धनसंपदा : निवृत्तीनंतरचे ‘अर्थ’कारण Print

alt

धनश्री राणे , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
निवृत्तीनंतरच्या गुंतवणुकीत जोखीम कमी व परतावा अधिक असा दृष्टिकोन हवा. त्या हेतूने म्युच्युअल फंड्समधील  ज्येष्ठ नागरिकांसाठीची नियमित मुदत योजना (Fixed Maturity Plans) हा चांगला पर्याय आहे. याशिवाय पोस्टातील मुदत ठेवी योजना व मासिक उत्पन्न योजना यांचाही पर्याय आहे.
नि वृत्तीपश्चात आरामात जगता येईल असे मिळकतीचे साधन असावे ज्यायोगे भावनिक समाधान मिळेल व आर्थिक स्थैर्यही जपले जाईल, अशी केतकी व अरुणची इच्छा आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षाही खूप आहेत. ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत करायच्या राहून गेल्या त्या पूर्ण करण्याचे स्वप्न आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांनी पाहिले आहे. अशा जोडप्यांनी त्यांच्या आयुष्यभराच्या मिळकतीचा सदुपयोग कसा बरे करावा, याचे समाधानकारक उत्तर. सोबत अर्थविषयक ‘करा’ व ‘करू नका’ यावर या लेखात सविस्तर चर्चा.
जर तुमची निवृत्तीची वर्षे जवळ आली असतील किंवा तुम्ही निवृत्त झाले असाल तर तुमच्यासाठी काही मार्गदर्शक सूचना-
तुमच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घ्या : प्राधान्याने तुमची कर्जे, बचत तसेच विमा योजना व एकूण गुंतवणूक यांचा अंदाज घ्या.
१. कर्जे- तुम्ही निवृत्तीच्या वयोमानाजवळ जाऊ लागलात की आपली देणी कमीतकमी असावीत याकडे लक्ष द्या. जर तुमचे वैयक्तिक कर्ज, गाडीचे कर्ज किंवा सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडणे बाकी असेल तर आधी ही देणी फेडून टाका. अन्यथा विनाकारण देणी चुकल्याने व्याजाचा भरुदड पडेल. गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज अशा कर्जातून करसवलत मिळते, अशी कर्जे सोडली तर इतर कर्जाची देणी दिर्घकाळासाठी वाढवण्यात व कर्जाचा डोंगर वाहण्यात काहीच अर्थ नाही.
२. विमा योजना- तुमच्या मनीबॅक किंवा इंडोवमेंट पॉलिसीसंदर्भातील गुंतवणुकीचा आढावा घ्या. काही विमा योजनांमध्ये समजा १० वर्षे तुम्ही पैसे भरल्यानंतर मिळणारी रक्कम एकदम तुम्हाला मिळते तर काही योजनांमधून ती ६०-४० टक्के अशा प्रमाणात ग्राहकांना दिली जाते. त्यामुळे तुमच्या योजनेसंबधित माहिती मिळवावी, त्यातून तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता, ते निवडा. कारण आता अनेक विमा कंपन्यांमधील योजनांमधून रक्कम सुलभ पद्धतीने काढण्याचे अनेक पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत.
३.भांडवली बाजारातील गुंतवणूक- जर तुमची भांडवली बाजारात गुंतवणूक असेल - शेअर्स किंवा म्युच्युअल फंड्स कोणत्याही स्वरूपात हळूहळू त्यातून तुमचा नफा काढून घ्या. व नफ्यातून हाती आलेली रक्कम निश्चित उत्पन्न देणाऱ्या कोणत्याही उत्पादनात गुंतवा. बाजाराशी निगडित जोखीमेचा तुमच्या निवृत्तीनंतरच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून ही सावधानता!
४. कर्मचाऱ्यांचे फायदे- याशिवाय तुमचे भविष्यनिर्वाह निधी व ग्रॅच्युइटी यांची जमाही ध्यानात घ्या. पेन्शनसंदर्भात बोलायचे तर अर्धी किंवा एकतृतीयांश रक्कम एकरकमी दिली जाते व उर्वरित रक्कम नियमितपणे पेन्शनच्या स्वरूपात दर महिन्याला दिली जाते. नोकरी अथवा व्यवसायानंतर तुम्ही केलेल्या बचतीचा महत्त्वाचा भाग या सगळ्यातून तयार होतो.
