आरोग्यम् : प्रक्रिया स्तनपानाची Print

- डॉ. कामाक्षी भाटे ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
- डॉ. पद्मजा सामंत
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्तनपान हा प्रत्येक बाळाचा हक्क आहे. मात्र आईला दूध येण्याची व बाळाने ते दूध ओढून घेण्याची एक प्रक्रिया असते, ती समजून घेतली नाही तर मुलाला नैसर्गिक दूध मिळणार नाही आणि बाळ दूध ओढू शकलं नाही तर आईला दूध येणार नाही.. काय आहे ही प्रक्रिया..
न वजात बाळ रडू लागले की, घरच्या सर्वाचे धाबे दणाणतात. लेकरू काही केल्या उगी राहत नाही तेव्हा पहिला प्रश्न सर्वाच्या मनात येतो तो बाळाचे पोट भरले नसेल का? सर्वाच्या नजरा आईकडे वळतात. आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे बाळ झाल्यावर पहिले तीन दिवस आईच्या स्तनात केवळ चीक-दूधच असते. पहिले तीन दिवस दूध उतरत नाही. तिच्या स्तनाग्रावर काही थेंबच चिकट चीक-दूध दिसते. त्याकडे प्रत्येकजण साशंकपणे बघू लागतो.
बाळाच्या रडण्याने आईदेखील कानकोंडी होऊन जाते. स्वत:ला दोष देऊ लागते आणि मग सुरू होते शर्यत- बाळाला काहीबाही भरविण्याची!
या नवमातेच्या परीक्षेची ही घटका असते. तिच्या मनात शंका नसेल, तिची जर खात्री झाली असेल की, ‘‘माझ्या बाळाला पुरेसं दूध मला निसर्गाने दिलेच आहे. ते मला येणारच, कारण चोच दिली आहे म्हणजे निसर्गाने चारा तर निर्माण केलाच असणार!’’ तरच ती या हळव्या परिस्थितीत सामोरी जाईल; नाहीतर तिचे नातेवाईक दवाखान्यातील कर्मचारी वगैरे मिळून पाण्यात कालवलेली डबाबंद दुधाची भुकटी बाटलीत घालून बाळाला पाजवितात. तेव्हा हताश होऊन पाहण्यापलीकडे तिच्या हातात काही राहत नाही.
मातेला दूध उतरेपर्यंत बाटलीतून डब्याचे दूध पाजले किंवा गाईचे दूध पाजले तर काय होईल?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीक (दुधाचे जे असंख्य फायदे बाळाला मिळायला हवेत ते मिळणार नाहीत.( फायदे ४ ऑगस्टच्या लेखात दिलेत) रोगराईपासून संरक्षण देणारी बाळाची कवचकुंडले जन्मत:च हिरावली जातील. त्यामुळे नवजात बाळाला जंतुसंसर्गाचा धोका संभवतो.
दुसरे म्हणजे बाळाचे पोट अतिशय चिमुकले असते, त्याचे पोट बाटलीच्या दुधाने भरून जाते. पहिले तीन दिवस बाळ जेव्हा पुन्हा पुन्हा आईचे स्तनाग्र ओढते तेव्हा ती आईच्या मेंदूला चालना असते व त्याने स्तनात जास्त दूध बनण्याचे संकेत दिले जातात; परंतु पोट भरलेलं बाळ आईचे स्तन प्रभावीपणे ओढणार नाही, त्यामुळे आईचे दूध उतरण्याला वेळ लागतो. चिमुकलं पोट भरलं म्हणजे बाळाचा स्तनाग्र ओढायचा उत्साह कमी होईल.
तिसरा व सर्वात मोठा गैरफायदा म्हणजे बाळाला ‘निप्पल कन्फ्युजन’ होईल. म्हणजे असं की, बाटली ओढायला बाळाला फारसे श्रम करावे लागत नाहीत, फक्त ओठ चोचीसारखे उघडले, ओठांच्या दाबाने दुधाच्या बाटलीच्या निप्पलमधील छिद्रातून सहजपणे दूध बाळाच्या तोंडात येते. या सहजतेने तोंडात दूध येत असेल तर आईची स्तनाग्रे ओढतानाही बाळ असेच चोचीसारखे तोंड उघडून थोडाच दाब देईल. हे बाळ मातेच्या स्तनावर कसे ओढायचे ते शिकतच नाही. त्यामुळे तीन दिवसांनंतर आईचे स्तन दुधाने गच्च भरले तरी बाळाच्या तोंडात एक थेंबही जात नाही. असे का बरे होत असेल?
हे माहीत करून घेण्यासाठी आधी मातेच्या स्तनाची बाह्य़ आणि आंतररचना पाहूया. मातेच्या स्तनाला पुढे स्तनाग्र (त्याला बोंड किंवा निप्पल म्हणतात) असते आणि स्तनाग्राच्या भोवतीने जो काळा भाग असतो त्याला अॅरिओला किंवा स्तनमंडल असे म्हणतात, ही झाली बाह्य़रचना.
