रुजुवात : शक्यतांच्या कल्पना.. Print

 

मुकुंद संगोराम - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

काळ, स्थळ आणि व्यक्ती यांच्या एकत्रित अभ्यासातून इतिहासाच्या शक्यता जोखून पाहायच्या की दस्तऐवज आणि पुराव्यांवरच अवलंबून राहायचं? यापैकी शक्यतांचा मार्ग अनेक इतिहासकारांनी मान्य केलेला आहे. लोकमान्य टिळकांचा आवाज म्हणून ऐकवलेली ध्वनिमुद्रिका त्यांच्याच आवाजातली आहे की नाही, या वादाचा विचार करताना अशा शक्यता आणि अनुमान यांना काहीच महत्त्व नाही का?
शाळेच्या वयात इतिहासाच्या पुस्तकातल्या सनावळय़ा झोप आणायला पुरेशा ठरत. प्लासीची लढाई आणि लॉर्ड कर्झन यांच्याबद्दल काही घेणंदेणं नसतानाही त्यांच्या संदर्भातील र्वष पाठ करण्यावाचून गत्यंतर नसे.

परीक्षेत नेमकी सनावळीच विचारली जायची आणि पाठांतर हमखास कामाला यायचं. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी १ ऑगस्टला असते आणि त्या दिवशी शाळेत त्यांच्याबद्दल भाषण करण्याचं फर्मान दरवर्षी शिक्षक काढीत. त्यांच्या टरफलाच्या गोष्टीचा तर तोपर्यंतच कंटाळा आला होता. मग ते अभ्यास सोडून वर्षभर व्यायाम कसे करत राहिले, याचं कौतुक वाटायला लागलं. पण वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी ‘केसरी’ हे नियतकालिक सुरू केलं आणि जनतेला शहाणं करून सोडण्याचा निश्चय केला. रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, मोबाईल असं काही उपलब्ध नसतानाही, वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी साऱ्या देशभर त्यांचं नाव झालं आणि काँग्रेस नावाच्या संघटनेच्या स्थापनेसाठी टिळकांच्या पुण्याची निवड देशपातळीवर व्हावी, एवढं सारं पुण्यात बसून त्यांना कसं काय जमलं, याची चर्चा करण्यातच हल्ली वयाची चाळिशी येते. शाळेबरोबरच इतिहासाशीही फारकत झाल्यानं नंतरच्या काळात सनावळीतून सुटल्याचीच भावना असायची. अशा मानसिक अवस्थेत लोकमान्य टिळकांचा आवाज ध्वनिमुद्रित झाला असून तो ऐकायला मिळण्याच्या शक्यतेनं काही क्षण मोहरून जायला झालं. ते एकदीड मिनिटांचं भाषण ऐकल्यानंतर इतिहासाच्या पुनर्भेटीचा आनंदही झाला. पण काहीच दिवसांत त्या आनंदावर विज्ञानप्रेमींनी विरजण टाकलं आणि तो आवाज टिळकांचा नसल्याचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं ठणकावून सांगून टाकलं. तो आवाज टिळकांचा नसेलही, पण ते भाषण मात्र टिळकांचंच असणार, याबद्दल पक्की खात्री असल्यानं खरं काय, याचा कोलाहल माजला.

