धनसंपदा : वित्त नियोजन : तुमचीच जबाबदारी Print

alt

धनश्री राणे , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपला देश बचतीला पसंती देणाऱ्या माणसांचा देश आहे. पण बचत करणे पुरेसे नाही. महागाईसारख्या बाबी लक्षात घेता आजच्या एक हजार रुपयांचे मूल्य दोन वर्षांनी पाचशे रुपयांच्याइतके कमी झालेले असेल. म्हणून प्राधान्याने गुंतवणुकीकडे वळा कारण वित्त नियोजन ही सर्वार्थाने तुमचीच जबाबदारी आहे.
आ जच्या लेखाची सुरुवात एका उदाहरणानेच करू या. मोठय़ा आयटी कंपनीत नोकरीला असणारी सुप्रिया विशीची आहे. येत्या सहा महिन्यांत घराची डागडुगी करण्याचा तिचा विचार आहे. पण येत्या काही वर्षांत तिचे लग्न होईल. त्यामुळे लग्नासाठीही तिला पैसे साठवायचे आहेत. शिवाय कार घेण्याचंही तिचं स्वप्न आहे. पण तिला इतके पैसे साठवणे जड जाते आहे. नेमकी कुठे गुंतवणूक करावी हे तिला कळत नाहीए. तिने काय बरे करावे?


शिल्लक रकमेचे व्यवस्थापन करण्यासाठी काही टिप्स -
१) महिन्याकाठी होणारे खर्च व उत्पन्नाचे पर्याय ओळखा- आपल्याकडून होणाऱ्या सगळ्याच खर्चाचा हिशोब ठेवणे अशक्य असते. कारण पैसे येण्याचे पर्याय मर्यादित असले तरी पैशांना पाय फुटायचे मार्ग अनेक असतात. पगार, भाडय़ातून मिळणारे उत्पन्न, व्याज व डिव्हिडंड यातून येणारा पैसा असे आपल्या मिळकतीचे पर्याय असू शकतात.
आपल्यापैकी अनेकांच्या डोक्यात महिन्याच्या बजेटचे एक अस्पष्ट चित्र असते. मात्र याविषयी इतके गाफील राहून चालणार नाही. नेहमीच्या बजेटचा अंदाज घेऊन खालील बाबी तपासा- कुटुंबाचा सर्वाधिक खर्च कशावर होतो? घरगुती खर्च, बिले भरणे (प्रवास खर्च हा नियमित खर्चात मोडणारा आहे), कर्जाचा हप्ता, विम्याचे प्रीमियम इत्यादी. या सगळ्याचा विचार करून महिन्याकाठी एका ठराविक रकमेच्या गुंतवणुकीचे नियोजन झालेच पाहिजे. या गुंतवणुकीचा तुमच्या खर्चाशी काहीही संबंध नाही हे ध्यानात ठेवा. याशिवाय-आऊटिंग, सिनेमा, भेटी हे स्वेच्छेने होणारे खर्च आहेत.
किती शिल्लक आहे, याची मोजदाद करण्यापेक्षा तुमचे आत्ताचे व भविष्यातील खर्च यांची यादी करा. यामुळे तुमच्या दर महिन्याला येणाऱ्या मिळकतीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल. उदा-बिले, कर्जाचे हप्ते, प्रीमियमचे हप्ते यांच्याइतकी रक्कम बाजूला काढा. ही देणी वेळच्यावेळी भरा. बिले मुदतीनंतर भरल्यास द्यावा लागणारा दंड तसेच विलंब शुल्क यांची बचत होईल.
