धनसंपदा : नवा पर्याय - कंपन्यांच्या मुदत ठेवी Print

धनश्री राणे ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कंपन्यांच्या मुदत ठेवी बँका किंवा पोस्टाच्या मुदत ठेवींपेक्षा निश्चितपणे अधिक व्याज देतात. मात्र यातील गुंतवणुकीत जोखीमही अधिक असते. त्यामुळे कंपनीच्या नामांकित तसेच सुस्थितीत असणाऱ्या कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये पसे गुंतवण्यास काहीच हरकत नाही. गुंतवणुकीपूर्वी कंपनीचे क्रेडिट रेटिंग तपासायला मात्र विसरू नका.
आ जघडीला गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असताना, नव्याने यात दाखल झालेला पर्याय म्हणजे कंपन्यांच्या मुदत ठेवी(corporate fixed deposits). आपल्या देशात बचतीची संकल्पना म्हणजे बँकांच्या किंवा पोस्टाच्या मुदत ठेव योजनांमध्ये (एफडी) पैसे गुंतवणे इतकीच मर्यादित होती. त्याच पठडीतल्या वाटणाऱ्या कंपन्यांच्या मुदत ठेवीही निश्चित कालावधीसाठी असतात. मग बँकांच्या किवा पोस्टाच्या एफडी व कंपन्यांच्या एफडी यात नेमका काय फरक? त्यांच्यातील साम्य व विरोधाभासी मुद्दे यांवर या लेखात सविस्तर चर्चा करूया.
बँका किंवा पोस्टाच्या मुदत ठेवींप्रमाणे कंपन्यांमधील मुदत ठेवींची रकमही, निश्चित कालावधीसाठी व निश्चित व्याजदराने संबंधित कंपनीकडे जमा असते. तसेच इतर मुदत ठेवींप्रमाणे टीडीएसचा दर ही यावर लागू आहे.
मात्र कंपन्यांच्या मुदत ठेवी पूर्णपणे सुरक्षित नाहीत. म्हणजे एखाद्या कारणाने कंपनी अडचणीत आली तर कंपनीच्या मालमत्तेची विक्री करून गुंतवणूकदार पैशाचा दावा करू शकत नाहीत. अनेक गृहवित्त कंपन्या, वित्तीय संस्था तसेच बँकेतर आर्थिक संस्था यांच्याकडून वितरित केल्या जाणाऱ्या मुदत ठेवींवर भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचा थोडाफार अंकुश आहे. मात्र, कंपन्यांच्या मुदत ठेवींचे ‘कंपनी कायद्याच्या ५८ कलम ’ अन्वये नियमन केले जाते हे विशेष! वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांशिवाय सरकारी कंपन्या तसेच उत्पादन क्षेत्रातील कंपन्याही मुदत ठेवी जाहीर करू शकतात. थोडक्यात सांगायचे निश्चित व्याजातून मिळणारे उत्पन्न सोडले तर कंपन्यांच्या एफडी व बँकांच्या एफडीमध्ये काहीही साम्य नाही.  
कंपन्या मुदत ठेवी का जाहीर करतात ?
अनेक कारणांसाठी किरकोळ ग्राहकांकडून कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात. अलीकडल्या काळात, भांडवलाच्या कमतरतेमुळे, कंपन्या देशातील किरकोळ बाजारातून पैसे उभारण्याकडे वळू लागल्या आहेत. ज्या कंपन्यांचा विस्तार चांगला आहे, परंतु तात्पुरत्या रोख रकमेची आवश्यकता भासते त्या कंपन्या या प्रकारच्या मुदत ठेवींमधून पैसे उभे करतात. यामागचं गुपित अगदी थेट आहे-जर या कंपन्यांनी थेट बँकांकडून कर्ज घेतले तर त्यांना ज्या व्याजाने त्याची परतफेड करावी लागेल त्या तुलनेत ग्राहकांच्या मुदत ठेवींवर द्यावे लागणारे व्याज कमी असल्याने कंपन्या हा पर्याय स्वीकारतात.(अनेकदा तर यातील काही कंपन्यांना बँका कर्जही देणार नाहीत.)
या मुदत ठेवीतील गुंतवणुकीपूर्वी-
वैयक्तिक गुंतवणूकदारांनी एकूण बचतीच्या अल्प प्रमाणातील रकम कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवण्यास हरकत नाही.
* कंपन्यांच्या मुदत ठेवी स्थिरता अथवा सातत्य पुरवणाऱ्या नसल्या तरी यावर मिळणारे व्याज बँका वा पोस्टांमधील मुदत ठेवींच्या तुलनेत अधिक असते. म्हणून या मुदत ठेवींकडे ‘उत्तम परतावा मात्र अतिरिक्त जोखीम’ या पद्धतीने बघण्यास काहीच हरकत नाही.
* कंपन्यांच्या मुदत ठेवींमधील रक्कम मुदतपूर्व काढता येत नाही. त्यामुळे दरम्यानच्या काळात पैशांची तजवीज म्हणून इतरत्र पर्यायी गुंतवणूक असणे केव्हाही चांगले. कंपन्यांच्या मुदत ठेवी तुमच्या पोर्टफोलियोचा २-३ वर्षांसाठी अशा मध्यम कालावधीच्या गुंतवणुकीचा भाग होऊ शकतात. साधारणपणे, या मुदत ठेवी कमीत कमी एक वर्षांच्या कालावधीसाठी असतात. यासाठी तुम्ही तिमाही, द्विवार्षिक वा चक्रवाढ पद्धतीने, तुमच्या गरजेनुसार व्याज स्वीकारण्याचा पर्याय निवडू शकता. जर व्याजाची फारशी गरज नसेल तर चक्रवाढ व्याजाचा पर्याय निवडणे सोयीस्कर.