भविष्यासाठी योजना बनवा-
निवृत्तीच्या सुरुवातीच्या वर्षांत, तुमच्या हाती पडणाऱ्या जमा पुंजीचे स्वरूप पाहता अनेकजण खर्चाचे ताळतंत्र सोडून वागतात. म्हणूनच आर्थिक गरजांचे नेमके चित्र स्पष्ट झाले तर हा अतिरिक्त खर्च टाळता येईल. समजा तुमच्याकडे निवृत्तीच्या वेळी दहा लाख रुपयांची बचत आहे. तुमचा व कुटुंबाचा महिन्याचा खर्च पंधरा हजार रुपये गृहीत धरला तर ही जमा पुंजी फक्त पुढची ७ वर्षे टिकेल.
सुधारलेले राहणीमान व अद्ययावत वैद्यकीय सुविधा यांमुळे भारतीयाचे सरासरी वयोमान वाढले आहे. त्यामुळे आपण निवृत्ती स्वीकारल्यानंतरही आणखी १०-१५ वर्षांचा कालावधी अंदाजे व्यक्तीकडे असतो. आयुष्यात इतकी वर्षे संघर्ष केल्यानंतर अर्थातच आपल्याला शांततापूर्ण आर्थिक स्वावलंबी जगणे हवे असते. केतकी व अरुण यांचा मासिक खर्च वीस हजार रुपयांच्या आसपास आहे. म्हणून निवृत्तीनंतर पुढील १० वर्षे सुखाने जगण्यासाठी (कोणतेही अतिरिक्त उत्पन्न नसताना) त्यांच्या गाठीशी २० लाख रुपयांची पुंजी असणे गरजेचे आहे. मासिक खर्चाच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण वाढत जाणार आहे. (उदा-मासिक खर्च १०,००० रुपये असणाऱ्या कुटुंबाला पुढील दहा वर्षांसाठी अंदाजे १० लाख रुपयांची बचत लागेल. तर ५० हजार रुपये मासिक खर्च असणाऱ्या कुटुंबाला निवृत्तीनंतरच्या १० वर्षांसाठी ५० लाख रुपयांची पुंजी साठवावी लागेल.)
आपत्कालीन निधी- कोणत्याही बऱ्या-वाईट प्रसंगाला तोंड देण्यासाठी आपत्कालीन निधी म्हणून साधारण तीन महिन्यांचा खर्च आपल्या शिलकीत असला पाहिजे. हे पैसे तुम्ही बचत खात्यात वेगळे काढून ठेवायला हवेत किंवा लिक्विड म्युच्युअल फंडात ठेवायला हवेत. या खात्याला ‘संबंधितांसाठी वा वारसदारासाठी’ असे स्वरूप असले पाहिजे व  गरजेच्या वेळी त्यातून पत्नी, तुम्ही वा कुटुंबातील कुणीही व्यक्ती पैसे काढू शकली पाहिजे.
तुमच्या व पत्नीच्या आरोग्य विम्यासाठीच्या पैशांसाठी दरवर्षी काही पैसे आठवणीने बाजूला काढून ठेवा.
छंद व आवडीसाठी- अत्यावश्यक गरजा भागवल्यानंतर जी काही राशी उपलब्ध असेल तिचा वापर छंद व आवडीनिवडी जपण्यासाठी करता येऊ शकेल.   
रिव्हर्स मॉर्गेज - ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे त्यांच्या उर्वरित आयुष्याला पुरेल इतकी बचत नाही त्यांच्यासाठी पर्याय म्हणजे ‘रिव्हर्स मॉर्गेज’. अर्थात ज्या वृद्ध जोडप्यांकडे पुरेसा पैसा नाही ते बँकेकडे त्यांचे घर गहाण ठेवू शकतात. त्या बदल्यात बँकेकडून महिन्याकाठी वा तिमाही असे ठराविक कालावधीने पैसे मिळतात. शिवाय ते जोडपे त्याच घरात वास्तव्य करत असल्याने राहण्याचा प्रश्नही सुटतो. घरावर घेतलेले कर्ज व कर्जाचा कालावधी यांना मर्यादा असते व त्यावरच संबंधित करारनामा ठरतो.
मात्र जर कायमस्वरूपी त्या वृद्धांनी ती मालमत्ता सोडली तर अशा परिस्थितीत ते घर विकण्याचा पूर्ण अधिकार बँकेला असतो. जर त्यांचा कुणी वारसदार असेल तर घराच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेतील अतिरिक्त रक्कम त्याला मिळते. परदेशात ही पद्धत अनेक ठिकाणी दिसून येते, मात्र भारतात तितकीशी ती रूढ झालेली नाही. दुर्दैवाने, मालमत्ता निर्देशांकाच्या अभावामुळे तसेच यासाठी कोणतीही आदर्श पद्धत अस्तित्वात नसल्याने मालमत्तेचे मूल्यमापन करण्याचा व व्याजदर ठरवण्याचा पूर्ण अधिकार बँकेला असतो.
