रुजुवात : अभ्यास आणि प्रसार .. Print

मुकुंद संगोराम, शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मौखिक परंपरेनं चालत आलेलं संगीताचं ज्ञान ग्रंथबद्ध करण्यासाठी विष्णू नारायण भातखंडे देशभर फिरले, अनेक भाषाही शिकले आणि त्या-त्या गायकीच्या खुब्यांमागलं शास्त्र त्यांनी शोधलं. ज्यांचं नाव घेताच ‘गांधर्व महाविद्यालय’ आठवतं, त्या विष्णु दिगंबर पलुस्करांनी संगीतप्रसाराचं कार्य तर केलंच, पण या कलेच्या अभ्यासाची आणि तो करणाऱ्यांची प्रतिष्ठाही महत्त्वाची मानली. त्या दोघांचं हे स्मरण..


प्रदीर्घ संगीत परंपरेचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक भारतीयाने आणि त्यातही प्रत्येक मराठी माणसाने पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पंडित विष्णू नारायण भातखंडे या दोन नावांचा जपच केला पाहिजे. नावे मराठी असली तरीही त्यांचे काम जागतिक स्तरावरचं आहे आणि ते आजही तेवढंच महत्त्वाचं आहे. पलुस्करांना जगण्यासाठी फक्त ५९ वर्षे मिळाली आणि भातखंडेंना ७७. एवढय़ा कालावधीत दहावीस प्रज्ञावानांनी एकत्र येऊन जेवढं काम घडलं असतं, तेवढं या दोघांनी प्रत्येकी स्वतंत्रपणे केलं आहे. भातखंडे यांच्या स्मृतीचे हे पंचाहत्तरावे आणि पलुस्करांच्या जन्माचे १४० वे वर्ष. दोघेही समकालीन आणि संगीताच्या एकाच क्षेत्रात राहून, परस्परपूरक असं काम करूनही एकमेकांचा हात हातात न धरणारे. विष्णू दिगंबरांनी संगीताच्या प्रसाराचं जे काम केलं, ते आजही टिकून आहे. महाराष्ट्र ही संगीताच्या क्षेत्रातील काशी झाली, त्याचं एक कारण पलुस्करांचा संगीत प्रसार हे होतंच; पण त्याहूनही अधिक महत्त्वाचं आणि सहसा दुर्लक्षिलं गेलंलं त्यांचं काम म्हणजे बदलत्या काळाबरोबर कलावंतांची घसरत चाललेली प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्याचं. दोघांनी एकत्र येऊन संगीताच्या प्रसाराचं आणि संगीताच्या संशोधनाचं काम करायचं ठरवलं आणि ‘ही योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे बाबतीत या दोघा महापुरुषांचा मतभेद झाला’, असे प्रा. बी. आर. देवधर यांनी लिहून ठेवलं आहे. दोघांनाही एकमेकांच्या कार्याबद्दल कमालीचा आदर असला, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून केवळ हावभावातूनच एकमेकांबद्दलचा क्षीण राग व्यक्त होत असे.
उस्ताद आणि पंडित
बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर ग्वाल्हेरला जाऊन भारतीय संगीताचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत महाराष्ट्रात न येता, तिकडेच फिरत राहून मोठे गवई म्हणून नावारूपास आले असते, तर महाराष्ट्राच्या संगीताच्या कामगिरीवर मोठाच परिणाम झाला असता, कारण मग पलुस्करांना त्यांचे शिष्य होता आले नसते आणि तोवर भारतात स्थायिक झालेल्या उस्तादी परंपरेला आव्हान देण्याची क्षमता ना पलुस्करांकडे येती, ना भातखंडय़ांना त्याबद्दल संशोधन करण्याची ऊर्मी! मिरजेच्या महाराजांचे दरबारी गायक असलेल्या बाळकृष्णबुवांना, पलुस्करांना शिकवावं लागलं, ते महाराजांच्या आज्ञेमुळे. पलुस्करांचे वडील शेजारच्या सांगली संस्थानातील अधिकारी. लहान वयात विष्णू दिगंबरांचे डोळे अधू झाल्यानंतर उपचारासाठी सांगलीच्या महाराजांच्या विनंतीवरून मिरजेच्या महाराजांनी त्यांची जबाबदारी स्वत: घेतलेली. राजवाडय़ातच मुक्काम आणि बाकी काही करता येणं शक्य नसल्यानं संगीताचं शिक्षण करणं पलुस्करांना भाग पडलं. पण मुळात त्यांना गाण्यात रस होताच आणि बाळकृष्णबुवांसारखा साक्षेपी आणि मैफली गवयाकडून मिळालेलं शिक्षण त्यांच्यासाठी फारच मोठी शिदोरी होती. पलुस्करांनी वयाच्या पंचविशीतच आपण संगीतकार व्हायचं हा निर्णय पक्का केला होता आणि त्यांनी तो इतका सार्थ केला की त्यामुळे भारतीय पंडिती परंपरेतल्या सगळ्याच कलावंतांच्या अंगावर मूठभर मांस चढलं.
