धनसंपदा : कर वाचवा,संपत्ती वाढवा Print

धनश्री राणे ,शनिवार, ९ जून २०१२
कर नियोजन आणि छोटय़ा-छोटय़ा गुंतवणुकीने आपण अधिक बचतीचे उद्दिष्ट गाठू शकतो. यासह भविष्यासाठी किंबहुना दीर्घकालीन हेतूने संपत्ती जमवू शकतो. आर्थिक वर्षांच्या सुरूवातीपासूनच नियोजनबद्ध गुंतवणुकीला सुरूवात केली तर वर्षांअखेरीस कराचे ओझे खाली आणणे सहज शक्य होते.
महिन्याकाठी पगार झाल्यावर लक्षात येतं की, कराच्या स्वरूपात जाणाऱ्या पैशापायी आपल्या हाती येणाऱ्या प्रत्यक्ष उत्पन्नात फारच घट होते. अर्थातच काळजी करण्यापेक्षा आपण आपल्या मिळकतीचं नियोजन करून योग्य गुंतवणुकीचे पर्याय अंगीकारले तर करांचे ओझे निश्चितपणे कमी होऊ शकते. बरेचदा आपण कर नियोजनाच्या विषयाकडे वळतो ते वर्षांच्या शेवटी आपल्या एचआर मॅनेजरने किंवा कर सल्लागाराने करासंबंधित कागदपत्रे मागितली की आपण खडबडून जागे होतो. पण शेवटच्या क्षणाला आपल्याकडे ना समाधानकारक पुरावे असतात, ना गुंतवणूक करण्यासाठी रोख पैसे. म्हणूनच आर्थिक वर्षांच्या सुरुवातीपासूनच करांचे व्यवस्थापन केले तर फायदेशीर ठरू शकते.
एक उदाहरण विचारात घेऊ या. अर्चनाचे दरवर्षीचे करपात्र उत्पन्न ७ लाख रुपयांपर्यंत आहे. २०१२-१३ च्या आयकर तरतुदींनुसार, त्यावर तिला २० टक्के कर भरावा लागू शकतो. ( म्हणजेच करसवलतीनंतरच्या पहिल्या तीन लाखांवर १० टक्के व उरलेल्या रकमेवर २० टक्के कर भरावा लागू शकतो.) म्हणजे ७२ हजारांच्या आसपास तिला कर भरावयाचा आहे. आता अर्चना तिचा कर कसा वाचवू शकते, याचे विविध मार्ग बघू या.
असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे बचतीचा हेतूही साध्य होतो आणि गुंतवणूकही. खाली दिलेल्या चार पर्यायांमुळे अर्चनाला नव्याने गुंतवणूक करावी लागणार नाही. उलट तिचे करपात्र उत्पन्न १ लाख रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.
alt१. पीएफ खाते-सर्वात साधा पर्याय म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफ. अनेक कंपन्या आता कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंडसाठीच्या खात्याची सुविधा पुरवतात. तुमच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा होते. ईपीएफ कायद्यानुसार, कंपनीलाही तितकीच रक्कम कर्मचाऱ्याच्या नावे जमा करणे बंधनकारक आहे. अर्चनाच्या उदाहरणात, तिचे मूळ वेतन २० हजार रुपये आहे. म्हणजेच ती २४०० रुपये महिन्याकाठी पीएफ खात्यात जमा करते. ही रक्कम करमुक्त आहे. म्हणजे अर्चना दर महिन्याला फक्त ४८०० रुपयांची तरतूद भविष्यासाठी करत नाही, तर वर्षांकाठी तिचे करपात्र उत्पन्न तब्बल २८ हजारांनी खाली येण्यास यामुळे मदत होते.
२. गृहकर्ज- कर्जामुळे हवालदिल होण्याचे दिवस आता संपले कारण गृहकर्ज काढल्यामुळेही तुमच्या डोक्यावरील कराचे ओझे कमी होण्यास मदतच होते! बघा, दर महिन्याला गृहकर्जाचा आपण जो हप्ता भरतो त्यात दोन भाग असतात- गृहकर्जाची मूळ रक्कम अधिक त्यावरील व्याज दरातील फरकाची रक्कम. त्यापैकी गृहकर्जाची रक्कम ८० सी कलमाद्वारे आयकरातून मुक्त होऊ शकते. त्याशिवाय गृहकर्जावरील व्याजाची दीड लाखापर्यंतची रक्कम (२४ सी कलमाद्वारे)करातून सवलतीस पात्र आहे. म्हणजेच ३६ हजार रुपयांची गृहकर्जाची रक्कम जी अर्चना भरते आहे त्यावर तिला आयकरातून मुक्तता मिळणार आहे. जर ती भाडय़ाने घेतलेल्या घरात राहत असेल तर सीटीसीमधील गृहभाडे भत्त्यामधून त्यातील काही रकमेवर आयकरातून सूट मिळू शकते.
