रुजुवात : निर्णयाची धांदल.. Print

 

मुकुंद संगोराम, शनिवार, १ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

शास्त्रज्ञांना आता असं लक्षात यायला लागलं आहे की, अलीकडच्या काळात निर्णय फार घाईत घेतले जातात आणि त्याचं कारण आधुनिक तंत्रज्ञान हे आहे.. कार्यक्षमतेचे निकष तंत्रज्ञानानं बदलले हे खरं, पण निर्णय घेतानाही ते घाईनंच होऊ लागले तर त्याला कार्यक्षमता म्हणावं का?


बुद्धिबळाचा खेळ काही फार ‘प्रेक्षणीय’ नसतो. समोरासमोर तासन्तास बसून त्या पटावरच्या सोंगटय़ांकडे पाहात बसणाऱ्या त्या दोन खेळाडूंच्या डोक्यात काय कोलाहल चाललाय, ते सामान्य प्रेक्षकाला कळत नाही. कोण कोणती खेळी खेळेल याचे आडाखे बांधत बसण्याचाही कंटाळा यावा, असा हा बुद्धीचा खेळ. आपल्या प्रत्येक खेळीचा काय आणि कसा परिणाम होईल, याचा विचार करूनही त्या दोघांमधला एकजण हरतोच. निर्णय चुकतो म्हणजे समोरच्या बुद्धिबळपटूला जो विचार करता आला तो आपल्याला करता आला नाही एवढंच. पण त्यामुळे जयपराजयाचा निकाल लागतो. आयुष्यात प्रत्येकालाच दरक्षणी काही ना काही निर्णय घ्यावे लागतात आणि त्यासाठी तो काही ना काही विचार करतच असतो. पण हा विचार बहुतेक वेळा नेहमीच्या सवयीने केलेला असतो. बहुतेकदा अशा निर्णयाचा बरावाईट परिणाम फक्त आपल्यावरच होत असतो. इतरांना त्याची झळ बसण्याची शक्यता नसते. पण जेव्हा आपला निर्णय अनेकांच्या जगण्याशी किंवा भवितव्याशी निगडित असतो तेव्हा आपण किती विचार करतो? शास्त्रज्ञांना आता असं लक्षात यायला लागलं आहे की, अलीकडच्या काळात असे निर्णय फार घाईत घेतले जातात आणि त्याचं कारण आधुनिक तंत्रज्ञान हे आहे. मोबाइल असो की इंटरनेट, आपल्याला प्रत्येक गोष्ट क्षणार्धात घडायला हवी असते. या तंत्रज्ञानानं आपल्या जगण्यातली शांतता हरवत चालली आहे, अशी टीका होत असली तरीही त्यांच्यावाचून आपलं जगणं ‘जगणं’ होत नाही, ही वस्तुस्थिती नाकारण्यात काय अर्थ आहे? एकाच आयुष्यात इतकं सारं करायचं असतं आपल्याला की वेळ कसा पुरवायचा, असा प्रश्न पडतो. पुस्तकं वाचायची असतात, सिनेमे पाहायचे असतात, गाणी ऐकायची असतात, मित्रांशी गप्पा मारायच्या असतात, हॉटेलिंग करायचं असतं, स्वैर भटकायचं असतं. कधी करणार हे सगळं, अशा चिंतेत वेळ कसा जातो ते कळत नाही आणि तेही फार उशिरा लक्षात येतं.