२. कर्जाच्या हप्त्यांचे सुनियोजन हवे- तुमच्या नावावर जर कर्जाच्या स्वरूपातील देणी असतील तर पैशांचे व्यवस्थापन थोडे अवघड असते. खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी कर्ज शक्य तितके कमी असलेले बरे. कार लोन किंवा जवळच्या सावकाराकडून अधिक व्याजाने घेतलेले कर्ज असेल तर अशी देणी प्राधान्याने फेडायला हवीत. गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्जाप्रमाणे या कर्जावर कोणतीही सूट नसल्याने ही र्कज थकवण्यात काहीच अर्थ नाही.  शिवाय घराचे मूल्य भविष्यात वृद्धिगंत होणारच असते मात्र कितीही महागडी कार घेतली व दोन महिन्यांनी जरी ती विकण्याचे ठरवले तरी तिची किंमत मूळ किमतीपेक्षा कमीच असणार, नाही का?
तुमचे क्रेडिट कार्ड याकामी उपयुक्त ठरू शकते. तुमची बिले तसेच पॉलिसीचे प्रीमियम वेळच्या वेळी भरण्यासाठी क्रेडिट कार्डची मदत घेतल्याने शिस्तबद्ध नियोजन होऊ शकते. दर चाळीस दिवसांनंतर घरातील खर्च व बिले भरण्याचे ठरवले तर महिन्यातल्या इतर दिवसांमध्ये तुमच्या हाती अधिक रक्कम शिल्लक असेल. मात्र क्रेडिट कार्डावर आकारले जाणारे व्याज खूप अधिक आहे, वर्षांकाठी जवळपास तीस टक्क्य़ांच्या आसपास. म्हणूनच क्रेडिट कार्डावरील बिले वेळेत भरा.
३. लवकर सुरुवात करा आणि सातत्य राखा- आपले अनिवार्य व नियमित खर्च यांचा अंदाज घ्या. यानंतर दरमहा जी रक्कम शिल्लक राहील तिची आपण बचत करू शकतो. या रकमेला निव्वळ बचत अथवा अतिरिक्त रोख म्हणता येईल- ही रक्कम कितीही असू शकते- तुमच्या पगाराच्या ५-१० टक्के किंवा १०-२० टक्के इ.
दरमहा पाच हजार रुपयांसारख्या कमी रकमेपासूनही तुम्ही सुरुवात करू शकता. मात्र या रकमेत कालांतराने वाढ झाली पाहिजे. पाच हजार रुपयांमध्ये वर्षभरानंतर १० टक्क्य़ांनी जरी वाढवली म्हणजे तेराव्या महिन्यापासून ५,५०० रुपये जरी केली तरी १० वर्षांनंतर तुम्ही तब्बल १० लाख रुपयांची बचत केलेली असते. पण नेहमी पगाराच्या ठराविक टक्के रक्कम बाजूला काढलेली असलीच पाहिजे. ‘दर महिन्याला मी माझ्या पगाराच्या एकचतुर्थाश रक्कमेची गुंतवणूक करतो’ असा हिशोब ठेवल्यास गुंतवणुकीचे नियोजन सुकर होते.
४. बचत म्हणजे गुंतवणूक नव्हे-
आपला देश बचतीला पसंती देणाऱ्या माणसांचा देश आहे. पण बचत करणे पुरेसे नाही. महागाईसारख्या सामान्यांना काळजीत टाकणाऱ्या बाबींमुळे आजच्या १००० रुपयांचे मूल्य दोन वर्षांनी आजच्या ५०० रुपयांच्या आसपास म्हणजे जवळपास निम्म्यावर आलेले असते. दुसरे म्हणजे निव्वळ बचत केल्याने तुमचे गुंतवणुकीचे ध्येय साधले जाईल असे नाही. सुप्रियाचे उदाहरण पाहू - सुप्रियाला घराच्या डागडुजीसाठी पन्नास हजार रुपयांची तात्काळ गरज आहे. पाठोपाठ पुढील पाच वर्षांत तिचा लग्नाचा नियोजित खर्च पाच लाख रुपये आहे. म्हणूनच तिच्या भविष्यासाठी तिने ६५०० रुपये दर महिना गुंतवणूक केली पाहिजे.
