आरोग्यम् : हॉर्मोन्सचे संतुलन Print

डॉ. कामाक्षी भाटे * डॉ. पद्मजा सामंत ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

हॉर्मोन्स म्हणजे अंत:स्राव. उदा. थायरॉइड, इन्सुलिन वगैरे. तसेच सेक्स हॉर्मोन्स म्हणजे जननेंद्रियावर प्रभाव असलेले आणि त्यांचे कार्य नियंत्रित करणारे अंत:स्राव. पण यांचे कार्य तिथपर्यंतच सीमित नसते. यांचा प्रभाव आपली त्वचा, हाडे, स्तन, हृदय, मेंदू, केस म्हणजे अख्ख्या शरीरावरच असतो. जेव्हा हार्मोन्स काम करीत नाहीत तेव्हा हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी वापरावी लागते. काय आहे ती..
हॉर्मोन हा खूप वापरला जाणारा पण तेवढाच गूढ असलेला शब्द आहे. गूढ आणि वलयांकित शब्दाबद्दल कुतूहल तर असतंच, पण जेव्हा आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य त्यावर अवलंबून असतं तेव्हा काळजी आणि भीतीही असते. तसंच हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी ही संज्ञा आता मध्यमवर्गीय स्त्रियांच्या परिचयाची झाली आहे. याबद्दलही काही शंका, समजुती अथवा गैरसमजुती असतातच. शिवाय, डॉक्टरांना काय विचारू? कसं विचारू? हा प्रश्न अनेकजणींच्या मनात असतो.
पण स्वत:च्या आरोग्यासाठी आपल्या शरीरातल्या हॉर्मोन यंत्रणेविषयी थोडेसे माहीत असणे आवश्यकच नाही का?
हॉर्मोन्स म्हणजे अंत:स्राव. उदा. थायरॉइड, इन्सुलिन वगैरे. तसेच सेक्स हॉर्मोन्स म्हणजे जननेंद्रियावर प्रभाव असलेले आणि त्यांचे कार्य नियंत्रित करणारे अंत:स्राव. पण यांचे कार्य तिथपर्यंतच सीमित नसते. यांचा प्रभाव आपली त्वचा, हाडे, स्तन, हृदय, मेंदू, केस म्हणजे अख्ख्या शरीरावरच असतो म्हणा ना!
थायरॉइड ग्रंथी काम करत नसली तर थायरॉइडच्या गोळ्या घेण्याशिवाय पर्याय नसतो. इन्सुलिनच्या अभावाने उद्भवणारा मधुमेह झाला तर इन्सुलिन घ्यावेच लागणार!
पण चर्चेचा विषय असणारी हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी तशी अगदी ‘मस्ट’, ‘अत्यावश्यक’ असते असे नाही आणि दुसरा आणि अधिक महत्त्वाचा मुद्दा असा की, याचे विपरीत परिणामही असतात आणि तोलून मापून वापर करावा लागतो व रुग्णाची निवड करावी लागते.
हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी म्हणजे नक्की काय?
नैसर्गिकरीत्या येणाऱ्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज)मुळे किंवा इतर काही कारणांमुळे आपल्या अण्डाशयात इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरान तयार होत नाहीत किंवा अण्डाशये काढावी लागतात तेव्हा त्यांच्या अभावापोटी आपल्या शरीरात काही बदल निर्माण होतात. कालांतराने जरी या बदलांची आपल्याला सवय होत असली आणि काही लक्षणे नाहीशी होत असली तरी हा काही काळ काही स्त्रियांना अत्यंत त्रासदायक ठरतो.
या काळात हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी म्हणजे इस्ट्रोजेन किंवा इस्ट्रोजेन व प्रोजेस्टरॉनच्या गोळ्या, पॅचेस आदी दिले जातात.
हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी कोणी घ्यावी?