डावीकडे जाऊ की उजवीकडे असा विचार करत लोडालाच टेकून बसणाऱ्यांची संख्या जगात कमी नाही. काय करावं, असा प्रश्न तर हरघडी प्रत्येकाला पडत असतो. निर्णय घेण्यातला उशीर बऱ्याचदा परवडणारा नसतो, त्यामुळे काय केलं तर योग्य होईल? असा त्यामागचा विचार असतो. तंत्रज्ञानानं जगणं सुकर होतं, ज्या गोष्टीसाठी बराच वेळ खर्च करावा लागतो, ती गोष्ट अतिशय कमी वेळात करता येते, कमीतकमी श्रमात अनेक गोष्टी घडवता येतात, हे सगळं खरं आहे. पण निर्णय घेण्याच्या मेंदूतील केंद्राला अनुभवाचं संचित साठवून योग्य वेळी त्या पोतडीतून मागील अनुभवाचं स्मरण घडणं, हे गेल्या काही दिवसांत झटपट होत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे खरा. औद्योगिक क्रांती सुरू झाली तीच मुळी माणसाच्या शरीराला आणि मेंदूलाही काही अंशी विश्रांती मिळावी म्हणून. (दिवसभर राबून लाकडं तोडण्यापेक्षा यंत्राच्या साह्य़ानं त्या लाकडांची सुबक कापणी शक्य होते. श्रम वाचतात आणि वेळही.) सुरुवातीला श्रमांची आणि वेळेची बचत याचंच अप्रूप वाटणाऱ्या माणसाला आपण या सगळ्या औद्योगिकीकरणाला किती शरण जातो आहोत, हे लक्षातच आलं नाही. ती त्याची त्या वेळची गरज होती. संगणकाच्या क्रांतीनंतर तर स्मरणशक्तीला ताण देण्याचीही गरज माणसाला वाटेनाशी झाली. शून्य ते नऊ असे आकडे बोटानं फिरवून दूरध्वनी करणाऱ्यांची आकडय़ांची स्मरणशक्ती जबरदस्त होती. दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवण्यासाठी तेव्हा अतिशय सुबक अशा डायऱ्या मिळत असत. प्रत्येक घरातल्या दूरध्वनीच्या यंत्राजवळच ती डायरी सापडेल, अशा ठिकाणी ठेवली जात असे. (आणि तरीही ती हव्या त्या वेळी सापडत असेच असे नाही!) आता स्वत:चा मोबाइल क्रमांकही अनेकांच्या लक्षात राहत नाही. इतरांचे क्रमांक लक्षात ठेवण्याची जबाबदारी आपण मोबाइलवर टाकून मोकळे होतो आणि आपलं यंत्र हरवलं किंवा चोरीला गेलं की कपाळाला हात लावून बसतो. घरातल्या पुस्तकांमध्ये हल्ली खुणेचे कपटे नसतात. कारण पुस्तक शोधत बसण्यापेक्षा इंटरनेटवर हवी ती माहिती क्षणार्धात मिळू शकते आणि ती कागदावर छापून झटकन हाती येऊ शकते. पुस्तकांमधली माहिती साठवून मेंदूचा मोठा भाग व्यापण्याची गरज आता वाटत नाही. नातेवाइकांचे वाढदिवसही आपण मोबाइलला अलार्म लावून लक्षात ठेवण्याची व्यवस्था करतो. शाळेत कॅलक्युलेटर वापरायला अगदी अलीकडे सुरुवात झाली. तोवर १३, १९, २३, २९ चे पाढेच काय, पण दीडकी, औटकीसारखे महाभयानक राक्षस तोंडपाठ करावे लागत. गुणाकार, भागाकार करताना जो ‘हातचा’ असायचा तो हातातल्या बोटात साठवून ठेवायला लागायचा. तो विसरला की गणितात शून्य. एरवी सगळ्या परीक्षा म्हणजे स्मरणशक्तीचाच खेळ. ऐन वेळी आठवलं नाही की महागोची. म्हणजे आपणच आपल्या मेंदूला कधी, काय नक्की आठवायचं याचं सतत स्मरण द्यायचं, असला हा प्रकार अजूनही त्याच गतीने सुरू आहे. मोठाल्या परीक्षेत उत्तरं लिहिताना पुस्तकं जवळ ठेवायची परवानगी असते असं जेव्हा कळलं, तेव्हा गंमत वाटली. अधिकृतपणे कॉपी करण्याची परवानगी हे प्रकरण जरा वेगळंच होतं. नंतर कळायला लागलं की हजार पानांच्या त्या ठोकळ्यात कोणत्या पानावर काय लिहिलं आहे, हेही अखेरीस लक्षातच ठेवावं लागतं.
