आरोग्यम् : बाळाचे आगमन - चोचीबरोबर चारा Print

डॉ. कामाक्षी भाटे ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
 डॉ. पद्मजा सामंत
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

ऑगस्टचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने मूल जन्मल्यानंतरच्या ‘फर्स्ट गोल्डन अवर’चे महत्त्व सांगणारा हा विशेष लेख.
घरी बाळ येणार म्हणजे घरच्या मंडळींमध्ये केवढा उत्साह असतो. किती ती तयारी! आईबरोबरच या मंडळींनाही कल्पना असायला हवी की, जन्मल्याबरोबर बाळाला जर कशाची गरज असेल तर ते आहे आईचा स्पर्श, तिचे सान्निध्य, तिची ऊब आणि तिचे दूध!
म्हणून जन्मानंतर लगेचच बाळाला कोरडे करून आईच्या दोन्ही छातीमध्ये उपडे ठेवावे. आईने बाळाला हाताने गोंजारावे, त्याचे पापे घ्यावे. हा माता-बाळाचा अनावृत्त स्पर्श बाळाला ऊब देतो. आईच्या छातीचे ठोके बाळाला सुखद अनुभूती देतात. बाळ हळूहळू आपोआप स्तनाकडून बोंडाकडे (निप्पलकडे) सरकून स्वत:च स्तनपानाला सुरुवात करू शकते! या पद्धतीला ‘ब्रेस्ट क्रॉल’ पद्धत म्हणतात.
आपल्या मनात नक्की प्रश्न येतील की नुकतेच जन्मलेले बाळ कसे काय आपोआप सरकून आईच्या छातीचे निप्पल हुडकून स्वत:च पिऊ लागेल? नवजात बाळ सुरुवातीचे दोन-तीन तास अत्यंत सतर्क असते. ते तोंड उघडायला आणि चोखायला नैसर्गिकरीत्याच उत्सुक असते. यालाच वैद्यकीय भाषेत ‘रूटिंग रिफ्लेक्स’ (गालाला लागलेल्या स्पर्शाच्या दिशेने तोंडाचा ‘आ’ वासून मान वळविणे) व ‘सकलिंग रिफ्लेक्स’ (तोंडात येईल ते जिभेने आत ओढून चोखणे) असे म्हणतात. आईच्या ओटी-पोटावर पाय मारून बाळ बोंडाच्या (निप्पलच्या) दिशेने सरकू शकते. आई बाळाला धरून ठेवतेच, पण बाळ पडू नये म्हणून तिथे उपस्थित नर्स, आयाबाई किंवा आईचे नातेवाईक यांनी हाताचा आधार द्यावा किंवा लक्ष ठेवावे.
‘ब्रेस्ट क्रॉल’ काही डॉक्टरांच्या इच्छेशिवाय किंवा संगतीशिवाय करता येत नाही. तरीदेखील निदान बाळ जन्मल्यानंतर एका तासाच्या आत बाळाला आईच्या कुशीत दिले पाहिजे. म्हणजे बाळाला आईचा स्पर्श, ऊब आणि चीकदूध मिळेल!
पहिला सोनेरी तास, ‘फर्स्ट गोल्डन अवर’ बाळ आणि बाळंतिणीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. आधी म्हटल्याप्रमाणे बाळ सतर्क असते, त्याला छातीशी नेले की तोंडाचा मोठा ‘आ’ करून मातेचे निप्पल स्तनाच्या काळ्याभागासहित तोंडात घेते आणि प्रभावीपणे चोखू लागते. हा त्या बाळाचा ‘शिकण्याचा’ तास असतो. यातून तीन अतिमहत्त्वाच्या गोष्टी साध्य होतात. बाळ सतर्क असल्याने स्तनावर प्रभावीपणे ओढायला शिकते. बाळाच्या ओठाच्या स्पर्शाने व ओढण्याने मातेच्या मेंदूला चालना मिळून स्तनात दूध तयार होण्यास मदत मिळते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आईच्या स्तनातले संरक्षक चीकदूध बाळाला मिळते.
आधी आपण ‘गोल्डन अवर’चे महत्त्व बघू आणि नंतर चीकदुधाचे!
बाळाला जर पहिल्या तासात आईकडे पाजायला दिले नाही तर बाळ सतर्कपणे इकडे-तिकडे बघत राहते व दोनएक तासांनी दमून झोपी जाते. या गाढ झोपी गेलेल्या बाळाला प्रत्यक्ष देवही त्या वेळी त्याला उठवू शकत नाही. ते आपोआप तीन-चार तासांनी उठते. आता बाळाला भूक लागलेली असते, ते रडत असते. जे बाळ ‘गोल्डन अवर’मध्ये ओढायला शिकते, ते प्रभावीपणे ओढून चीकदूध पिऊ शकते, पण ज्याला छातीशीच लावलेले नसते. त्याला स्तनावर ओढायला शिकायला वेळ लागतो. रडणारे बाळ म्हणजे आई-आजीच्या काळजीचा विषय नातेवाईक सारखे आत-बाहेर करू लागतात. आई दमलेली असते, टाके दुखत असल्याने तिला बसता-झोपता येत नाही. रडणारे भुकेले बाळ पाहिले म्हणजे आईला काळजी वाटू लागते. जवळपास असणारे लोक आईला सूचना, उपदेश, रागे भरणे वगैरे करू लागतात व वरचे दूध देण्यासाठी उतावीळ होतात. अशाने मातेचा आत्मविश्वास डळमळीत होतो. बाळ रडते म्हणून पुन्हा पुन्हा तक्रार केल्यावर मातेला मदत करण्याऐवजी दुधाची भुकटी पाण्यात कालवून देण्याकडे नर्सिग स्टाफचा कल असतो. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी ‘गोल्डन अवर’चा पुरेपूर उपयोग व्हावा.
