आकलन : भ्रष्टाचाराची उपयुक्तता ? Print

प्रशांत दीक्षित, मंगळवार, १० जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चीनमध्ये नवे नेते सत्तेवर येऊ घातले असतानाच आजी-माजी नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्यांकडे जगाचे लक्ष वेधले गेले. नेते भ्रष्टाचार अमान्य करीत नाहीत, उलट त्याचे समर्थन करतात. सौम्य भ्रष्टाचार विकासाला आवश्यकच असतो असे म्हणतात.. !


जागतिक सत्तेचा तोल सध्या आशियाकडे झुकत आहे तो चीनमुळे. खेळापासून अंतराळापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील पाश्चिमात्यांची मिरासदारी मोडून काढण्याचा चंग चीनने बांधला आणि आर्थिक सुबत्ता मिळवीत तो तडीस नेण्यासाठी नेटाने प्रयत्न चालविला. आर्थिक सुबत्ता मिळविण्याचे वेड चीनने डेंग यांच्या कारकीर्दीत घेतले. आर्थिक यशाच्या आधारावर विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करणे हे चीनचे ध्येय झाले. त्याला कल्पनातीत यश मिळाले. अवघ्या वीस वर्षांत साठ कोटी लोक गरिबीतून उच्च मध्यमवर्गात गेले. मानवी इतिहासातील हा विक्रम आहे.
या यशाचे श्रेय चिनी राज्यकर्त्यांना दिले जाते. त्यांचा व्यवहारवाद, जगातील प्रवाह ओळखून त्याचा फायदा उठविण्याची हातोटी, घडामोडींचा सूक्ष्म अभ्यास, पोथीनिष्ठेला तिलांजली देऊन रोकडा व्यवहार करण्याकडील कल अशा अनेक गुणांची चर्चा होते. हे गुण आपल्या नेत्यांमध्ये नाहीत आणि म्हणून भारत मागे पडतो असेही म्हटले जाते. याशिवाय भ्रष्टाचार या जटिल रोगाने आपण खंगलो आहोत यावर आपला विश्वास आहे. भारत भ्रष्टाचारमुक्त झाला की महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही अशी आपली खात्री करून देण्यात आली आहे. चीनचे पुढारी देशाचा विचार करतात तर आपले फक्त स्वत:चा असे आपण मानतो. पण चीनचे पुढारीही स्वत:चाच विचार करतात आणि कमालीचे भ्रष्ट असतात. चीन वैभवात असला तरी तेथे हितसंबंधीयांच्या भांडवलशाहीचे (क्रॉनी कॅपिटललिझम) पेव फुटलेले आहे. चीनमधील भ्रष्टाचाराच्या सुरस कथा बाहेर येत आहेत.
काही कथा तर अशा आहेत की हे चीनचे वर्णन की भारताचे हे कळणार नाही. ‘नोकरी मिळविण्यासाठी, मुलांना  शाळेत घालताना हात ओले करावे लागतात, इस्पितळात बेड मिळविण्यासाठी पैसे चारावे लागतात.. एक काम असे नाही की पैशाशिवाय होत नाही.’ असे शांग बिन्जियांग या चित्रकाराने ‘एनपीआर’ वाहिनीला सांगितले. सध्याच्या पदाधिकाऱ्यांची मुले, माजी पदाधिकाऱ्यांची मुले, केंद्रीय पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, लष्करी अधिकारी, पोलीस अशा सर्वाच्या मुलांची वा नातेवाईकांची वर्णी लावावीच लागते असे व्हिटर शिआ या अभ्यासकाला आढळून आले.
माओच्या काळातही भ्रष्टाचार असला तरी इतका नव्हता. चीनमध्ये पैसा वाढला आणि तसा भ्रष्टाचारही वाढला. या भ्रष्टाचारात मुख्यत: पक्षाचे पदाधिकारी आणि सरकारी नोकर सामील असतात. चीनमध्ये अनेक क्षेत्रांत सरकारने मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक सुरू केली. अवाढव्य प्रकल्प हाती घेतले. अनेक चिनी कंपन्यांनी जागतिक बाजारात उडी घेतली. हे सर्व करीत असताना सरकारी पैसा हेच मुख्य भांडवल होते. त्या पैशावर कम्युनिस्ट पदाधिकाऱ्यांची सत्ता होती. नव्या प्रकल्पांमध्ये शेअर मिळविणे, मुलांना व नातेवाइकांना संचालक म्हणून नेमणे किंवा सरकारी गुंतवणुकीवर भव्य प्रकल्प उभा करून त्याची सूत्रे मुलांकडे देणे आणि अनेक क्षेत्रांतील आर्थिक हितसंबंध बळकट करीत जाणे याला कम्युनिस्ट पदाधिकाऱ्यांनी प्राधान्य दिले. यातून देशाचा विकास झाला आणि पदाधिकारीही अतोनात श्रीमंत झाले. ‘रेड नोबिलिटी’ असे याला म्हटले जाते.
