आकलन : मी. माझे.. कुठून, कोठपर्यंत? Print

 

प्रशांत दीक्षित - मंगळवार, १७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

व्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यांवर विकसित होत असताना, व्यक्तीच्या ‘नि:स्वार्थ’ प्रेरणेतून गट-समूह-समाज निर्माण झाले आणि स्थिरावले. व्यक्तीच्या ठायी असणाऱ्या ‘स्वार्थ’ व ‘नि:स्वार्थ’ या जन्मजात मानसिक प्रेरणांचा तोल बिघडला की व्यक्ती आणि समाज यांपैकी एका घटकाचा संकोच अपरिहार्य असतो. या प्रेरणांतून जाणतेपणाने
निवड करता येईल?


साठच्या दशकानंतर जगात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत अनेक चळवळी होऊ लागल्या. चौकटीबद्ध जीवनरहाटीला आव्हान देणारे प्रयोग होऊ लागले. त्याआधीच्या मार्क्‍सवादी प्रयोगात माणसाच्या व्यक्तित्वाची पुरती गळचेपी होत असल्याचा अनुभव आला. याउलट साठच्या दशकातील चळवळींमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याला अधिक किंमत दिली गेली. या चळवळी सर्जनशील होत्या. हिप्पी ते पर्यावरण, महिलांचे हक्क ते समलिंगी संबंधांचे हक्क असे विविधांगी स्वरूप या चळवळींना आले. कलेच्या क्षेत्रातही नवे नवे प्रयोग होत राहिले. या सर्वाचा मुख्य गाभा प्रत्येक माणसाचे व्यक्तिविशेष जपणे हा होता.
यातील बहुतांश सर्व चळवळींचा ठळक प्रभाव पडला. मात्र याच दरम्यान झालेली एक गडबड आता काहीजणांच्या लक्षात येत आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील वाढत्या व्यक्तिवादाची छाया आर्थिक क्षेत्रावरही पडली. कलेप्रमाणे आर्थिक क्षेत्रातही व्यक्तिस्वातंत्र्य मुख्य मूल्य बनले. कलाकार ज्या स्वातंत्र्याची मागणी करतो, तसेच स्वातंत्र्य आर्थिक व्यवहार करणारा मागू लागला. व्यक्तित्ववाद किंवा ‘स्वत:पेक्षा अन्य कोणी मोठा नाही अशी भावना’ ही आर्थिक व्यवहारांची मुख्य प्रेरणा झाली. यातून अनर्थ घडला व जागतिक मंदी आली.
कर्ट अ‍ॅण्डरसन या कादंबरीकाराने याचे सुरेख वर्णन ‘डाऊनसाइड ऑफ लिबर्टी’ या लहानशा निबंधात केले आहे. जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य आणि सुखाचा पाठलाग हे अमेरिकी राज्यघटनेत माणसाचे मुख्य हक्क मानले आहेत. हे व्यक्तित्ववादाचेच प्रगटीकरण आहे. संपूर्ण अमेरिकी समाज हा आत्यंतिक व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. हवे तसे जगण्याचा मला हक्क आहे असे मानणारा आहे. त्याला अर्थशक्तीची जोड मिळाली. गेल्या शतकात वैज्ञानिक शोधांमुळे अमेरिका अतोनात श्रीमंत झाली. हे वैभव व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केल्यामुळेच मिळाले असे मानले गेले. यातून व्यक्तिवाद अधिक मूळ धरू लागला. तथापि, अ‍ॅण्डरसनच्या मते साठच्या दशकापूर्वी व्यक्तिवादाला वेसण घातली गेली होती. तो हाताबाहेर जाणार नाही याची दक्षता सामाजिक, कौटुंबिक व राजकीय स्तरावर घेतली जात होती. श्रीमंतांवर ९० टक्क्यांहून अधिक कर लावण्यास रिपब्लिकनांचा त्या वेळीही विरोध होता. वैभव मिळविण्याचे माणसाचे जन्मजात स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे, असा त्यांचा आक्षेप होता. परंतु, हे कर जेमतेम ३० टक्के असावेत अशी आत्यंतिक टोकाची भूमिकाही ते घेत नव्हते. पन्नास टक्क्यांच्या दरम्यान कर असण्यास त्यांची ना नव्हती. केवळ करच नव्हे, तर लैंगिक स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्य, कौटुंबिक स्वातंत्र्य या सर्वाबाबत समतोल राखला जात होता. कामगारांपेक्षा वरिष्ठ व्यवस्थापकांना तेव्हाही अधिक पगार होते, पण ते २०० ते ४०० पट अधिक नव्हते. थोडक्यात, स्वातंत्र्य हे स्वैराचारात परिवर्तित झाले नव्हते.
