धनसंपदा : आरोग्य विम्याचे संरक्षण Print

धनश्री राणे , शनिवार , २१  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पैशाचे नियोजन करताना आपण संभाव्य खर्च व भविष्यातल्या योजना यांचा प्रामुख्याने विचार करतो. घर घेणे असो किंवा मुलाबाळांच्या शिक्षणासाठीची तरतूद असो आपण त्यासाठी पैसे साठवत असतो. पण दुर्दैवाने कुटुंबाची अर्थव्यवस्था मेटाकुटीला आणणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा विचार करायला आपण विसरतो. म्हणूनच आरोग्य विमा पॉलिसीबद्दल या लेखात चर्चा करूया.ए खाद्या कुटुंबातील कर्ती-सवरती व्यक्ती अचानक आजारी पडली तर त्याचा भावनिक व मानसिक ताण कुटुंबावर अधिक असतो. अशाच परीक्षा पाहणाऱ्या काळात कुटुंबाचे आरोग्यहित जपण्यासाठी व आवश्यक ती आर्थिक तजवीज करण्यासाठी आरोग्य विमा महत्त्वाची भूमिका बजावतो.आरोग्य विम्याचा पंधरा हजार रुपयांपर्यंतचा प्रीमियम हा ८० डी अन्वये करमुक्त आहे ही आणखी एक मोलाची गोष्ट. तुमचे आई-वडील जर ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळतो, तो म्हणजे वीस हजार रुपयांपर्यंतचा प्रीमियम करमुक्त ठरतो.
ग्रुपसाठीचे आरोग्य विमा
आपल्या देशातील अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप हेल्थ इन्शुअरन्स अर्थात गट स्वरूपातील आरोग्य विमा पॉलिसी निवडतात. यालाच मेडिक्लेम असे म्हणतात. एखाद्या निकषावर आधारित ग्रुपला ही पॉलिसी आरोग्य विम्याचे संरक्षण देते. हा निकष पुढीलपैकी काहीही असू शकतो ; एकाच कंपनीचे सर्व कर्मचारी, विशिष्ट काम करणारे, समान उत्पन्न वा वयोगट असणारे, इ. कोणत्या आधारावर ग्रुप ठरवला गेला तो निकष व ग्रुपमधील लोकांची संख्या यावरून त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीचा अंदाज बांधला जातो. व त्यानंतर विमा कंपनी प्रीमियमची रक्कम ठरवते. आरोग्य विमा कंपन्या अशा एकहाती पॉलिसी घेणाऱ्या ग्राहकांसाठी काही सवलती देतात. त्यामुळे पॉलिसीच्या प्रीमियममध्ये घट होते व ग्राहकांचा फायदा होतो.
मेडिक्लेमअंतर्गत कुटुंबातील सदस्य अर्थात पती, पत्नी व मुले यांना आरोग्य संरक्षण मिळते. यात त्यांचा वैद्यकीय खर्च तसेच हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास येणारा संपूर्ण खर्च, प्रसूतीलाभ तसेच एखादी दुर्धर व्याधी वा पूर्वीपासून असणारा आजार (विमा कंपनीच्या नियमांवर आधारित) यांचा समावेश होतो. एक उदाहरण पाहूया. अंजूने पॉलिसी घेतली तेव्हा तिला मधुमेहाचा आजार होता. त्यामुळे त्याला आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत संरक्षण मिळते. अशा आजारांना पॉलिसीधारकाचे पूर्वीपासूनचे आजार असे संबोधले जाते. अशा आजारांसाठी पॉलिसी काढल्यापासून तीन वर्षांनंतर ग्राहकाला आरोग्यविषयक संरक्षण मिळते. काही आरोग्य विमा कंपन्या पॉलिसीधारकावर थेट अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींसाठीही विमा संरक्षण देतात. उदा. पॉलिसीधारकाची पत्नी व मुलांचा समावेश नियमित पॉलिसीत असतोच, मात्र त्याच्या आई-वडिलांनाही विमा संरक्षण दिले जाते. अनेकदा आई-वडिलांना एखादा मोठा आजार असल्यास, अतिरिक्त प्रीमियम भरून त्यासाठीही विमा संरक्षण घेता येते.
अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी एखादा अपघात झाला तर त्यासाठी विमा संरक्षण देतात. अर्थात आरोग्यसेवेशी संबधित हा अतिरिक्त लाभ कर्मचाऱ्यांच्या हिताचाच आहे.
मात्र, आरोग्यविषयक विमा पॉलिसीचे फायदे प्रत्येक कंपनीप्रमाणे बदलत जातात. काही कंपन्या पंधरा हजारांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देतात. महत्त्वाचं म्हणजे एखाद्या कंपनीने दिलेली मेडिक्लेमची सुविधा त्या कंपनीत तुम्ही कामावर असेपर्यंतच लागू असते. तसेच अनेकदा ग्रुपसाठीच्या योजनेत अनेक बाबी वगळल्या जातात. याचा विचार करून तुम्ही अतिरिक्त पॉलिसी खरेदी करू शकता.
वैयक्तिक आरोग्य संरक्षण
साधारणपणे आरोग्य विमा पॉलिसी, ज्या कालावधीसाठी असते त्या काळात ग्राहकांना, हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वीचा व नंतरचा खर्च (किमान २४ तास भरती असणे बंधनकारक) व संबंधित बाबी म्हणजे खोलीचे किंवा रुग्णवाहिकेचे भाडे वा औषधांवरचा खर्च आदींसाठी मोजावी लागणारी रक्कम पुरवते. पॉलिसीधारकाला दिली जाणारी रक्कम त्याने काढलेल्या आरोग्य विमा संरक्षणावर अवलंबून असते. केमोथेरेपी, किडनी स्टोन, डायलिसिस वा डोळ्यांची सर्जरी अशा केसेसमध्ये रुग्णाला जरी चोवीस तासांच्या आत डिस्चार्ज मिळाला तरी त्यांना पॉलिसीमुळे विमा संरक्षण मिळते.
यापूर्वी पॉलिसीधारकाने वैद्यकीय खर्च आधी स्वत:च्या खिशातून करायचा मग त्याला विमा कंपनी त्या रकमेचे भुगतान देत असे. आता मात्र अनेक विमा कंपन्यांकडून कॅशलेस सुविधा दिली जाते. अनेक मोठय़ा हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधेचा लाभ घेता येतो. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाला कॅशलेस कार्ड दिले जाते. हे कार्ड, वैद्यकीय अहवाल व खर्चाची कागदपत्रे यांची ‘टीपीए’कडून पडताळणी केली जाते व त्याला मंजुरी दिली जाते. अर्थातच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ठराविक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. काही वेळेला एखाद्या सर्जरीवेळी वगैरे विमा कंपनीला आगाऊ याची माहिती देणे बंधनकारक असते. म्हणूनच तुमची पॉलिसी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा व विमा कंपनीकडून संबंधित माहिती घ्या.
वैयक्तिक आरोग्य विमा दोन प्रकारचे असतात-
१. प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र
२. कुटुंबासाठी एकत्रित योजना
प्रत्येक व्यक्तीसाठीची पॉलिसी म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र पॉलिसी. याचा अर्थ तुमच्या विम्यामार्फत दिली जाणारी संरक्षण मर्यादा व प्रीमियम प्रत्येकाच्या आरोग्यस्थितीनुसार वेगवेगळे. तर दुसऱ्या बाजूला फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये संपूर्ण कुटुंबासाठी एकच पॉलिसी असते. यात पती-पत्नी व तीन मुले यांना विमा संरक्षण मिळते. मुले २५ वर्षांची होईपर्यंत या पॉलिसीचा भाग असू शकतात. तीन लाख रुपयांच्या कुटुंबाच्या पॉलिसीसाठी अंदाजे दहा हजार रुपयांचा प्रीमियम असतो. एकच प्रीमियमचा हप्ता भरून संपूर्ण कुटुंबाचं आरोग्यहित जपलं जात असल्यानं ही पॉलिसी सोयीस्कर आहे. शिवाय प्रीमियमची रक्कम तुलनेने कमी असल्याने अनेकांना ही पॉलिसी फायदेशीर वाटते.