कोणत्या तंत्रानं टिळकांचा आवाज ध्वनिमुद्रित झाला, असा हा कळीचा प्रश्न आहे. ध्वनिमुद्रणाचे अभ्यासक सांगतात, की टिळकांचा हा आवाज इलेक्ट्रिकल पद्धतीनं ध्वनिमुद्रित झाला आहे. हे तंत्रज्ञान त्यांच्या निधनानंतर अस्तित्वात आल्यानं तो त्यांचा असणं शक्य नाही. वस्तुस्थिती म्हणून हे मान्य करण्यावाचून पर्याय नसला, तरीही जे दीड मिनिटांचं भाषण त्या ध्वनिमुद्रिकेत आहे, ते टिळकांशिवाय अन्य कुणी करण्याची शक्यता नाही. गणेशोत्सवात भास्करबुवा बखले यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये उपस्थित श्रोत्यांनी काहीसा व्यत्यय आणण्यास सुरुवात केल्यावर त्यांना अक्षरश: झापल्याचं या आवाजातून स्पष्ट होतं. ‘ऐकायचं नसेल, तर चालते व्हा’ असं ठणकावून सांगण्याची तेव्हा कुणाची हिंमत असेल? असा अधिकार तिथं उपस्थित असलेल्यांपैकी कुणाकडे असण्याची सुतराम शक्यता नाही. हा आवाज निश्चित कुणाचा? या प्रश्नाला तंत्रज्ञानाच्या आधारानं उत्तर मिळण्याची शक्यता नाही. तो दुसऱ्या कुणाचा असू शकेल, अशीही शक्यता नाही. म्हणजे असं भाषण कुणी ध्वनिमुद्रित करण्याचं खरंतर काही कारण नाही. ज्या ईश्वरदास नारंग यांच्या संग्रहात हे ध्वनिमुद्रण उपलब्ध झालं, ते संगीताचे प्रेमी होते आणि त्यांनी बालगंधर्व, उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्यासारख्या त्या काळातील अनेक दिग्गज कलावंतांचं ध्वनिमुद्रण करून ठेवून संगीतावर अपार उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी बखलेबुवांचं ध्वनिमुद्रण केलेलं नाही, असं इतिहास सांगतो. ‘मी उशिरा जन्माला आलो हे माझं पाप. नाहीतर मला भास्करबुवा ऐकायला मिळाले असते’, असे नारंग यांचेच शब्द आहेत. मग त्यांनी टिळकांचा आवाज ध्वनिमुद्रित करत असतानाच बुवांचं गाणंही रेकॉर्ड करून ठेवलंच असतं, यात शंका नाही. या ध्वनिमुद्रिकेत ते गाणं नाही. फक्त आवाज आहे. अर्थ एवढाच, की हे ध्वनिमुद्रण नारंग यांनी केलं असणं शक्य नाही. मग ही ध्वनिमुद्रिका त्यांच्याकडे कशी बरं आली? ती दुसऱ्या कुणी तरी दिली नसेल? हेही शक्य आहे. तेव्हाच्या उपलब्ध तंत्रात सार्वजनिक ठिकाणी ध्वनिमुद्रण करणं सहजसोपं नव्हतं, हे मान्य केलं तरी अन्य कुणी अन्य कोणत्या तंत्रज्ञानाच्या साहय़ानं असं काही केलं नसेल कशावरून? बुवांचे शिष्य मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचा हा आवाज असेल, अशी शक्यता व्यक्त होते. ती साफच चुकीची म्हटली पाहिजे. कृष्णराव आपल्या गुरूंबद्दल असं काही बोलणं शक्य नाही. त्या काळातील नकलाकार भोंडे यांनी टिळकांच्या आवाजात अनेक नकला ध्वनिमुद्रित केल्या आहेत. त्या ऐकल्यानंतरही हे भाषण त्यांच्या नकलेच्या आवाजातलं नाही, याची खात्री पटते. शिवाय भोंडे असले ‘विषय’ नसलेले टिळकांचे भाषण नक्कल म्हणून कशाला करतील? हाही प्रश्न आहेच!
इतिहास दोन कालबिंदूंना जोडण्याचं काम करतो. हे कालबिंदू अनेक पुराव्यांच्या आधारे निश्चित केले जातात. पुराव्यांच्या विश्वासार्हतेपासून ते त्या कालबिंदूच्या परिसरात घडलेल्या अन्य घटनांच्या पुराव्यांपर्यंत अनेक प्रकारच्या चाचण्यांमधून इतिहासाला जावं लागतं. तरीही त्याच्या लेखनात लेखक डोकावतच नाही, असं छातीठोकपणे म्हणता येत नाही. तरीही तटस्थपणे सर्व शक्यता व्यक्त करण्यासाठी पुराव्यांचा उपयोग करणारे इतिहासकार लेखनात आपली प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा पुरेपूर उपयोग करीतच असतात. पुरावा नाही, म्हणून एखादी घटना घडलीच नाही, असं म्हणणं तर्काला धरून होत नाही हे जसं खरं, तसं केवळ कल्पनाविलासही कामी येत नाही, हेही