आकलन : घेण्याइतकाच आनंद देण्यातही. Print

 

प्रशांत दीक्षित ,मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जग मंदीच्या वावटळीत सापडले तरी दान करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. याचे कारण दान देणे ही त्यागाची नव्हे तर आनंदाची क्रिया आहे. हा आनंदच माणसाला मदत करण्याची प्रेरणा देतो. हे वैज्ञानिक सत्य आहे, कल्पना नव्हे.
एकहार्ट या अमेरिकेतील भागात एके काळी पैसा मुबलक खेळत होता, मात्र मंदीचे तडाखे एकहार्टला सर्वात आधी बसले. अमेरिकेत सर्वात जास्त बेरोजगार या भागात नोंदले गेले. बराक ओबामा यांना तीन वेळा या भागाला भेट द्यावी लागली.


एकहार्ट कंट्री कम्युनिटी फाऊंडेशन ही संस्था एकहार्टमधील अडीच लाख नागरिकांसाठी, नवीन उद्योग सुरू करण्यापासून ते प्राथमिक सोयीसुविधा पुरविण्यापर्यंत अनेक पातळ्यांवर काम करते. पीट मॅककाऊन हा त्याचा अध्यक्ष. गेल्या वर्षी त्याला डेव्हिड गुंडलाश याचा फोन आला. त्याने पीटला भेटीला बोलविले. डेव्हिड हा एकहार्टचा मूळचा रहिवासी. नशीब काढायला बाहेर पडला आणि त्याने खरोखर नशीब काढले. विमा व्यवसायात नफा कमविला. हॉलीवूडमध्ये जाऊन चित्रपट काढले. ‘गेट लो’ या त्याने निर्माण केलेल्या चित्रपटाचे कौतुकही झाले. लॉस एंजलिसमध्ये तो स्थायिक झाला होता. डेव्हिडने का बोलविले असावे, असा विचार करीत पीट त्याला भेटायला गेला. डेव्हिडला उपयोगी पडेल असे काहीच त्याच्याजवळ नव्हते.
पण डेव्हिडला काही नको होते. उलट आपल्या जन्मगावाला काहीतरी देण्यासाठी त्याने पीटला बोलविले होते. ‘मी माझ्या संपत्तीमध्ये तुमच्या फाऊंडेशनसाठी रक्कम देणार आहे’, डेव्हिडने पीटला सांगितले. ‘ती कशी खर्च करायची ते तुम्ही ठरवा. माझा तुमच्या कामावर पूर्ण विश्वास आहे’.
पीटला आनंद झाला, पण डेव्हिड अद्याप पन्नाशीत असल्याने ही रक्कम मिळण्यास बराच काळ जाईल. तोपर्यंत आपण म्हातारे होऊ, पण निदान आपल्या गावातील पुढील पिढीला मदत मिळेल, असे म्हणत पीट एकहार्टला परतला.
त्यानंतर थोडय़ाच दिवसात, म्हणजे ऑक्टोबर २०११मध्ये, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने डेव्हिडचे झोपेतच निधन झाले. तो ५६ वर्षांचा होता. एकहार्टमधील त्याचे मित्र हळहळले आणि त्याने कबूल केलेल्या मदतीबद्दल विसरूनही गेले.
मात्र महिनाभरापूर्वी डेव्हिडच्या वकिलांचा पीटला फोन आला. डेव्हिडने शब्द पाळला होता. गावाच्या हितासाठी, गावक ऱ्यांना सुखाचे दिवस पुन्हा दिसावेत यासाठी त्याने रक्कम काढून ठेवली होती. ही रक्कम होती, १२५ दशलक्ष डॉलर. म्हणजे सहा अब्ज ७४ कोटी ५७ लाख रुपये.
रक्कम ऐकून अनेकांचे डोळे विस्फारले. डेव्हिड गावासाठी इतके काही देईल असे कुणाला वाटले नव्हते. मुळात त्याने इतका पैसा कमविला होता हेच कुणाला माहीत नव्हते. खुद्द त्याची आई अनभिज्ञ होती. ‘त्याचे बरे चालले आहे हे मला कळत होते, कारण तो माझ्याकडे कधी काही मागत नसे. पण त्याचे इतके बरे चालले होते याची कल्पना नव्हती’, अशी कबुली या ९४ वर्षांच्या आईने दिली.
