रुजुवात : स्वल्पविराम, विसर्ग, उद्गारवाचक.. Print

 

मुकुंद संगोराम - शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भाषा बोलल्यासारखी लिहायची नाही, ही सक्ती आधी मोडली गेली; आता संगणकाच्या सोयी वापरून विरामचिन्हंही  कमी होऊ लागली!  विरामचिन्हांना विरामच मिळणार की काय?
साधं चार ओळींचं पत्र लिहायचं, तर हल्ली हात थरथरायला लागतात. म्हणजे भाषा येत नाही म्हणून नव्हे, तर आपल्याला येणारी भाषा लिहिताना गडबड होण्याची भीती वाटते म्हणून. व्याकरण ही भाषा बोलणाऱ्यांचा आणि लिहून वापरणाऱ्यांचा प्रांत नसला तरी त्याशिवाय आपण भाषा वापरू शकत नाही. व्याकरण हेच भाषेच्या व्यवस्थेचं दुसरं नाव.

शाळेत शिक्षक भाषा शिकवतात, म्हणजे धडे वाचून दाखवतात. त्यातल्या अवघड, म्हणजे तोपर्यंत कानावर न पडलेल्या शब्दांचे अर्थ समजावून सांगतात. मग काय समजलंय, ते तपासण्यासाठी प्रश्न विचारतात. अर्थ कळला असेल तर उत्तर लिहिणं सोपं जातं; पण निबंध वगैरे लिहायची वेळ आली की मग पाचावर धारण बसते. जागेपणी सतत वापरत असलेली भाषा अक्राळ-विक्राळ रूप धारण करून समोर उभी ठाकते तेव्हा, तिला शरण जायचं, की तिच्यावर आरूढ व्हायचं ते कळत नाही. एकूण सारीच पंचाईत होते. चार वाक्य सुसंगत लिहायची, तर ही रोजच्या वापरातली अक्षरं भूत बनून नाचायला लागतात आणि मग म्हणायचं काय होतं आणि लिहून काय झालं, याचा मेळ लागत नाही. या सगळ्या अक्षरांच्या मध्येमध्ये कडमडणारी चिन्हं तर डोक्याला वैताग आणतात. तो स्वल्प विराम काय किंवा अर्ध विराम काय, उद्गार चिन्ह काय किंवा अवतरण चिन्ह काय; ही सगळी भुतं ही भाषा लिहिण्याच्या भानगडीत इतकी नाकं खुपसतात की अक्षरांची भाषा आणि भाषेचं व्याकरण हे एक अतिशय जगडव्याळ रूप वाटू लागतं.
अगदी मराठी भाषा घेऊन बी. ए., एम. ए. झालेल्यांनाही ही चिन्हं किती सतावतात ते  त्यांच्या चार ओळी वाचतानाही सहज लक्षात येतं. त्यांचं त्यावर समर्थन असं असतं, की अर्थ तर कळला ना.. अनुस्वार कुठे आहे आणि अर्धविराम का दिला नाही, याला कशाला महत्त्व देता! अगदी साठच्या दशकापर्यंत निदान मराठीपुरतं लिहायची भाषा आणि बोलायची भाषा वेगवेगळी होती. भाषेचं लिखित रूप शुद्धतेचा खूप आग्रह धरत असे. ह. ना. आपटे, नाथमाधव यांच्यापासून ते वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्यापर्यंत सगळे लेखक हा शुद्धतेचा पुरेपूर आग्रह धरत. त्यांचं लेखन वाचताना आपण जी भाषा बोलतो ती किती वेगळी आहे, याचा सतत प्रत्यय येतो. (‘कोसला’ कादंबरीनं हे लेखी भाषेचं गणित बदललं. असे लिहिण्याऐवजी असं लिहिणं सर्वसंमत झालं. नंतरच्या काळात सगळ्याच लेखकांनी बोली आणि लिखित भाषेतलं हे अंतर भरपूर कमी करून टाकलं. जसं बोलतो, तसंच लिहिण्याला मग अधिकृतपणे मान्यताही मिळाली. तरीही हे चिन्हांचं गौडबंगाल मात्र तसंच गूढ राहिलं!) ‘बोले तैसा लिहे’ ही उक्ती तेव्हा सार्वत्रिक पातळीवर अमान्य केली गेली होती. त्यात सगळी विरामचिन्हे कशी जागच्या जागी नीटनेटकी असत. तेव्हा संवाद लिहिताना ‘‘..’’ अशी दोन उलट आणि सुलट अवतरण चिन्हे (अक्षरांच्या तळाशी समांतर वापरताना हेच चिन्ह स्वल्पविराम असतं आणि ते वरच्या रेषेशी समांतर होताच त्याचं अवतरण होतं.) वापरण्याची पद्धत रूढ होती. आता सगळ्यांनी एकत्र येऊन न ठरवताही त्यातले एकेक अवतरण काढून टाकले आणि ‘..’ असं त्याचं रूप करून टाकलं. पण कोणत्याही शब्दाकडे विशेष लक्ष वेधण्यासाठीही हेच रूप वापरलं जात होतं. आता त्यात सहज सरमिसळ झाली आणि संवादासाठी आणि विशेषत्वासाठी एकच खूण वापरून काम भागवायचं ठरलं.