थाटाचे ‘लक्ष्यसंगीत’
भातखंडे उच्चशिक्षित होते, म्हणजे त्यांनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. पण संगीत हाच त्यांचा प्राण होता. पंडिती परंपरा लयाला चालली असल्याचे तीव्र दु:ख त्यांना सलत होतं आणि त्यामुळे त्यांनी संगीताच्या अभ्यासाला प्रारंभ केला आणि त्यात डोंगराएवढं काम केलं. तोवर संस्कृत ग्रंथांचाच काय तो आधार होता. भातखंडय़ांनी मग संस्कृतमधूनच ‘लक्ष्यसंगीत’ हा ग्रंथ लिहिला. त्याचा बोलबाला व्हायला लागल्यावर हळूच त्यांनी तो आपणच लिहिल्याची कबुलीही देऊन टाकली. पण मराठीचा जाज्वल्य अभिमान असल्यानं आयुष्यात कधीही अन्य भाषेत न लिहिण्याचं त्यांनी ठरवलं. तरीही त्यांची थोरवी भारतवर्षांत सर्वदूर पसरलीच.
संगीत म्हणजे पाण्यावरची अक्षरं. व्यक्त होताहोताच लयाला जाणारी. टिकतो तो फक्त अनुभव. ध्वनिमुद्रण ऐकल्यासारखी सगळी मैफल मेंदूत साठवून ठेवणं केवळ अशक्य असल्यानं, पाण्यावरची ही नक्षी निर्माण होत असताना मिळणारा कैवल्याचा आनंद हेच त्यातून मिळणारं समाधान. भातखंडय़ांनी त्यातलं शास्त्र शोधायचा प्रयत्न केला. रागांची रूपं, त्यांचे स्वभाव, त्यातील स्वरांची ठेवण, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि त्यातून होणारी सौंदर्यनिर्मिती हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यासाठी देशभर सतत फिरून त्यांनी प्रचंड माहिती गोळा केली. ते अभ्यासक आणि संशोधक असले, तरी ते मनातून कलावंत होते. त्यामुळे या माहितीचं विश्लेषण करताना त्यांनी दाखवलेला सौंदर्याचा विचार थक्क करायला लावतो. रागांचे स्वभाव लक्षात आल्यावर त्यांचा एक समूह दिसायला लागतो आणि त्या समूहातील राग एकमेकांशी कसं सख्य ठेवून असतात, हेही लक्षात येतं. भातखंडय़ांनी त्यातून ‘थाट’ या कल्पनेला पुष्टी दिली. वकील असणाऱ्यानं गाणाऱ्यांना शिकवू नये, असं सांगत त्या काळातल्या सगळ्या बडय़ा गवयांनी त्यांची थट्टा केली. क्वचित टीकाही केली. पण हे गृहस्थ जराही हलले नाहीत.
मुंबईतल्या वाळकेश्वराच्या मंदिरात राहूनही देशभर यात्रा करीत संगीत शोधणाऱ्या या माणसानं आपल्या या प्रवासाची सविस्तर टिपणं ठेवली. त्या रोजनिशीच्या पहिल्या पानावर स्वत:साठीच काही नियम लिहून ठेवले. त्यात, ‘हा प्रवास संगीत संशोधनासाठी असल्यामुळे उगीच जुन्या इमारती व इतिहासप्रसिद्ध ठिकाणे पाहण्यात वेळ घालवायचा नाही, तसेच एकमेकांच्या आदरातिथ्यात व जेवणपाटर्य़ाच्या नादात वेळ दवडायचा नाही.  विद्वान गायक किंवा संगीतशास्त्रज्ञ यांचा पत्ता कोणाकडून मिळाल्यास, ते राहत असलेली ठिकाणे दूरवर असली तरी तेथे जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून माहिती मिळवायची’, अशा नियमांचा समावेश होता. मूळच्या ध्येयापासून आपण ढळता कामा नये, म्हणून स्वत:वर बंधनं घालून घ्यायची ही तऱ्हा काही औरच होती. सुमारे १८०० बंदिशींचे स्वरलेखन करणाऱ्या भातखंडय़ांनी त्यासाठी स्वरलेखन पद्धत तयार केली. त्या काळात म्हणजे १९३० साली अहमदाबादेत असलेल्या क्लेमंट या इंग्रज अधिकाऱ्याच्या फिल-हार्मोनिक सोसायटीतर्फे आयोजित संगीत परिषदेत भारतीय संगीतात पाश्चात्त्य स्टाफ नोटेशनचा स्वीकार करण्याचा ठराव पास व्हायचा होता. भातखंडय़ांचा त्याला विरोध होता, पण त्यांच्याकडे संस्थात्मक बळ नव्हतं. विष्णू दिगंबर पलुस्करांना हे कळलं, तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना सांगून आपण अहमदाबादेत येत असल्याची वर्दी देणारी मोठाली पोस्टर्स छापून शहरभर लावण्याची आज्ञा केली. त्याचा परिणाम क्लेमंटसाहेबानं आपली संगीत परिषदच रद्द करण्यात झाला.