* अर्थातच कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये इतर मुदत ठेवींपेक्षा अधिक जोखम आहे. गुंतवणुकीसाठी कंपनी निवडतानाही जोखीम आहेच. म्हणूनच उत्पादन क्षेत्रातील नव्या किंवा अल्प परिचित कंपनीत पैसे गुंतवणे टाळा. तसेच खालच्या दर्जाचे क्रेडिट रेटिंग असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना सावधान! (कंपन्यांच्या मुदत ठेवींच्या अर्जावर क्रेडिट रेटिंग दिलेले असते, अन्यथा कंपनीच्या संकेतस्थळावर त्याबाबतची माहिती मिळते.)
गुंतवणुकीतील काही जोखमीचे मुद्दे
अपेक्षित जोखीम -आधी चर्चा केल्याप्रमाणे, ठराविक वर्षांनंतर कंपनी व्याज देणे थांबवू शकते. कंपन्या मुदत ठेवीच्या योजना जाहीर करतात त्याच मुळात अडचणीच्या काळात, लोकांकडून भांडवल उभारण्यासाठी. त्यामुळे कंपनीने जर नजीकच्या भविष्यात चांगली कामगिरी केली तर कंपनी ठेवीदारांचे व्याज सहज देऊ शकते. अन्यथा..  
रेटिंग संबंधित जोखीम- कंपनीचा कारभार, आर्थिक स्थिती-सध्याची व भविष्यातली, व्यवस्थापकीय रचना व उद्योगजगत यावरून कंपनीचे क्रेडिट रेटिंग केले जाते. म्हणूनच हे क्रेडिट रेटिंग त्या कंपनीत गुंतवणूक करावी की नाही हे ठरवण्यासाठीचा महत्त्वाचा निकष ठरतो.
ज्या कंपन्यांना ‘एए’ वा त्या पुढील श्रेणीतील रेटिंग (एए, एए+ किंवा एएए ) असते त्या कंपनीची सध्याची स्थिती उत्तम असते. तर दुसऱ्या बाजूला आर्थिक अस्थर्यामुळे कंपनीची बाजारातली पत नाहीशी होते. याचा थेट परिणाम कंपनीकडे येणाऱ्या रोख भांडवलावर होतो व पर्यायाने गुंतवणूकदारांच्या व्याजाचे गणितही चुकते. कमी रेटिंग असणारी कंपनी अनेकदा चांगला परतावा देणारी असली तरी त्यातील जोखीम मोठी असते.
 पुर्नगुतवणुकीत जोखीम-निश्चित कालावधीच्या कोणत्याही योजनांमध्ये ही जोखीम असतेच. पोस्टातील मुदत ठेवींच्या तुलनेत कंपन्यांच्या मुदत ठेवी अधिक व्याज देतात. मात्र निश्चित कालावधीनंतर कदाचित पूर्वीइतकाच व्याजदर मिळेल याची कोणतीही हमी नाही.आधीच्या व्याजदरापेक्षा कमी टक्क्य़ांनी व्याज मिळू शकते अशा वेळी पुर्नगुतवणुकीतील जोखीम वाढते. मात्र, मुदतीपूर्वी पसे काढताही येत नाहीत.
न विसरता तपासा-
* नामांकित तसेच सुस्थितीत असणाऱ्या कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये पसे गुंतवण्यास काहीच हरकत नाही. शक्यतो ‘एएए’ किंवा ‘एए’ पर्यंत क्रेडिट रेटिंग असणाऱ्या कंपन्या ठीक आहेत.
* कंपनीने मुदत ठेवींवर देऊ केलेल व्याज भारतीय स्टेट बँक किंवा तत्सम मोठय़ा बँकेच्या व्याजदराच्या तुलनेत अधिक असेल तर कंपनीचे क्रेडिट रेटिंग व आर्थिक स्थितीचा गुंतवणुकीपूर्वी आढावा घ्या. (दोन्ही व्याजदरातील फरक ३ टक्क्य़ांहून अधिक तर सतर्क व्हा व कंपनीची अधिक माहिती काढा. कारण १-२ टक्क्यांचा फरक अनेकदा दिसून येतो मात्र त्याहून अधिक व्याज असेल तर जागरूकतेने चौकशी करणे केव्हाही चांगले.)
* तुमच्या बँकेच्या खात्यात थेट व्याज जमा होण्याचा पर्याय निवडा. यामुळे कंपन्यांकडून सेवा देण्यात येणाऱ्या त्रुटी कमी होतील.
* गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी एखाद्या वित्त सल्लागाराची वा एजंटची मदत घेण्यास हरकत नाही. मुदत ठेवींसंबंधी सर्व कागदपत्रे सल्लागारात्या मदतीने पूर्ण वाचून मगच भरा. मुदतीनंतर पसे काढतानाही त्यांच्या सल्ल्याची गरज लागू शकते. वित्त सल्लागारांना या कामाचे कमिशन मिळते त्यामुळे ते ग्राहकांना मोफत सल्ला देतात. मात्र अधिक कमिशन देणाऱ्या कंपन्यांच्या मुदत ठेवी घेण्यासाठी ते गळ घालू शकतात हेही लक्षात असू द्या. म्हणून कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये पसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही स्वतच थोडा अभ्यास करा. त्यामुळे तुमच्या कष्टाच्या पशाला तुम्ही अधिक चांगला न्याय देऊ शकाल.
(लेखिका वित्त सल्लागार असून लेखात व्यक्त झालेली मते त्यांची वैयक्तिक आहेत.)