मात्र साठच्या दशकानंतर हा समतोल गेला व अतिरिक्त व्यक्तिवादाच्या युगाला सुरुवात झाली. त्याची कारणे अ‍ॅण्डरसनने दिलेली नाहीत, पण बहुधा साम्यवादाचा पराभव हे त्याचे एक कारण असावे. गोर्बाचेव्ह यांच्यापूर्वीच रशियाची पीछेहाट जगाच्या लक्षात येऊ लागली होती. अमेरिकेच्या भांडवली अर्थव्यवस्थेवर आणि त्याला इंधन पुरविणाऱ्या व्यक्तिवादी विचारसरणीवर साम्यवादाचा अंकुश होता. यामुळेच अमेरिकेतील कामगार रशियातील कामगारांपेक्षा कितीतरी अधिक सुखी झाले. इतके की आता ते ऐदी बनत गेल्याचा आरोप होत आहे. वयाच्या पन्नाशीतच सहा आकडी निवृत्तिवेतन घेऊन स्वस्थ बसण्याची प्रवृत्ती वाढत आहे. युरोप-अमेरिकेत कल्याणकारी राज्याची संकल्पना राबविण्यामागे साम्यवाद वाढण्याची भीती हे मुख्य कारण होते. साम्यवादाचा पराभव झाल्यावर ही धास्ती नाहीशी झाली आणि व्यक्तिवादी भांडवलशाहीला मुक्त रान मिळाले. या व्यक्तिवादाचे दुष्परिणाम आता केवळ अमेरिकेपुरते मर्यादित राहिले नसून भारतातील उच्च मध्यमवर्गापर्यंत जगात सर्वत्र पोहोचले आहेत. कारण ८०च्या दशकानंतर अमेरिका हेच जगातील तरुणांचे दैवत बनले.
अ‍ॅण्डरसनच्या मते अमेरिकेच्या इतिहासात १८४०पासून तीन ते चार वेळा व्यक्तिवादाचा अतिरेक होण्याचा काळ येऊन गेला आणि त्यापाठोपाठ मंदी आली. त्या मंदीतून सावरता-सावरता अमेरिकी समाज पुन्हा व्यक्तिवादाकडे खेचला गेला. सामाजिक, सांस्कृतिक तसेच कौटुंबिक क्षेत्रातील व्यक्तिवादाच्या कडव्या समर्थनामुळे अर्थक्षेत्रातील अत्यधिक लालसाही अप्रत्यक्षपणे समर्थनीय होऊन जाते, असा अ‍ॅण्डरसनचा दावा आहे.
व्यक्तिस्वातंत्र्याची वेस ठरवायची कशी आणि समाजाला महत्त्व कुठपासून द्यायचे हा यातील मुख्य प्रश्न आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याची सनद लिहिल्यानंतर ३८ वर्षांनी थॉमस जेफर्सनला ही समस्या लक्षात आली होती. स्वत:ची हौस-मौज व सामाजिक कर्तव्य यांचा मेळ घालण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्याने म्हटले होते. असा मेळ घालण्यासाठी शिक्षण, सरकार आणि धर्मवेत्ते ही मुख्य साधने आहेत असेही त्याचे मत होते.
याच विषयात आता विज्ञानाने लक्ष घातले आहे. ‘माझा मी’ आणि ‘समाजाचा मी’ यांच्यातील झगडय़ाचे मूळ केवळ ऐतिहासिक काळात सापडत नाही. त्यासाठी त्यापूर्वीच्या बऱ्याच मोठय़ा कालखंडात शोध घ्यावा लागतो. या सामजिक तिढय़ाची निर्मिती इतिहासात नव्हे तर जीवशास्त्रात सापडते, असे एडवर्ड विल्सन यांनी दाखवून दिले आहे. हार्वर्डमध्ये ते प्रोफेसर एमिरट्स आहेत. उत्तम संशोधक आहेत आणि लिखाणासाठी त्यांना दोन वेळा पुलीत्झर पारितोषिकही मिळाले आहे. ‘इव्होल्यूशन अ‍ॅण्ड अवर इनर कन्फ्लिक्ट’ हा त्यांचा गेल्याच महिन्यात प्रसिद्ध झालेला निबंध या विषयात रस असणाऱ्यांनी मुळातून वाचावा असा आहे. जगात जे काही घडते ती माणसाची गोष्ट असते आणि या गोष्टीत रंग भरणाऱ्या, गोष्टीला वळण देणाऱ्या शक्ती या ऐतिहासिक नसतात तर जैविक असतात. माणसापुढील आजच्या अनेक समस्यांचा उगम माणसाच्या उत्क्रांतीत सापडतो. साधारणपणे तीस लाख वर्षांपूर्वी माणूस माकडांपासून वेगळा होऊ लागला. त्यानंतर पाच लाख वर्षांनी त्याने अग्नीवर नियंत्रण मिळविले आणि अग्नीभोवती त्याचे व्यवहार होऊ लागले. यातून ‘गट’ या संकल्पनेचा कोंब उगवला. गटात राहण्याचे महत्त्व त्याला अधिकाधिक समजू लागले. व्यक्तिगत हुशारीपेक्षा गटाची हुशारी सरस ठरते आणि त्यामुळे आपण अधिक सुरक्षित होतो हे त्याच्या लक्षात आले. याच काळात त्याच्या मेंदूचा पुढील भाग अधिक तीक्ष्ण होऊ लागला. भावनेपेक्षा स्मृती व बुद्धी यांना महत्त्व मिळाले.
