रुजुवात : अंतरीच्या गूढगर्भी सांग तू आहेस का? Print

मुकुंद संगोराम, शनिवार, ७ जुलै २०१२
mukund.sangoram@expressindiacom
‘कोहम’- आपण कोण, कुठून आलो,  हे प्रश्न मानवी प्रज्ञेच्या विकासाइतकेच जुने..  पृथ्वीवर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तिच्या जन्माच्या कुळकथेत रस असणं स्वाभाविक आहे. देवकण सापडला, पुढं काय, असा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुतूहल शमल्याच्या जाणिवेनं एकदा तरी अपूर्व आनंद झाला असेल..

तेराव्या शतकात जो जे वांछील तो ते लाहो अशी कामना करणाऱ्या ज्ञानेश्वरांना पृथ्वीवरील समस्त प्राणिमात्रांबद्दल असलेली आस्था आणि या ग्रहाच्याही पलीकडे असलेल्या विश्वाची चिंता होती. हा ग्रह कसा निर्माण झाला, तेथील जीवसृष्टी कशी निर्माण झाली, त्यामागील वैज्ञानिक कारणे काय होती, याच्या पलीकडे जाऊन विश्वाचे आर्त त्यांच्या मनी प्रगटले होते. देवकणाचा शोध हा असा समस्त प्राणिसृष्टीच्या या चराचरातील वास्तव्याच्या मुळाशी जाणारा आहे. मानवाच्या इतिहासात त्याच्या ठायी प्रज्ञेचा उगम झाल्यापासून तो सतत फक्त कोडी उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला सतत काही प्रश्न पडत आहेत आणि तो जिद्दीच्या रेटय़ानं त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी पहिल्यापासून त्याला निसर्गत: मिळालेल्या जिज्ञासेला अभिवादन करायला हवे. सारे काही आपोआप घडतं, आपण फक्त निमित्तमात्र असतो, असं तत्त्वज्ञान निर्माण करून खरं तर माणसानं स्वस्थचित्त व्हायला हरकत नव्हती. आकाशात तरंगणारा शुभ्र गोळा म्हणजे काय आहे, याचा शोध घेत असतानाच माणसानं, त्याला आपल्या जगण्यात हक्काचं स्थान देऊन टाकलं होतं. तो चंद्र त्याचा जिवाभावाचा सखा झाला होता. चंद्रावर पाणी आहे की नाही, तेथेही आपल्यासारखीच माणसं आहेत की नाही, असल्या प्रश्नांची उत्तरं शोधणारी माणसं, त्यांच्या जिज्ञासेची पूर्ती करत होती. पण त्याहीपलीकडे जाऊन समग्र मानवजातीला सर्वात जवळ असलेला चंद्र नावाचा अक्षय मित्र ही त्याच्यासाठी फार मोठी देणगी होती. विश्वनिर्मितीचं गूढ ही जशी माणसाच्या जगण्याच्या मुळाशी जाण्याची विजिगीषा होती, तशीच हे गूढ उकलल्यानं त्याला मिळणारी ‘तसल्ली’ त्याच्यासाठी अधिक महत्त्वाची होती. मंगळावर पाणी आहे, म्हणून आपण तेथील यानंच्या यानं भरून पृथ्वीवर पाणी थोडंच आणणार आहोत? पण हे कळणं आपल्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं, कारण या पृथ्वीवरील प्राणिजगतामध्ये फक्त माणसाला मिळालेलं प्रज्ञेचं, जिज्ञासेचं आणि कल्पनेचं वरदान.