गुंतवणुकीचे पर्याय
* बँकांमधील मुदत ठेवींसह ज्येष्ठ नागरिकांनी कंपन्यांच्या मुदत ठेवींमध्ये पैसै गुंतवण्यास काहीच हरकत नाही. जर यावरील व्याजातून येणारे उत्पन्न दहा हजार रुपयांच्या पुढे गेले तर वर्षांच्या सुरुवातीस १५एच हा फॉर्म भरण्यास विसरू नका. अन्यथा टीडीएस लागू होऊ शकतो.
* म्युच्युअल फंड्समध्येही ज्येष्ठ नागरिक नियमित मुदत योजना (Fixed Maturity Plans) हा पर्याय निवडू शकतात. हा पर्याय म्हणजे जोखीम व परतावा या मुद्दय़ांचा विचार करता बँकांच्या मुदत ठेवी व कंपन्यांच्या मुदत ठेवी यांतील सुवर्णमध्य ठरू शकतो. तीन महिने, सहा महिने, एक वर्ष वा एक वर्षांहून अधिक कालावधीसाठी  एफएमपी घेता येऊ शकते.
कमी व दीर्घ कालावधीच्या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांची केव्हाही पैसा उपलब्ध होऊ शकतो. कारण त्यांना कोणत्या वेळी पैशाची गरज भासेल ते सांगणे कठीण आहे. कमी मुदतीच्या योजनांमुळे दर तीन-सहा महिन्यांनी पुनर्गुतवणुकीबाबत निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या गुंतवणुकीतील काही भाग, उदा १० टक्के एमआयपी (Monthly Income Plans)मध्ये गुंतवता येऊ शकतो. एमआयपीमधील गुंतवणुकीपैकी १५-३० टक्के रक्कम भांडवली बाजारात वळवली जाते. त्यामुळे बाजाराशी निगडित अधिक परतावाही मिळतो. थोडी जोखीम असली तरी. एमआयपीतील गुंतवणुकीसाठी तीन वर्षे व अधिक असा कालावधी असतो.
*पोस्टाची मासिक उत्पन्न योजना- महिन्याकाठी उत्पन्न हवे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना उत्तम आहे. मात्र यात गुंतवणुकीसाठी मर्यादा आहे. एका खातेदारासाठी साडेचार लाख रुपये तर सहखातेदारांना ९ लाख रुपये अशी मर्यादा आहे. मुदतठेवींचे व्याज वार्षिक तत्त्वावर काढले जाते मात्र या योजनेचे व्याज दर महिन्याला दिले जाते. म्हणून पोस्टाच्या त्याच व्याजदराच्या मुदत ठेवींतून मिळणाऱ्या एकूण प्राप्तीपेक्षा पोस्ट खात्याच्या मासिक उत्पन्न योजनेतून होणारी प्राप्ती अधिक असते.
पोस्टाच्या मुदत योजना- या योजनांवर व्याज तिमाही तत्त्वावर काढले जाते व चक्रवाढ पद्धतीने ते वाढत जाते. म्हणून मुदत संपताना मिळणारा परतावा जाहीर केलेल्या व्याजदराहून अधिक असतो. मात्र एक वर्षांनंतर केव्हाही मुदतीपूर्वी पैसे काढले तर व्याजदरात एक टक्का कपात केली जाते पण गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.
*ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजना- यामध्ये कमीतकमी अगदी एक हजार रुपयांच्या रकमेपासून ते १५ लाख रुपयांच्या रकमेपर्यंत कितीही रक्कम पाच वर्षांसाठी (तीन वर्षांपर्यंत वाढवता येणे शक्य आहे) ज्येष्ठ नागरिक या योजनेत गुंतवू शकतात. ऐच्छिक सेवानिवृत्ती घेणाऱ्यांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे इतकी कमी करण्यात आली आहे. एक व दोन वर्षांनंतर मुदतीपूर्वी रक्कम काढता येणे शक्य आहे, त्यावर अनुक्रमे दीड व एक टक्का इतका दंड भरावा लागतो.
(लेखिका वित्त नियोजिका असून लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)