उत्क्रांतीच्या या टप्प्यावर साधारण वीस लाख वर्षांपूर्वी नि:स्वार्थीपणा वा परहितदक्षता हा गुण उगवला. कारण गटाच्या सुरक्षेसाठी अशा गुणाची गरज होती. इथून पुढे माणसात दोन प्रेरणांची झुंज सुरू झाली. गटांतर्गत अन्य माणसांशी स्पर्धा आणि आपल्या गटाची अन्य गटांशी स्पर्धा या दोन आव्हानांसाठी या दोन प्रेरणा होत्या. पहिली स्वार्थाची होती तर दुसरी नि:स्वार्थाची. स्वत:ला जगविण्यासाठी स्वार्थ आवश्यक होता, तर गटाला जगविण्यासाठी नि:स्वार्थ हवा होता. माणूस नि:स्वार्थी झाला नसता तर गट निर्माण झाला नसता. गट निर्माण झाला नसता तर सामूहिक हुशारीला व सामर्थ्यांला माणूस मुकला असता आणि अल्पकाळात कदाचित मनुष्याचा नाश झाला असता. स्वार्थ-नि:स्वार्थ या दोन प्रेरणांचा खेळ कुटुंबापासून सुरू होतो तो राष्ट्रांपर्यंत पोहोचतो.
उत्क्रांतीच्या या सखोल संशोधनातून विल्सन यांनी पुढे आणलेली दोन निरीक्षणे महत्त्वाची आहेत. १) माणूस पूर्णपणे स्वार्थाच्या आहारी गेला की समाजाचा नाश होतो. किंबहुना समाज ही संस्थाच उभी राहू शकत नाही. (विल्सनने भारताचा अभ्यास केलेला नाही. पण भारतात आध्यात्मिक क्षेत्रात असे झाले. सर्वाभूती आत्मा हे सत्य घोकत असूनही व्यक्तिगत साधनेला अतोनात महत्त्व दिले गेल्याने सुदृढ समाज-संस्था निर्माण झाली नाही. ही त्रुटी ध्यानी आल्यामुळेच टिळक व गांधी यांनी आपल्या आध्यात्मिक प्रेरणांना सामाजिक कार्याची जोड दिली.) याचबरोबर माणूस पूर्णपणे समाजाच्या आहारी गेला तर व्यक्तित्वाचा नाश होतो आणि सर्जनशीलता मरते. चीन व रशिया ही याची उत्तम उदाहरणे.
विल्सनचे दुसरे निरीक्षण खूप महत्त्वाचे आहे. दोन व्यक्तींमधील संघर्षांत बहुधा स्वार्थाचा विजय होतो व नि:स्वार्थाला माघार घ्यावी लागते. मात्र नि:स्वार्थी व्यक्तींचे दल उभे राहिले, तर स्वार्थी गटांना हार पत्करावी लागते.
‘सोयरे सज्जन’ वा ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ या ज्ञानदेवांच्या शब्दांचा खोल अर्थ येथे ध्यानी येतो.
‘स्वार्थ’ व ‘नि:स्वार्थ’ या दोन्ही प्रेरणा माणसात जन्मजात असतात. त्यामागची मानसिक शक्ती एकच असते. आपण कधी स्वार्थाकडे झुकतो, कधी नि:स्वार्थाकडे. तसाच समाजही कधी स्वार्थी होतो आणि त्याचे दुष्परिणाम दिसले की नि:स्वार्थाकडे झुकू लागतो. या दोन प्रेरणांचा झगडा वीस लाख वर्षांपासून सुरू झाला आणि तो यापुढेही असाच सुरू राहील. त्यामागे ना देवाचा कुठला हेतू आहे, ना सैतानाचा. हा प्रकृतीचा खेळ आहे आणि स्वार्थ कुठे व नि:स्वार्थ कुठे याची जाणतेपणे निवड करीत तो खेळण्यातच मजा आहे.