रुजुवात : प्रतिभा संक्रमण Print

 

मुकुंद संगोराम - शनिवार, १६ जून  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कलावंत आणि रसिक यांच्यातला अनुबंध तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा कलाकृतीला व्यासपीठ लाभतं. सर्जनातून कलावंताने घेतलेली अपूर्वतेची अनुभूती संक्रमित होण्यासाठी ती योग्य जागी पोहोचवण्याचे काम ही व्यासपीठं करीत असतात.
कोणतीही कला निर्माण होताना ती एकटय़ाची असत नाही. ती प्रकाशाच्या वाटा शोधत असते. ही वाट सापडणं हे त्या कलाकृतीच्या भाळी लिहिलेलं असावं लागतं. प्रतिभा संक्रमणाचा संस्कार अशा वेळीच घडून येऊ शकतो.


प्रतिभेला नवोन्मेषाचं वरदान असतं. सतत काही नवं सुचणं आणि ते व्यक्त करण्याची ऊर्मी निर्माण होणं या घटना सर्जनशील कलावंताच्या बाबत अनेकदा घडत असतात. जेव्हा नवं सुचत असतं, तो क्षण त्या कल्पनेचा अंकुर असतो. त्या अंकुराचं पालनपोषण करणं आणि त्यातून कोंब बाहेर येणं, यासाठी काहीवेळा वाट पाहावी लागते किंवा कधीतरी हे सगळंच खूप झटपट होऊन जातं. हे पटकन काही घडणं हा जसा एक आनंदाचा भाग असतो तसाच, ही प्रक्रिया खूप काळ तरंगत राहणं हाही सर्जनाचाच उल्हास असतो. उत्क्रांतीच्या या वेदनाही कलेच्या प्रांतात हव्याहव्याशा वाटणाऱ्या असतात. म्हणजे दिसामाजी काही लिहीत जावे, असं म्हणून रोज काही नवनवीन सर्जन होत नसतं. नवं सुचणाऱ्या आणि ते व्यक्त करू शकणाऱ्या प्रत्येकालाच ही क्रिया सतत घडावी, असं वाटत असलं, तरी ते तसं घडत नाही असा अनुभव असतो. हे सर्जनाचं गीत सगळ्यांच्याच वाटय़ाला येत नाही खरं! त्यामुळेच हे नवं सुचणं जेव्हा आपल्यासारख्या न सुचणाऱ्यांपर्यंत पोहोचतं, तेव्हा ‘कसं काय बुवा सुचतं, कोण जाणे’ अशी अभावित प्रतिक्रिया व्यक्त होते. सुचत तर सगळ्यांनाच असतं. अगदी स्वयंपाक करत असतानाही ही प्रतिभा टवटवीत असते आणि आपल्या रुक्ष कार्यालयीन दैनंदिन कामातही ती आपल्याला सतत काही सुचवत असते. आपण त्याला साद देतो की नाही, हा प्रश्न असतो. बहुधा ही साद आपण देत नाही, याचं एक कारण असं असेल, की आपल्याला या नव्या सुचण्याचं पुढे काय करायचं; म्हणजे हे नवसर्जन कसं व्यक्त करायचं, त्याची कविता करायची की कथा करायची, की चित्र काढायचं की शिल्प बनवायचं.. असं प्रश्नांचं मोहोळ उठतं. समजा काय करायचं, हे लक्षात आलं आणि आपण त्या वाटेला गेलो, तर पुन्हा असं कळतं की जे नवं सुचलं आहे, ते व्यक्त करताना काहीतरी सांडून जातं आहे. ते सगळंच्या सगळं चिमटीत (मग ती चिमूट शब्दांची, रंगांची, पोताची किंवा अन्य कशाचीही.) पकडता येत नाहीये. मग जी धडपड सुरू होते, ती सुचलेलं व्यक्त करण्यासाठी योग्य अशा चौकटीच्या शोधाची. ही चौकट सापडली की मग कित्येकवेळा सगळंच अगदी सुलभ होऊन जातं आणि ते हातावेगळं होईपर्यंत लक्षातही येत नाही. झाल्यानंतर जरासं मागे वळलं, की आपलेच डोळे लकाकायला लागतात. हे सारं मी घडवलं, माझ्याच कल्पनेतून घडवलं आणि हे फक्त माझंच सर्जन आहे, असं लक्षात यायला लागतं.
