धनसंपदा : सुट्टीची मजा लुटा, पण.. Print

धनश्री राणे ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

परदेशातील प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी प्रवास विमा पॉलिसी हवीच. या पॉलिसीमुळे परदेशात असताना तुमच्या सामानासह तुमच्या आरोग्यविषयक समस्यांनाही संरक्षण मिळते. तसेच शॉपिंग, हॉटेलिंगचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रवासी कार्डची सुविधाही लोकप्रिय होऊ लागली आहे.
अलीकडल्या काळात, पर्यटनासाठी परदेशवारी करणाऱ्या हौशी प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आपण सगळेच सहलीचे प्लॅन्स आखताना खूप उत्साही असतो. कुटुंबासह जाणार असलो तर सहलीचे ठिकाण, वास्तव्यासाठी हॉटेलची निवड, प्रेक्षणीय ठिकाणांची यादी वगैरे गोष्टींचा आपण आधीच विचार केलेला असतो. मात्र पर्यटनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये वा गोंधळाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून काही उत्पादने ग्राहकांसाठी सज्ज आहेत. प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची मदत घ्यावी लागते. अशा पर्यटनपूरक उत्पादनांविषयी या लेखात माहिती घेऊया.
ऑनलाइन प्रवास विमा योजना- काही  वर्षांपूर्वी, कामानिमित्त केलेल्या एका परदेशवारीत, मला कांजण्यांचा त्रास सुरू झाला. आधीच परदेशात, त्यात असा संसर्गजन्य आजार उद्भवल्याने पंचाईत झाली. त्या वेळी डॉक्टरांकडे दिलेल्या एका भेटीसाठी मला १०० डॉलर मोजावे लागले!
घरापासून दूर, त्यात आजारी व एकाकी असे असताना आरोग्यविषयक समस्या हाताळणं कठीण असतं. आपल्या (भारताच्या ) तुलनेत परदेशात वैद्यकीय खर्च अत्यंत महागडा असतो. म्हणूनच अशा प्रवासाला निघण्यापूर्वी विमा उतरवणे महत्त्वाचे आहे. दुसरं म्हणजे विमानाचे उड्डाण रद्द झाले किंवा आपल्या सामानाची, बॅगांची चोरी झाली तर तुमच्या सहलीच्या आनंदावर विरजण पडू शकते.
दाताच्या दुखण्यासारख्या कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीसह अचानक आलेल्या सामान चोरी, तसेच व्हिसा-पासपोर्ट, विमानाचे तिकीट अशा महत्त्वाच्या कागदपत्रांच्या गहाळ होण्यापर्यंतच्या संकटापासून प्रवास विमा योजना तुम्हाला संरक्षण देते. आता यापैकी बऱ्याचशा पॉलिसी ऑनलाइन उपलब्ध असतात.
ऑनलाइन प्रवास विमा पॉलिसीसाठी, इच्छुक व्यक्तीला प्रवासाशी निगडित मूलभूत माहिती कंपनीला द्यावी लागते. अगदी घरबसल्याही तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता. पॉलिसींतर्गत येणारे संरक्षण त्यानंतर लगेच लागू होते. नेट बँकिंग, चेक पेमेंट किंवा डेबिट वा क्रेडिट कार्डाच्या मदतीने तुम्ही पॉलिसीचे पैसे अदा करू शकता. अवघ्या दोन तासात प्रवास विमा पॉलिसी मिळते, त्यामुळे प्रवासाला जाण्याच्या दिवशीही तुम्ही ती घेऊ शकता.
काही वेळेला वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक असते, अशा परिस्थितीत पॉलिसी दोन-तीन दिवसांत दिली जाते. तुम्ही खासगी सहलींसाठी जाणार असाल तरी तुमच्या कुटुंबाला प्रवासी विम्याचे संरक्षण मिळू शकते.
परदेशात विम्यांची मर्यादा पन्नास हजार डॉलरपासून सुरू होते. मात्र एकूण खर्चापैकी काही रक्कम ग्राहकांना भरावी लागते. उदा- पॉलिसीधारकाला फ्रॅक्चर झाले, त्यासाठी ५०० डॉलर खर्च आला. तर पॉलिसीधारकाने समजा १०० डॉलर खिशातून खर्च करण्याची मर्यादा असेल तर त्यानंतर आपल्या देशात परतल्यावर कंपनी क्लेम सेटल करते.
साधारणपणे, पर्यटन काळातील वास्तव्याचा कालावधी विम्यात संरक्षित केलेला असतो. ही पॉलिसी सात दिवसांपासून १८० दिवसांपर्यंत वाढवता येते. काही परिस्थितीत एक वर्षांपर्यंतही वाढवता येते. अनेक विमा कंपन्या ग्राहकांच्या सोयीसाठी टोल-फ्री दूरध्वनीची सेवाही देतात. ग्राहकांच्या सेवेत या कंपन्या २४ बाय ७ कार्यरत असतात. विमा पॉलिसीतील तरतुदीप्रमाणे विम्याचीभरपाई वेगवेगळी असू शकते.
सामानाच्या विम्यासाठी- सामानाचे वर्णन, एकूण सामग्री व त्याची किंमत यांबाबत एक अर्ज कंपनीला भरून देणे आवश्यक आहे. नाशवंत तसेच खाण्याच्या पदार्थावर कोणतेही संरक्षण अर्थातच मिळत नाही.
