आकलन : दंगलीचे गणित आणि इतिहासाचे विज्ञान Print

 

प्रशांत दीक्षित  - मंगळवार, २१ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

विज्ञान व सामाजिक शास्त्रे यांचा परस्परांशी संबंध नाही अशी आपली समजूत आहे. परंतु सामाजिक घटनांचे विश्लेषण व अंदाज बांधण्यासाठी विज्ञान व गणित उपयोगी पडते. इतकेच नव्हे तर गणितीय अंदाजामुळे दंगलीसारख्या घटना कदाचित रोखताही येतात.
मुंबईतील दंगलीचा पंचनामा सध्या सुरू आहे. ती पूर्वनियोजित होती की अचानक सुरू झाली, जमाव कशामुळे हिंसक बनला, पोलीस बेसावध की त्यांची  पूर्वतयारी पुरेशी नव्हती, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. भारतातील राज्यकारभाराची पद्धत पाहता या प्रश्नांना उत्तरे मिळतील अशी आशाही करता येत नाही.


बरोबर वर्षांपूर्वी म्हणजे ऑगस्ट २०११मध्ये लंडनमध्ये अशीच दंगल झाली. ती आठवडाभर चालली. चार हजार गुन्हे नोंदले गेले. सुमारे २५ कोटी पौंडांचे नुकसान झाले. सोशल मीडियामुळे दंगल भडकली, असा निष्कर्ष तेथेही काढण्यात आला. सोशल मीडियावर मर्यादित र्निबधही घालण्यात आले. तेथे दंगलीचे राजकारण अद्यापही होत आहे. मतांकडे लक्ष ठेवून प्रशासनावर दबाव टाकणारे राजकारणी तेथेही आहेत.
मात्र दंगलीचा आणखी एका वेगळ्या अंगाने अभ्यास तेथे झाला. पोलिसांची संख्या पुरेशी नव्हती. योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि पुरेशा संख्येने पोलीस उपलब्ध असते तर दंगल भडकली नसती हे मागे वळून पाहताना लक्षात आले. पण ही योग्य वेळ ठरवायची कशी? जमाव पूर्वसूचना देऊन हिंसाचार सुरू करीत नाही. दंगल अचानक सुरू होते आणि पोलीस गाफील राहिल्याने ती भडकते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. नंतर होणाऱ्या चौकशीत एखादे तात्कालिक कारण दिले जात असले तरी मुख्य मुद्दा पोलिसांची संख्या व त्यांची तत्परता हाच असतो.
त्याचबरोबर दंगलीची पूर्वसूचना हासुद्धा कळीचा मुद्दा असतो. विश्वासू खबऱ्यांचे जाळे पोलिसांनी विणलेले असेल तर बऱ्याचदा ही पूर्वसूचना मिळते. मात्र अलीकडे विविध कारणांमुळे खबऱ्यांचे जाळे नष्ट होत गेले. अशा वेळी दंगलीची पूर्वसूचना कशी मिळवायची? दुसरी बाब म्हणजे खबऱ्यांचे जाळे हे बहुधा गुन्हेगारी टोळ्यांची माहिती घेण्यासाठी उपयुक्त असते. सामाजिक असंतोषातून वाढणारा तणाव हा दंगलीच्या दिशेने जात असेल तर त्याचा अंदाज या खबऱ्यांना येतोच असे नाही. लंडनमधील दंगल ही गुन्हेगारी टोळ्यांनी केलेली नव्हती. सुशिक्षित तरुणांचा त्यामध्ये सहभाग होता.
समाजातील या प्रवाहांचा अंदाज कसा बांधायचा? या प्रश्नांवर गेली अनेक वर्षे खल सुरू आहे. दंगल होऊन गेली की ती घडण्यामागची कारणे सांगता येतात. असे विश्लेषण करणारे बरेच असतात. इतिहासातील घटनांचे विश्लेषण इतिहासकार ज्या पद्धतीने करतो तीच पद्धत ते वापरतात. यातून समाजातील काही प्रवाह समजतात, परंतु पुढील घटनांचा वेळीच अंदाज बांधता येत नाही. तो बांधण्यासाठी गणितासारखी अचूक ज्ञानशाखा सामाजिक व ऐतिहासिक घटनांच्या विश्लेषणासाठी वापरता येईल का, याचे प्रयोग गेली काही वर्षे सुरू आहेत. दंगल किंवा सामाजिक असंतुलन कधी प्रकट होईल याचे गणिती समीकरण तयार करता येईल का, यावर संशोधन सुरू आहे व त्याला बऱ्यापैकी यशही येत आहे.
