धनसंपदा : ‘अर्थ’पूर्ण वृद्धापकाळासाठी Print

धनश्री राणे ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पीएफ, ग्रॅच्युइटी या सुविधा असल्या तरी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी त्या पुरेशा नाहीत. सध्याच्या जीवनशैलीशी मिळतेजुळते घेऊन जगण्यासाठी निवृत्तीनंतर मिळकतीचे पुरेसे, निश्चित उत्पन्न आपल्या हाती पडणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थातच तरुणपणापासून नियोजनबद्ध गुंतवणुकीला प्राधान्य दिले पाहिजे...
निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत आपण अनेक स्वप्नं बाळगून असतो. मात्र, निवृत्तीनंतरचं आयुष्य आनंदाने जगण्यासाठी आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणंही गरजेचं आहे. कारण निवृत्तीनंतर मिळकतीचे मार्ग मर्यादित असतात तर खर्च वाढलेले असतात.
सध्या बहुसंख्य भारतीय, खासगी कंपन्यांमधून निवृत्त होतात किंवा तत्सम असंघटित क्षेत्रातील रोजगारनिर्मितीतून रोजीरोटी कमावत निवृत्त झालेले आहेत. म्हणूनच सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ त्यांना मिळत नाहीत. तसेच पीएफ किंवा ग्रॅच्युइटीसारख्या सुविधा आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याला पुरेसं आर्थिक संरक्षण देऊ शकतील, या भ्रमात राहणं सद्य परिस्थितीत चुकीचंच आहे. म्हणूनच निवृत्तीनंतरच्या आर्थिक जीवनासाठीची तरतूद हा मुद्दा आपण गांभीर्याने घेतला पाहिजे. निवृत्तीनंतर कुणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी तरुणपणापासून आर्थिक नियोजनाला पर्याय नाही..
निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील आर्थिक गरजा
निवृत्तीनंतरच्या काळातही आपले पूर्वीचे राहणीमान कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या जीवनशैलीत काहीही तडजोड न करता जगता यावे, यासाठी जे नियमित उत्पन्न निवृत्तीनंतरच्या काळातही गरजेचे असते ते निश्चित करणारे गुणोत्तर म्हणजे ‘इन्कम रिप्लेसमेंट रेशो’. पेन्शनचे उत्पन्न तुमच्या वेतनाच्या साधारण ७५ टक्के ते ९० टक्क्य़ांच्या आसपास असले पाहिजे.
 वीणाचे उदाहरण पाहूया. तिचे सध्याचे वय ३५ वर्षे असून पंच्चावन्नाव्या वर्षी ती निवृत्ती स्वीकारणार आहे. तिच्या नावे सध्या १० लाख रुपयांच्या आसपासच्या ठेवी बँकांमध्ये आहेत. यानंतरही तिचं उत्पन्न सुरूच राहणार असून त्यामुळे निवृत्तीनंतरचे तिचे आयुष्य आरामात जाईल, असे वाटते. मात्र, निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीचे नियोजन करताना, महागाई तसेच चलनवाढ यांचा आपल्या बचतीवर होणारा परिणाम यांचा विसर पडता कामा नये.
समजा, वीणाचा पगार दरमहा ५० हजार रुपये आहे. त्यात दर वर्षांला दहा टक्के वाढ होते. त्याप्रमाणे २० वर्षांनंतर, तिचा पगार साडेतीन लाख रुपये दरमहा होईल. छान. पण या उत्पन्नाच्या तीनचतुर्थाश टक्के उत्पन्न निवृत्तीनंतरही कायम ठेवणे तिला शक्य आहे का? कारण खर्चात कितीही कपात केली तरी २० वर्षांनंतर तिला दरमहा १ लाख रुपये इतका खर्च येणं स्वाभाविक आहे. यात घरगुती, वैद्यकीय खर्च तसेच पर्यटनासारख्या चैनीच्या बाबींवरील खर्चही धरला आहे.
याशिवाय तिच्या बँक खाती किंवा ठेवी यांमधील गुंतवणुकीतून तिला निवृत्तीनंतर साधारण पाच टक्केपरतावा मिळेल. म्हणून २० वर्षांनंतर वीणाकडे अंदाजे अडीच कोटींच्या आसपास संपत्ती असली पाहिजे. जे की अशक्यप्राय आहे. (जरी आपण १० टक्के व्याजदर विचारात घेतला तरी तिच्या १० लाख रुपयांच्या ठेवींवर मिळणारे व्याज तिच्या अपेक्षित रकमेच्या (अडीच कोटी रुपये) जेमतेम एकचतुर्थाश उत्पन्न देऊ शकेल.) म्हणूनच म्हातारपणी पुरेसा पसा हवा, हे लक्ष्य गाठणं किती कठीण आहे ते ध्यानात येईल.
आपल्या एकूण बचतीत भविष्य निर्वाह निधी (पीएफ)सारख्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या योजना महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मात्र या योजनांमुळे आपल्या बचतीचे ध्येय गाठणे शक्य होतेच असे नाही.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ ) -
ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ६५०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल त्यांच्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची योजना बंधनकारक आहे. परंतु अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना राबवताना दिसतात.
