रुजुवात : ही शर्यत रे अपुली.. Print

मुकुंद संगोराम - शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नव्या जागतिक परिस्थितीत कासव व्हायचं की ससा, हे ठरवताना आपल्याला काय हवंय, याची जाणीव सार्वजनिकरीत्या व्यक्त होणं अधिक आवश्यक असतं.. नाहीतर या शर्यतीत कुणाचीतरी फरपट होणार..
जन्मल्यापासून मरेपर्यंत ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ अशी आपली अवस्था झाली आहे! सतत कुणाच्या ना कुणाच्या पुढे धावण्याची ही शर्यत संपण्याची शक्यता नाही. काय जिंकायचं आहे, कशासाठी जिंकायचं आहे, यापेक्षा जिंकायचं आहे, एवढीच सूचना मेंदूला मिळाली असल्यानं जगातले सगळेजण धापा टाकताहेत.

सगळीकडे आपण पुढे असलं पाहिजे, या कल्पनेनं सगळय़ांना इतकं पछाडलं आहे, की असं पुढे असण्यानं नेमकं काय मिळणार आहे, याचा विचार करण्याची क्षमताही सगळेजण गमावून बसण्याची शक्यता आहे. एकटय़ानं स्वत:शीच स्पर्धा करण्याची खरंतर गरज नसते. तरीही हे करायला हवं, ते मिळवायला हवं. तसं झालं नाही, तर फार नुकसान होईल, असं झालं, तर खूप काही मिळाल्याचं समाधान मिळेल, अशा वाटण्यानं सगळय़ांचं जगणं अतिशय श्रमलं आहे. जगातल्या अनेकांना अशा स्पर्धा लावण्यात खूप मौज वाटत असते. कोण कुठल्या क्रमांकावर आहे, याचा शोध घेत कुणाला चढवायचं आणि कुणाला फसवायचं, याचे आडाखे बांधण्यातच त्यांना समाधान वाटत असतं. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत ही स्पर्धा इतकी अटीतटीची व्हायला लागली आहे, की त्यामुळे आपलं जगणं हराम आहे की काय असं वाटायला लागलं आहे. चीन आपल्या पुढे चाललाय, म्हणून भारतानं चिंता करायची आणि आपण भारतालाही मागे टाकलं म्हणून ब्राझीलसारख्या छोटय़ा देशानंही फुशारकी मारायची. कुणाला सुखाचा आणि समाधानाचा निर्देशांक वाढवायचा असतो, तर कुणाला स्पर्धात्मक युगात पहिल्या क्रमांकावर राहायचं असतं. जगातल्या १४४ देशांमधल्या स्पर्धात्मक परिस्थितीचा आढावा ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या संस्थेनं नुकताच जाहीर केला. कोणत्याही मानवी समूहात स्पर्धा किती निकोप आहे, याचा हा शोध होता. ही स्पर्धा निर्माण करताना ते ते देश कोणत्या प्रकारची तयारी करतात, कसले वातावरण तयार करतात, त्यासाठी कसे प्रोत्साहन देतात यावर त्या देशातील स्पर्धा कशा प्रकारच्या आहेत, याचा अंदाज येतो. या आढाव्यात भारताचा क्रमांक खाली घसरणार, हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नव्हतीच. भारतापेक्षा लहान असलेल्या ब्राझीलनं पुढे जाऊन भारताचं नाक खाजवलं, म्हणून आपण नाराज व्हायचंही कारण नाही, कारण अमेरिकेचाही क्रमांक खाली गेला आहे आणि चीनचाही. तेव्हा आपल्या बोटीत आणखीही काहीजण आहेत!