कलावंताची प्रतिष्ठा
विष्णू दिगंबरांकडे भविष्यकाळाचा वेध घेण्याची क्षमता होती. मैफली गायक म्हणून भारतात दिगंत कीर्ती मिळाली, तरी त्यांनी आपले ध्येय शिक्षणप्रसार हेच ठेवलं आणि त्यातूनच गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली. पाकिस्तानातील लाहोर शहरातील मध्यवस्तीत गांधर्व महाविद्यालयाची पाटी अगदी अलीकडेपर्यंत दिमाखात दिसत होती. भारतभरातील अनेक शहरांमध्ये आजही संगीताचे शिक्षण देणारे हे पहिले विद्यापीठ कार्यरत आहे. कलावंत म्हणून आपली काही प्रतिष्ठा असली पाहिजे, यावर पलुस्करांचा कटाक्ष असे. ते स्वत: अतिशय दिमाखात राहात असत. त्यात श्रीमंती भपकेपणा नसला तरीही खानदानी आब होती. गाणाऱ्याला ‘पोटासाठी काय करता?’ असा प्रश्न विचारला जात होता, त्या काळात विष्णू दिगंबर मोठय़ा आवाजात ‘हम संगीतकार हैं’ असं खणखणीत उत्तर द्यायचे.
लग्न-मुंजीत गायला जायचं नाही आणि गाण्याची अप्रतिष्ठा होऊ द्यायची नाही, असा त्यांचा दंडक होता, त्यासाठी ते त्या काळी पाचशे रुपयांची बिदागी मागत. पलुस्कर स्वत: ग्वाल्हेर घराण्याचे. जयपूर घराण्याचे संस्थापक अल्लादिया खाँसाहेबांनी गंडा बांधण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केल्याबद्दल कुणीतरी विष्णू दिगंबरांकडे कागाळी केली. तेव्हा ते काही विरोधी बोलतील, अशी सांगणाऱ्याची अटकळ असावी. पण त्यांनी अल्लादिया खाँ यांचेच कसे बरोबर आहे, हे पटवून दिलं. कुणा कलावंतानं जास्त बिदागी मागितली, तर पंडितजी खूश व्हायचे, कारण त्यामागे गायकाला मिळणाऱ्या प्रतिष्ठेचं समाधान असे. काळाबरोबर राहण्याचं त्यांचं भान अचाट होतं. पाश्चात्त्य संगीताचे अभ्यासक प्रा. जिओव्हानी स्क्रिंझी यांनी भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचा अभ्यास करण्यासाठी देऊ केलेल्या शिष्यवृत्तीसाठी पलुस्करांनी त्यांचे शिष्य प्रा. बी. आर. देवधर यांची योजना केली आणि दोन्ही संगीताचा अभ्यास घडण्यास चालना दिली. जिथे जिथे लोकांचा मेळा तिथे तिथे संगीताने पोहोचले पाहिजे, हा त्यांच्या संगीत प्रसाराचा पाया होता. त्यासाठी राजकीय लोकांशी आणि सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवणं त्यांना आवश्यक वाटत असे. त्यामुळेच स्वातंत्र्य चळवळीचाही संगीताशी संबंध जोडणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं. संगीताचा विविधांगानं अभ्यास आणि प्रसार करणाऱ्या या दोन महान विभूतींचं ऑगस्ट महिन्यातच स्मरण करून त्यांना वंदना देणं याला फार वेगळं मोल आहे.