रुजुवात : किती सोशिक, किती कणखर? Print

 मुकुंद संगोराम ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शत्रू समोर नसतो, तरीही माणूस समोरच मरतो.. भीतीने मेंदूचा एक कप्पा गच्च भरला आहे. हे कधीच संपणं शक्य नाही, असा विश्वास देणारी, झोपेत आणि जागेपणीही ही भावना ग्रस्त करणारी. आपल्याही झोळीत हे दु:ख पडू शकतं, या जाणिवेनं त्रस्त होत आपण पुन्हा सूर्योदयाची वाट पाहतो..

कौरव-पांडवांच्या काळात एक बरं होतं. युद्धं वगैरे युद्धभूमीवर व्हायची. आतासारखी रस्त्यावर अकल्पितपणे कुणाच्या लक्षात यायच्या आत नाही व्हायची. युद्ध म्हणजे दूर कुठेतरी, सीमेवर करायचं. एकमेकांवर चाल करून जायचं. एकमेकांविरुद्ध लढून जय-पराजयाचा निर्णय करायचा. महाभारतातल्या युद्धात असंच व्हायचं. सामान्यांना त्याची माहितीही नसायची किंवा कळली, तरी खूप उशिरा कळायची. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे एकमेकांचे शत्रू जागा वगैरे ठरवून आपापलं सैन्य घेऊन तिथं हजर व्हायचे. दिवसभर एकमेकांच्या विरुद्ध लढायचे. अंधारून आलं की युद्ध थांबवायचे. एकमेकांच्या नुकसानीबद्दल रात्री चर्चा करायचे. परत सकाळी युद्धासाठी सज्ज व्हायचे. कोणजिंकलं आणि कोण हरलं, हे ठरवण्यासाठी सर्वमान्य नियम होते. नि:शस्त्रावर शस्त्र चालवायचं नाही आणि युद्धातील नियम मोडायचे नाहीत, असा संकेत होता. त्यामुळे युद्ध सुरू झाल्यावरसुद्धा अर्जुनाला श्रीकृष्णाची गीता ऐकायला वेळ मिळत होता. जगण्याचं निमित्त आणि कारण सांगणारी कृष्णाची आध्यात्मिक चर्चा ऐन युद्धभूमीवर ऐकण्याची सोय असणारं ते युद्ध होतं. दोन राजे एकमेकांशी भांडायचे, तेव्हा त्या दोघांच्याही राज्यातल्या जनतेला काही त्रास व्हायचा नाही. जनता बापडी आपली सगळी कामं शांतपणे करत राहायची. विजय झाला, तर तो सगळेजण मिळून साजराही करायचे. त्याचं कारण आपल्या राजाच्या शूरपणाचा तो एकप्रकारे आदरसत्कार असे. चार-पाच हजार वर्षांत किती सारं बदललं. युद्धाची कारणं बदलली, हेतू बदलले, नियम बदलले आणि नीतीही..
आता युद्ध आपल्या दारात, आपल्या डोळ्यांदेखत होतं. त्यासाठी अतिप्रचंड आकाराचे रणगाडे समोर येऊन उभे ठाकत नाहीत. रणगाडे जाऊच देत, शत्रूदेखील समोर दिसत नाही आणि तरीही युद्ध होत असतं. आपल्या घरातलं, दूरच्या नात्यातलं, ओळखीचं, बिनओळखीचं असं कुणीही रस्त्यावर मरून पडतं. माणूस मेला म्हणून रडताना मनातलं भीतीचं काहूर तशाही स्थितीत तसंच घोंघावत राहतं. सकाळी ‘येतो’ असं सांगून बाहेर पडलेला माणूस रात्रीपर्यंत येतच नाही आणि कळतं, तेव्हा तो रस्त्यावर कुणीतरी बॉम्ब फोडला म्हणून मेलेलाच असतो. मानवी जगण्यातल्या अटळ मृत्यूला असं सामोरं जाण्याची सवय अजूनही आपल्याला झालेली नाही. भारत-चीन किंवा भारत-पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं ते तिकडे सीमेवर. तरीही शत्रूची विमानं आलीच तर त्यांना अंधारात दिसू नये, म्हणून ब्लॅक आऊट वगैरे करायचे. म्हणजे घरातही मिणमिणत्या प्रकाशात बसावं लागायचं. घरातल्या पंधरा व्ॉटच्या फिलॅमेंटच्या दिव्याच्या प्रकाशाची तिरीपही