निकोप स्पर्धा हे एक मायाजाल असतं. गेल्या दोन दशकांत या नावाखाली व्यवस्थापनशास्त्रानं भरपूर धुमाकूळ घातला आहे. व्यावसायिक संस्थांमध्ये चांगल्या, दर्जेदार आणि कार्यक्षम व्यक्तींना प्रोत्साहन कसं देता येईल, यावर जगातले हे तज्ज्ञ सतत चिंतन करत असतात. या चिंतनातून निर्माण होणाऱ्या नवनवीन कल्पना जगाच्या मानगुटीवर बसतात. पर्यायानं, ‘चांदोबा’तल्या वेताळाच्या गोष्टीप्रमाणे स्पर्धेचं हे भूत अगदी जन्मल्यापासून पाठीवर बसवलं जातं आणि मरेपर्यंत ते उतरत नाही. वर्गातल्या प्रत्येक मुलानं पहिला क्रमांक कसा काय मिळवायचा, असा प्रश्न कुणाला पडत नाही. सगळेच पहिले आले, तर मग त्यातला परत अधिक हुशार कोण हे कसं ठरवायचं? वगैरे प्रश्न परत येतातच. ही स्पर्धा सुरू होते, अमुकच शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे इथपासून. मग कधी ती पैशानं जिंकली जाते, तर कधी वशिल्यानं. शाळेनंतर कॉलेज आणि नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी परत अशीच स्पर्धा. मग नोकरीत गेल्यानंतर प्रमोशनसाठी आणि व्यवसायात इतरांपेक्षा अधिक यश मिळवण्याची स्पर्धा. यातली कुठलीही स्पर्धा निकोप असतेच असं नाही. शाळेतच निरागसतेला सुरुंग लावणाऱ्या या स्पर्धेमुळे नवे प्रश्न निर्माण व्हायला लागले आहेत. वर्गात पहिल्या येणाऱ्या मुलाबद्दल इतर मुलांच्या मनात खरंतर आदरच असतो. निरागस वयात वर्गातल्या आपल्या मित्रांबद्दल स्पर्धेची भावना तीव्र झाली, ती अगदी अलीकडच्या काळात. नकला करणाऱ्या मुलाला वर्गात नेहमीच डिमांड असते. अभ्यासू मुलाला क्वचितप्रसंगी पुस्तकी कीडा म्हणून टिंगलीलाही सामोरं जावं लागतं. आता मात्र मुलांमध्ये ‘असूया’ हा उपद्रवी घटक वाढीस लागला आहे. पालक, शिक्षक, क्लासवाले, परीक्षा घेणारे असे सगळेजण या मुलांमध्ये स्पर्धेची एक भयानक भीती निर्माण करत असतात. ही भीती त्याला आयुष्यभर छळत राहते, काहीवेळा त्यामुळे त्याच्यामध्ये असलेले गुण बाहेर यायलाही घाबरतात आणि तो स्वत:च्या कोशात जातो. देशातील वातावरण हा या सगळय़ा प्रकरणातला एक भाग आहे. समाजाची बदलत असलेली मानसिकता हा त्याचा खरा पाया आहे.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने केलेली पाहणी ही आर्थिक विकासाच्या संदर्भातली होती. जगातल्या कोणत्या अर्थव्यवस्था विकसित पावत आहेत आणि त्याची कारणं काय, हा त्या अभ्यासाचा गाभा होता. आर्थिक विकास हे समाजजीवन सुखी होण्याचं एक महत्त्वाचं इंजिन असतं. औद्योगिकीकरणानंतरच्या काळात पाश्चात्त्य देशांनी हा बदल अनुभवला. त्यामुळेच नवं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपोआप अनुकूल वातावरण तयार झालं.मूलभूत संशोधन करून त्याचं व्यावसायिक रूपांतर करणं जसं त्यामुळे घडू लागलं, तसंच माणसाच्या अभिजात प्रेरणांचा शोध घेण्याचं कार्यही व्हायला लागलं. मग माणूस चंद्रावर गेला, त्यानं पाठवलेलं यान मंगळावरही गेलं. पृथ्वीच्या जन्माचं गूढ उकलण्यासाठी जगातल्या अनेक संशोधकांना एकत्र आणून अब्जावधी रुपये खर्च करून त्यानं भूगर्भात प्रयोगशाळा निर्माण केली. या सगळय़ा प्रयत्नातून नवं काही सापडल्याचा प्रत्येक क्षण माणसाचं जगणंच गर्भश्रीमंत करून टाकतो. संगीतकाराला एखादी नवी चाल सुचणं, कवीला कविता सुचणं आणि विचारवंताला नव्या ज्ञानाचा साक्षात्कार होणं, या गोष्टी माणूसपण अधिक समृद्ध करत असतात. तिथं पहिलं येण्याची शर्यत नसते की काही मिळवण्याचा हव्यास नसतो. असतो तो ध्यास. शर्यत लावून पहिलं येण्यासाठी जिवाचा आकांत करून विकास साधणाऱ्या अर्थव्यवस्था हे जसं जगातलं एक वास्तव आहे, तसंच निराकार, निरामय शांतता मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे माणसाचे सारे प्रयत्न हे एक स्वप्न आहे.