रोज टबमध्ये अंघोळ करणाऱ्या प्रत्येकाला टबमधून पाणी बाहेर पडल्याचं कळत होतं, तसं प्रत्येकाला आकाशात फेकलेली प्रत्येक वस्तू फिरून खाली येते, हेही माहीत होतं. पण आर्किमिडीज आणि न्यूटनला जे कळलं ते इतरांपेक्षा वेगळं होतं. नुसतं वेगळं नव्हतं, तर त्यांच्या मनातील प्रश्नांच्या मालिकेला आणखी बळ देणारं होतं. भारतीय तत्त्वज्ञानात ‘कोहम्’ असा प्रश्न विचारून त्याची अनेकांगी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न झाला, पण त्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगशाळा नव्हती. होती ती मनाची आणि मेंदूची प्रयोगशाळा. मी कोण, मीच या पृथ्वीवर कसा आलो, माझं इथं अवतरण्याचं प्रयोजन काय, मी नेमकं काय करणं अपेक्षित आहे, अशा नानाविध शंका माणसाच्या मनात यायला लागल्या, तेव्हाच खरंतर त्याचा मेंदू प्रगल्भ व्हायला लागला. जे मिळेल, ते खावं, जमेल तसं जगावं असं करून पाहिल्यानंतरही काही तरी राहतंय, असं वाटणं हे फक्त माणसाच्या नशिबी होतं. प्राणिजगतातील इतरांनीही बहुधा ही जबाबदारी फक्त माणसाच्या डोक्यावर टाकून शांत राहायचं ठरवलं असावं. मी कोण याचं उत्तर प्रत्येकचजण आपापल्या परीनं शोधत राहिला. कुणाला त्यासाठी आपल्याच पूर्वसुरींच्या अनुभवाचा आधार घ्यावासा वाटला तर कुणाला त्याविना मुळापासूनच सर्वकाही तपासण्याची गरज वाटली. या पृथ्वीवरील प्रत्येक कणाला मिळणारे वजन ज्या अद्भुत कणामुळे प्राप्त होतं, तो कण एकदा का कळला, की मग सारं विश्वच आपल्या मुठीत येईल, असं वाटणारा माणूस काही एकटादुकटा नव्हता. असं वाटणारे अनेकजण चारी टोकाला विखुरलेल्या भागात होते. सगळ्यांना एकच समस्या होती आणि सगळ्यांनाच त्याचं उत्तर मिळवायचं होतं. या अद्भुताच्या दुनियेची ही सफर एकत्रितपणे करायची, तर देशांच्या भौगोलिक आणि राजकीय सीमा पार करणं फारच आवश्यक होतं. एरवी रोजच्या रोज फुटकळ कारणांसाठीही या सीमांचं रक्षण करण्यासाठी चवताळून एकमेकांवर धावून जाणाऱ्यांकडे तरीही माणसाच्या मनाच्या अगदी खोल गाभ्यातली चिंता समजण्याचं भान होतं. त्यामुळेच तर जगातले वैज्ञानिक एकत्र आले आणि त्यांनी या अज्ञाताच्या प्रवासाला एकत्रितपणे प्रस्थान ठेवायचं ठरवलं. विज्ञानानं देवाच्या अस्तित्वाला आव्हान दिलं, तरी माणसामध्ये असलेल्या अज्ञाताविषयीच्या बालसुलभ शंकांना अव्हेरलं नाही. शंकांच्या निरसनासाठीच त्यानं बाह्या सरसावल्या आणि पुन्हा पहिल्यापासून न थकता, विश्रांती न घेता प्रयत्नांना आरंभ केला.
कुणी म्हणालं, पृथ्वीच्या उदरात अशी प्रयोगशाळा उभारून तेथे पृथ्वीचा जन्मसोहळा साजरा करायचा, तर पृथ्वी जन्मतेवेळी झाला, तसा अतिप्रचंड विस्फोट होऊन सारी पृथ्वीच नष्ट होईल, तेव्हा असले प्रयोग करणे हा शुद्ध मूर्खपणाच आहे. कुणाला वाटलं, की पृथ्वीचा जन्मच मुळी दोन वस्तूंच्या टकराटकरीतून झालेला नाही. सारे विश्व स्थितीवादी असून पृथ्वीच्या जन्माचे कारण आणखीनच वेगळं असलं पाहिजे. असं कुणाकुणाच्या म्हणण्याला विरोध करण्याऐवजी आपलं हे संशोधन सुरू ठेवणं, ही साधीसुधी गोष्ट नव्हती. अतितेज बुद्धीच्या मोजक्या माणसांना एकत्रित ठेवण्याचा जसा हा अनोखा प्रयोग होता, तसाच त्यांच्याकडून एकाच दिशेने चिंतन घडवून आणण्याचाही होता. मी कोण या प्रश्नाचं उत्तर जसं श्रीकृष्णानं दिलं, तसंच शंकराचार्यानीही दिलं. प्रेषित महंमदानं आणि कारुण्याची महामूर्ती असलेल्या येशू ख्रिस्तानं, नंतरच्या काळातील गौतम बुद्धानं, महावीरांनी आपापल्या परीनं याच प्रश्नाचा शोध घेतला. हे सारे मानवी मनाचे संशोधक होते. त्यांना मानवाच्या कल्याणाची चिंता होती. मानवामध्ये चिरस्थायी स्वरूपात असलेल्या पाशवी वृत्तींच्या जागी त्यांना मंगलकामनांची स्थापना करायची होती. समग्र प्राणिजगाचंच भलं व्हावं, अशा कल्पनांनी भारलेल्या या साऱ्या समाजनेत्यांना पृथ्वीच्या उदरातील आणि या विश्वाच्या अनंत अवकाशातील घनदाट काळोखाचा शोध घेण्यासाठी आपल्याच मनाची प्रतिकृती सापडली आणि मग हा स्व चा शोध सुरू झाला. बाह्य जगातील आक्रमणांबरोबरच अंतर्मनातल्या खळबळींचा हा शोध कोहम्पर्यंत येऊन ठेपला.
