रुजुवात : स्वरसुंदर दंतकथा Print

 

मुकुंद संगोराम  - शनिवार, २३ जून २०१२
mukund.sangoram@expressindiacom

बालगंधर्वानी ‘स्टारडम’ निव्वळ कलेच्या बळावर  मिळवलं,  त्यातून कलेला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. येत्या २६ जूनला बालगंधर्वाच्या जन्माला सव्वाशे र्वष होतील आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘गंधर्व नाटक मंडळी’ची शताब्दी येत्या ५ जुलै रोजी आहे.. हे निमित्त त्यांच्या ‘हिरोवर्शिप’च्या पुनरावलोकनाचं!
वयाच्या पंचविसाव्या वर्षी स्वत:ची नाटक मंडळी स्थापन करणाऱ्या बालगंधर्वाना एवढं नक्की ठाऊक होतं, की आपल्या गळय़ात एक स्वर्गीय आणि अलौकिक सौंदर्य दडलेलं आहे.

अवघा महाराष्ट्र या सौंदर्याच्या प्रेमात असा काही पडला की प्रत्येकाच्या ध्यानी, मनी, स्वप्नी फक्त एकच नाव झालं.. बालगंधर्व! नारायण राजहंस नावाचा हा कोवळा मुलगा जेव्हा किलरेस्कर नाटक मंडळीत दाखल झाला, तेव्हा त्याच्या गळय़ाची फारच तारीफ झाली, पण त्यावर सुसंस्कार व्हायला हवेत, अशी गरजही व्यक्त करण्यात आली. घराणेदार कलावंत भास्करबुवा बखले यांच्या तालमी मिळण्याआधी त्यांनी जळगावात असताना महमूद खाँ यांची गायकी आत्मसात करायला सुरुवात केली होती. बखलेबुवांचं गाणं म्हणजे मूर्तिमंत अभिजातता. त्यात घराण्याची आब होती आणि सौंदर्याची ललितसुंदर आस होती. हा मुलगा पुढे साऱ्या नाटय़विश्वाचा तारणहार बनेल, अशी अटकळ त्या वेळी काहींनी बांधलीही होती. हा सारा काळ आहे विसाव्या शतकाच्या अगदी प्रारंभीचा. म्हणजे ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान भारतात अवतरण्याचा. प्राचीन भारतीय संगीतात गांधर्व या शब्दाचा अर्थ संगीत असा होता. स्वर्गलोकीचं गाणं म्हणजे गंधर्वगान. बालगंधर्वाना अगदी पदार्पणातच टाळय़ा मिळाल्या आणि त्यांचं कोडकौतुक सुरू झालं. याच कलावंतानं पुढच्या आयुष्यात, कलेच्या दुनियेतील कलाकारांच्या कपाळी लिहिलेलं सामाजिक बहिष्काराचं दु:ख पुसून टाकलं आणि या दुनियेतल्या ‘स्टारडम’चा प्रारंभ केला.
किलरेस्कर नाटक मंडळी ही संगीत रंगभूमीवरील आद्य संस्था. तिनंच तर संगीत नाटक या एका अजब प्रकाराला जन्म दिला, तिचं पालनपोषण केलं आणि त्यावर लोकप्रियतेची मऊमुलायम पांघरुणं घातली. त्यात बालगंधर्वासारखा गायक नट कंपनीला येऊन मिळालेला. देखणं रूप आणि त्याहून सुंदर गळा असं समसमा संयोग असणारं रसायन तोवर तरी अवतरलेलं नव्हतं. नाटकातल्या स्त्रीभूमिकांसाठी पुरुषांचीच योजना होत असल्यानं गायन आणि सौंदर्य अशा संयोगाच्या शोधात तेव्हाची नाटक मंडळी असत. बालगंधर्व हे या सगळय़ांसाठीचं एक सुंदर स्वप्न ठरलं आणि ते स्वप्न समोर साकारलं जातानाचा अनुभव साऱ्या महाराष्ट्रानं थोडीथोडकी नाहीत, तर चांगली पन्नास र्वष घेतला. संगीत नाटकांनी बालगंधर्वाना जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं, तेव्हा महाराष्ट्रातच काय, पण देशातही कलावंताचं स्थान फार वरचं नव्हतं. एक प्रकारचा सामाजिक चातुर्वण्र्यच पाळला जायचा तेव्हा. गाणं बजावणं करणाऱ्याला फारशी प्रतिष्ठा नाही. पडल्याच तर फक्त शिव्या. काहीच येत नाही, म्हणून गाण्याकडे वळला असणार अशी जणू खात्रीच. गाणं हे आत्माविष्काराचं साधन आहे आणि त्यासाठी कमालीची प्रतिभा लागते, यावर समाजाचा तोवर फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे गाणाऱ्याला समाजात मानाचं पान मिळण्याची शक्यता नव्हती. अगदी जेवणावळीतही कलावंताचं ताट आडवं मांडलं जायचं. गाणारे गावोगावी जात, तेव्हा हॉटेलं नव्हती. कुणाच्या तरी घरीच उतरणं भाग असे. अशा घरांमध्येही इतरांसाठी पक्वान्नं आणि कलावंतासाठी मीठभाकरी असाच बेत असायचा. कलावंताची आणि त्याच्या कलेची किंमत असायची, ती त्याच क्षेत्रातल्या इतर कलावंतांना. पण त्यातही घराण्यांच्या पोलादी भिंती आड यायच्या. पण तरीही मनातल्या मनात का होईना, अशा सुंदर गायनाला दाद मिळायची. हेवा वाटायचा आणि त्रासही व्हायचा. कुणाच्या गळय़ात हे सौंदर्याचं चांदणं हलकेच उतरून येईल, हे कधीच सांगता येत नाही. पण अशा चांदण्यात न्हाऊन निघणाऱ्यांना जो स्वर्गीय आनंद व्हायचा, त्यानं वेड लागायला व्हायचं. बालगंधर्वानी असं सगळय़ांना वेड लावलं होतं.