मात्र, कोणतीही अनुचित घटना वा अपघात तुम्ही निवडलेल्या प्रवासाच्या माध्यमातून केलेल्या प्रवासातच  घडली पाहिजे. उदा-हवाई मार्गे, सागरी वा रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करतानाच घडली पाहिजे. सामानाच्या बॅगा हरवल्यास, संरक्षण दिलेल्या एकूण रकमेच्या पन्नास टक्केजमा होतात किंवा बॅगेतील सामानावर संरक्षण दिलेल्या रकमेच्या काही ठराविक टक्के तरी मिळतात.
प्रवासी कार्ड
परदेशी प्रवासात प्रामुख्याने येणारी अडचण म्हणजे देशी चलनाचा अभाव. आपण प्रत्येक वेळी पुरेसे परदेशी चलन जवळ बाळगू शकत नाही.
तसेच भारतातील आपल्या बँकेच्या क्रेडिट कार्डाद्वारे तेथील आंतरराष्ट्रीय एटीएममधून पसे काढल्यास त्या सुविधेसाठी भरपूर दर आकारला जातो. उदा. दोन्ही देशांतील चलनाच्या दरातील तफावत तसेच चलन दर विनिमयाचा आकार यामुळे एकूण व्यवहाराची रक्कम वाढते. तसेच दरवेळेला ती आकारली जाते त्यामुळे अधिक खर्चिक.
उदाहरणार्थ-थायलंडच्या सफारीवर असताना तुमच्या क्रेडिट कार्डावर आकारली जाणारी रक्कम ही आधी रुपयाचे अमेरिकन डॉलरमधील रूपांतर व नंतर थाई बाथमध्ये रूपांतर या चलनाच्या विनिमयावर अवलंबून असते.
ही अडचण टाळण्यासाठी भारतातील अनेक बँका परदेशी चलनाचे प्रवासी कार्ड पुरवतात. प्रवासी कार्ड अगदी मोबाइल फोनच्या प्रीपेड कार्डप्रमाणे असते-अर्थात त्यात पुरेशी शिल्लक असेपर्यंत तुम्ही ते वापरू शकता. ही प्रवासी कार्ड प्रमुख आंतरराष्ट्रीय चलनांमध्ये उपलब्ध आहेत- अमेरिकन डॉलर, ऑस्ट्रेलियन डॉलर, युरो, पाऊंड, सिंगापूर डॉलर, यूएई दिराम इ. ज्या बँका ही कार्डची सुविधा देतात त्यांच्याकडून कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांवर काही ठराविक टक्केरक्कम फी म्हणून घेतली जाते. तर काही बँका पहिल्यांदा, कार्ड घेतानाच काही रक्कम आकारतात. तर काही बँकांकडून कार्डच्या मदतीने केलेल्या एकूण व्यवहारांच्या रकमेवर ठराविक टक्के रक्कम स्वीकारली जाते.
 या कार्डमुळे तुम्ही सुरक्षितपणे कुठल्याही काळजीशिवाय इतकी मोठी रक्कम बाळगू शकता व सहलीचा आनंद घेऊ शकता.
याशिवाय कार्डमधील रक्कम संपत आल्यास किंवा तुमची परदेशातील सहल लांबल्यास  तुम्ही यातील रक्कम वाढवून घेऊ शकता.
मोठमोठाली शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, व्यापारी संकुले, विमानतळे अशा अनेक ठिकाणी हे कार्ड सहजपणे वापरता येते.
केवळ खर्चासाठीच नव्हे तर एटीएममधून पैसे काढण्यासाठीही या प्रवासी कार्डचा वापर करता येतो. सुरुवातीला फक्त व्यावसायिक हेतूनेच प्रवासी कार्ड वापरले जात होते, मात्र हळूहळू परदेशी सहलीला जाणाऱ्या नागरिकांकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून याचा वापर वाढत गेला. काही कारणांनी हे कार्ड गहाळ झाले, चोरी झाली तर तात्काळ संबंधित बँकेला फोन बँकिंग सुविधेद्वारे कळवावे. (क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या बाबतीतही हीच सावधानता बाळगावी.)
सहलीसाठी काही टिप्स-
१. प्रवासाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे व प्रवासी कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती सहलीदरम्यान नेहमी जवळ बाळगा.
२  एकाच जागी तुमच्याकडील सगळी रोख रक्कम व क्रेडिट वा डेबिट कार्ड ठेवू नका.
३. परदेशात प्रवास करताना, तुमचे हॉटेल, बँक  तसेच प्रवासी कार्डसंबंधित संपर्क दूरध्वनी एके ठिकाणी नमूद करून ठेवा.
४. कोणतीही अपूर्ण स्लिप किंवा रोख पावती यांच्यावर काळजीपूर्वक नजर टाकल्याशिवाय सही करू नका.
५. स्थानिक नियम, कायदेकानू व पद्धती यांची पुरेशी माहिती करून घ्या. त्यामुळे अनावश्यक दंड टाळता येईल.
६. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रथमोपचाराचे साहित्य व नेहमीची काही औषधे गोळ्या कायम सोबत ठेवा.
(लेखिका वित्त नियोजिका असून लेखातील त्यांची मते वैयक्तिक आहेत.)