बाहेर जाणं म्हणजे शत्रूला आपलं अस्तित्व दाखवण्याइतकं भयंकर असायचं. म्हणून मग दारं बंद करायची, खिडक्यांना काळे कागद चिटकवायचे आणि भीतीशी खेळत गप्प बसून राहायचं. आपल्या घरातल्या दिव्यामुळे काही हजार फुटांवरच्या शत्रूच्या विमानाला बॉम्ब टाकणं शक्य होईल आणि जणू कधीही बॉम्ब पडेल, अशी ती गोठून टाकणारी भीती. आता मागे वळून पाहताना हसू येतं. पण तेव्हा अगदी नकळत्या वयातही हे सारं मनावर खूप दडपण आणणारं वाटायचं. आता भर दिवसा किंवा रस्त्यावरच्या झगमगाटात शेजारी उभ्या असलेल्या सायकलच्या पुढच्या कॅरियरमध्ये ठेवलेला मिठाईच्या बॉक्ससारखा दिसणारा बॉक्सही बॉम्ब असतो. दूर कुठेतरी उभ्या असलेल्या माणसाच्या हातातल्या उपकरणानं तो फुटतो आणि शेजारी उभ्या असलेल्या कुणालाही सहजपणे मृत्यूला सामोरं जावं लागतं. डोळ्यांना दिसणारी प्रत्येक वस्तू जीवघेणी आहे, असा समज करून घेणं हे नुसतं भयंकर असतं. शूर कोण आणि पळपुटा कोण यातला फरक नाहीसा करणारं हे वास्तव आता आपल्या घरातून अगदी माजघरापर्यंत आलं आहे.
अमेरिकेनं हिरोशिमा, नागासाकी या जपानमधल्या शहरांवर अणुबॉम्ब टाकले तेव्हा जो कल्लोळ झाला, तो माणसाच्या अस्तित्वाशी निगडित होता. हजारो माणसं क्षणार्धात मरून जाणं, ही गोष्ट तेव्हाही अतक्र्य वाटावी अशी होती. आज इतक्या वर्षांनंतर ती ऐकतानाही व्याकुळ व्हायला होतं. कुणाचा कोण, विनाकारण हकनाक मरतो आणि दु:खाचा महापर्वत उभा राहतो! ही बॉम्बफेक जपानवरील रागाचं निमित्त होतं. सामान्यांना वेठीला धरून जपानला शरण यायला लावणारी ही खेळी माणसाच्या अजस्र महत्त्वाकांक्षेचं द्योतक होती. संहार हे युद्धाचं पहिलं लक्षण आणि मानवी संहार हा त्याचा परिणाम. आपला राग व्यक्त करण्याची ही कल्पना इतक्या पातळ्यांवर अस्तित्वात यायला लागली की त्याला धरबंध राहिला नाही. मग ते अमेरिकेतले जुळे मनोरे असोत की सामान्यांची घरं असोत. समजणारी आणि जाहीर स्वरूपाची कारणं असली, तर हे असं काही घडेल, याचा अंदाज तरी असतो. पण कारणही माहीत नाही आणि कशासाठी घडतंय, हेही कळत नाही, तेव्हा विनाअंदाज सतत भीतीच्या अंधारात चाचपडत राहणं, याला काही जगणं म्हणत नाहीत. कोटी वर्षांपासून माणसाचा मेंदू विकसित होतो आहे. त्याच्या मेंदूतल्या अचाट आणि अफाट क्षमतांना बांधून ठेवणं अशक्य वाटावं, अशी ही प्रगती. त्यानं या प्रगतीत जगण्याचे नानाविध अर्थ लावायचा प्रयत्न केला. ते अर्थ जगण्यात रुजवण्याचाही प्रयत्न केला. सहिष्णुता हे मानवी आयुष्यातलं सर्वात मोठं सार असल्याचं याच काळात लक्षात आलं. जीवसृष्टीतल्या एकमेकांचं स्वातंत्र्य जपण्याच्या तत्त्वाचं जगण्यातलं रूप म्हणजे सहिष्णुता. दुसऱ्याला आपल्यासारखंच स्वातंत्र्य हवं असतं, ते टिकवणं हे जसं त्याचं काम असतं, तसंच ते न विस्कटणं हे आपलही कर्तव्य असतं. एका बाजूला मेंदूच्या विकासातून हे सारं बाहेर येत होतं आणि दुसरीकडे सारं जग आपल्याच मुठीत राहण्यासाठी विरुद्ध विचारांनी कब्जा घ्यायला सुरुवात केली होती. ‘माझं ते माझं आणि तुझं तेही माझं’ ही वृत्ती माणसाच्या विकासाचंच लक्षण मानायचं का?