चेहऱ्याला रंग लावून, त्या त्या व्यक्तिरेखेचा कपडेपट सांभाळून रंगभूमीवर एक कल्पित सत्य साकारायचं आणि त्यात समोर बसलेल्या प्रत्येकाला गुंतवून आणि गुंगवून टाकायचं, ही काही सोपी गोष्ट नाही. बालगंधर्वाना हे सारं सहजसाध्य झालं. कसं झालं, ते त्यांनाही समजलं नाही. ते कुठूनतरी त्यांच्यात आलं होतं, एवढंच त्यांना समजत होतं. आपल्या गळय़ातून असं देखणं शिल्प कसं साकारलं जातं, याचं कधीकधी त्यांनाही कोडं पडत असे. पण त्याचं खरं इंगित (बालगंधर्वाच्याच भाषेत) ‘मोठे गंधर्व’ असलेल्या बखलेबुवांच्या शिकवणीत होतं. घराणेदार तालीम मिळालेल्या बुवांनी बालगंधर्वाना पलटे मारत बसायला लावलं नाही. रियाज करायचा तो बैठकीच्या गाण्याचा, पण त्यासाठीची तयारी मात्र घोकंपट्टीची नाही, असा त्यांचा खाक्या होता. ‘देवगंधर्व’ या पुस्तकात बालगंधर्वाचा जो लेख समाविष्ट करण्यात आला आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे, की ‘एकदा असं झालं, की मास्तर कृष्णरावांना (फुलंब्रीकर) शिकवीत असताना मी जवळच होतो. बुवांना कोठे बाहेर जावयाचे होते. त्यांनी ‘हा पलटा १०० वेळा घोक’ म्हणून सांगितला आणि ते बाहेर गेले. मास्तरांकडे मी वशिला लावला व म्हटलं, की मला हा पलटा बसवून द्या. त्यांनी सांगायला सुरुवात करून मी म्हणू लागलो. मध्येच बुवांचं काहीतरी विसरलं असावं, म्हणून ते परत आले व मी पलटा म्हणण्याच्या भानगडीत आहे हे ऐकलं. त्यांनी आत येऊन मला ‘गुरुप्रसाद’ दिला व बजावलं की पुन्हा असं करशील, तर मी शिकवणार नाही. तेव्हापासून आजतागायत मी नोटेशनच्या भानगडीत पडलो नाही.’
