आरोग्यम् : गर्भारपणासाठीचं समुपदेशन Print

alt

डॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , ७ जुलै २०१२
स्त्री एकूणच आपल्या आरोग्याविषयी उदासीन असते, परंतु गर्भारपण हे स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि कठीणही. त्यासाठी गरज आहे गर्भारपणापूर्वीपासूनच समुपदेशन घ्यायची.
हॉ स्पिटलला पोहोचण्याच्या एका घाईगर्दीच्या सकाळी लक्ष्मीबाईने लिफ्टच्या दरवाजातच अडवलं. ‘‘ताई, सुनेला दाखवायला आणायचं होतं, पण अजून पाचवाच महिना आहे. सातव्या महिन्यात ओटी भरली की माहेरी जाईल. नाव तिथंच घालू, पण पाय खूप सुजून राहिलेत पोरीचे आणि डोकंही दुखतंय!’’
‘‘मावशी, कुठे डॉक्टरांना दाखवलंय का?’’ लक्ष्मीबाईने नकारार्थी मान हलविली.
 आजही अशा शेकडो तरुणी या महानगरीत प्रसूतीपूर्व तपासणीपासून वंचित राहतात, हे आपलं दुर्दैव!
लक्ष्मीबाईंना सुनेला लागलीच इस्पितळात न्यायचा ताकीदवजा सल्ला देऊन मी इतर कामांकडे वळले. एसएमएसची रिंग मोबाइलवर वाजली. पाहते तर माझ्या शाळकरी मैत्रिणीचा एसएमएस होता. ‘सुनेची पाळी चुकली आहे. दादर भागात चांगली लेडी डॉक्टर कोण आहे?’
दोन सासवा आणि वेगळे प्रश्न! शिक्षण महिलांच्या आरोग्यावर किती मोठा परिणाम करतं नाही का?
दुसरीकडे ‘कुछ मीठा हो जाए’च्या जाहिरातीतलं तरुण जोडपं! पत्नी जेव्हा पतीला गोड बातमी देते तेव्हा तो ‘कुछ मीठा हो जाये!’ पत्नीला म्हणत कॅडबरी भरवतो. मग येतात पुढचे प्रश्न - डॉक्टरांकडे कधी जायचे? नाव कधी घालायचे? कोणकोणती काळजी घ्यायची? बाळ सुदृढ कसे होईल? सोनोग्राफी कधी करायची? जास्त वेळा सोनोग्राफीने काही अपाय होईल का? हे असतात भीती, काळजीवजा प्रश्न!
बाळ निरोगी व सुदृढ होण्यासाठी आई व बाबांचे सुदृढ असणं आवश्यक नाही का? मग ते कसे कळावे?
प्रिकन्सेप्शनल कौन्सेलिंग : गर्भधारणेआधी करायचे समुपदेशन! गर्भधारणेआधी करायचे समुपदेशन या संकल्पनेने आपल्या समाजात अजून जोम धरला नसला तरी त्याचे महत्त्व खूप आहे.
जर एखादी उपचार पद्धत अथवा त्यामागचे तत्त्व चांगले असेल तर ते सर्वासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यामध्ये ‘गर्भधारणेपूर्व सुमपदेशन’ही मोडते.
हे समुपदेशन अपेक्षित गर्भधारणेआधी ३ ते ६ महिने करतात. हा काळ महिलेस आपल्या शारीरिक व मानसिक तयारी करण्यासाठी असतो. त्यामुळे तब्येतीविषयी सर्व प्रश्नांचे व तक्रारींचे निराकरण करायला व सुदृढ बाळ जन्माला घालायला मदत मिळते. इथे डॉक्टर किंवा समुपदेशक पती-पत्नी दोघांच्याही कुटुंबातील आनुवंशिक आजारांची व वैयक्तिक माहिती घेतात. जसे की - रक्तगट, उपगट, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थेलिसेमियासारखे आनुवंशिक आजारही अंतर्भूत आहेत.
या माहिती व संबंधित तपासण्यांमधून आई आणि बाळाला धोके संभवत असतील तर ते कळते. काही जंतुसंसर्ग असतील उदा. गोनोऱ्हिया, क्लॅमीडिया तर त्यांचा उपचार केला येतो. महिलेची थायरॉइड लेव्हल योग्य नसेल तर त्याचा उपचार करता येतो. व्ही.डी.आर.एल. (गुप्तरोगाची तपासणी) व एच.आय.व्ही. तपासणी केली जाते. लागल्यास उपचार केले जातात. महिलेला डायबेटिस असल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करता येते. त्यामुळे होणाऱ्या बाळाला विशिष्ट प्रकारच्या जन्मजात शारीरिक व्यंगांपासून वाचविता येते. रुबेलाची लस घेणे हा या तपासणीतला भाग असू शकतो.