हा विषय पुन्हा चर्चेला आला तो ‘ब्लूमबर्ग’ने केलेल्या गौप्यस्फोटामुळे. चीनचे संभाव्य अध्यक्ष जिनिपग यांच्या नातेवाइकांच्या देशी-विदेशी गुंतवणुकीचा तपशील ‘ब्लूमबर्ग’ने दोन आठवडय़ांपूर्वी जाहीर केला. खाणी, बांधकाम क्षेत्र आणि संदेशवहन या क्षेत्रात जिनिपग यांच्या नातेवाइकांची अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आहे. ही सर्व माया सरकारी कृपेने मिळालेली आहे. ही माहिती जाहीर होताच अपेक्षेप्रमाणे ‘ब्लूमबर्ग’ व ‘बिझिनेस वीक’ची संकेतस्थळे चिनी संगणकांवरून अदृश्य झाली.
अर्थात जिनपिंग हे एकटे नाहीत. चिनी कम्युनिस्ट पदाधिकाऱ्यांची अख्खी बटालियनच अशा उद्योगात गुंतलेली आहे. त्याची सुरुवात अगदी वरिष्ठ स्तरापासून होते. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने मे महिन्यात एक यादीच प्रसिद्ध केली. हॉलीवूडमधील ड्रीमवर्क कंपनीने शांघायमध्ये अ‍ॅनिमेशन स्टुडिओ उभारण्यासाठी ३३० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. जिआंग झेमीन या माजी अध्यक्षाचा मुलगा यामध्ये भागीदार आहे. नोकिया, मायक्रोसॉफ्टसह सेमीकंडक्टर, टेलिकम्युनिकेशन व बांधकाम क्षेत्र यामध्ये चीन सरकारच्या साह्याने उभ्या राहाणाऱ्या अनेक प्रकल्पांत झेमीन यांच्या मुलाचा सहभाग आहे. तो ‘डीलमेकर’ म्हणूनच ओळखला जातो. पंतप्रधान वेन जिआबाव यांच्या मुलाची उपग्रह वाहिनी आहे, चिनी सरकारला सुरक्षा यंत्रणा पुरविणाऱ्या कंपनीची मालकी अध्यक्ष हु जिंताव यांच्या मुलाकडे आहे. जगातील सर्वात मोठी पब्लिक स्टॉक ऑफर चीनमध्ये २००६ मध्ये झाली. मेरिल लिन्चचे हे डील २२ अब्ज डॉलर्सचे होते आणि ते फेंग शोडाँग याने मिळवून दिले. कम्युनिस्ट पार्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा पदाधिकारी वू बँगगुओंचा फेंग हा जावई.
डीलमधून मिळालेला पैसा आलिशान राहणीवर खर्च होतो आणि परदेशात गुंतवला जातो. चिनी सरकारच्या अंदाजानुसार १८ हजार पदाधिकाऱ्यांनी १३० अब्ज डॉलर परदेशात नेले आहेत. बो या पॉलीटब्यूरोच्या सदस्याला अटक झाली. तो १०० दशलक्ष डॉलरचा मालक आहे. रेल्वे मंत्रालयातील उपाध्यक्षाने अडीच अब्ज डॉलर परदेशात पाठविले. या पदाधिकाऱ्यांनी जगातील अनेक प्रगत देशांमध्ये बरीच गुंतवणूक केली आहे. त्यांची मुले हार्वर्ड, स्टॅनफर्ड अशा मान्यवर विद्यापीठांत शिकतात. नंतर व्यवसाय सुरू करतात. त्या व्यवसायाला चीन सरकारचे संरक्षण असते. कोणत्या क्षेत्रात पैसा मिळणार याचा अचूक अंदाज राज्यकर्ते बांधतात आणि गुंतवणूक करतात. काही कंपन्या तर पदाधिकाऱ्यांशी असलेले संबंध मुद्दाम प्रगट करतात. दरवर्षी सुमारे ७०० अब्ज डॉलर्सवर पक्ष पदाधिकारी व नोकरशहा डल्ला मारतात असा प्राथमिक अंदाज आहे.