३.पॉलिसी प्रीमियम-जर तुम्ही आयुर्विमा काढला असेल तर त्याचा हप्ता अथवा प्रीमियमची रक्कम आयकरातून वजा केली जाते. उदा. २५ लाखांच्या पॉलिसीवर साधारण पाच हजारांचा प्रीमियम बसतो. ही रक्कम आयकरातून माफ केलेली आहे.
४. शैक्षणिक कर्ज- मुलीच्या एमबीएच्या शिक्षणासाठी अर्चनाने शैक्षणिक कर्ज घेतले आहे. या कर्जावरील व्याज पूर्णपणे करमुक्त आहे.
याव्यतिरिक्त, अर्चना तिच्या बचतीतून काही पैसा प्रॉव्हिडंट फंडात गुंतवू शकते किंवा करातून सवलत मिळणाऱ्या म्युच्युअल फंडात किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा विविध कालावधीच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवू शकते. तिने तिच्या मुलाच्या नावे भविष्य निर्वाह निधीत गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. यासाठी तिमाही ती पाच हजार रुपये जमा करते. संबंधित महिन्याच्या पाच तारखेपर्यंत हे पैसे तिच्या बँक पीपीएफ खात्यात जमा होतात. शिवाय गुंतवणुकीत विविधता आणण्यासाठी तिने करात सवलत देणाऱ्या म्युच्युअल फंडातही पैसे गुंतवले आहेत.
इतर पर्याय
वाढणाऱ्या महागाईबरोबर, कुटुंबाच्या आरोग्यसेवेशी निगडित असणाऱ्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे मेडिकल बिले मेडिकल क्लेमच्या सुविधेअंतर्गत कंपनीकडे जमा करून त्या रकमेचा दावा करता येतो. यासह कुटुंबातील सदस्य, सासरची मंडळी किंवा तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय खर्चाच्या तरतुदीसाठी पंधरा हजार रुपयांचा आरोग्यविमा उतरवण्याचा पर्याय तुमच्याकडे आहेच.
या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती २० हजार रुपयांपर्यंतची रक्कम इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड्समध्ये गुंतवू शकते. हे रोखे १० वर्षांच्या कालावधीसाठी असतात आणि सरकारच्या हमीनुसार निश्चित परतावा देणारे असतात. मात्र या रोख्यांमधील गुंतवणूक दीर्घकालीन उद्दिष्टांची असते. म्हणूनच विचारपूर्वक ही गुंतवणूक करा.
या उदाहरणावरून हे लक्षात येईल की, योग्य कर नियोजन केल्यास, अर्चना तिच्या करपात्र उत्पन्नाची मर्यादा कमी करू शकते. वरीलप्रमाणे गुंतवणूक केल्याने तिला ७ लाखांच्या करपात्र उत्पन्नावर साधारण ७२ हजार रुपये कर भरावा लागणार होता. त्याऐवजी तिला फक्त ३० हजार रुपये कर भरावा लागणार आहे. त्यामुळे वर्षांकाठी तिचे ४० हजार रुपये वाचणार आहेत, तसेच यासह भविष्यातील गुंतवणुकीसाठी तिचा ढाचाही तयार होतोय.
कर नियोजन
आयकर कायद्यातील तरतुदींचा आढावा घेतल्यास असे लक्षात येईल की, यात सामान्य माणसाला दिलासा देणाऱ्या अनेक बाबी आहेत. अर्चनाच्या उदाहरणात आपण सर्वसामान्य, पण महत्त्वाचा पैलूवर चर्चा केली. तुमच्या उत्पन्नावर किती आयकर लागू होईल, याची आकडेमोड करणारा कॅलक्युलेटर आयकर खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आपण वर्षांच्या सुरुवातीला नियोजन केले व गुंतवणुकीला सुरुवात केली तर कराशी संबंधित कागदपत्रे व करातून मुक्तता देणारी गुंतवणूक करता येते. यामुळे कराचे ओझे खाली आणणे सहज शक्य होते. अर्थातच कर नियोजन हा सखोल अभ्यासाचा मुद्दा असल्याने कर सल्लागारांशी चर्चा करून तुमच्या कर नियोजनाविषयी सल्ला घेणे केव्हाही चांगले.    
(लेखिका वित्त सल्लागार आहेत.)