जसे शरीर सुदृढ असावे लागते तसेच मनही सुदृढ व आनंदी असावे लागते नाही का? पाश्चात्त्य देशांमध्ये या समुपदेशनात होऊ घातलेली माता ही नैराश्य, घरगुती हिंसा यापासून मुक्त आहे की तिला मदतीची गरज आहे, हे पाहिले जाते.
जर त्या महिलेला कुठले व्यसन असेल तर त्याबाबतही इलाज होऊ शकतो. आपल्याकडील महिला सर्वसाधारणपणे दारू पीत नसल्या तर मशेरी, तंबाखूचे सेवन करतात व हे गर्भासाठी धोकादायक आहे. इतके नियोजन अजून आपल्याकडे झाले नसले तरी गरोदर असल्याची शंका आली तर लगेच डॉक्टरांकडे जावे, वेळ काढू नये.
याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट सर्व महिलांनी लक्षात ठेवली पाहिजे. कोणत्याही आजारासाठी डॉक्टरांकडे गेले असता - एक्स-रे, सी.टी. स्कॅन करून घ्यावे लागत असेल तर गरोदर नसल्याची खात्री करून घ्यावी लागते. काही औषधेदेखील गरोदरपणात चालत नाहीत म्हणून पाळीची तारीख डॉक्टरांना आवर्जून सांगावी आणि गरोदर असल्या-नसल्याची शहानिशा करून घ्यावी. त्यामुळे डॉक्टरांना योग्य औषधांची निवड करायला मदत होईल.
म्हणजे योग्य वेळ कोणती?
ज्या महिलांची पाळी नियमित असते त्यांनी पाळी चुकल्यावर डॉक्टरांकडून किंवा स्वत:देखील लगेच प्रेग्नन्सी टेस्ट करावी. पूर्वी सहा आठवडेपर्यंत या टेस्ट पॉझिटिव्ह होत नसत; परंतु अलीकडे उपलब्ध चाचण्या गर्भधारणा झाल्या झाल्या होकारार्थी येतात. लगेच नाव घालावे.
या सुरुवातीच्या काळात केलेल्या सोनोग्राफीने गर्भ गर्भाशयात नक्की कुठे रुजला आहे व किती आठवडय़ांचा आहे हे कळते. गर्भ एक आहे की जुळे-तिळे आहेत हे कळते. अंडनलिकेत गर्भ रुजला असेल तर लवकरात लवकर उपचार प्रक्रिया सुरू करता येणं शक्य होतं.
प्राथमिक तपासणीनंतर काही औषधोपचारांची गरज असते का? पहिल्या तीन महिन्यांत बाळाच्या अवयवांची रचना होत असते, म्हणजे मेंदू, मज्जारज्जू, पाठीचा कणा हेदेखील बनत असते. या तीन महिन्यांत फोलिक अ‍ॅसिड नावाचे ‘बी’ जीवनसत्त्वातील घटक प्रत्येक गरोदर महिलेने घेणे आवश्यक आहे. फोलिक अ‍ॅसिडमुळे मेंदू, मणका, मज्जारज्जू यांच्या सदोष वाढीचे धोके कमी होतात.
सुरुवातीचे तीन महिने बऱ्याचजणींना एवढय़ा उलटय़ा होत असतात की पोटात काहीच टिकत नाही. त्यामुळे अ‍ॅसिडिटी होते. थकवा येतो. परंतु जर गरोदर महिलेने सकाळी उठून कोरडे अन्न घेतले, सुके खाणे खाल्ले जसे की बिस्किटे, खाखरा, टोस्ट वगैरे तर मळमळ थांबते. सकाळी द्रवपदार्थ घेण्याचे टाळले तर उपयोग होतो. रक्तातील साखर घटू नये म्हणून थोडय़ा थोडय़ा वेळाने काहीतरी खावे; परंतु सतत उलटय़ा होत राहिल्या तर मात्र डिहायड्रेशन (शरीरातील पाणी कमी होणे) होऊ शकते. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
(उर्वरीत मजकूर २१ जुलै)