मात्र घराच्या डागडुजी करण्यासारख्या अल्पकालीन उद्दिष्टांसाठी तिला लागणारी रक्कम (पन्नास हजार, लग्नासाठीच्या ५ लाख रुपयांच्या तुलनेत) जरी १० पटीने कमी असली तरी तिला महिन्याला ८ हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत! सुप्रियाला आता महिन्याला इतकी रक्कम गुंतवणे शक्य नाही. म्हणून तिने एक वर्षांनंतर घराचे काम काढण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याकाठी ४ हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून तिचे हे उद्दिष्ट गाठले जाणार आहे. म्हणूनच नियमितपणे व सातत्याने गुंतवणूक करणे आत्यंतिक गरजेचे आहे. अल्पावधीच्या गुंतवणुकीसाठी मुदत ठेवी, लिक्विड म्युच्युअल फंड्स या पर्यायांचा विचार करायला हरकत नाही.
५. खर्चाला लावा कात्री अन् मिळकतीच्या कक्षा करा रुंद ! - अर्थातच हा सल्ला द्यायला सोपा पण अमलात आणायला तितकाच कठीण असा आहे. सुप्रियाचेच बघा ना..तिने कर नियोजनाला सुरुवात केली, पण कंपनीच्या एचआरकडून आयकरासंदर्भात नोटीस आल्यावर. अनेकदा दर महिन्याला नियोजनपूर्ण गुंतवणूक न केल्यामुळेच आपल्याला कर भरावा लागतो.
जर तुम्ही १२ टक्के व्याजदराने गृहकर्ज घेतले असेल आणि काही वर्षांनी व्याजदर ८ टक्क्य़ांवर खाली आला तर नवे गृहकर्ज काढून आधीचे फेडायचे हा कर्ज पुनर्रचनेचा पर्याय तुम्ही निवडू शकता. याशिवाय कर्ज कमी रकमेच्या  इएमआयमध्ये, अधिक वर्षांसाठी वाढवून त्याची पुनर्रचना करू शकता.
अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना सीटीसी(कॉस्ट टू कंपनी)चे घटक ठरवण्याची मुभा देतात. अशा वेळी तुम्ही ‘मूळ पगारा’ची राशी वाढवली तर भविष्य निर्वाह निधीची रक्कम वाढते व निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते. याशिवाय शॉपिंग, हॉटेल्स तसेच मनोरंजन यावर तुम्ही जो ऐच्छिक खर्च करता त्यालाही एक मर्यादा घातली पाहिजे.
जेव्हा तुम्ही गुंतवणुकीकडे वळाल तेव्हा खालील अभ्यास तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.
१) सध्याच्या खर्चाचा अंदाज घ्या. २) भविष्यातील गरजा अधोरेखित करा. ३) गुंतवणुकीसाठी दरमहिना उरणारी शिल्लक ठरवा. ४)  वित्त उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी गुंतवणुकीची योजना आखा.
निष्कर्ष- हाती पडणाऱ्या पैशाचे व्यवस्थापन अर्थात बजेट तयार करणे ही वित्त नियोजनाच्या प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. शिवाय वर उल्लेख केलेल्या पर्यायांची अंमलबजावणी केल्यानंतर अधिक श्रम न घेताही नियोजनाकडे आपली वाटचाल सुरू झालेली असेल.
आपल्या दरदिवसाच्या कामाचा आपल्या वित्त नियोजनावर नक्कीच परिणाम होतो. जर आपण वरीलप्रमाणे पैशाचे नियोजन केले नाही तर आपण अधिक कर भरू किंवा कर्जावरील व्याजाचा भार अधिक वाढवून ठेवूच पण अडीनडीच्या वेळी लागणारा पुरेसा पैसाही आपल्याकडे नसेल.
वित्त नियोजनात एखादी व्यक्ती अनेक स्तरांमधून जाते. यांची पुढील लेखात चर्चा करू या..
(लेखिका वित्त नियोजिका असून लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)