मातेचे स्तन हे दुग्ध ग्रंथी, त्यातून निघणाऱ्या दुग्धनलिका व या सर्वाच्या भोवती असणारी चरबी यांनी बनलेले असतात. या दुग्धनलिका एकमेकाला जोडल्या जाऊन स्तनमंडलाखाली (स्तनाग्राभोवतीचा काळा भाग) असणाऱ्या दुग्धविवरात उघडतात व ही विवरे सूक्ष्म नळ्यांनी स्तनाग्रात उघडतात. म्हणजे बाळाच्या तोंडात दूध यायचे झाले तर बाळाने तोंड आ वासून उघडून स्तनमंडलावर दाब दिला पाहिजे.
दूध बाळाच्या तोंडात येण्याची प्रक्रिया : यामध्ये बाळ जीभ आणि जबडय़ाचा आतला भाग याने स्तनाग्र, स्तनमंडलासहित आत ओढून घेते व जिभेच्या साहाय्याने बाळ दूध दुग्धविवरातून तोंडात दूध ओढून घेते.
आणि मगाशी बघत होतो त्या ‘निप्पल कन्फ्युजन’मुळे काय होते की, बाळ बाटलीवर पिल्याप्रमाणे स्तनावर पिते. दूध बाळाच्या तोंडात जात नाही. स्तनात भरपूर दूध असून मातेला वाटते, बाळाला आपण पाजू शकत नाही. छाती दुधाने भरल्याने तिला ताप वगैरे भरू शकतो. जर मातेने हाताने स्तनातील दूध काढून टाकले नाही तर बाळाला पिताच येणार नाही व बाळ प्यायले नाही तर दूध निर्माण होणार नाही.
हे सर्व टाळायचे असेल तर नवजात बाळाला पहिले २४ तास पुन्हा पुन्हा छातीशी लावून पाजायला घेतले पाहिजे.
माझ्या सुनेला (मुलीला) दूधच आले नाही! खूप काळजीने दु:खाने आजी-आई-सासू असं म्हणतात, पण साधारणपणे आपण मगाशी बघितली तशीच स्थिती असते. बाळाला चीक-दूध न देता साखरेचे पाणी, ग्लुकोज, मधाचे पाणी, गाईचे दूध, डबाबंद भुकटीचे दूध असेच काही बाटलीमधून पाजलेले असते. असे तीन दिवस चालते. तिसऱ्या दिवशी मातेच्या स्तनात भरपूर दूध असले तरी बाळ गोंधळलेले असते. ते पिऊ शकत नाही. मातेला माहीत नसते की, हाताने स्तनातील दूध काढून टाकले नाही तर दूध बनण्याच्या प्रक्रियेत अडथळा येईल. बाळ प्यायला शिकेपर्यंत मातेने आपले स्तन पुन्हा पुन्हा हाताने दूध काढून मोकळे केले पाहिजेत.
दुसरे, काही वेळेला असे घडू शकते की, आईला काहीतरी तीव्र दु:ख झाले, आघात झाला तरी दूध बनण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो; परंतु दूध आलेच नाही, बनलेच नाही ही गोष्ट अगदी नगण्य प्रमाणात घडते.
सिझेरियन झालेल्या मातेने दूध कसे पाजावे?
ज्या मातेचे सिझर होते तिला भुलेचे (अॅनेस्थेशियाचे) इंजेक्शन दिलेले असते. अशी माता स्वत: बाळाला धरू शकत नसली तरी नवजात बाळाला नातेवाईक किंवा नर्स एका तासाच्या आत मातेच्या छातीला लावू शकतात. ही गोष्ट माता शुद्धीवर येईपर्यंत त्यांनी पुन्हा पुन्हा करावी म्हणजे बाळाला ‘गोल्डन अवर’चा फायदा मिळेल. चीक-दूध मिळेल व चार तासांनी माता शुद्धीवर आल्यानंतर ती बाळाला पाजू शकेल. या मातेला थोडी जास्त मदतीची गरज असते. ही मदत केवळ बाळाला धरण्यापूर्वी नसते तर तिला मानसिक आधाराची गरज असते. ज्या मातांना अशी मदत मिळते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना भरपूर दूध येते. त्या बाळांना आपलं दूध सहजपणे पाजू शकतात.
सुरुवातीला भरपूर दूध आले व नंतर दूध कमी आले असे होऊ शकते का?
ही गोष्ट बऱ्याच मातांच्या अनुभवाला येते; परंतु या प्रश्नाची खरी गोम समजून घेतली पाहिजे. बाळंतपणानंतर तीन दिवसांनी भरपूर दूध उतरते आणि आईला स्तन जड वाटू लागतात. पण बाळ जसजसे मोठे होईल तसे ते प्रभावीपणे ओढून स्तन मोकळे करते. आईला स्तन हलके लागल्याने तिला काळजी वाटू लागते; परंतु काळजीचे कारण नाही. अजून दूध पुन्हा पुन्हा बनेल ते संपले असे तिने समजू नये. हे तिला कोणी समजावून सांगितले नाही तर बाळाला दूध पुरणार नाही, या भीतीने ती वरचं काही भरवू शकते. आणि मग होते काय बाळाने प्रभावीपणे स्तन मोकळा केला नाही तर पुढच्या वेळचे दूध बनण्यास अडथळा येतो.
पहिले सहा महिने मातेने बाळाला केवळ आपलेच दूध द्यावे. वरचे काहीच भरवू नये; परंतु कामकाजी मातांचे कसे होईल? त्यांनी कसा मार्ग काढावा हे पुढील लेखात (१ सप्टेंबरच्या) पाहू.