मात्र या पॉलिसीत एकच त्रुटी आहे ती म्हणजे पॉलिसीची मर्यादा आधीच ठरलेली असते. उदा. एखाद्या प्रसंगी, नवऱ्याला येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची रक्कम पावणेदोन लाख रुपये आहे, तर पत्नीच्या सर्जरीचा खर्च दीड लाख रुपये आहे. मात्र पॉलिसीची मर्यादा दोन लाख रुपये असल्याने तितकेच पैसे पॉलिसीधारकाला मिळू शकतात.
विशेष गरजा
गंभीर आजारांसाठी आरोग्य संरक्षण देणारी पॉलिसी - कॅन्सर, हृदयाचे विकार, पक्षाघात, अवयवाचे रोपण यांसारख्या आजारांसाठी संरक्षण मिळते. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या पॉलिसीतून ६० वर्षांवरील ज्येष्ठांना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळते. या पॉलिसीत मधुमेह तसेच हृदयरोगासारख्या आजारांचा समावेश असून प्रीमियमही जबरदस्त असते. मात्र अनेक क्लिष्ट वैद्यकीय चाचण्यांचा यात समावेश नाही, तसेच सरंक्षणाची कमी मर्यादा, विशिष्ट आजारांपुरताच विचार या त्रुटी प्रामुख्याने यात आहेत.
काही विमा पॉलिसी (डिफर्ड पॉलिसी) यापेक्षा वेगळ्या आहेत. यामध्ये काही वर्षांनंतर तुम्हाला वैद्यकीय लाभ मिळतो. या पॉलिसीअंतर्गत काही रक्कम सध्याच्या गरजांसाठी राखून ठेवली जाते. तर उर्वरित रक्कम विविध फंडांत गुंतवली जाते व भविष्यासाठीची तरतूद केली जाते. मात्र अशा पॉलिसींचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सुरुवातीची काही वर्षे प्रीमियमची रक्कम न चुकता भरणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकांनी पॉलिसीवर क्लेम केला नाही तर काही विमा कंपन्या प्रीमियमची रक्कम कमी करतात.
कोणता आरोग्य विमा मी निवडावा?
१. एखाद्या गंभीर आजाराने किंवा अपघातामुळे तुमचे उत्पन्न अचानक खंडित झाले तर ज्या आर्थिक मदतीची तुम्हाला अपेक्षा असेल साधारण त्या रकमेचा अंदाज घ्या.
२. तुमच्या आरोग्यविषयक इतिहासाचा आढावा घ्या.( वडील व आईकडच्या लोकांना असणाऱ्या आनुवंशिक आजारांचा प्रामुख्याने विचार करा.) सध्याशी जीवनशैली पाहता कोणत्या प्रकारचा आरोग्य विमा घ्यावा, याचा निर्णय घ्या.
३. पॉलिसीचे फायदे व त्रुटी समजून घ्या. कोणत्या पद्धतीने क्लेम करू शकता त्याची पद्धत विचारात घेऊनच पॉलिसीबाबतचा अंतिम निर्णय घ्या. विशेष पॉलिसी घेताना ज्या आजारांना संरक्षण मिळणार त्याची यादी काळजीपूर्वक वाचा.
४. जर कॅशलेस पॉलिसी असेल तर ज्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा आहे त्यांची यादी मिळवा.
५. अखेरीस अशीच आरोग्य विम्याची पॉलिसी निवडा ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला संरक्षण मिळेल, मात्र आर्थिक नुकसानालाही सामोरे जावे लागणार नाही.
(लेखिका वित्त नियोजिका असून ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)