अंधाऱ्या खोलीत कुठूनतरी कानाखाली आवाज निघताहेत आणि असहायपणे आपण ते सहन करतो आहोत, अशी ही अवस्था. शाळेत, कॉलेजात, कार्यालयात, हॉटेलात, मॉलमध्ये, थिएटरात, रस्त्यावर असं कुठेही, कधीही, काहीही घडू शकतं. जगण्याचं सुख मिळवण्यासाठी हवं ते करण्याचं सारं बळ शोषून घेणारं, हतबल, क्षीण आणि उन्मळल्याची ही भावना सगळ्यांचं भान नष्ट करणारी. मुंबईतल्या भर गर्दीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी हादरून जाणारे सारेजण दुसऱ्या दिवशी जगण्याची साधनं शोधत पुन्हा घराबाहेर पडतात आणि जीव मुठीत धरून जगत राहतात, तेव्हा त्यांचंही कौतुक वाटतं. जणू काही घडलंच नाही, अशी ही तटस्थता आणि स्थितप्रज्ञता असते की जगण्यासाठीचं अटळपण? काही घडणार नाही, सगळं कसं सुरळीत चालेल, असा खोटा विश्वास बाळगून पुन्हा धडपड करण्याचं हे सामथ्र्य मेंदूच्या प्रगतीचाच भाग आहे? आपलं जगणं हराम होतंय आणि आपण कुणीही एकटे किंवा सामूहिकपणे त्याचा प्रतिकार करू शकत नाही, ज्यांनी हे सारं काबूत ठेवायचा प्रयत्न करायचा, तेच गळाठलेले. त्यांना त्यांच्याच चिंतांनी इतकं घेरलेलं की तुमच्या माझ्याकडे बघायला फुरसतच मिळू नये. शिवाय सारी शक्ती काढून घेतल्यानंतर येणाऱ्या कोमजलेपणातून निर्माण होणारी भयचकित अवस्था आणि गर्भगळित झाल्याचा अनुभव त्यांच्या वाटय़ाला फारसा येतही नाही. हे सारं तुमच्या आमच्यासाठी. घाबरणं हा आपला हक्क. त्यांच्यासाठी हे असंच घडणार असा ‘अपरिहार्य क्रमबद्धतेचा सिद्धान्त’ हाच खरा.
घडणारं अटळ आहे. तेव्हा ते नाकारण्यापेक्षा त्याला धीरानं सामोरं जायला शिकवताहेत आपल्याला. विरोध करण्याची क्षमता नसल्याचं ठाऊक असल्याने चडफडत राहणं, हेच आपलं प्राक्तन आहे. असुरक्षितता हाच आपला स्थायीभाव आहे. आनंदाच्या प्रत्येक लहरीला दु:खाची झालर आहे, या भीतीने मेंदूचा एक कप्पा गच्च भरला आहे. हे कधीच संपणं शक्य नाही, असा विश्वास देणारी, झोपेत आणि जागेपणीही ही भावना ग्रस्त करणारी. आपल्याही झोळीत हे दु:ख पडू शकतं, आपल्याला घेरू शकतं.. आपल्या मनाचा ताबा घेऊ शकतं या जाणिवेनं त्रस्त होत आपण पुन्हा सूर्योदयाची वाट पाहतो. टीव्हीवरच्या त्याच त्या बातम्यांचं दळण निरासगसपणे पाहात राहतो. मित्र-मैत्रिणींना एसेमेस करून ख्यालीखुशाली विचारतो. एकमेकांची सहनशक्तीची चाचपणी करण्यासाठी फेसबुकवर किंवा ट्विटरवर आपला राग व्यक्त करतो. त्याला प्रतिसादाची अपेक्षा करतो. सतत घुमणाऱ्या कर्णकर्कश कानठळ्या दडे बसलेल्या कानांच्या पडद्यांवर आदळून परत फिरतात. प्रतिध्वनींचा गोंधळ मनात आणखी काहूर माजवतो. किरकोळ बॉम्बस्फोटांचा आपण किती बाऊ करतो?