तो अर्धविराम तर सतत डोकं खातो. कधी वापरायचा, ते काही केल्या कळत नाही. स्वल्प विराम म्हणजे , हे चिन्ह आणि अर्धविराम म्हणजे ; हे चिन्ह. या दोन्हीच्यामध्ये आणखी एक विसर्ग म्हणजे : हे चिन्ह. त्याचा अर्थच बहुतेकवेळा कळत नाही. म्हणजे हे चिन्ह कधी वापरायचं, कशासाठी वापरायचं तेच लक्षात येत नाही. जोडरेघेचं म्हणजे इंग्रजीत ज्याला डॅश म्हणतात ते - हे चिन्ह तर इतकं फसवं आहे की त्याचे काय करायचं असा प्रश्न पडावा. स्वल्पविराम तर इतका फसवा की तो कोणत्या शब्दाच्या आधी असायला हवा, याबद्दल सतत संभ्रमावस्था असते. मग कधीही स्वल्पविराम, कोठेही उद्गारवाचक आणि केव्हाही अर्धविराम ठोकून देण्याची नवी पद्धत रूढ व्हायला लागली. प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक यातला फरकच अनेकांना समजेनासा झाला आहे. मराठीत अक्षराचा जेव्हा अर्धा उच्चार करतात, तेव्हा त्या अक्षराचा ‘पाय मोडण्याची’ पद्धत असते. हा पाय कधी मोडायचा, हे केवळ सवयीनंच समजून घेण्याशिवाय पर्याय नसतो, कारण त्याच्या शास्त्रात घुसलं की डोकं भंजाळून जातं. ‘र’ हे असंच एक अक्षर इतक्या विविध पद्धतीनं वापरलं जातं की त्यामुळे भल्याभल्यांची पंचाईत होते. कार्य या शब्दातही ‘र’ असतो आणि कऱ्हा या नदीच्या नावातही ‘र’ असतो. एकाग्रतेमधल्या ‘र’ चं रुपडं आणखीनच निराळं. या सगळ्यापलीकडे रवी मधली एक सरळमार्गी ‘र’ पुन्हा आपलं दर्शन देतच असतो.    