पहिल्या दिवशी व विशेषत: रात्री बाळ थोडं जास्ती रडतंच. त्याला पुन्हा पुन्हा छातीशी लावण्याची गरज असते. इथे बाळंतिणीला एखाद्या प्रेमळ व्यक्तीची गरज असते; जी बाळाला पुन्हा पुन्हा आईच्या स्तनाला लावण्यास मदत करेल. नवजात बाळाला केवळ काही थेंबच चीक दूध पुरेसे असते. त्याला इतर कशाचीच गरज नसते. बाळ फक्त भुकेसाठी रडत नसते, अजून बाहेरच्या वातावरणाला ते रुळलेले नसते. त्याला घेणे, जोजवणे आणि आईच्या स्तनाला लावणे हे पहिल्या रात्री कित्येक वेळा करावे लागते. ही मदत आईला मिळाली तर आईला विश्रांती मिळेल, बाळ ओढायला शिकेल, मातेला भरपूर दूध येईल व तिचा आत्मविश्वास वाढेल.
चीकदूध काय असते?
खाकी पिवळसर दिसणाऱ्या या काही थेंबच प्रथम दुधाला एवढे महत्त्व का? या चीकदुधात (प्रथम दुधात) बाळाला आवश्यक ती सर्व पोषक व संरक्षक द्रव्ये असतात. त्यातून बाळाला प्रतिकारक शक्ती मिळते. बाळाच्या आतडय़ांचा विकास होऊन बाळाला लवकर पहिली काळी ‘शी’ होण्यास मदत मिळते. त्यामुळे बाळामध्ये नवजात काविळीचे प्रमाण कमी होते. म्हणजे खरं तर चीकदूध म्हणजे बाळाची कवच कुंडलेच असतात! सर्वच माता आपल्या बाळाला ही संरक्षक कवच कुंडले देण्यास समर्थ असतात. या चीकदुधामध्ये प्रथिने व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण जास्त असल्याने बाळाचे पोट भरते. इथे एक महत्त्वाचे पुन्हा सांगते- चीकदुधाचे प्रमाण खूप कमी असते, अगदी काही थेंबच एकावेळी बाहेर येतात. ते दुधासारखे दिसत नाही ते घट्ट व खाकी-पिवळसर असते, बाळ ओढू लागल्यावर ते बाळाला मिळते, आपोआप झरत नाही. हे काही थेंबच बाळासाठी अमृत असतात.
निसर्गाने सुरुवातीलाच मातेला भरपूर दूध का नाही दिले? याची महत्त्वाची दोन कारणे आहेत. बाळाच्या अंगात गर्भजलाचे भरपूर प्रमाण असल्याने जास्त द्रवपदार्थाची त्याला गरज नसते. चीकदुधामध्ये बाळाला आवश्यक सर्व पोषक तत्त्वे असतात आणि हे काही थेंब घट्ट दूधच बाळाला पुरते. दुसरे कारण चीक दुधाने बाळाच्या आतडय़ांचा विकास होण्यास मदत मिळते व काळी शी होण्यास मदत मिळते. विकास होण्याआधी बाळाला भरपूर दूध पचू शकत नाही.
नवजात बाळाला कुठे झोपवाल?
आईच्या कुशीतच! यालाच शास्त्रीय भाषेत ‘बेडिंग इन’ असे म्हणतात. आईच्या कुशीइतकी ऊबदार जागा बाळासाठी दुसरी नाही. बाळाला पाळण्यात वगैरे ठेवू नये. आईच्या कुशीत बाळ ऊबदार राहील, बाळाला हवे तेव्हा आई सहज पाजू शकेल, जंतू संसर्गाचा धोका टळेल व मातेला आपले बाळ सुरक्षित असल्याचा आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वासाने पान्हा फुटण्यास मदत होते.
नवजात बाळाला दोन-दोन तासांनी छातीला लावले पाहिजे. म्हणजे २४ तासांत कमीत कमी नऊ ते दहा वेळा पाजले पाहिजे. बाळ झोपले असेल तर उठवून पाजले पाहिजे. हे पहिले दहा ते बारा दिवस, त्यानंतर बाळाला हवे तेव्हा म्हणजे उठून हालचाल करू लागले तरी पाजायला घ्यावे. बाळ रडेल तेव्हा पाजू म्हणून वाट पाहू नये.
तिसऱ्या दिवशी भरपूर दूध उतरल्यावर छाती जड होते. बाळ पिऊ शकेल तितके पाजावे. उरलेले दूध स्वच्छ उकळलेल्या पाण्यात ठेवलेल्या स्टीलच्या वाटीत काढून ठेवावे. छातीतून जितके दूध बाहेर निघेल तितके जास्त बनेल. २०-२५ दिवसांनंतर मातेला स्तन एकदम हलके लागू लागतात. तिला भीती वाटते की आपल्याला दूध कमी येते. असा समज करून घेणं चुकीचं आहे. आता बाळाची वाढ झाली आहे. त्याला छातीवर सहजपणे पिता येतं. त्यामुळे प्रभावीपणे बाळ छाती मोकळी करतं. छाती जितक्या वेळा मोकळी होईल तितके दूध जास्त बनेल.
पहिल्या तीन दिवसांत दूध उतरले नसताना वरचे दूध भरविण्यासाठी नातेवाईक उतावीळ होतात. त्यामुळे काय होईल ते पुढच्या लेखात पाहू ..