्गमुक्त आहे असे म्हणता येईल.
मग या जोडप्याच्या वैवाहिक जीवनाचे काय? त्याला पूर्णविराम लागला का? ‘निरोध’चा नियमित आणि नेहमीच वापर करून संजना स्वत:चे संरक्षण करू शकते.
एच.आय.व्ही. विषाणू हा एक नाजूक विषाणू आहे. तो शरीराबाहेर जगत नाही. जेव्हा दूषित शारीरिक द्राव सुकतात तेव्हा हा विषाणू लगेच नष्ट होतो. याच्यापासून लैंगिक मार्गाने संसर्ग होण्याची शक्यताही एक टक्क्य़ापेक्षा कमी असते. हिपॅटायटिस बीचा विषाणू एच.आय.व्ही.पेक्षा ३० पटीने अधिक संसर्गकारक आहे.
आता सिद्धार्थने काय करावे? सिद्धार्थची जर एकाच पद्धतीने रक्ततपासणी झाली असेल तर त्याने पुन्हा एकदा सरकारी दवाखान्यात अथवा आय.सी.टी.सी. (इंटेग्रेटेड कौन्सेलिंग अ‍ॅण्ड टेस्टिंग सेंटर)मध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी किंवा खात्रीलायक निदानासाठी वेस्टर्न ब्लॉट ही निर्णायक तपासणी करून घ्यावी.
जर सगळ्या तपासण्या निर्णायकरीत्या सकारी (पॉझिटिव्ह) आल्या तर सिद्धार्थची सी.डी. फोर तपासणी होईल. तसेच हिपॅटायटिस बी व सी आणि क्षयरोगासाठी थुंकीची तपासणी व क्ष-किरण तपासणी होईल.
हिपॅटायटिस बी, सी आणि क्षयरोग हे आजार सहसंसर्गविकार (को-इन्फेक्शन) मानले जातात व त्यांच्या असण्या/ नसण्यावर एच.आय.व्ही.साठी कुठली औषधे द्यायची हे ठरविले जाते.
जर सी.डी. फोरचे प्रमाण चांगले- साधारण ३७० च्यावर असेल तर एच.आय.व्ही.ग्रस्ताला औषधोपचाराची गरज नसते. मग ही तपासणी दर सहा महिन्यांनी केली जाते. व्हायरल लोड- विषाणूचे प्रमाण. ही तपासणी आपल्याकडे सगळ्यांसाठी केली जात नाही.
खासगी दवाखाने व रुग्णालयात ही तपासणी सर्व एच.आय.व्ही.ग्रस्तांसाठी केली जाते, पण ती खर्चिक आहे. सरकारी रुग्णालयात ही जुजबी शुल्कात उपलब्ध आहे.
समजा, संजना गरोदर असती आणि तिची तपासणी सकारी (पॉझिटिव्ह) आली असती तर?
एच.आय.व्ही. संसर्गाचे निदान होणारा हा एक मोठा वर्ग आहे. गरोदर महिला प्रसूतिपूर्व तपासणीसाठी रुग्णालयात जाते. ती पूर्णत: सुदृढ असते. येणाऱ्या बाळाची स्वप्ने पाहत असते. तिला कल्पनाही नसते की, ही एक तपासणी तिचे आयुष्यच बदलून टाकणार आहे.
इकडे असा एक स्वाभाविक प्रश्न येईल की, सर्वच व्यक्तींची ही चाचणी करायचीच का? की फक्त गरोदर महिलांचीच करायची? मग असे का?
आईच्या पोटातील गर्भाला एच.आय.व्ही.बाधित आईकडून एच.आय.व्ही.ची लागण होऊ शकते, पण फक्त ३० ते ४० टक्के केसेसमध्ये आईपासून बाळाला एच.आय.व्ही.चा संसर्ग होतो. तीन वेगवेगळ्या अवस्थांमध्ये हा संसर्ग होऊ शकतो.
(१) पोटात बाळ असताना या संसर्गाची शक्यता फार थोडी असते.
(२) नैसर्गिक प्रसूतिदरम्यान दूषित रक्ताचा संसर्ग बाळाला होऊ शकतो. हे प्रमाण अधिक असते.
(३) नंतर जेव्हा आई बाळाला आपले दूध पाजते तेव्हा हा संसर्ग होण्याचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे.
यासाठी काय प्रतिबंधक उपाययोजना आहेत?
जर गरोदर महिला एच.आय.व्ही.ग्रस्त असली तर पहिल्या अवस्थेत संसर्ग टाळण्यासाठी आईच्या शरीरातले विषाणूचे प्रमाण काबूत ठेवणे आवश्यक आहे. मग बाळाला संसर्ग होण्याची शक्यता घटते.