शांतपणे एखाद्या बाबीच्या सर्व बाजू तपासून त्यांचा अभ्यास करून मग एखाद्या निर्णयाप्रत येण्याएवढा अवधी आता माणसाच्या हाती राहिलेला नाही. जगणं जेवढं वेगवान होत आहे, तेवढाच निर्णय घेण्याचाही वेग असणार हे स्वाभाविकच आहे. पण जगणं वेगवान व्हायला ज्या अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या, त्यात तंत्रज्ञानाने आविष्कृत केलेल्या अनेक उपकरणांचा वाटा मोठाच म्हणायला हवा. संरक्षणशास्त्रातील धोरणकर्ते असणाऱ्या जॉन बॉईड यांना मात्र अजूनही ससा आणि कासवाचीच गोष्ट कालसुसंगत आहे, असं वाटतं. निर्णय घेताना एखादा क्षण थांबलं, तर बराच मोठा फरक पडतो, असं त्यांचं निरीक्षण आहे. बॉईड हे स्वत: वैमानिक होते आणि त्यांना असं वाटतं की निर्णय घेण्यास अगदी कमी वेळ हाती असतानाही, पाव सेकंद मागे राहण्याने अचूक निर्णय घेण्यास मदत होते. त्यांनी निर्णयप्रक्रियेला मदत करणारं एक तंत्रही विकसित केलं आहे. निरीक्षण, माहितीचं विश्लेषण, निर्णय आणि कृती अशा चार टप्प्यांचा त्यात समावेश आहे. त्यांचं सूत्र एकच आहे, ते म्हणजे निर्णय घेताना लागणाऱ्या उशिराचेही नियोजन करायला आपण शिकलं पाहिजे. अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ प्रा. फ्रँक पार्टनॉय यांनी या विषयावर बरंच संशोधन केलं आहे. आधुनिक तंत्रज्ञान माणसाला घाईने निर्णय घ्यायला भाग पाडतं. त्यामुळेच माणूस प्राणिपातळीवरील प्रेरणांनुसार झटपट निर्णय घेतो. त्याचे दूरगामी परिणाम होतात. निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो, याचं भान तंत्रज्ञानामुळे आपण गमावतो आहोत की काय, असं वाटायला लागतं. पूर्वीचे अनुभव, त्या वेळची आणि आताची परिस्थिती, निर्णयाचे संभाव्य परिणाम याचा विचार करण्यासाठी जो आवश्यक वेळ लागतो, तो देण्यास आपण तयार नसतो. तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर त्याला कारणीभूत आहे, असं पार्टनॉय यांचं म्हणणं. पृथ्वीवरील अन्य प्राण्यांपेक्षा माणसाचं वेगळेपण त्याच्या मेंदूच्या विकासात आहे. प्राणिमात्रांना परिसराचं आणि संकटाचं भान असतं. माणसाला परिस्थितीचंही भान असतं. स्वत:च्या आणि इतरांच्या पूर्वानुभवाचा उपयोग करून तो वर्तमानातील समस्या सोडवू शकतो. डोळे, नाक आणि कान या इंद्रियांतून मेंदूपर्यंत जाणारी संवेदना साठवून ठेवून तिचा भविष्यात उपयोग करण्याची क्षमता माणसाच्या मेंदूच्या विकासाने निर्माण झाली. पण तिचा वापरच करायचा नाही, असं ठरवलं तर निर्णय घेताना अनेकदा अडखळायला होणारच. निर्णय घेण्याची घाई माणसाला अडचणीत आणते आणि त्याची दुरुस्ती करताना त्याची दमछाक होते. संगणकाचं बटण दाबताक्षणीच तो सुरू व्हायला हवा आणि इंटरनेटवर विषय नोंदवल्यावर पापणी लवण्याच्या आत हवी ती माहिती पडद्यावर दिसायला हवी, अशी आपली अपेक्षा असते. नव्या पिढीला ट्रंककॉल ही एक ऐतिहासिक कल्पना वाटेल. पण दूरच्या गावी दूरध्वनी करण्यासाठी तासन्तास ताटकळणाऱ्या त्या पंचवीस वर्षांपूर्वीच्या काळातील स्थितिशीलता तंत्रज्ञानाने घालवून टाकली. आता जगात कुठंही क्षणात संपर्क साधता येतो, माणसांशी पडद्यावर भेटता येतं. चर्चा करता येते, अनुभवांची देवाणघेवाण करता येते. हे सगळं किती वेगानं घडतं, यावर त्याची कार्यक्षमता ठरते. पण निर्णयदेखील लवकर घेणं, यालाच जर कार्यक्षमता म्हणायचं असेल, तर ती तात्पुरतीच राहणार, असं तज्ज्ञांना वाटतं. भविष्याचा वेध घेण्याची माणसाची क्षमता अशी तंत्रज्ञानाने मुळीच वाया जाता कामा नये.