जगातल्या कोणत्या देशात अधिक सुखी लोक आहेत, असाही एक अभ्यास मध्यंतरी झाला. जे देश सुखी आहेत, तिथं माणसाच्या मूलभूत प्रेरणांना वाव मिळणारं वातावरण आहे, असं त्यात दिसून आलं. बदलत्या सामाजिक परिस्थितीनं आणि सांस्कृतिक क्षेत्रात घडणाऱ्या उलथापालथीनं माणसाला एका अजस्र वाहनाला जुंपलं गेलं आहे. हा गाडा ओढत नेताना त्याची जी ओढाताण होते आहे आणि त्यातून मुक्त होण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याला जगण्याची सारी सुखं शरीरानं अनुभवायची आहेत आणि त्यापलीकडे जाऊन आत्मज्ञानाचीही मशागत करायची आहे. ससा आणि कासवाच्या गोष्टीत धपापलेला ससा हरला आणि निवांत कासव जिंकलं. पण हे फक्त गोष्टीतच घडतं. कारण ती गोष्ट जिंकण्याहरण्याची नाही. नव्या जागतिक परिस्थितीत कासव व्हायचं की ससा, हे ठरवताना आपल्याला काय हवंय, याची जाणीव सार्वजनिकरीत्या व्यक्त होणं अधिक आवश्यक असतं. भ्रष्टाचार आणि सार्वजनिक पातळीवरील अनैतिकता ज्या समाजात उजळ माथ्यानं वावरू शकते, त्या समाजात अशी जाणीव निर्माण व्हायलाही वेळ लागतो. स्पर्धात्मकता हा जर आजच्या माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असेल, तर ती अधिक निकोप करण्याचा प्रयत्न करायला हवा. पण निकोप स्पर्धेत एकमेकांच्या ताकदीबद्दल आदरभाव असतो, जगाचं नवं भान स्वीकारण्याची क्षमता असते. हे नवं भान शर्यत अटळ असल्याचंच सांगत असेल, तर ते स्वीकारताना आपण आपल्या क्षमता कणाकणानं वाढवणं एवढंच आपल्या हाती राहतं. भारत काय किंवा ब्राझील काय, जगाच्या संदर्भात आपण नेमके कुठं आहोत, हे आपल्याच देशवासीयांना स्पष्टपणे सांगण्याची हिंमत जोवर सत्ताधाऱ्यांमध्ये येत नाही, तोवर आपणच बलाढय़ असल्याची फुशारकी खरी वाटत राहते. सतत शर्यत खेळत राहायची आणिजिंकण्याची मनीषा ठेवायची, हा आता नवा जागतिक खेळ आहे. ‘दो बिघा जमीन’मधल्या बलराज सहानीची धडपड निव्वळ जगण्याची होती. मानानं जगण्याचीही नव्हती. काळ बदलला तरी नुसती जगण्याची धडपड करणाऱ्यांची संख्या जगात आजही प्रचंड आहे. एकतृतीयांश जग भुकेलेच आहे आणि उरलेल्या जगाला इतर अनेक समस्यांनी घेरलं आहे. त्याला पिळवणुकीपासून ते जातिभेदांपर्यंत आणि प्रतिष्ठेपासून ते श्रीमंतीपर्यंत अनेक पदर आहेत. शर्यतीत जिंकण्याचं स्वप्न दाखवून दमछाक करणं ही आजची सामाजिक स्थिती आहे. भुताची भीती भिणाऱ्यालाच वाटते. घाबरायचं की शूरपणे सामोरं जायचं हे ठरवणं आपल्या हाती आहे. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’, असा शोध घेताना स्वत:च्या मनालाही प्रश्न विचारण्याचं भान त्यासाठीच आवश्यक आहे.