आर्थिक वावटळीत सापडलेल्या आपल्या लहानशा शहराला पुन्हा उभे करण्यासाठी एक माणूस इतकी मोठी रक्कम देतो, ही अमेरिकेच्या समृद्ध समाजजीवनाची अनुकरण करावी अशी बाजू आहे. या घटनेचा मोठा गवगवाही झाला नाही. डेव्हिडच्या आरत्या ओवाळण्यात आल्या नाहीत. कारण अमेरिका हा, जगभर उचापत्या करणाऱ्यांचा जसा देश आहे तशीच ती दानशूरांचीही भूमी आहे. दान करण्याची मोठी परंपरा त्या देशात आहे. या परंपरेला अमेरिकेने संस्थात्मक रूप दिले. यामुळे त्यांचे दान योग्य ठिकाणी, योग्य वेळी पोहोचते. दानाच्या भावनेला व्यवस्थापकीय शिस्त आणली. यामुळेच तेथे केवळ व्यक्तिगत दानातून अफाट मोठय़ा संस्था उभ्या राहिल्या.
दानाची तेथील मुख्य प्रेरणा ही ख्रिश्चन शिकवणुकीत असली तरी दान तेथे धार्मिक राहिले नाही, तर समाजजीवन अधिक समृद्ध होण्यासाठी श्रीमंत लोक पैसा वाटत आले. तेथील चर्चेस आपल्या देवळांसारखीच भरगच्च देणग्या मिळवितात, पण त्याहून जास्त पैसा हा लोकांच्या भौतिक समृद्धीसाठी काम करणाऱ्या संस्था, शिक्षण संस्था व संशोधन संस्था यांना दिला जातो. स्वत:च्या मोक्षासाठी, स्वर्गातील जागा निश्चित करण्यासाठी किंवा इडा-पिडा टाळण्यासाठी नव्हे तर आजूबाजूच्या लोकांच्या भौतिक समृद्धीसाठी दान करणाऱ्यांची मांदियाळी तेथे उभी राहिली आहे.
याउलट स्थिती आपल्याकडे आहे. हिंदू धर्मातही दानाचे महत्त्व जागोजागी सांगितले आहे. वेद, पुराणे, महाभारत, संत वाङ्मय यात दानाचे गुणगान गाणारी वचने व गोष्टी कित्येक सापडतील. पण दान करण्याच्या क्रियेला आपल्याकडे संस्थात्मक स्वरूप आले नाही. मोक्षप्राप्तीचा एक मार्ग म्हणूनच दानाकडे पाहिले गेल्याने दान हे देवळांपुरते मर्यादित राहिले. आता परिस्थिती थोडी बदलत असली तरी आजही रुग्णालये, शाळा वा अन्य कोणत्याही भौतिक सोयीपेक्षा मंदिर वा उत्सवांसाठी पैसा जमा करणे कित्येक पटीने सोपे जाते. म्हणूनच ‘वर्ल्ड गिव्हिंग इंडेक्स’मध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर भारत ९१व्या स्थानावर. अमेरिकेत कंपन्यांपेक्षा कित्येक पट अधिक दान हे डेव्हिडप्रमाणे व्यक्तींकडून होते. जगाच्या तुलनेत दानशूर व्यक्तींची भारतात कमीच आहे. इस्लामी व आफ्रिकी देशही याबाबत भारताच्या पुढे आहेत.
मंदीच्या तीव्र झळा लागत असूनही जगात सर्वत्र दान देण्याचे प्रमाण वाढले आहे. मंदीमुळे पैशाची मदत थोडी घटली, पण पैसे न घेता काम करणे व अनोळख्यास सहज मदत करणे यामध्ये खूपच वाढ झाली. आज जगातील पन्नास टक्के लोक काही ना काही मार्गाने दुसऱ्याला मदत करतात, तर तीस टक्के लोक दुसऱ्यासाठी पैसा वा वेळ खर्च करतात.
हे लोक असे करतात कारण दानाची कृती आनंददायी आहे. हा आनंद थेट अनुभवता येतो. दुसऱ्याला मदत करण्याची कृती नकळत आपल्याला समृद्ध करून जाते. दुसऱ्याला देण्याने आपण गमावीत काहीच नाही, उलट आतून विस्तारतो, आतून श्रीमंत होतो. ही श्रीमंती पैशापेक्षा फार मोलाची असते. ही श्रीमंती ज्यांना जाणवते ते पुन:पुन्हा दान करतात आणि दानाचा आनंद उपभोगतात.