तेवढंच खरं. तरीही जिथं पुरावा नाही, तिथं शक्यतांचा विचार आपोआपच पुढे येतो. या शक्यता कोणकोणत्या असू शकतील, यावर इतिहासकाराची सर्जक शक्ती काम करायला लागते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी याबाबत लिहिलंय, की ‘मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचं वर्णन द्यावयाचं म्हटलं म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार कालानं व स्थलानं विशिष्ट कसा झाला आहे हेही इतिहासकाराला स्वाभाविकपणेच सांगावं लागतं. सारांश, काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची सांगड, तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते.’ लोकमान्यांच्या आवाजाबाबत नेमकं हेच घडलं आहे.
त्या दिवशीच्या भाषणात टिळक म्हणाले होते, की ‘बखलेबुवा यांच्या गायनास सुरुवात झालीच आहे. लोकांनी शांतपणे ऐकावं अशी माझी इच्छा आहे. कुणी गडबड केली, तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं. पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे.’ समाजातल्या सर्व घटकांशी टिळकांचा असलेला भावसंबंध ही भारतीय इतिहासातील एक अतिशय हृद्य गोष्ट आहे. संतपरंपरेतील सर्व संतांचा समाजाशी असा संबंध जडला होता. याच परंपरा काळातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याबद्दल त्या वेळच्या समाजात असलेला आत्मविश्वास ही केवळ अपूर्व अशी गोष्ट होती. समाज सहसा, अशा लोकोत्तर व्यक्तींचंच ऐकतो. ‘गाणं ऐकायचं नसेल तर बाहेर जावं’ असं ठणकावण्यासाठी असा भावसंबंध दृढ करावा लागतो. तो झाल्यानंतर त्या समाजावर अप्रत्यक्षपणे प्रभुत्व प्रस्थापित होतं. त्यामुळेच असं सांगण्याचा अधिकारही प्राप्त होतो. टिळकांनी तो प्राप्त केला असल्यानंच ते श्रोत्यांना गप्प बसा असं दटावू शकत होते. आजच्या काळात समाज कुणावर विश्वास ठेवत नाही व त्यामुळेच कुणाचं ऐकत नाही, याचं कारण समाजावर आपल्या कर्तृत्वानं प्रेमळ वचक निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारी निर्ममता, पारदर्शकता आणि वैचारिक सखोलता असणारा नेताच नाही. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील या गुणांचा दुष्काळ आताच्या वातावरणात दिसत असल्यामुळेच समाजधुरीण ही संस्था बरखास्त झाली आहे. ज्यांच्यावर विश्वासून राहावं, त्यांचेच पाय मातीचे असल्याचं लक्षात येतं, तेव्हा होणाऱ्या विश्वासघातानं समाजात केवढी मोठी खळबळ माजते, याचा अनुभव आपण सध्या घेत आहोत.
मुद्दा असा, की गणेशोत्सवातल्या त्या कार्यक्रमातील हे भाषण टिळक यांच्याशिवाय अन्य कुणी करण्याची शक्यता नाही. तरीही पुराव्यानिशी तो आवाज टिळकांचा नाही, असं सिद्ध झालं आहे. परिस्थितिजन्य पुरावा आणि प्रत्यक्ष पुरावा यांच्यातील एक नवं द्वंद्व आता पुढे येत आहे. त्या काळात, सार्वजनिक ठिकाणी सहजपणे करता येईल, असं ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान अन्यत्र कोणत्या देशात होतं किंवा कसं, तेथील कुणी त्याचवेळी पुण्यात आलं होतं किंवा नाही, त्यांनी केलेल्या या आवाजनोंदीचं ऐतिहासिक महत्त्व न कळल्यानं रेकॉर्ड तयार करणाऱ्या आणि संगीताचे भोक्ते असणाऱ्या ईश्वरदास नारंग यांच्याकडे हे ध्वनिमुद्रण असंच फिरत फिरत आलं होतं काय, (नारंग यांच्या संग्रहात भाषणांचा संग्रह असण्याचं कारण नाही!) अशा अनेक शक्यतांच्या कल्पनांचा उगम स्वाभाविकपणे होऊ लागतो. त्यामुळे ठोस आणि थेट उत्तर मिळत नाही हे खरं असेल, त्यामुळे केवळ पुरावा नाही, म्हणून त्याकडे डोळेझाक करणंही तेवढंच गैर आहे. इतिहासातील सर्जनशीलतेला यामुळे नवं आव्हान मिळालं आहे खरं!