मूळ वेतनाच्या १२ टक्के व महागाई भत्ता यांचा प्रॉव्हिडंड फंडात समावेश होतो. व यांच्या बेरजेइतकीच रक्कम कंपनीकडून भरली जाते. कंपनी प्रशासनाकडून भरल्या जाणाऱ्या रकमेतील ८.३३ टक्क्य़ांची रक्कम कर्मचाऱ्याच्या पेन्शनच्या योजनेत जाते तर उरलेली १५.६७ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीत गुंतवली जाते. पीएफची सुविधा बंधनकारक असल्याने, आपल्या बचतीतील काही रक्कम दर महिन्याला यात जमा होते. आपण जरी नोकरी बदलली तरी ईपीएफ खाते संबंधित कंपनीकडे हस्तांतरित केले जाते. प्रत्येक वर्षी ईपीएफवरील व्याज सरकारकडून निश्चित केले जाते. गेल्या काही वर्षांत ईपीएफवरील व्याजदर सव्वाआठचे साडेनऊ टक्क्य़ांच्या आसपास राहिले आहे.
पेन्शनअन्वये जमा होणारी राशी, नोकरीत सेवा दिल्याची वर्षे तसेच निवृत्तीच्या वर्षांतील १२ महिन्यांच्या पगाराच्या सरासरीच्या प्रमाणावर अवलंबून असते.
पीएफचा प्रमुख फायदा म्हणजे दरवर्षी निश्चित व्याजाने पैसे कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा होतात.पीएफ विभागाकडून तुमच्या पीएफ खात्यातील तपशील ऑनलाइन बघण्याची सुविधा दिली गेली आहे. हे स्वागतार्ह पाऊल असून कर्मचारी त्यांच्या खात्यातील रक्कम सहज पाहू शकतात व दुसऱ्या कंपनीकडे  हस्तांतरित करू शकतात.
ग्रॅच्युईटी-
ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेची सलग पाच वर्षे त्याच कंपनीत पूर्ण केली आहेत, ते ग्रॅच्युइटीसाठी पात्र असतात. दर महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या निम्मी रक्कम (असल्यास महागाई भत्ता) गुणिले सेवा दिलेली वर्षे, या पद्धतीने गॅ्रच्युइटीची रक्कम काढता येते.
ग्रॅच्युइटीची रक्कम ही निश्चित रक्कम मानली जाते. ईपीएफमधील पैसा निश्चित असला तरी त्यावरील व्याज दरवर्षी ठरवले जाते, त्यामुळे परताव्याची रक्कम बदलू शकते. मात्र, ग्रॅच्युइटीची सेवेच्या अखेरीस मिळणारी रक्कम निर्धारित असते.
याशिवाय तुमच्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या हिताच्या काही योजना असतील तर त्यांची माहिती घ्या. काही कंपन्यांमध्ये ‘सुपरअ‍ॅन्युएशन प्लॅन’ची सुविधा दिली जाते. याअंतर्गत तुमच्या मूळ वेतनाच्या १५ टक्के रक्कम पेन्शन फंडात जमा होते. पीएफ, ग्रॅच्युइटी, पेन्शन योजना, रजांचे पैसे तसेच ‘सुपरअ‍ॅन्युएशन प्लॅन’ यांच्या आधारावर तुमच्या निवृत्तीनंतरच्या पुंजीचा आढावा घ्या.
विचारात घेण्यासारखे-
वरील योजनांचा हेतू निवृत्तीनंतरच्या काळात उत्पन्नाचा स्रोत कायम राहावा, असा आहे. मात्र जर आपण पीएफ खात्यातून गृहकर्जासाठी किंवा लग्नकार्यासाठी पैसे काढले तर निवृत्तीनंतरच्या काळात आपल्या हाती फारशी रक्कम राहणार नाही. आधीचे उदाहरण विचारात घेता, वीणाचे मूळ वेतन होते २० हजार रु. दर महिन्याला ती त्याच्या १२ टक्के रक्कम पीएफसाठी जमा करते. ती आहे २४०० रु. यात कंपनीचा वाटाही गणतीत घेतला तर एकूण ३१३४ रु. ईपीएफमध्ये जमा होतात. वर्षांला साडेआठ टक्क्य़ांचे व्याज मिळेल, असे विचारात घेतले तरी २० वर्षांनंतर ही रक्कम ३० लाख रुपयांच्या आसपास असेल. आता तुम्हीच सांगा निर्धारित आर्थिक लक्ष्याच्या ही रक्कम किती नजीक आहे ते..(कारण अपेक्षित रक्कम आहे अंदाजे अडीच कोटी)
पूर्वीच्या काळी असलेली एकत्र कुटुंबपद्धती घरातल्या सगळ्यांच्या गरजा भागविणारी उत्तम व्यवस्था होती. या व्यवस्थेत आर्थिक पािठबाही होता व आर्थिक जबाबदाऱ्यांची वाटणी कुटुंबातील सदस्यांमध्ये व्हायची. आता आपण स्वीकारलेल्या विभक्त कुटुंबपद्धतीत तुम्ही आर्थिकदृष्टय़ाही विभक्त असता. त्यामुळे वृद्धापकाळाच्या आर्थिक गरजांचा विचार किती सुरुवातीपासून केला पाहिजे, याचा अंदाज येईल.
म्हणूनच निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी तुमचे सध्याचे उत्पन्न, खर्च व नोकरीतील उर्वरित वर्षे यांचा विचार करून नियोजनाला सुरुवात करा. अनेक जण चाळिशी-पन्नाशीनंतर निवृत्तीनंतरच्या काळासाठी नियोजनाला सुरुवात करतात. त्या वेळी निवृत्तीची वर्षे जवळ आल्याने तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीची जोखीम घेऊ शकत नाही. म्हणूनच वर उल्लेख केलेल्या योजनांवर अवलंबून राहण्यापेक्षा पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा लघू बचत योजना यांमध्येही गुंतवणुकीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
(लेखिका वित्त नियोजिका आहेत.)