गंधर्वाच्या गाण्यानं सगळय़ांवर जी मोहिनी घातली, तिचं वर्णन करणारं भरपूर लेखन प्रसिद्ध झालं आहे. ते सगळं वाचताना वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, म्हणजे काय याचा अनुभव येतो. हा दिव्यत्वाचा साक्षात्कार शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा तो खटाटोप किती कष्टप्रद होता, हेही समजतं. ज्या काळात कलांना समाजात स्थान नव्हतं, त्या काळात हे गंधर्वगान अवतरलं आणि एका वेगळय़ाच सामाजिक प्रतिष्ठेची किरणप्रभा फाकू लागली. प्रत्येकाचा ध्यास आणि श्वास होणं, ही तेव्हा अप्रूपाची गोष्ट. बालगंधर्वानी पहिल्यांदा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला ‘स्टारडम’ म्हणजे काय असतं, याची जाणीव करून दिली. कलावंताला, त्यातही नाटकातल्या, स्त्रीपार्टी करणाऱ्या पुरुष नटाला, लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ होता येणं, ही कल्पनाही कुणाला शिवत नव्हती. गाणं न कळणाऱ्यालाही या व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण वाटावं, असं काही जादुई वातावरण तेव्हा निर्माण झालं. पदार्पणातच झोतात येण्याची सोय असलेल्या आजच्या जमान्यात या वातावरणाची कल्पनाही करता येणार नाही. एखाद्या रूपवान स्त्रीला लाजवेल, असं सौंदर्य बालगंधर्वानी आपल्या ठायी रुजवलं होतं. मुळातच सुंदर असले, तरी ते खुलून येणारी आदब त्यांनी कमावली होती. रंगमंचावर अवतरलेल्या या रूपमतीला पाहण्यासाठी जेवढी गर्दी होत होती, तेवढीच त्यांच्या गायनाच्या अमीट गोडीची चव चाखण्यासाठीही! आपण ‘स्टार’ आहोत, याची पुरेपूर जाणीव बालगंधर्वाना किती असेल ठाऊक नाही, पण कलेच्या प्रांतातील प्रत्येकाला हेवा वाटावा, अशा या ‘स्टारपणा’नं तेव्हाचं वातावरण भारलेलं असायचं. एरवी खाकी हाफ पँटमध्ये वावरणाऱ्या बालगंधर्वाचे अस्फुट दर्शनही आयुष्य सार्थकी लागल्याचं समाधान द्यायचं. अनेक दिवस मग त्या दर्शनाचीच चर्चा घरीदारी व्हायची. कुणा खानदानी घरात हळदीकुंकवाच्या निमित्तानं स्त्रीवेषात जाऊन बालगंधर्वानी उडवलेली धमाल हा तेव्हाचा सार्वत्रिक चर्चेचा विषय होता. त्यांची प्रत्येक कृती हे एक ‘स्टेटमेंट’ होतं. त्यांच्यासारखं लुगडं नेसता यावं, म्हणून कितीतरी घरांमध्ये कितीतरी स्त्रिया आरशासमोर तासन्तास रेंगाळायच्या. त्यांच्यासारखे दागिने ल्यायला मिळावेत, हे सगळय़ांचं स्वप्न होतं आणि त्यांच्यासारखी सहसुंदर, विनासायास समेवर येणारी तान आपल्याही गळय़ात असावी, अशी हजारोंची तमन्ना होती. त्यापूर्वी कधीही घडून आला नाही, असा एक प्रकारचा ‘हिस्टेरिया’ होता तो! समांतरतेपुरतं बोलायचं, तर आजच्या काळातील अमिताभ बच्चन किंवा मायकेल जॅक्सन यांच्याभोवती असणाऱ्या वलयाची, अस्तित्वात आलेली ती पहिली सगुण- मूर्त कल्पना होती.
गंधर्व या एका शब्दानं केलेली ही जादू तेव्हा पूर्णत: नवी होती. कलेच्या अपूर्व आविष्कारातून मिळणारी दाद त्या कलावंताला कलाबाहय़ जगातही केवढय़ा उंचीवर नेऊन ठेवते, याचा तो एक आविष्कार होता. गंधर्वानी हे जे उपभोगलं, ते आपल्याही वाटय़ाला यावं, यासाठीची अनेकांची धडपड तेव्हा समाजानं पाहिली. तेव्हा ना चित्रपट होता ना टीव्ही. सगळय़ांपर्यंत सहजपणे पोहोचण्याचं कुठलंच साधन नसताना केवळ आपल्या कलेवर हे असं ‘स्टारडम’ प्राप्त करणं ही दुष्प्राप्य गोष्ट बालगंधर्वानी साकार केली. आज त्यांच्या जन्माला सव्वाशे र्वष (२६ जून १८८८) होत असताना आणि वयाच्या पंचविशीत त्यांनी स्थापन केलेल्या ‘गंधर्व नाटक मंडळी’ची शताब्दी ( ५ जुलै १९१३) साजरी होत असताना त्यांच्या या ‘हीरोवर्शिप’ची आठवण न होती तरच नवल! सगळय़ांच्या स्वप्नात जाण्याचं भाग्य त्यांच्या वाटय़ाला आलं होतं. कलावंताला सामाजिक प्रतिष्ठा मिळणं आणि त्यातून कलांच्या विकासाला मदत होणं यासाठी अनेकांनी अनेक र्वष प्रयत्न करून जे जमलं नसतं, ते बालगंधर्वानी साहजिक करून दाखवलं. त्यांच्यामुळे नंतर आलेल्या चित्रपटांच्या रुपेरी दुनियेतल्या अनेकांना प्रसिद्धीच्या झोताचा अर्थ समजावून सांगणारे बालगंधर्व हे पहिले ‘स्टार’ होते!