हॅना फ्रे यांनी लंडनच्या दंगलीचे असे विश्लेषण केले. लंडन विश्वविद्यालयात फ्ल्युइड डायनॅमिक्समधील पीएचडी त्यांनी मिळविली आहे. समाज हा एक प्रवाह व व्यक्ती म्हणजे त्यातील थेंब असा विचार करीत निरनिराळ्या क्षेत्रांतील संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर करून सामाजिक घटनांचे विश्लेषण त्यांनी केले. दंगल कधी होणार याचे स्पष्ट संकेत सामाजिक गणितातून मिळू शकतात असा त्यांचा दावा आहे. त्यामध्ये तथ्य असावे असे अभ्यासकांनाही वाटते. दंगलींचा अभ्यास करता त्यांच्या असे लक्षात आले की काहीतरी गडबड केली पाहिजे असा निर्णय कुणीतरी घेतो. हा निर्णय कधी घेतला जातो हे अचूक सांगता येत नसले तरी हा निर्णय समाजात पसरत कसा जातो हे तपासता येते. त्याला जोड सामाजिक भावनांची असते. त्या सुप्त असल्या तरी समाजाच्या प्रतिक्रियांमधून त्या समजून घेता येतात. गडबड करावी ही भावना कशी फैलावत जाते हे पाहण्यासाठी संसर्गजन्य रोगाचा फैलाव तपासणारी संख्याशास्त्रीय पद्धत उपयोगी पडली. जंतू जसे फैलावतात अगदी त्याच पद्धतीने सामाजिक असंतोष फैलावतो. काही गडबड होत आहे असा थोडा जरी अंदाज आला तर त्याचा फैलाव कसा होईल याचा नकाशा संगणकाची मदत घेऊन तयार करता येतो. लंडनसाठी हॅनाने असा नकाशा केला.
पुढील पायरी असते ती दंगलीच्या स्थानाचा अंदाज बांधण्याची. सभेचे ठिकाण हे सर्वमान्य स्थान असले तरी अनेकदा दंगल भलत्याच ठिकाणी सुरू होते. या ठिकाणाचाही अंदाज गणिताने बांधता येतो. हॅनाने यासाठी ग्राहकांच्या खरेदीच्या पद्धतीचा अंदाज करणाऱ्या संख्याशास्त्रीय मॉडेलचा वापर केला. दंगलखोरांचे राहण्याचे ठिकाण व दंगलीचे स्थान यांचा संबंध असतो. लांबवर खरेदीला जाण्यापेक्षा जवळच्या ठिकाणी खरेदी करणे ग्राहक जसे पसंत करतो, तोच प्रकार दंगलखोर करतात. मात्र काही वेळा यामध्ये बदलही होतो. उदाहरणार्थ, भरपूर सवलत मिळत असेल तर थोडे लांब जाऊन खरेदी करण्यास ग्राहकांची हरकत नसते. तसेच दंगलखोरही करतात. अडथळ्यांची शक्यता जिथे कमी असेल तेथे जाऊन गडबड करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. दंगली पूर्वनियोजित असल्या तर ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते. पोलिसांची संख्या व त्यांची ठिकाणे यांचा दंगल फैलावणे वा रोखणे यावर थेट परिणाम होतो. याबाबतचे गणित अगदी सरळ आहे. पोलिसांची संख्या जशी वाढते तशी अटक होणाऱ्यांची संख्याही वाढते. हे समीकरण कोणत्याही दंगलीत लक्षात येते.
हॅनाने तीन संख्याशास्त्रीय समीकरणे तयार केली आहेत. त्यावरून दंगलीची पूर्वसूचना पोलिसांना मिळू शकते आणि दंगल घडल्यास ती कशी फैलावेल याचा अंदाजही बांधता येईल असे हॅना म्हणते.  हा शोधनिबंध नेटवर उपलब्ध आहे.. तो संख्याशास्त्रीय तपशीलांनी भरलेला आहे!