नवं जे सुचतं, ते सर्वात थोर असतं, अशी आपली तर खात्रीच असते. आपण वाचत असतो, पाहात असतो, ऐकत असतो आणि ते सगळं साठवत असतो. पण आपल्याच नव्या कल्पनांशी आपण या आजवर मिळवलेल्या अनुभवाची तुलना करायला तयार होत नाही. खरोखरंच जगावेगळं आणि प्रतिभेचा परिसस्पर्श झालेलं काही आपल्या हातून घडलं आहे का, याचा विचार करायला आपण तयार होत नाही. जे सुचलं, जसं सुचलं, ज्या चौकटीत सुचलं, ते व्यक्त केलं हे खरं. पण ते खरंच किती ‘पाण्यात’ आहे, याचं परीक्षण करायची आपली तयारी नसते. मग ते ब्लॉगवरचं लेखन असो, की आपली व्यक्तिगत डायरी असो. जे नवं व्यक्त होतं, ते खरंच सांगितलं नाही तर चालणार नाही का, असा प्रश्न आपण स्वत:ला किती वेळा विचारतो?
प्रतिभेचं लेणं लेवून आलेल्या अशा अनेक कलाकृतींना अंधारात राहण्याचा शाप असू शकतो. हे नवोन्मेषांचं गाणं नुसतं तयार होऊन चालत नाही. ते पोहोचायलाही लागतं. आपल्याला माहीत नसणारे असे कितीतरी प्रतिभावान आपली सर्जनाची सारी शक्ती एकवटून काही नवनिर्माण करत असतात. कलेच्या प्रांतातील हे घडणं जोवर योग्य अशा व्यासपीठावर पोहोचत नाही, तोवर त्याचं संक्रमण होत नाही. म्हणजे ते योग्य त्या ठिकाणी पोहोचतच नाही. सर्जनातून व्यक्त होणारा अपूर्वतेचा अनुभव समोरच्या रसिकाला, प्रेक्षकाला, श्रोत्याला घेता येण्यासाठी कलेच्या प्रांतात अशा व्यासपीठांची फार फार आवश्यकता असते. चित्रकाराचं चित्र नीट कागदात बांधून ठेवणं, नवी बंदिश तिच्या नोटेशनसह केवळ वहीत लिहून ठेवणं, शिल्पाकृतीला कापडात गुंडाळून ठेवणं म्हणजे या प्रतिभेला कोंडून ठेवण्यासारखं असतं. त्यासाठी एक मुक्त व्यवस्था हवी. चित्र मांडण्याची सार्वजनिक ठिकाणं हवीत. गाण्यासाठी स्वरमंच हवा. नाटक करायला रंगमंच हवा. पुस्तक सिद्ध व्हायला हवं आणि ते सगळ्यांना उपलब्ध व्हायला हवं. कारण नवसर्जन आणखी काही नवं घडण्यासाठीचं बीज असतं. एखादा कलावंत आपली कला व्यक्त करत असताना ती अनुभवणाऱ्यांपैकी काहींसाठी हा अनुभव आणखी नवं सुचण्याची पहिली पायरी असते. सर्जनाची ही परंपरा गेल्या काही हजार वर्षांत अशीच सुरू राहिली आहे. कोणत्याही कलेचा अनुभव हा एक वेगळा प्रांत असतो. केवळ रसिक असलेला त्या कलानुभवानं आनंदाच्या बह्मात लीन होतो आणि सर्जनाची आस असणारा कलावंत त्यातून आपल्या प्रेरणांचा शोध घेतो. एखादं अप्रतिम चित्र पाहिल्यानंतर ते पाहणाऱ्या चित्रकाराला स्फूर्ती मिळते, ती नवसर्जनाची. एखादी उत्तम साहित्यकृती वाचल्यानंतर येणाऱ्या अनुभवातून आपणही असं काही करू शकू का, याची मनातल्या मनात चाचपणी सुरू होते. प्रतिभेचं हे संक्रमण कलांच्या जिवंतपणाशी निगडित असतं. कलांचं विश्व प्रवाही असतं आणि त्यात सतत नवे प्रवाह मिसळत असतात. हे नवे प्रवाह निर्माण होताना त्यात आधीच्या प्रवाहाचंच बीज असतं. म्हणजे काही नवं घडण्यासाठी काही नवं अनुभवायलाही लागतं. सगळंच नवं दर्जेदार असत नाही. त्यातही अनेकदा फोलफटं असतात. कलांबाबतचा अनुभव तरी असा आहे, की ही फोलफटं वाऱ्यासरशी उडून जातात. जे टिकतं, ते त्यातील अस्सलपणामुळे आणि जे विस्तारतं, ते त्यामधील सर्जनाच्या ताकदीमुळे!