बाह्य जगाच्या निर्मितीच्या शोधातही हा ‘स्व’चाच शोध लपलेला होता. एवढे सगळे शास्त्रज्ञ एकत्र येऊन जे काही शोधण्याचा प्रयत्न करत होते, ते सापडल्याचा दावा त्यांनी केला, तरी त्यांच्या लगेचच हेही लक्षात आलं की, अजून शोध संपलेला नाही. मी आणि माझेपण ज्या वस्तुमानातून आकाराला येतं, तेही आता शोधायला हवं. पृथ्वीवर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला तिच्या जन्माच्या कुळकथेत रस असणं स्वाभाविक आहे. देवकण सापडला, पुढं काय, असा प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुतूहल शमल्याच्या जाणिवेनं एकदा तरी अपूर्व आनंद झाला असेल. अमुक एक गोष्ट अशीच का, अमुक एक घटना अशीच का घडली असेल, असल्या पार्थिवाच्या जगातील कितीतरी शंकांची उत्तरं माणसं आयुष्यभर शोधत असतात. जयवंत दळवी, श्री. ना. पेंडसे, चिं. त्र्यं. खानोलकर, जी. ए. कुलकर्णी असे अनेक प्रतिभावंत याच तर शंकांनी पछाडलेले होते. माणसाच्या मनाचा तळ शोधता शोधता, ते त्याच्या जगण्यातील अनेक घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत राहिले. एका परीनं हाही अज्ञाताचाच शोध. हा शोध घेण्यासाठी माणसानं संगीत निर्मिलं. शब्दसृष्टी निर्मिली. शोध तरीही सुरूच राहिला. एकाचवेळी बाह्य जगात आणि अंतर्मनातला हा शोध त्याला कैवल्याचा आनंद देतो. तो चाखता येत नाही, हुंगता येत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही. पण संवेदनांची सुखद लहर त्याची जाणीव मात्र करून देते. संशोधनातून ठोस, म्हणजे वस्तुरूप असं काय मिळालं, याचं उत्तर कदाचित लगेच मिळणारही नाही. पण मी कोण, या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेनं टाकलेलं हे पाऊल पुढच्या प्रवासातील निर्वेधतेचं आश्वासन तरी देतं. त्यामुळे अजाण विश्वातील सर्वच गोष्टींबद्दल कमालीची माया आणि जिव्हाळा व्यक्त करण्याएवढी प्रगल्भता तरी व्यक्त होऊ शकते. संत तुकारामांना ‘अणुरणिया थोकडा, तुका आकाशाएवढा’ असं म्हणावसं वाटलं, याचं कारणच चराचरात भरून राहिलेल्या अणुरेणूचं भान त्यांना प्रज्ञेतून आलेलं होतं. ज्ञानेश्वरांच्या काळातील विज्ञानाची स्थिती पाहता, त्यांची पृथ्वी आणि त्यांचे विश्व केवढे होते, हे शोधण्यापेक्षा या विश्वातील सारे दु:ख सहन करण्याच्या क्षमतेची याचना करणारा हा एक माणूस होता, हे अधिक महत्त्वाचं आहे. पृथ्वीचं प्रेमगीत लिहिणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसाठी पृथ्वी हेच स्वप्न होतं आणि तेच सत्यही होतं. जणू हिग्ज बोसोनलाच उद्देशून लिहिलेल्या कवितेत सूर्यकांत खांडेकरांना म्हणावंसं वाटलं.
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?
वादळाच्या साराचे घोर ते तू रूप का?
जीवनी या वर्षणारा, तू कृपेचा मेघ का?
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?
त्या स्वप्नातल्या दुनियेला सत्यात उतरवणाऱ्या हिग्ज बोसोन या देवकणाच्या संशोधनानं काही काळ तरी ‘हलकं हलकं’ वाटेल!