अण्डाशय काढलेल्या सगळ्याच स्त्रियांना आणि पाळी गेलेल्या सगळ्याच स्त्रियांना याची गरज असते का?
गर्भाशय काढण्याची अनेक कारणे आपण पूर्वीच्या लेखात पाहिलीच आहेत. कधी कधी अगदी तिशीतसुद्धा गर्भाशय, अंडाशय काढावे लागते. अशा वेळी महिलांना हॉट फ्लशेस (अचानक खूप गरम होणे), कोल्ड स्वेट्स (घामाघूम होणे), धडधडणे याचा खूप त्रास होतो. जेव्हा नैसर्गिकरीत्या पाळी थांबते तेव्हा हीच लक्षणे हळूहळू सुरू होत असल्याने त्यांची तीव्रता कमी असते.
ही लक्षणे त्रासदायक असली तरी धोकादायक नाहीत. पण हाडांच्या घनतेवर हॉर्मोन्सच्या अभावाचा विपरीत परिणाम होतो. तसेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांचा विकार होऊन हृदयविकाराची शक्यता वाढते. नैराश्य, हातपाय थरथरणे, पार्किन्सन्स डिसिजसारखी लक्षणे दिसणे, थोडासा स्मृतिभ्रंश होणे इ. दिसून येते.
अशा स्त्रियांना हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपीमुळे होणारे लाभ त्यामुळे होणाऱ्या अपायापेक्षा अधिक असतात.
ही थेरपी कशी दिली जाते?
ज्या स्त्रियांचे गर्भाशय काढलेले नसते त्यांना इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही दिले जातात, नाही तर गर्भाशयाच्या आतील थराची जाडी वाढून अपाय होतो.
गर्भाशय काढलेल्या स्त्रियांना फक्त इस्ट्रोजेन दिले तरी चालते.
या थेरपीचे अनेक प्रकार आहेत. यातला अगदी साधा प्रकार म्हणजे इस्ट्रोजेन क्रीम अथवा मलम. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनच्या अभावामुळे योनीमार्गाचे पटल सुकते व संभोगाच्या वेळी वेदना अथवा जळजळ होते. तसेच लघवीची नलिका (मूत्रनलिका) आणि मूत्राशय यांचे आतील पटलही सुकते आणि लघवीला जळजळणे, परत परत लघवी होण्याची जाणीव होणे, इन्फेक्शन होणे इ. लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे वृद्ध स्त्रियांमध्ये तर मोठय़ा प्रमाणात दिसतात. या वेळी फक्त इस्ट्रोजेन क्रीम थोडे दिवस दिले तर त्वरित आराम पडतो. पण सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे वैद्यकीय तपासणीशिवाय हे क्रीम वापरायचे नसते. कधी कधी या थोडय़ाशा इस्ट्रोजेनमुळेसुद्धा पाळीसारखा स्राव होऊ शकतो. हे झाल्यास आपल्या डॉक्टरांना जरूर कळवावे.
गोळ्या : आधी म्हटल्याप्रमाणे गर्भाशय असलेल्या स्त्रियांना प्रथम इस्ट्रोजेन व १५ ते २० दिवसांनंतर १० दिवस थोडे प्रोजेस्टेरॉन दिले जाते. त्या वेळीही पाळी येऊ शकते.
गर्भाशय नसलेल्या स्त्रियांना फक्त इस्ट्रोजेन दिले जाते.
ही थेरपी घेताना स्तनांची चाचणी, मॅमोग्राफी पॅप स्मिअर करून घेणे आवश्यक असते.