पाश्चात्त्य देशात यासाठी गरोदर महिलांना संयुक्त एच.आय.व्ही.विरोधी औषधोपचार दिला जातो व जर आईच्या विषाणूचे प्रमाण प्रति मि.लि. ५० च्यावर असेल तर सिझेरियन केले जाते. भारतात राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे आपल्याकडे गरोदर महिलेचे सी.डी. फोर प्रमाण चांगले असले तर तिला प्रसूतीच्या सुरुवातीस नेव्हिरापिन नावाचे औषध दिले जाते व प्रसूतिनंतर बाळालाही याचा डोस दिला जातो.
पाश्चात्त्य देशात एच.आय.व्ही.ग्रस्त मातांना स्तनपान देण्यापासून परावृत्त केले जाते व बाळांना फक्त वरचे दूधच दिले जाते.
जागतिक आरोग्य संघटनेने विकसनशील देशांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत.
आपल्या देशात बालमृत्यूचे प्रमाण विकसित देशांपेक्षा ५० पटींहून अधिक आहे. याचे मुख्य कारण कुपोषणे आणि जंतूसंसर्ग.
या पाश्र्वभूमीवर स्तनपानाचे फायदे फारच महत्त्वाचे आहेत. म्हणून पहिले चार महिने केवळ आईचे दूधच द्यावे. (इतर काहीही नाही- अगदी पाणीसुद्धा नाही.)
चार महिन्यानंतर आईचे दूध पूर्णपणे बंद करून बाळाला वरचे दूध दिले जाते. हे मार्गदर्शक तत्त्व केवल एच.आय.व्ही.ग्रस्त मातांच्या बाळांसाठीच आहे.
आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत पूर्वी एच.आय.व्ही.ग्रस्त मातांच्या बाळांची १८ महिन्यांनंतर रक्ततपासणी होत असे. गेली दोन वर्षे सहा आठवडय़ांनंतर पहिली रक्ततपासणी होते व या वेळेपासून बाळाला न्युमोनिया प्रतिबंधक औषध सुरू केले जाते.
शेवटची तपासणी दीड वर्षांवर होते व ती नकारी असल्यास बाळ एच.आय.व्ही. मुक्त समजले जाते.
सरकारी रुग्णालयांमध्ये बालकांसाठी एच.आय.व्ही.विरोधी औषधोपचार उपलब्ध झाले आहेत.
जर पती आणि पत्नी दोघेही एच.आय.व्ही.ग्रस्त असतील, तर त्यांना निरोध वापरण्याची गरज आहे का?
इतर संसर्गजन्य गुप्तरोगांपासून एकमेकांचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. जर दुसरे गुप्तरोग असले तर व्हायरल लोड (विषाणूचे प्रमाणही) वाढते.
जर जोडप्यात एकच व्यक्ती एच.आय.व्ही.ग्रस्त असेल तर त्यांनी मुले होऊ द्यावीत का? मग त्या वेळी एच.आय.व्ही. मुक्त व्यक्तीचे काय?
जर पुरुष एच.आय.व्ही. मुक्त असेल व महिला एच.आय.व्ही.ग्रस्त असेल तर कृत्रिमरीत्या वीर्य गर्भाशयात सोडले जाते. (इन्सेमिनेशन)
जर पुरुष एच.आय.व्ही.ग्रस्त व महिला एच.आय.व्ही. मुक्त असेल तर स्पर्म वॉशिंग करून (वीर्यावर विशेष प्रक्रिया) इन्सेमिनेशन केल्यास महिलेला विषाणूच्या संसर्गाचा धोका कमी होतो.
आपले जोडपे संजना आणि सिद्धार्थ हे संवेदनशील आणि समजूतदार आहेत, पण आपल्या समाजामध्ये परिस्थिती बऱ्याचदा वेगळी दिसून येते.
एकतर शारीरिक रचनेमुळे महिलेला पुरुषाकडून संसर्गाचा धोका जास्त असतो. वीर्यामध्ये विषाणूचे प्रमाण योनीद्वारापेक्षा अधिक असते.
महिलेच्या कौटुंबिक दुय्यम स्थानामुळे आणि आर्थिक परावलंबित्वामुळे ती असुरक्षित लैंगिक संबंधांना पतीला नकार देऊ शकत नाही.
आजच्या वैद्यकीय विकासाच्या पाश्र्वभूमीवर एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की, पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिली नाहीये. एच.आय.व्ही.ग्रस्त व्यक्तींसाठी आता अनेक उपचार आणि तपासण्या उपलब्ध झाल्याच आहेत. शिवाय मोकळ्या चर्चेमुळे आणि माहितीमुळे लोकांच्या मनातली भीतीही कमी झाली आहे.
एच.आय.व्ही.ची लागण म्हणजे मृत्युदंड असे समीकरण आता राहिलेले नाही.