भाषेतल्या अक्षरांना चिन्हांचं रूप मिळालं, तेव्हाच ती लिहिण्याची काहीएक सर्वमान्य पद्धत निर्माण करण्याची गरज वाटली असणार. ‘अ’ ते ‘ज्ञ’ ही देवनागरीतील किंवा ‘ए’ टू ‘झेड’ ही इंग्रजीतील अक्षरमाला काय; त्यात प्रत्येक अक्षराला स्वत:चं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व नसतं. ‘व’ किंवा ‘ए’ सारखा एखादा अपवाद सोडला तर प्रत्येक अक्षराला कोणाच्या तरी संगतीनेच अर्थ मिळतो. संवादासाठी निर्माण झालेल्या भाषेला लिखित रूप देणारा पृथ्वीतलावरील एकमेव प्राणी म्हणून माणसानं मिरवलं खरं; पण गेल्या काही दशकांत या भाषेचं रूप इतक्या झपाटय़ानं बदलू लागलं, की ही सारी चिन्हांची व्यवस्था कोलमडून पडते की काय, अशी शंका यावी. दोन अक्षरांनी एकत्र येणं आणि त्यातून शब्दाची निर्मिती होणं.. या शब्दाला सर्वमान्य अर्थ प्राप्त होणं ही एक व्यवस्था असते. मला जे सांगायचं आहे, ते वाचणाऱ्याला तसंच्या तसं कळणं हा या व्यवस्थेचा पाया आहे. अर्थाचा अनर्थ न होता, होणाऱ्या संवादासाठी लिहिणारा आणि वाचणारा या दोघांनीही ही व्यवस्था आणि तिचे नियम मान्य करण्याची गरज असते. ते अमान्य करायचं ठरवलं की मग आपोआप विसंवादाला जागा मिळते. भाषा जोवर लिहिली जात होती, तोवर म्हणजे अगदी वीस पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत, तिच्या सगळ्या शास्त्राला काही अर्थ होता. त्याबाबत आग्रह (कधीकधी दुराग्रहही.) होता.
टाइपरायटर आल्यानंतर इंग्रजीनं लिहिण्याच्या बाबतीत कात टाकली नाही, पण संगणकाच्या क्रांतीनंतर या सगळ्या चिन्हांनाच विराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली. भाषेतल्या शब्दांचं वजन कमीजास्त करण्याची अद्भुत सोय संगणकानं करून दिली. वाक्यातल्या एखाद्या शब्दाकडे मुद्दाम लक्ष वेधण्यासाठी अवतरण चिन्ह वापरण्याऐवजी तो शब्द ठळक अक्षरात लिहिता येऊ लागला. त्याला वेगळ्या रंगात सादर करणं किंवा त्याची वळणंही बदलणं शक्य होऊ लागलं. मुळात लिहिताना होणारी अक्षरांच्या वळणाची हेळसांड कमी झाली आणि प्रत्येक शब्द कसा सुंदर होऊनच समोर येऊ लागला. (पण हातानं लिहिलेल्या शब्दांच्या वाटावळणांमधून प्रतीत होणारं त्या लेखकाचं व्यक्तिमत्त्व मात्र हरपलं!) जोडरेषेला संगणकावर अक्षराच्या तळाशी समांतर असणाऱ्या रेषेचा (इंग्रजीतील अंडरस्कोअर वा अंडर-स्लॅश्ड) पर्याय आला. आपल्याकडे धनादेश लिहिताना आकडय़ांच्या पुढे उभी तिरपी रेघ आणि त्यापुढे जोडरेष मारण्याची पद्धत आहे. संगणकीय भाषेत या उभ्या तिरप्या रेषेला (स्लॅश) फारच महत्त्व प्राप्त झालं. शब्दांपुढच्या तीन टिंबांनी मराठीतली अभिव्यक्ती बदलली आणि जो तो, उठल्यासुटल्या तीन टिंबं मारून आपण कसे लेखकराव आहोत, हे सिद्ध करू लागला. चिन्हांची संख्या काही अक्षरमालेएवढी नाही. अर्धा डझन चिन्हांनी भाषेच्या जंगलात जो धुमाकूळ घालायला सुरुवात केली, त्यानं जंगलातलं प्रत्येक झाड माहीत असणारा वाटाडय़ाही घाबरून गेला. पूर्ण विरामाला पर्यायच नसल्यानं तो दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पण हे अर्धविराम, विसर्ग, उद्गारवाचक आणि अवतरणं यांनी मात्र भाषेच्या वापराबद्दल दडपण निर्माण करायला सुरुवात केली. गणितातली प्रमेय सोडवताना किंवा वर्गमूळ काढताना जसा घाम येतो, तसंच या चिन्हांमुळेही होतं. हे चिन्हांचं ‘अर्थवाही’ जग समजून घेण्याची गरज कुणाला वाटत नाही. शाळेतल्या चिमुकल्या जगात ते समजावून सांगू शकतील असे शिक्षक आता फार राहिलेले नाहीत. ज्यांना त्याबद्दल तळमळ आहे, त्यांचं ऐकायची कुणाची तयारी नाही. चिन्ह विराम हे तर भाषेचं भविष्य नसेल?