ही कविकल्पना नव्हे. असंख्य प्रयोगाअंती मानसशास्त्राने सिद्ध केलेला हा सिद्धांत आहे. स्वत:वर पैसा खर्च करण्याने अधिक आनंद मिळतो ही पूर्णपणे चुकीची समजूत असून स्वयंसेवी पद्धतीने केलेले काम ही समाधानी आयुष्याची किल्ली आहे, असे मानसशास्त्र म्हणते. सहज केलेली मदत पुढील कित्येक आठवडे मन प्रसन्न ठेवते. स्वत:वर खर्च केलेल्या पैशापेक्षा दुसऱ्यावर चांगल्या कामासाठी खर्च केलेला पैसा अधिक आनंद मिळवून देतो. स्वत:वर केलेल्या खर्चाच्या आठवणीपेक्षा दुसऱ्यासाठी केलेल्या मदतीची आठवण मनाला अधिक आनंद देते असेही प्रयोगातून दिसले. पैसा किती खर्च केला यापेक्षा तो कसा खर्च केला याच्याशी आनंदाचा थेट संबंध असतो. अर्थात हे सर्व निरागस, निरपेक्ष वृत्तीने व सहजगत्या केलेल्या मदतीबाबत खरे आहे. काही हेतू ठेवून केलेली मदत ही दान नव्हे. तो छुपा स्वार्थ असतो. तो कधीही आनंद देत नाही.
मानसशास्त्राचे हे निष्कर्ष मेंदूवरील संशोधनाने अधिक पक्के केले. काही गोष्टी करताना आपल्याला विलक्षण आनंद होतो, कारण सुखसंवेदना जागृत करणारी मेंदूतील केंद्रे त्या कृती करताना पूर्ण जागृत झालेली असतात. कुणी आपल्याला अचानक मदत केली वा कौतुकाची थाप मारली की आपण मनातून खुलतो ते या केंद्रांमुळे. आश्चर्याची बाब अशी की, दुसऱ्याला मदत करताना हीच केंद्रे जागृत होतात. मेंदूतील ‘प्लेझर सेंटर्स’ उद्दिपित करण्याची क्षमता दुसऱ्याकडून काही घेण्यात जितकी आहे तितकीच दुसऱ्याला काही देण्यामध्येही आहे. दुसऱ्याला मदत करण्याने मेंदू अधिक ताजातवाना होतो. कोणतीही अपेक्षा न धरता ही मदत केली असेल तर त्याला अधिकच आनंद होतो, असे ‘एमआरआय स्कॅनिंग’मध्ये दिसले. अचानक धनलाभ झाल्यास मेंदूतील जी केंद्रे कार्यान्वित होतात तीच निरपेक्ष मदत करताना होतात. दानाची क्रिया अशी देणारा व घेणारा या दोघांनाही आनंद मिळवून देते. यासंबंधींच्या प्रयोगांची मोठी जंत्रीच उपलब्ध आहे. त्यातही ओरेगॉन विश्वविद्यालयात डॉ. हरबॉग यांनी यासंदर्भात केलेले प्रयोग तसेच हार्वर्ड विश्वविद्यालयातील एलिझाबेथ डन यांचा ‘फिलिंग गुड अबाऊट गिव्हिंग’ हा शोधनिबंध शास्त्रीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.
मन आनंदी, प्रसन्न असले की दान करण्याची प्रवृत्ती वाढते. दान केले की मन आणखीनच प्रसन्न होते. हे वर्तुळ मग कायम काम करीत राहते. दुसऱ्याला केलेली लहानशी मदतही, मग ती कोणत्याही प्रकारची असो, तुम्हाला हा आनंद मिळवून देते. तुम्ही मदत किती करता यावर हा आनंद अवलंबून नसतो तर कशी करता व किती मनापासून करता यावर तो अवलंबून असतो. मन प्रसन्न नसेल तरी हरकत नाही, दानाची कृती करा, मन आपसूक प्रसन्न होईल आणि ही प्रसन्नता पुन्हा मदत करायला प्रेरणा देईल, हे विज्ञानाचे सांगणे आहे. तेव्हा प्रयोग करायला काय हरकत आहे?
डेव्हिडला स्वर्ग मिळाला की नाही हे कोणालाच माहीत नाही, पण दान देण्यातला रोकडा आनंद त्याच्या मेंदूला मिळाल्यामुळे थडग्यात तो समाधानाने निजला असणार. दानाचा आनंद सर्वासाठी खुला आहे. लुटावा तितका थोडाच.