 चिनी समाजातील आर्थिक दरी रुंदावत चालली आणि पदाधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठू लागला. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मनातून जे नेते उतरतात त्यांच्याविरोधातील बातम्या प्रसिद्ध होण्यास आडकाठी येत नाही. भ्रष्टाचाराचे कोणते प्रकरण उघड करायचे आणि कोणते नाही यावर कम्युनिस्ट पक्षाची सक्त नजर असते. मात्र इंटरनेटच्या युगात असे नियंत्रण कठीण जाते. याशिवाय लोक सतत रस्त्यावर येऊन दंगली करीत असतात. भ्रष्टाचारावरील लोकांच्या रागाची दखल घेतली पाहिजे असे चीन सरकारलाही अधूनमधून वाटते. मग नैतिक कारभाराचे डोस दिले जातात. मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना सुटतात. एखाद्दुसऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होते. पण परिस्थिती तशीच राहते. पैसा पुढाऱ्यांच्याच हातात एकवटत राहतो.
आश्चर्य म्हणजे या भ्रष्टाचाराचे समर्थन केले जाते. सौम्य भ्रष्टाचार हा विकासासाठी आवश्यक असतो, असे प्रतिपादन ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारधार्जिण्या वृत्तपत्रातील अग्रलेखात केले आहे. या अग्रलेखातील एक परिच्छेद चिनी राज्यकर्त्यांचे धोरण स्पष्टपणे मांडतो. ‘भ्रष्टाचार पूर्णपणे घालविण्याचा मार्ग कोणत्याच देशात सापडलेला नसल्याने तो लोकांना सहन होईल इतपत ठेवणे हे महत्त्वाचे आहे. परंतु चीनमध्ये तसे करणे हेही कमालीचे क्लेषदायक ठरेल. भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट झाला तर देशात प्रचंड गोंधळ निर्माण होईल हे जनतेने लक्षात घ्यावे. भ्रष्टाचार नष्ट करणे ही अत्यंत कठीण बाब आहे. त्यातील यश हे अन्य क्षेत्रातील यशावर अवलंबून आहे. पुढारी स्वच्छ आहेत, पण अनेक क्षेत्रांत देश मागासलेला आहे. अशा परिस्थितीत सापडलेल्या चीन देशाची कल्पनाही करवत नाही. असे जरी शक्य असले तरी परवडणारे नाही.’
या अग्रलेखावर टीका झाली असली तरी भ्रष्टाचाराची उपयुक्तता समजून घ्या असा कम्युनिस्ट पदाधिकाऱ्यांचा जनतेला आग्रह आहे. ‘आम्ही बिलियन डॉलरवर डल्ला मारला असला तरी देशाची अर्थव्यवस्था सात ट्रिलियन डॉलरवर नेऊन ठेवली त्याचे काय?’ हा चिनी पदाधिकाऱ्यांचा सवाल आहे. सौम्य भ्रष्टाचार विकासाला पूरक ठरतो असा सिद्धांत ते जनतेच्या गळी उतरवितात. स्वच्छ कारभाराचा आग्रह धराल तर समाजातील आर्थिक दरी अधिक रुंदावत जाईल, असा इशारा देतात.
हा युक्तिवाद मनाला पटणारा नाही. मूलभूत विचार करता तो धोकादायक आहे. पण त्याचा समर्पक प्रतिवाद करणेही सोपे नाही. कारण ज्या जीवनशैलीचा आपण पाठलाग करीत आहोत ती काही कोटी लोकांपर्यंत पोहोचविण्यात चिनी राज्यकर्ते यशस्वी ठरले आहेत. चिनी राज्यकर्ते भ्रष्ट आहेत, पण कमालीचे कार्यक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्या युक्तिवादाला तो चुकीचा असला तरी वजन येते. असा युक्तिवाद आपले राज्यकर्ते करू शकत नाहीत. कारण आपण भ्रष्ट आहोत आणि अकार्यक्षमही आहोत. आपल्यातील गुणांवर अकार्यक्षमतेची काजळी चढलेली आहे. त्यामुळे जगाच्या आर्थिक सत्तेचा तोल आशियाकडे सरकत असला तरी भारत त्यामध्ये नाही.

शांग बिनजिआंग या तरुणाने भ्रष्ट चिनी पदाधिकाऱ्यांची १६०० व्यक्तिचित्रे केली, पण परवानगी नसल्याने  या चित्रांचे प्रदर्शन आपल्या स्टुडिओतच मांडले. कीर्तिवंतांची चित्रे ओळीने मांडून ‘हॉल ऑफ फेम’ सजवतात, तशी ही ‘वॉल ऑफ शेम’ -  अशी मिश्किल टिप्पणीही तो करतो.