पॅच : इस्ट्रोजेनचा छोटा पॅच त्वचेवर चिकटवला जातो. याचा परिणाम एक आठवडा टिकतो. त्वचेला जिथे सुरकुत्या नसतात अशा भागावर पोटावर, मांडीवर वगैरे पॅच लावता येतो. आपल्या सारख्या उष्ण प्रदेशात घाम अधिक येत असल्याने पॅच सुटू शकतो. पॅचचा फायदा म्हणजे याद्वारे यकृत (लीव्हर)मध्ये होणारे इस्ट्रोजेनचे परिणाम कमी करता येतात, कारण यातील इस्ट्रोजेन पचनसंस्थेचा मार्ग टाळून परस्पर रक्तात मिसळते. पॅच कधीच स्तनाच्या त्वचेवर लावायचा नसतो आणि याच्याबरोबरसुद्धा प्रोजेस्टेरॉन दिले जाते.
इंजेक्शन आणि त्वचेखाली रोपण केले जाणारे इस्ट्रोजेनचे इम्प्लाण्टही परदेशात उपलब्ध आहेत. पण या प्रकारे दिलेल्या उपचारात औषधाचे रक्तात होणारे शोषण नियंत्रित करता येत नाही.
हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपीचे अपाय काय असतात?
अनेक संशोधनात हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी घेणाऱ्या महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग मोठय़ा प्रमाणात आढळून आला आहे.
तसेच रक्ताच्या गुठळ्या होऊन व त्यामुळे अर्धागवायूचा झटका येऊ शकतो अथवा हृदयविकार होऊ शकतो.
मग या उपचार पद्धतीला काही पर्याय आहेत का?
निश्चितच. हाडांच्या आरोग्याबद्दल सांगायचे तर; नियमित व्यायामाने हाडांच्या पेशींना चालना मिळते व हाडांची घनता वाढण्यास मदत होते. तसेच कॅल्शियमयुक्त आहार दूध, अंडी, केळी इ. घेणे नेमाने दीड ग्रॅम १५०० मि.ग्रॅ.पर्यंत कॅल्शियम घेणे, रोज ४०० युनिट्स ‘डी’ व्हिटॅमिन घेणे या उपायांनी हाडांची मजबुती टिकविता येते. सोयाबीनचा वापर आजकाल सर्वानाच माहीत झालेला आहे. अनेकजणी रोजच्या पोळीच्या पिठातही सोयाबीन पीठ मिसळून वापरतात.
योनीमार्गाची जळजळ : यासाठी त्वचा ओलसर ठेवणारे क्रीम (लुब्रिकंट्स) वापरता येते.
हृदयरोगापासून रक्षण मिळण्यासाठी इस्ट्रोजेनच हवे असे नाही तर नियमित व्यायाम, पोषक आहार, वजन काबूत ठेवणे, धूम्रपान न करणे, एवढे केले तरी पुरे.
‘बायो आयडेंटिकल हॉर्मोन थेरपी’ हा काय प्रकार आहे?
कोणतीही गोष्ट ‘बायो’ म्हटली म्हणजे नैसर्गिक किंवा चांगली असे समजण्याचे कारण नाही. या प्रकारातही वनस्पतींपासून बनविलेले इस्ट्रोजेन व पोजेस्ट्रेन दिले जातात. हे वनस्पतींपासून बनवितात पण बनविताना बऱ्याच रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात; परंतु अजूनही या प्रकाराला आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त नाही.
टिबोलोन काय आहे?
हे एक प्रकारचे स्टेरोइड हॉर्मोनच म्हणायला हरकत नाही. खास करून हे स्त्रियांच्या हाडांची घनता वाढविण्यासाठी व हॉट फ्लशेसच्या इलाजासाठी वापरले जाते. रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता व स्तनाचे आजार असणाऱ्या महिलांना हे देता येत नाही.
यामुळे अर्धागवायूचा झटका येऊ शकतो. जाता जाता एवढेच सांगायचे आहे की, हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी चिरतारुण्यासाठी नाही. याचा वापर फक्त वैद्यकीय सल्ल्याने आणि कमीत कमी काळासाठी करायचा असतो.
पोषक आहार, नियमित व्यायाम आणि जीवनसत्त्वांचा अंतर्भाव करून सुदृढ आणि निरोगी राहता येते.