लंडनची दंगल ही एकच घटना हॅनाने अभ्यासाला घेतली, पण वैज्ञानिक समीकरणे लावून ऐतिहासिक घटनांकडे पाहता येते का याची चाचपणी करणारी एक ज्ञानशाखाच गेल्या काही वर्षांत विकसित झाली आहे. ‘क्लिओडायनॅमिक्स’ हे त्याचे नाव. पीटर टर्चिन या मूळच्या रशियन जीवशास्त्रज्ञाने त्याची सुरुवात केली. क्लिओ ही ग्रीकांची इतिहासाची देवता. राजकीय स्थिरता, देशाची बांधणी किंवा विनाश आणि समाजातील विविध घटकांमधील सामंजस्य या तीन महत्वाच्या प्रवाहांना गणिती समीकरणात बसविता येते असे टíचनचे म्हणणे आहे. ऐतिहासिक विश्लेषणाला गणितीय समीकरणाची बैठक दिली तर अधिक अचूकता येते. म्हणून ऐतिहासिक विश्लेषणांचेही समीकरण मांडण्याचा आग्रह टर्चिनने धरला. इतिहासाचा त्याने तसा अभ्यासही केला. गणित, संगणक व माहिती तंत्रज्ञानातील अनेक आयुधे यांचा वापर करून मागील व पुढील घटनांचे ‘सिम्युलेशन’ करता येते. यातून मागील घटना कशा घडल्या व पुढील कशा घडतील याचा अंदाज बांधता येतो. लोकसंख्या, समाज व्यवस्था, शासनाची क्षमता, राजकीय आघाडय़ांमधील संवाद वा विसंवाद असे अनेक घटक ऐतिहासिक घटनांच्या मुळाशी असतात. या प्रत्येक घटकाला गुणांक देऊन त्यावरून समीकरण तयार करता येते. टर्चिनने गेल्या काही शतकातील घडामोडींचा अभ्यास केला व त्यावरून समीकरण तयार केले. टर्चिनला असे आढळले की २०० ते ३०० वर्षांचे सामाजिक चक्र नियमितपणे काम करीत आहे. याला ‘सेक्युलर सायकल’ असे नाव त्याने दिले आहे. या चक्रातच ५० वर्षांचे दुसरे चक्रही नियमितपणे फिरत असते. या दोन चक्रांच्या आधाराने मागील अडीच हजार वर्षांतील घटनांचे व्यवस्थित विश्लेषण करता येते असे टर्चिन सांगतो. ‘नेचर’च्या ताज्या अंकात ‘हिस्टरी अ‍ॅज सायन्स’ हा टर्चिनच्या संशोधनावरील लेख बराच गाजतो आहे.
मात्र इतिहासकारांना हे संशोधन पसंत नसावे. कारण ‘हिस्टरी टुडे’च्या संपादकांनी या पद्धतीवर झोड उठविली आहे. इतिहासकाराने व राजकीय नेत्यांनी व्यवहारवाद सांभाळावा असा त्यांचा सल्ला आहे. परंतु, संपादकांच्या या मताशी अनेक वाचक सहमत नाहीत. वेगळ्या पद्धतीने अभ्यास होत असेल तर त्याचे स्वागत झाले पाहिजे असे वाचकांना वाटते. गणित हे फक्त विज्ञानासाठी असते व सामाजिक घटनांसारख्या वेगवान प्रवाहांना ते लागू शकत नाही असे म्हटले जाते. तथापि, देशातील विविध घटकांना गुणांक देऊन टर्चिनप्रमाणेच ‘गोल्डमन सॅक्स’ने ऑलिंपिकमधील पदकांचा अंदाज बांधला. तो बरोबर ठरला. आज सीआयए ही अमेरिकी गुप्तचर यंत्रणा टर्चिनच्या मॉडेलचा उपयोग करू लागली आहे. टर्चिनच्या अंदाजानुसार २०२० या वर्षी अमेरिकेत मोठी गडबड होण्याची दाट शक्यता आहे. समाजातील चलनवलनावरून गणिताने काढलेला हा निष्कर्ष कितपत खरा ठरतो ते पहायचे.   
हे अंदाज भौतिकशास्त्रासारखे अचूक नसले तरी त्यातून बराच बोध घेता येतो. मुख्य म्हणजे संकटाचा सामना करण्यासाठी तयारी करता येते. विमान कधी कोसळेल हे कधीच अचूक सांगता येत नाही. तरीही ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण केले जाते आणि त्यामुळेच विमान कोसळण्याची संख्या कमी होत जाते. हाच न्याय या टर्चिन व फ्रे यांच्या संशोधनाला लावता येतो असे हर्बट जेन्टीस या अर्थशास्त्रीचे मत आहे.
मात्र असे संशोधन करण्यासाठी माहितीचा प्रचंड साठा हाताशी असावा लागतो. पाश्चात्य देशात माहिती जमविणे आणि तिचे शास्त्रोक्त वर्गीकरण करून ठेवणे याला अतोनात महत्त्व दिले जाते. त्यासाठी अद्ययावत ग्रंथालये लागतात. भारतात नेमकी याचीच वानवा आहे. माहितीचा साठा व त्याचा व्यावहारिक फायदा आपल्या कधीच लक्षात आला नाही. काल काय घडले याची अचूक माहिती हाती नसल्यामुळे उद्या काय घडेल याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. म्हणून लंडन पुढील दंगल कदाचित थांबवू शकेल..
 संशोधकांना अशी अचूक माहिती मुंबईत मिळणे शक्य नाही.