करीम खाँ, अल्लादिया खाँ, भास्करबुवा बखले यांच्यापासून ते भीमसेन जोशी, कुमार गंधर्व यांच्यासारख्या अचाट प्रतिभेच्या कलावंतांनी जे नवं घडवलं, ते व्यक्त करण्यासाठी त्यांना सतत व्यासपीठ मिळालं. समोरच्या शेकडो, हजारो रसिकांपर्यंत पोहोचलेल्या त्यांच्या प्रतिभेनं अनेकांना दीपवून टाकलं. काही नवं घडवण्याची प्रेरणा दिली. ‘नवं गाणं’ व्यक्त करण्याची ऊर्मी असणारे शेकडो कलावंत आजही आपली प्रतिभा उजळवत असतात. त्यांच्या परिघातल्या सगळ्यांना त्यांच्या या कलेतील सृजनाचं अप्रूप असतं. कलेच्या प्रांतात अग्रभागी असणाऱ्या कलावंतांच्या पाठीमागे अशाही अनेक प्रज्ञावान कलावंतांची मांदियाळी असते. पण त्यांची नावंही कुणाला माहीत नसतात, त्यांचं कलास्थानही समजलेलं नसतं. अशी न सापडलेली प्रतिभा शोधणं फार महत्त्वाचं असतं. अशी अनेक चित्रं असतील जी अंधाऱ्या खोलीत बंद राहिली असतील. अशा किती शिल्पाकृती असतील, ज्यांनी प्रकाशाची तिरीपही अनुभवली नसेल. असे घडत असतानाही अनेक कलावंत आपल्या प्रतिभेची आराधना थांबवत नाहीत. तेच त्यांचं भागधेय असतं. सतत नवं सुचण्याची ही शक्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही. या सर्जनाला दाद मिळण्याची वाट पाहावी लागत नाही, कारण त्याच्या निर्मितीच्या प्रेरणाच वेगळ्या असतात. व्यक्त करण्यावाचून गत्यंतरच नाही, अशा स्थितीत कलावंत त्या प्रतिभेला एकाकी सोडू शकत नाही. अशा अनेक अप्रकाशित कलावंतांच्या अप्रकाशित प्रतिभा एकाकी असतात. ज्यांची सर्जनशीलता हजारोंपर्यंत पोहोचते आणि जे आपल्या प्रज्ञेचं दर्शन घडवून तिचा साक्षात्कार घडवतात, अशा पहिल्या फळीतील कलावंतांची प्रतिभाच सामान्यत: प्रेरणादायी ठरत असते.
कोणतीही कला निर्माण होताना ती एकटय़ाची असत नाही. ती प्रकाशाच्या वाटा शोधत असते आणि अशी वाट तिला अगदी सूर्यापर्यंत घेऊन जाते. ही वाट सापडणं हे त्या कलाकृतीच्या भाळी लिहिलेलं असावं लागतं. नवनिर्मितीची आस कलावंताला जशी स्वस्थ बसू देत नाही, तशीच, त्या कलाकृतीला सामोरं जाणाऱ्या प्रतिभावान रसिकालाही शांतता लाभू देत नाही. कलेला व्यासपीठ मिळण्यानं तिचा दिमाख वाढतो हे मात्र खरं. तरीही आपण एखादा स्वयंप्रकाशी गुरू पाहतो. आपली सारी प्रतिभा तो आपल्या शिष्यांच्या ठायी संक्रमित करू शकतो. आपल्या लपून राहिलेल्या या गुणांना आपल्या शिष्याच्या मार्गाने तो जगापुढे आणतो आणि मग पुन्हा प्रतिभेच्या संक्रमणाचं हे चक्र सुरू होतं. प्रतिभेला नवोन्मेषाचं वरदान असतं, तसाच अंधारात राहण्याचा शापही असतो!